थोडा है थोडे की जरुरत है @17.03.19
थप्पड त्या दिवशी तो चित्रपट बघताना मी स्वतःला एक प्रश्न विचारण्यास बाध्य झालो . पहिल्यांदा असे झाले की अश्या पद्धतीच्या एका प्रश्नाचा मी चित्रपटाच्या कथानकासोबतच विचार करु लागलो . चित्रपटातील त्या घटनेसोबत तो प्रश्न माझ्या मनात तयार झाला . तणावाच्या व अवहेलनेच्या एका स्थितीमधे , बाॅससोबत होणाऱ्या भांडणादरम्यान , मधे येऊन त्या भांडणातून बाजूला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीला तिच्या पतीने रागाच्या भरात मारलेली एक थापड एकमेकांपासून घटस्फोट घेण्याचे कारण ठरु शकते का ? सारा संसार हसत खेळत सुरु असताना , तो घरासाठी कार्यालयीन कामात भरपूर मेहनत घेत असताना , ती गृहिणी म्हणून त्याचा संसार मनापासून सांभाळत असताना , घरची सारी कामे जसे , स्वयंपाक करणे , झाडांना पाणी घालणे , सासुची शुगर टेस्ट करणे , नवऱ्याच्या सर्व वस्तू सांभाळणे , तो कार्यालयात जाताना त्याच्या हातात पाण्याची बाॅटल व पैश्याचे पाकीट देणे ही सारी कामे ती मनापासून करताना , फावल्या वेळात तिच्या नृत्याची हौस एका मुलीला न...