थोडा है थोडे की जरुरत है @ 05.06.18

अवरोह

त्या दिवशी ती अतिशय खिन्न होती. काहीतरी झालेय हे माझ्या लगेच लक्षात आले. माझ्याजवळ मन मोकळे करायला तिला आवडते आणि ते मला देखील तितकेच आवडते. संगीत हा समान आवडीचा विषय असल्याने तिच्या त्या वेदनेचा प्रत्येक सूर मला लक्षात आला. कदाचित ती जे बोलत होती ते तिच्या वयाच्या बऱ्याच स्त्रीयांचे प्रतिकात्मक रुदन होते. स्त्रीयांचे कशाला काही प्रमाणात ते पुरुषांनाही लागू पडणारेच होते. अर्थात स्त्रीयांच्या बाबतीत त्याची तीव्रता जास्त असते, पण साधारण चाळीशीतील प्रत्येकाला ती बाब लागू पडणारी आहे. जीवन जगत असताना चाळीशीचा एक टप्पा असा येतो की त्यावेळी ती म्हणाली तसे विचार मनात येतात आणि स्वाभाविकपणे त्या विचारांना व्यक्त करण्याची देखील गरज असते. जीवनाच्या मार्गक्रमणावरील सर्वात महत्वाच्या जबाबदारी काही प्रमाणात पूर्ण होणारा हा काळ, संसाराचा व्याप सांभाळताना आपले स्वतःचे अस्तित्व संपूर्णपणे समर्पित करुन विसरल्यावर ते अस्तित्व आहे याची पुन्हा जाणीव करुन देणारा हा काळ, इतरांसाठी स्वतःला झोकून दिल्यावर माझ्यासाठीही मी असायला हवे याचे भान निर्माण करणारा हा काळ, संसाराचे सारे व्याप सांभाळताना त्यासाठी आयुष्यातील अनमोल काळ देताना मला देखील हे आयुष्य एकदाच मिळणार आहे याची जाणीव करुन देणारा हा काळ, आयुष्याचा आरोह जबाबदाऱ्यांची पूर्तता करता करता अचानक आपल्याही आयुष्याचा अवरोह सुरु झालाय याची आठवण करुन देणारा हा काळ. याच संदर्भात ती बोलत होती, खूप वेळ आणि मी शांतपणे ऐकत होतो.

ती म्हणाली, खरच आता अवरोह सुरु झालाय. आरोहात जग फारच वेगळे होते. तारुण्य होते, उमेद होती, काहीही अन् कितीही सहन करण्याची ताकद होती. आद्य षड्जापासून सुरुवात झाली तरी तार षड्जापर्यंत मजल मारायचे ध्येय होते आणि त्याच बळावर एकेक सूर लावत आयुष्याची वाटचाल करायला सुरुवात केली. अनेक चांगल्या वाईट प्रसंगांना तोंड देताना जीवनाच्या आरोहात कधी कधी अनेक आवडत्या गोष्टी वर्ज्य कराव्या लागल्या. एकेक सूर आळवीत आता निषादापर्यंत पोहोचलेय अन् आता मात्र षड्ज लागेल असे वाटत नाही. कारण परतण्याची वेळ झाली. इच्छांना बाजूला सारुन कर्तव्यांच्या मागे धावत धावत आयुष्याच्या मध्यावर कधी येऊन पोहोचले ते कळलेच नाही. अाणि आता अश्या काही स्थितीत पोहोचलेय की पुढे जाता येत नाही आणि मागे फिरण्याची इच्छा होत नाही. कितीही रंगामागे लपविण्याचा प्रयत्न केला तरी एखादा पांढरा केस जाणीव करुन देतो की अवरोह सुरु होतोय. पूर्वीसारखा जोर मनात असला तरी शरीरातील त्राण कमी होतोय. दमायला होते. पूर्वी घरी २० लोकांचा स्वयंपाक लिलया बनवणारी मी, आता दोन लोक जेवायला येणार तर दडपण येते. पाठीतून अचानक निघणारी कळ आठवण करुन देते तरुणपणी केलेल्या ट्रेकींगची, आता एक छोटी टेकडी चढताना दमछाक होते. अन् शरीरात तर अंतःस्त्रावी ग्रंथी काय घोळ घालत आहेत ठाऊक नाही. घटकेत चिडायला होते, घटकेत खूप राग येतो, खूप निराश वाटते तर कधी अचानकच आनंदाला उधाण येते. जाणवतंय, अवरोह सुरु झालाय. पण हे काय? अजून षड्ज तर लागलाच नाही. पूर्णत्व, पूर्णत्वाचा आनंद अपूराच आहे. सर्व इच्छांची पूर्तता होण्यापूर्वीच अवरोह सुरु झाला. निषादापासून षड्जापर्यंतचे थोडेसे अंतर कापता आले नाही. धडपड खूप केली पण, जमले नाही. असो.

