सैराट या चित्रपटावरील माझा समिक्षणात्मक लेख
सैराट- भानावर आणणारं येड
सैराट या चित्रपटाचा शेवटचा 'तो' एक मिनीट बघितला आणि चित्रपटगृहातील बरेचजण सुन्न झाले. कोणतेही पार्श्वसंगीत नसणारा, कोणतेही संवाद नसणारा तो एक शांत मिनीट पुढील कित्येक तास अस्वस्थ करीत राहीला...त्या मिनीटापर्यंत पोहोचतानाचा चित्रपटाचा प्रवासही तेव्हडाच रंजक आहे. मध्यंतराच्यावेळी आर्ची आणि परश्या एकमेकांचा हात धरुन गावातून पळून जातात. त्यांचे तश्याप्रकारे पळून जाणे मध्यांतरातच अनेक प्रश्न निर्माण करते. आता पुढे यांचे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी जेव्हा हा चित्रपट पुढे सरकतो तेव्हा नागराज मंजुळे या प्रतिभावान दिग्दर्शकाने राखलेली कलात्मक विलगता वाखाणण्यासारखी आहे. दिग्दर्शक विषयाची मांडणी करीत जातो व त्यानेच लिहीलेली कथा आपल्याला वास्तवाचे भान देत देत पुढे सरकत राहते. आपल्याही नकळत आपण स्वप्नांच्या दुनियेतून व्यावहारिकतेकडे जायला लागतो. विशेषतः या चित्रपटाच्या मूळ विषयाशी संबंधित असलेला तरुण वर्ग, ज्यांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतलाय, त्यांना देखील 'प्रेमाच्या' भावनेबद्दल व त्या तरल भावना प्रत्यक्षात आणताना सामोरे जाव्या लागणाऱ्या भयावह वास्तवाची जाणीव हा चित्रपट ठळकपणे करुन देतो. अर्थात मध्यंतरापर्यंत आर्ची व परश्याच्या प्रेमाची सैराट धावणारी गाडी वेगवेगळ्या रंगीबेरंगी क्षणांच्या सोबतीने खुलत जाते.
संपुर्ण ग्रामीण बाज जसाचा तसा वापरुन नागराज मंजुळेंनी ही प्रेमकहाणी रंगविली आहे. गावच्या पाटलाची व आमदार होऊ इच्छीणाऱ्या एका धनाढ्य शेतकऱ्याची मुलगी अर्चना व गावाच्या एका टोकाला झोपडीत राहून मासेमारीवर पोट भरणाऱ्या एका गरीब कोळ्याचा पोरगा परश्या यांची ही प्रेमकहाणी. अनेक हिंदी चित्रपटांमधे प्रेमातील अश्याप्रकारच्या सामाजिक स्थितींना दाखवून झालेले आहे. पण सैराटमधे या प्रेमकहाणीचा टेक मुळात ग्रामीण भागातील असल्याने त्याचे वेगळेपण पदोपदी जाणवते. याशिवाय यातील नायीका ही 'नव्या जमान्याची' या विशेषणाला सिद्ध करणारी आहे. ती बुलेट चालविते, इकतेच काय ट्रॅक्टर देखील चालविते. विहीरीत पोहणाऱ्या पोरांना हाकलून लावत मैत्रीणींसोबत पाण्यात उड्या मारते. परश्याच्या प्रेमात पडल्यावर त्याच्याकडे वेड लागल्यागत बघत राहते. तो तिची विनवणी करतो पण ती ऐकत नाही व त्याच्याकडे बघतच राहते. आर्चीचा हा बिनधास्तपणा प्रेक्षकांना देखील आवडतो व ते तिच्या वाक्यांना आणि असल्या अवताराला भरभरुन दाद देतात. परश्या आणि आर्चीच्या या प्रेमाला आणखी मोहक बनविण्यासाठी या चित्रपटातील सुरेल गाणी देखील कारणीभूत आहेत. अजय-अतुल या संगीतकार जोडीने यावेळी परत एकदा कमाल केलेली आहे. मोठमोठ्या परदेशी वाद्यवृदांची मदत घेऊन त्यांनी प्रत्येक गाणं अप्रतिम बनविलेलं आहे. या गाण्यांमधील विशेषत्वाने व्हायोलीनच्या सिंफनीचा केलेला वापर वाखाणण्यासारखा आहे. अजय गोगावलेच्या आवाजातील येड लागलंय हे गाणं तर आर्ची आणि परश्याच्या प्रेमातील वेडेपण आपल्यापर्यंत अचूक पोहोचवितं. तरुण वयातील ते सारं मन अलगद हलकं करणारं ते प्रेम क्षणभर आपल्यालाही वेडं करतं. सध्याच्या काळात प्रेमाची स्वप्ने बघणाऱ्या व प्रेमासाठी मोबाईलचा भरपुर वापर करणाऱ्या तरुण पिढीच्या मनाला भावतील अश्या सर्व बाबी दिग्दर्शकाने दाखविलेल्या आहेत. हे करीत असताना या वयाच्या मुला मुलींमधे असलेले शारिरीक