थोडा है थोडे की जरुरत है @17.03.19

थप्पड

त्या दिवशी तो चित्रपट बघताना मी स्वतःला एक प्रश्न विचारण्यास बाध्य झालो. पहिल्यांदा असे झाले की अश्या पद्धतीच्या एका प्रश्नाचा मी चित्रपटाच्या कथानकासोबतच विचार करु लागलो. चित्रपटातील त्या घटनेसोबत तो प्रश्न माझ्या मनात तयार झाला. तणावाच्या अवहेलनेच्या एका स्थितीमधे, बाॅससोबत होणाऱ्या भांडणादरम्यान, मधे येऊन त्या भांडणातून बाजूला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीला तिच्या पतीने रागाच्या भरात मारलेली एक थापड एकमेकांपासून घटस्फोट घेण्याचे कारण ठरु शकते का? सारा संसार हसत खेळत सुरु असताना, तो घरासाठी कार्यालयीन कामात भरपूर मेहनत घेत असताना, ती गृहिणी म्हणून त्याचा संसार मनापासून सांभाळत असताना, घरची सारी कामे जसे, स्वयंपाक करणे, झाडांना पाणी घालणे, सासुची शुगर टेस्ट करणे, नवऱ्याच्या सर्व वस्तू सांभाळणे, तो कार्यालयात जाताना त्याच्या हातात पाण्याची बाॅटल पैश्याचे पाकीट देणे ही सारी कामे ती मनापासून करताना, फावल्या वेळात तिच्या नृत्याची हौस एका मुलीला नृत्य शिकवून भागवताना, एकूण गुण्यागोविंदाने संसार सुरु असताना अचानक घडलेला हा वर उल्लेखित थापड मारण्याचा प्रसंग त्या दोघांमधील घटस्फोटाचे कारण बनू शकतो का? झालेल्या घटनेबद्दल तो तिची माफी मागत नाही कारण त्याला ती गोष्ट फार मोठी वाटत नाही. कारण कदाचित रागाच्या भरात त्याच्याकडून घडलेली ती कृती होती, कदाचित त्या बाॅसवरचा राग त्या क्षणी बायकोवर निघाला आणि अश्यावेळी आपल्या जवळच्या व्यक्तीवरच निघतो ना राग? त्यामुळे त्याला त्याचे फार काही वाटले नाही. त्यालाच काय परंतू त्यांच्या संपर्कातील अनेकांना, अगदी तिच्या जन्मदात्या आईला देखील असेच वाटले की गोष्ट वाईट घडली परंतू घडून जाते. तो एक अपघात होता म्हणून विसरून पुढे चालायला हवे. असे घडायला नको, परंतू आता रागाच्या भरात घडले तर त्याला काय करावे. परंतू ती घटना घटस्फोटापर्यंत पोहोचावी का? हा मुलभूत प्रश्न मला तो चित्रपट बघताना जाणवित होता. आपल्या माणसांच्या बाबत झाले गेले विसरुन पुढे चालायचे हेच आपल्याला पुर्वापार सांगितल्या गेले ना? कारण अश्या गोष्टींवरुन जर एकदम अशी टोकाची भूमिका घेतल्या गेली तर मग जगणेच कठीण होईल असेच आपल्याला सांगितले जाते ना? मी देखील असे सांगितले जाणाऱ्या पिढीचाच असल्याने, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास थप्पड नावाच्या या चित्रपटात दाखविलेली ती घटना जरी वाईट असली तरी ती थेट घटस्फोटापर्यंत पोहोचावी असे मला देखील अजिबात वाटत नव्हते. मीच काय परंतू आतापर्यंत मी जे लिहीले त्यावरुन बऱ्याच वाचकांनाही असेच वाटले असेल की खरेच आहे, घटना घडू नये अशीच असली तरी एकदम घटस्फोट? हे नाही बरोबर! परंतू हा चित्रपट जसा जसा पुढे सरकायला लागतो तसा तसा त्या मुलीच्या संपर्कातील एक एक व्यक्ती बदलायला लागतो, त्याचा त्या प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू लागतो आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचे हे यश आहे की चित्रपट बघणारे देखील त्या घटनेकडे एका वेगळ्या भूमिकेतून बघायला लागतात आणि चित्रपटातील पुढील घटनांसोबत आपला देखील बदललेला दृष्टीकोन आपल्याला निश्चितच आनंद प्रदान करतो.

