My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

परफेक्शनची सुट्टी
माझा परफेक्शनीस्ट मित्र सुनील याला मी विचारले, तुझा दिवस कसा सुरु होतो? त्याने ताबडतोब उत्तर दिले.. व्यायाम!! मी म्हणालो, उत्तम! कसा करतोस व्यायाम? त्याच्या उत्तरादाखल त्याने सांगितले, अरे बाबा, त्यासाठी मी जवळपास एक लाख रुपये खर्च केलेत. डायटेशीयन आणि हेल्थ इन्सट्रक्टरची फी, तीस हजार रुपयांची सायकल, फिटनेस मॉनीटर करण्यासाठी ॲपल वॉच. ते मला माझ्या कॅलरीज, हार्टरेट, ब्लड शुगर याबाबत सारखे रीडींग देते. मी त्या अॅपल वॉचच्या आधारे परफेक्ट फिटनेस मेंटेन करतो. रोज सकाळी सायकल चालविणे जॉगींग करणे हे नियमाने सुरु असते. त्यात खंड नाही. माझे ॲपल वॉच माझ्या आय पॅडशी इंटीग्रेटेड असल्याने माझ्या हेल्थचे ग्राफीकल चार्टस् माझ्या आयपॅडमधे आताही आहेत मी दाखवू शकतो. मी त्याला म्हणालो, सुनिल रोज व्यायाम केला पाहिजे हे तर मान्यच आहे परंतू रोज सकाळी उठतोस तर एखाद्या दिवशी, सुंदर हवा सुटलेली असते, पहाटेच्या वेळी गार वाटणारी ती हवा आपल्या शरीराचा रोम रोम रोमांचित करीत असते. अश्यावेळी व्यायाम आणि सर्व ॲप वगैरे बाजूला ठेऊन शांतपणे रस्त्यातीलच एखाद्या बेंचवर बसून थंडगार हवा खाऊन बघितली आहेस का? एखाद्या वेळी अश्या प्रकारची तुझ्या परफेक्ट व्यायामाला दिलेली सुट्टी तुला खूप आनंद देऊन जाईल... आणि हो, यासाठी काही अतिरीक्त खर्च नाही बरे! सुनिल काही बोलला नाही. कदाचित त्याला माझे पटत होते. सुनील..., मी पुढे बोलू लागलो...
माणसामधे आणि यंत्रामधे जो फरक आहे तो क्रयशक्तीपेक्षा मनःशक्तीचा जास्त आहे. या मनःशक्तीमुळेच मानव हा जगातील कोणत्याही यंत्रापेक्षा सरस व बलवान आहे. क्रयशक्तीचा विचार केल्यास अनेकवेळा आपल्यापेक्षा गणिते संगणक जास्त वेगाने करु शकतो परंतू त्याच्यावरही आपलेच नियंत्रण आहे. बुद्धीच्या अफाट क्षमतेसोबतच आपल्याला सुंदर भावनांची देण देखील परमेश्वराने दिली आहे. त्याचा वापर करता आला तर मग त्या परफेक्शनला कशाप्रकारे मधून मधून सुट्टीवर पाठवायचे हे सुचू शकते. काय काय करता येईल रे सुनील आपल्याला? 
मुसळधार पाऊस पडत असताना, घराची दारे खिडक्या बंद करुन बसण्यापेक्षा मोकळेपणाने त्या पावसात चिंब भिजण्यासाठी बाहेर पडता येईल? भिजल्यावर तब्येत बिघडेल ही फार काळजी करण्यापेक्षा तापत्या उन्हामुळे होणारा अंगाचा दाह शमविण्याची क्षमता असलेल्या त्या मृगधारांना आपल्या शरीरावर झेलून थेट मनापर्यंत शांतता अनुभवता येऊ शकते. पावसाच्या पाण्याचा तो एकएक थेंब आपल्याला किती सुखावून जातो आणि म्हणूनच त्यास आपण बरेचवेळा अमृतवर्षा का म्हणतो याचा प्रत्यय प्रत्यक्ष पावसात भिजल्याशिवाय येऊ शकणार नाही. परंतू त्यासाठी तुला तुझ्या परफेक्ट शेड्यूलला एक दिवस रजा द्यावी लागते. लवकर निजे लवकर उठे... ही म्हण आपण नेहमीच ऐकत आलोय. त्यानुसार वागतोही. पण एखाद्या दिवशी रात्री ठरवून टिपूर चांदण्यानी भरलेल्या आसमंताखाली बसून बघितलेस का? रात्रीच्या वेळी तुझ्या सुंदर घराच्या गच्चीवर एकटाच.. त्या टीमटीमत्या ताऱ्यांनी व्यापलेल्या आभाळाचे अथांग विस्तिर्णपण, आजुबाजूला पसरलेली निःशब्द शांतता, त्या ताऱ्यांच्या गोड विळख्यामधे अडकलेली ती सुंदर चंद्रकोर, त्या नभोमंडळाच्या अनंतत्वाचे गुढ आपल्या मानवी संवेदनांना हळूहळू व्यापून टाकते, अश्यावेळी संपुर्णपणे एकटे असलेलो आपण आपल्या स्वतःलाच नव्याने भेटतो. अश्यावेळी कसलाही आणि कुणाचाही विचार आपल्या मनाला स्पर्श करु नये. केवळ आणि केवळ आपल्या स्वतःशी आपल्याला निवांतपणे भेटता येते व त्या मंत्रमुग्ध करणाऱ्या क्षणाला आपल्याला आपल्यातील त्या चिरंतन चेतनेची अनुभूती होते...परंतू यासाठीही आयुष्याची ठराविक व साचेबद्ध -लवकर निजे लवकर उठेची - चौकट एखाद्यावेळी तोडावी लागते..