आकर्षण देखील दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचा प्रेक्षकांवर होणाऱ्या परीणामाचे समिक्षण करता हा प्रकार टाळता आला असता असे वाटते. कारण चित्रपटाच्या उत्तराधात या स्वप्नाळू प्रेमाचे वास्तव रुप या पिढीच्या मनाला भावताना दिसत नाही. चित्रपटाचा स्वप्नाळू पुर्वार्ध तरुणांसाठी आणि सुन्न करणारे वास्तव दर्शन या अल्लड वयाच्या पुढील प्रेक्षकांसाठी अशी सरळ सरळ विभागणी झालेली दिसते. या स्वप्नाळू प्रेमाच्या भविष्यातील अवस्थेली मात्र ही पौंगडावस्थेतील पिढी गांभिर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळेच दिग्दर्शकाने बारकाईने मांडलेले आर्ची व परश्याचे प्रेमच डोक्यात ठेवले जातेय. अर्थात हा दिग्दर्शकाचा दोष नसून सध्याच्या बदललेल्या वातावरणाचा परीणाम आहे. प्रेम व त्यानंतर त्याची परीणीती विवाहात करण्याचा विचारच तर हळू हळू कालबाह्य होतोय. त्यामुळे दिग्दर्शक जो काही संदेश देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तरुण वर्ग मात्र पुर्वार्धातील आर्ची-परश्याच्या प्रेमाच्या 'झिंगाटातून' बाहेरच पडलेले नसतात. त्यामुळे त्या दोघांमधील शारिरीक आकर्षण देखील प्रेमाचा एक अविभाज्य भाग असेच स्विकारले जात आहे. अर्थात हा सारा भाग दिग्दर्शकाने संयम बाळगूनच दाखविला आहे. काही ठिकाणी या दृष्यांवर अश्लिलतेचा आरोप केला जातोय पण वस्तुस्थिती ती नाही. या दृष्यांपेक्षा जास्त विकृतीचे व कामुकतेचे दर्शन घडविणाऱ्या अनेक पर्फ्युम्सच्या जाहीराती आपण कुटुंबासोबत एकत्रीत बसून बघत असलेल्या मालिकांच्या दरम्यान सर्रास बघत असतो. चित्रपटाबाबत अडचण एव्हडीच आहे की तरुण वर्ग तेव्हडाच भाग लक्षात ठेवतो आहे. कारण या चित्रपटात अश्या स्वप्नाळू प्रेमाची परीणिती विवाह व आयुष्यभराच्या सोबतीमधे करावयाची असल्यास कोणकोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते या बाबी समजण्याची गरज आहे. चित्रपटाचा उत्तरार्ध त्या चटके देणाऱ्या जीवनाची ओळख पटवून देतो.
आर्ची आणि परश्या हातात हात धरुन पळून एका शहरात पोहोचल्यावर त्यांची अवस्था या चित्रपटातील वास्तवाचा प्रवास मांडते. पदोपदी लागणारा पैसा, हॉटेलमधे राहण्यासाठी लागणारे आयडी प्रुफ, बसस्थानकावर काढावी लागणारी रात्र, त्यातच आर्चीवर पडलेली मवाल्यांची नजर, महालासारख्या मोठ्या घरातून थेट एका झोपडपट्टीतील अडगळीच्या खोलीपर्यंत पोहोचलेली आर्ची, तेथील परसरलेले घाणीचे साम्राज्य, सार्वजनिक स्वच्छतागृहे या सारख्या अनेक समस्या तिला सहन कराव्या लागतात. स्वप्नवत प्रेमाचा बहर ओसरल्यावर चरितार्थ चालविण्यासाठी करावी लागणारी धडपड हा सर्व वास्तववादी भाग देखील चित्रपटात फार बारकाईने टिपला आहे. मुख्य म्हणजे प्रेमाचा स्वप्न प्रवास ते रखरखीत जीवन यामधे दिग्दर्शकाने स्वतःचे मत न मांडता तटस्थपणे या साऱ्या बाबी प्रेक्षकांच्या आकलनासाठी व अंमलबजावणीसाठी सोडून दिलेल्या आहेत. हेच या चित्रपटाचे बलस्थान आहे. कारण जीवनाच्या या अनंत अडचणीचा सामना केल्यानंतर हे दोन जीव आपल्या समाधानी जीवनाची उभारणी करु लागतात आणि तेव्हड्यात चित्रपट त्या शेवटच्या एका मिनीटाला येऊन पोहोचतो. तेथे या प्रवासाच्या शेवटाला अनेक प्रश्न उपस्थित करुन दिग्दर्शकाने चित्रपट थांबवलाय. झींग झींग झिंगाटच्या भन्नाट प्रेम प्रकरणापासून हा चित्रपट शेवटी एका महत्वाच्या सामाजिक समस्येला आपल्यापुढे मांडतो व आपल्याला सुन्न करुन थांबतो.