सार्वसाधारणपणे आपण सर्व, काही मोजके अपवाद वगळता या घटनेबद्दल दुःख व्यक्त करतो जिच्या बाबत हे घडले तिच्याप्रती सहानुभूती दाखवून झाले गेले विसरायलाच सांगतो. कारण ज्या सामाजिक कौटुंबिक पद्धतीमधे आपण सर्व मोठे झालो तेथे असल्या अनेक घटना होत असताना देखील संसार संपविणे घटस्फोट घेणे ही सहज स्विकारणारी बाब आजही नाही. परंतू तापसी पन्नू या अत्यंत गुणी अभिनेत्रीने वठविलेली अमृता जेव्हा हे समजवायला लागते की त्यादिवशी सर्वांसमोर माझ्या नवऱ्याने माझ्या गालात मारलेली थापड म्हणजे नेमके काय होते तेव्हा मात्र आपण तिच्या बाजूने निदान विचार करण्याचा प्रयत्न करु लागतो. ती थापड म्हणजे तिच्या स्त्रीत्वाच्या आत्मसन्मानाचा अपमान होता. ती थापड म्हणजे तिच्या मनापासून प्रेम करण्याच्या सत्शील वृत्तीचा अपमान होता. ती थापड म्हणजे गृहिणी म्हणून तिला कोणत्याही प्रसंगी गृहित धरता येणार नाही या नव्या काळातील नववैचारिक मनोभूमिकेचा पराभव होता. संसार हा दोघांचा असतो आणि तो एकमेकांना सन्मान देऊन टिकवत असताना ती जबाबदारी पुरुष स्त्री या दोघांचीही समसमान आहे त्याच भूमिकेतून दिल्या जाणाऱ्या समानतेच्या सहकार्याच्या भूमिकांची पायमल्ली करणारी होती ती थापड. अजूनही पटत नसणारच, कारण रागाच्या भरात नवऱ्याकडून मारल्या गेलेली थापड म्हणजे इतके सारे काही आहे ही बाब देखील समजून घ्यायला जरा जडच आहे. घटना वाईट घडली याबद्दल कुणाचेही दुमत नसताना त्याचा परीपाक म्हणजे थेट घटस्फोट? चित्रपटातही अमृताला तिच्या आसपासच्या जिवाभावाच्या लोकांना हे सांगावे लागते. पण कुणालाही ते पटत नाही. काही मंडळी मात्र तिच्या पाठीशी ठामपणे उभ्या असतात ज्यात तिची वकील, तिच्या भावाची बायको आणि तिचे वडील. बाकी सर्व मंडळी तिला इतके तर चालतच असते किंवा एवढ्याश्या गोष्टीचे एवढे काय? असे म्हणूनच बोल लावत असतात. चित्रपट बघताना आपल्याही मनाची अशीच अवस्था असते. कधी आपण अमृताच्या बाजूने असतो तर कधी तिला समजावणाऱ्यांच्या बाजूने. मुळात हे याकरीता होत असते की अमृताला मारलेली थापड वाईट होती हे पटले असतानाही आपल्याही मनावर पिढ्यान पिढ्या झालेल्या संस्कारांची पद्धत आपल्याला चटकन अमृताची बाजू समजूच देत नाही. परंतू चित्रपटाच्या उत्तरार्धात जेव्हा कोर्टाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु होण्याची स्थिती निर्माण होते तेव्हा मात्र अमृता या सर्व प्रकाराबद्दल बोलते. सर्वांसमोर मारलेली ती थापड, जरी सर्वांनाच एवढी जास्त ताणू नये असे वाटत असली तरी ती थापड म्हणजे एका वेगळ्याच गोष्टीचा शोध करुन देणारी होती असे ती सांगते.

