थोडा है थोडे की जरुरत है @ 05.06.18
अवरोह त्या दिवशी ती अतिशय खिन्न होती . काहीतरी झालेय हे माझ्या लगेच लक्षात आले . माझ्याजवळ मन मोकळे करायला तिला आवडते आणि ते मला देखील तितकेच आवडते . संगीत हा समान आवडीचा विषय असल्याने तिच्या त्या वेदनेचा प्रत्येक सूर मला लक्षात आला . कदाचित ती जे बोलत होती ते तिच्या वयाच्या बऱ्याच स्त्रीयांचे प्रतिकात्मक रुदन होते . स्त्रीयांचे कशाला काही प्रमाणात ते पुरुषांनाही लागू पडणारेच होते . अर्थात स्त्रीयांच्या बाबतीत त्याची तीव्रता जास्त असते , पण साधारण चाळीशीतील प्रत्येकाला ती बाब लागू पडणारी आहे . जीवन जगत असताना चाळीशीचा एक टप्पा असा येतो की त्यावेळी ती म्हणाली तसे विचार मनात येतात आणि स्वाभाविकपणे त्या विचारांना व्यक्त करण्याची देखील गरज असते . जीवनाच्या मार्गक्रमणावरील सर्वात महत्वाच्या जबाबदारी काही प्रमाणात पूर्ण होणारा हा काळ , संसाराचा व्याप सांभाळताना आपले स्वतःचे अस्तित्व संपूर्णपणे समर्पित करुन विसरल्यावर ते अस्तित्व आहे याची पुन्हा जाणीव करुन देणारा हा काळ...