सैराट चित्रपटाच्या मांडणीमुळे हा चित्रपट ज्या दोन भागात विभागला गेलाय त्या दोन्ही भागांकडे जिवन समजून घेण्याच्या भूमिकेतून बघण्याची गरज मात्र आहे. म्हणूनच तरुणांना काही प्रमाणात हा चित्रपट कसा बघावा व त्यामधून नेमके काय उचलावे हे सांगितल्या जायला हवे. याचे महत्वाचे कारण ज्या वयातील प्रेम या चित्रपटाचा आधार आहे त्या वयात वास्तवाचे भानच नसते व म्हणूनच हा चित्रपट भानावर आणणारं येड ठरतो जर भानावर येण्याची तयारी असेल तर.
या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सोशल मिडीयामधे वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटल्या. अगदी हा चित्रपट मांजरेकर व पिळगावकरांना चपराक वगैरे पद्धतीच्या. काहीही करुन प्रत्येक गोष्टीला जातीशी बांधण्याची आपल्या देशातील वाईट सवय याही बाबतीत ठळकपणे पुढे आली. परंतू या गोष्टींमुळे आपण नागराज मंजूळेंच्या कलासादरीकरणाचीच किंमत कमी करतोय हे या काहींना कळत नाही. मांजरेकर किंवा पिळगावकर यांनी आपल्या क्षमतेनुसार कलेच्या सादरीकरणाची एक रेष ओढली आहे. नागराज मंजुळेंनी त्या रेषांचा सन्मान ठेऊन आपली त्यापेक्षा मोठी रेष काढली असे म्हणल्यास जास्त संयुक्तिक ठरेल. कला ही साधना असते व ती जाती पाती बघून प्रसन्न होत नाही तर ती केवळ कठोर परीश्रम करणाऱ्या पिळगावकर, मांजरेकर तसेच नागराज मंजुळेंना प्रसन्न होते. आपण रसिकांनी कला सादर करणाऱ्याची जात बघू नये तर त्याच्या किंवा तिच्या सादरीकरणाची पोत बघावी कारण कलाक्षेत्रात त्यालाच मान आहे व त्याचाच टिकाव लागतो. एका प्रतिक्रीयेमधील एक शब्द मला महत्वाचा वाटतो. त्यात असे लिहीले होते की, सैराट हा चित्रपट 'डीकास्ट' होऊन बघावा म्हणजे तो मनाला भावतो. खरे तर हा चित्रपट आपल्याला 'डीकास्ट' होण्याच्या स्थितीकडेच नेणारा आहे. जातीपातींच्या जोखडांच्या ओझ्याखाली अजूनही आपण जीवनातील माणुसपणाची सच्चाई जपण्यास असमर्थ ठरतोय. हा चित्रपट आपल्याला त्याबद्दल गांभिर्याने विचार करायला लावतो तसेच प्रेमाच्या भावनेची दोन्ही रुपे दाखवितो. जातीपातींच्या बंधनातून मुक्त असलेल्या समाजनिर्मितीच्या विचारांना बळकटी देण्यासाठी आवश्यक त्या प्रबोधनासह 'सैराट' जरुर बघावा.. सोबतच यातील प्रेमाचं येड हे भानावर आणणारं आहे हे देखील समजून घ्यावे.
- डॉ. अविनाश मोहरील, अमरावती / संवाद: ९४२३१२३९०६
,सुंदर परीक्षण!
ReplyDelete