अमृता म्हणते, मला तुम्ही सारे जगाच्या ठराविक साच्याच्या विरोधात विचार करणारी म्हणालात तरी चालेल परंतू सर्वांसमोर माझ्या नवऱ्याने मला मारलेली थापड म्हणजे आमच्या नात्यात प्रेमच नाही याची जाणिव करुन देणारी होती. रात्रभर मी तळमळत असताना सकाळी उठल्यावर आधल्या दिवशी मला लगावलेल्या थापडी बद्दल चकार शब्द काढणारा नवरा जेव्हा स्वतःच्याच मूड बद्दल बोलायला लागला तेव्हा लक्षात आले की या संसाराच्या प्रवाहात कर्तव्यपूर्तीचाच भाग जास्त आहे. प्रेम नाही. तुम्ही सारे मला म्हणाल की प्रेम म्हणजे वेगळे काय असते? सहवासातून, एकमेकांसोबत राहून, नवरा बायकोमधे प्रेम निर्माण होतेच. परंतू असे मानणे म्हणजे स्वतःची केलेली फसवणूक आहे. ते प्रेम नव्हे, ती केवळ ॲडजस्टमेंट असते. नवऱ्याच्या आणि त्याच्या परीवाराच्या सर्व गरजा पूर्ण करण्यात स्वतःला धन्य मानून त्यातच आनंद शोधणारी मी इतरांप्रमाणे त्यालाच प्रेम समजली होती. परंतू सर्व लोकांसमोर गालावर थापड खाल्ल्यावर माझ्या लक्षात आले की आमच्या नात्यात प्रेमच नाही. कारण प्रेम हे सांभाळण्यात असते, मन जपण्यात असते, पाठबळ देण्यात असते, स्वतंत्र विचारांना प्राधान्य देण्यात असते, मानसिक सुरक्षितता प्रदान करण्यात असते, काळजी करु नकोस, मी आहे हे सांगण्यात असते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रेम सन्मान करण्यात असते. माझ्या नवऱ्याने कदाचित रागाच्या भरात मला थापड लगावली असेल परंतू त्याने जे केले त्याचे त्याला काहीही वाटू नये किंवा इतरांनाही ती गोष्ट फार मोठी नाही तर विसरुन जाण्यासारखी आहे असे वाटावे ही बाब मला खटकणारी आहे. त्या थापडीचा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने अर्थ काढला परंतू माझ्या दृष्टीने त्याकडे कुणीही बघितले नाही म्हणूनच मला त्या माणसासोबत रहायचे नाही. मला त्याच्याकडून कपर्दिकही नको, जे त्याने द्यायला हवे होते ते देण्यास तो असमर्थ ठरलाय, माझा सन्मान. तो त्याने दिल्यामुळे मला घटस्फोट हवाय. त्याने मला थापड मारली म्हणून हवाय. त्याच कारणासाठी हवाय. कारण काहीही झाले तरी तो मला थापड मारु शकत नाही. एकही नाही, कधीच नाही

अमृताच्या या विचारांबद्दल ठामपणे तिच्या बाजूने मत मांडणे चित्रपट संपेपर्यंत किंवा त्यानंतरही कठीण जाते. एक मात्र नक्की, आधुनिक काळात नात्यातील प्रेमाचा आधार आता कर्तव्यासोबत एकमेकांचा सन्मान हा देखील बनलाय, आणि ही एक चांगली बाब आहे, होय ना?




Comments

  1. संसार रुपी रथाची चाके म्हणजे स्त्री,पुरुष, आहेत हे कालबध्द सत्य आहे मात्र सद्य स्थितीत बदललेली आहे स्त्री शिक्षण आणि संशोधन या मुळे तिच्यात परिवर्तन झाले, संस्कार टी जपते पण अस्तित्वाला अधिक महत्त्व देते , आजच्या स्त्री चे अस्तित्व, सन्मान करणे कुटुंबात गरजेचे आहे ,एक कौटुंबिक समस्या दर्शक, स्त्री प्रतिमा प्रकाश टाकणारा लेख वाचायला मिळाला,आपले अभिनंदन 💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय, डॉ. संगीता जवंजाळ मॅडम.. अगदी योग्य लिहिलंय तुम्ही..

      Delete
    2. सांसारात स्त्री चा सन्मान ही बाबच लोकांना विचित्र वाटते । तीच्या बाबत सगळ्या ची भूमिका नेहमी taken for granted असते ।। उत्तम विषय निवडला सर आपण ।

      Delete
  2. छान विषय निवडला तुम्ही सर आज पुरुषांना ही समजणे खूप गरजेचे आहे स्त्री चे अस्तित्व आहे, ती संसारात सर्व तडजोड करायला तयार असते पण तिच्या स्वाभिमान दुखावल्या जाणार नाही ही खूप आवश्यक आहे..

    ReplyDelete
  3. Yes, absolutely right every women desrve first respect and then love.

    ReplyDelete
  4. खरं बोललात. चित्रपट संपल्यानंतरही अमृताच्या बाजूने विचार करत ठाम राहणे कठीण आहे पण ती गरज सुध्दा आहे. कोणत्याही नात्यामध्ये एकमेकांचा आदर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पण मी पहिल्यांदा एका पुरुषाची या चित्रपटवरची अशी पोस्ट लिहिलेली वाचतेय,आणि त्यासाठी तुमचं अभिनंदन.

    ReplyDelete
  5. नवीन विचार हा काळानुसार रुजवायलाच पाहिजेत. छान शब्दांकन..

    ReplyDelete
  6. अगदी बरोबर sir स्त्रियांचा सन्मान krutitun आणि वागण्यातून सुध्दा करायलाच पहिजे .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18