थोडा है थोडे की जरुरत है @ 23.10.18
आय सी यु च्या बाहेरचा बेंच मोठाच अपघात होता तो . नकळत घडलेला परंतू तिचे सारे जीवन ढवळून काढणारा . सायंकाळी नवरा घरी आल्यावर त्याला सांगायची कामे तिने कागदावर लिहून ठेवली होती . सारी कामे कागदावर लिहून ठेवायची तिच्या बाबांनी लावलेली सवय कधी कधी हास्याचा व टिंगलीचा विषय ठरायची . परंतू गोष्टी विसरायला नको म्हणून ती देखील कुणाचीही तमा न बाळगता कामे लिहीलेल्या चिठ्ठ्या सोबत बाळगायची . त्या दिवशी नवऱ्याला जरा जास्तच उशीर झाला म्हणून मनातली शंका खरी ठरली . बाजुचे काका सांगत आले की , हरीशला कार्यालयातून येताना मोठा अपघात झाला , त्याच्या गाडीला एका भरधाव वाहनाने धडक दिली व त्याला जखमी अवस्थेत एका मोठ्या रुग्णालयाच्या आय सी यु मधे भरती केलेय व तिला ताबडतोब तिकडे जायला हवे . आता जरावेळाने आपल्या पतीसोबत बाहेर जायच्या तयारीत असलेल्या तिला होती त्या स्थितीमधे धावत निघावे लागले . मनात नाही नाही त्या शंका येत होत्या , प्रत्यक्ष त्याला बघत नाही तोपर्यंत जीव थाऱ्यावर नव्हता...