खाण्यापिण्याच्या बाबतीतही तू किती परफेक्शन बाळगतो. बाहेर जेवायचे म्हणजे कॉन्टीनेंटल हॉटेलच तुला लागते. तेथील ते मंद संगीत, मंद दिवे, विशिष्ट मांडणीने ठेवलेल्या प्लेटस्, एक्सक्युज मी, कॅन आय गेट सम वॉटर प्लीज असली वाक्ये... सारे कसे मोजून मापून आखल्यासारखे. एखाद्या दिवशी त्या कँपरोडवरील चौकात एका बाजुला उभ्या असलेल्या पाणीपुरीच्या टपरीसमोर उभा राहा. गर्दीने वेढलेल्या त्या पाणीपुरी वाल्याला, भैय्या, एक प्लेट लगाना.. अशी ऑर्डर दे. मग त्याने हातात दिलेली प्लेट घेऊन त्याच्या बाजूने उभा रहा. त्याला प्लेटमधे कांदा माग. भैय्या खटाईके साथ देना..अशी सूचना कर. तुझ्यासमोर बढीया तो खास मसाला टाकून बनविलेले पाणी ढवळतो, पुरीमधे बटाटे व चणे घालून ते पाणी भरतो, वर थोडी खटाई टाकून ती चविष्ट पुरी तुझ्या प्लेट मधे ठेवतो. ती अख्खी पुरी जेव्हा तू तोंडात टाकतोस तेव्हा जिभेपासून तो थेट डोक्यापर्यंत ती चरमरीत चव सर्र करुन झिणझिण्या आणते...आणि सहजच तुझ्या तोंडून वाक्य निघते, क्या बात है.. त्याला खरा आनंद म्हणतात... जो मधून मधून घ्यायचा असतो. परंतू तो देखील घेण्यासाठी तुला तुझी कॉन्टीनेंटलची सवय जरा बाजूला ठेवावी लागेल. वाचनही काय करतोस रे तू आजकाल? सकाळी इकॉनॉमीक्स टाईम्स तुला वाचावाच लागतो कारण त्यामधून बदलते अर्थकारण तुला समजून घ्यायचे असते. याशिवाय राजकीय स्थित्यंतरे समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या पोलीटीकल थेअरीज देखील तुला वाचाव्या लागतात. एक मोठे कार्यालय चालवायचे म्हणजे शासनाचे नियम, अधिनियम, अधिसूचना इत्यादी बाबींचा तुझा अभ्यास सुरुच असतो. यासोबतच अनेक न्यायालयीन प्रकरणे तुला हाताळावी लागतात त्यामुळे त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या फाईल्स, वेगवेगळे न्यायालयीन निर्णय हे सारे तुला वाचावे लागते. हे वाचण्यात तुझा इतका वेळ निधून जातो की तुला बाकी इतर काही वाचायला वेळच नसतो किंवा आताशा असे काही वाचण्याची गरजही तुला वाटेनाशी झालीय, होय ना? पण कधीतरी वेळ काढून मी तुला दोन वर्षांपूर्वी भेट दिलेले तुझ्या माझ्या आवडत्या गुलजारचे पुस्तक 'रात पश्मीने की' उघड, बघ त्याच्या प्रत्येक पानावर तुला सुखावणाऱ्या आणि तुझ्या थकलेल्या मनाला प्रसन्न करणाऱ्या किती गोष्टी आहेत.. तू वाचशील... 
कल सुबह जब बारिश ने आ कर खिडकी पर दस्तक दी, थी
नींद मे था मै -- बाहर अभी अँधेरा था !
ये तो कोई वक़्त नही था, उठ कर उससे मिलने का !
मैने पर्दा खींच दिया ---
गीला गीला इक हवा का झोंका उसने
फूँका मेरे मुँह पर, लेकीन --
मेरी 'सेन्स ऑफ ह्युमर' भी कुछ नींद मे थी--
मैने उठ कर ज़ोर से खिड़की के पट उस पर भेड़ दिये--
और करवट ले कर फिर बिस्तर में डूब गया !
शायद बुरा लगा था उसको -----
ग़ुस्से में खिड़की के काँच पे
हत्थड़ मार के लौट गयी वह, दोबारा फिर आयी नहीं ---
खिड़की पर चटख़ा काँच अभी बाक़ी है !!
जीवनाची तुझी परफेक्शनची आवड मला मान्यच आहे, परंतू त्या परफेक्शनचे देखील तुला ओझे होत आहे. परफेक्शनमुळे तुला यश मिळाले व मिळते आहे परंतू जीवनाच्या यशस्वीपणाला निखळ आनंदाच्या पाठबळाची आवश्यकता असते, जो तुला तुझ्या परफेक्शनचा मार्ग काही काळ बाजूला सारुनच प्राप्त होऊ शकेल, कारण एक सांगू सुनील, आनंद देणारी ती गुलजारची बारीश एकदा गेली की परत येत नाही, उरतात केवळ - अफसोस करनेवाले काँच के टुकडे. वेळ निघून जाण्याआधी त्या आनंद पावसाला उराशी कवटाळून बघ आणि त्यासाठी तुझ्या परफेक्शन ला एखाद्या वेळी सुट्टी देऊन टाक..
 

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18