थोडा है थोडे की जरुरत है @ 15.05.18
कटींग चाय मुंबईच्या अत्यंत सुंदर अश्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे ४ वाजता मी एका दुकानाची पाटी वाचून जरासा थबकलो . या आधीच्या विमानप्रवासांच्या वेळी मला हे दुकान दिसले नव्हते . यावेळी ते नव्याने सुरु झालेले दुकान होते . त्या दुकानाची पाटी व त्यावरील अक्षरे फार विशेष होती . त्या अक्षरांना वाचूनच मी त्या दुकानाकडे गेलो . दुकानाचे नाव होते कटींग चाय . नागपूरला जाण्यासाठी एयर इंडीयाचे सकाळचे फ्लाईट असल्याने मला झोप टाळण्यासाठी चहा पिण्याची इच्छा झाली . दुकानाच्या काऊंटरवर गेल्यानंतर तेथे सारे विशेष होते . वेगवेगळ्या प्रकारचे चहा तेथे एका शो केसमधे ठेवलेले होते . दुकानात सारे काही सुंदर पद्धतीने रचलेले होते . खास गणवेष घातलेली काही मंडळी तेथे काम करीत होती . ऑर्डर देण्यासाठी रांग लागली होती . मी आपला रांगेत लागलो . माझ्यासमोर साधारण दहा लोक रांगेत होते . रांग पुढे पुढे सरकत होती . माझे मन मात्र ती त्या दुकानाची पाटी कटींग चाय बघून भूतकाळात जाऊ लागले . मागे जात जात त...