पण हा अवरोह देखील मी मनापासून जगायचे ठरवले आहे. निषादापासून परतताना षड्ज लागल्याची खंत मनात आहे. पण हरकत नाही. आरोहात जे वर्ज्य केले होते ते सारे अवरोहात करताना एकेक सूर उतरत आनंद घ्यायचा आहे. आता मात्र इच्छा एकच आहे, तार सप्तकातील षड्ज जरी लागला नाही तरी अवरोहात मात्र षड्जानंतरच सम यावी. मनाला स्पर्शून गेलेले हे शेवटचे वाक्य उच्चारता क्षणी तिच्या डोळ्यातून अलगद अश्रू ओघळले. स्वाभाविकच होते. अंतस्थ मनाचे ते प्रकटीकरण असल्याने डोळ्यातील अश्रुंना ती तरी किती वेळ थांबवणार? शांतपणे तिच्या हातावर हात ठेऊन मी काही वेळ थोपटत राहीलो. तिला देखील त्यावेळी मी काही बोलावे असे अजिबात अपेक्षित नव्हते. माझ्या हाताचा स्पर्श तिला सारे काही सांगत होता. आज पहिल्यांदाच तिने कुणाजवळ तरी आपल्या मनातील हे सारे विचार व्यक्त केले होते. अश्यावेळी मित्रच लागतो. मी मात्र तिच्या बोलण्याचा तिने उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाचा विचार करु लागलो. जबाबदारी निभावत असताना काही जणांना कधी कधी किती वेळा मनातील इच्छांना तिलांजली द्यावी लागते याचा अंदाजच येत नाही. आपले सुखनैव आयुष्य सुरु असताना त्याची जाणीव देखील होत नाही. परंतू काही जणांच्या बाबतीत सर्वच पातळीवर संघर्षाची स्थिती निर्माण होते आणि मग कर्तव्यपूर्ती करताना अनेक गोष्टी राहून जातात. असाच काहीसा जीवन आरोह तिने माझ्यापुढे मांडला मी सून्न झालो. तिच्या शेवटच्या बोलण्यातील सकारात्मक भाग मला आवडला. जीवनाच्या आरोहात राहून गेलेल्या गोष्टी अवरोहात करण्याची तिच्या मनाची तयारी तिच्यातील सकारात्मकता दर्शवून गेली. पण मला खटकत होते तिचे काही शब्द. तार सप्तकातील षड्ज लागल्यामूळे तिला भासणारी अपूर्णता. पुर्णत्वाचा आनंद मिळाल्याची खंत. त्याबद्दल मात्र मला तिला सांगायचे होते. त्यावेळी बोलू शकलो नाही पण तेवढाही नकारात्मक भाग मला तिच्या आयुष्यातून काढायचाय. संगीत ही अंतस्थ आवड असल्याने तिला त्याच स्वरुपात सांगायचेय.

सखे, मला आठवते पं. अजय चक्रवर्तींची एक मैफल. त्या दिवशी पंडीतजींचा मुड गाण्यासोबतच गाणे समजावण्याचा होता त्यामुळे सारे रंगतदार होत होते. एका रागाचे सुरेख सादरीकरण करत असताना पंडीतजींनी सुंदर षड्ज लावला. सभागृहात आहाहा चा समुह उद्गार निघाला. त्यानंतर मात्र त्यांनी जे सांगितले ते फार महत्वाचे होते. ते म्हणाले राग आणि जीवन हे जवळपास सारखेच असते. त्यात आपण हवे तसे रंग भरु शकतो आणि त्या रंगानुसार त्याचे सौंदर्य खुलत जाते. सुरावट पुन्हा त्यांनी सुरु केली. काहीतरी वेगळे होत होते. माझ्या बाजूने बसलेल्या जाणकार मित्राला विचारले तर तो म्हणाला, त्यांनी षड्ज बदललेला आहे. षड्ज बदलला? हा काय प्रकार? संगीताचा चाहता असलो तरी मला काय होत होते ते कळत नव्हते. पण यावेळी आधीच्या सुरावटीपेक्षाही जास्त आनंद मिळत होता. परत एकदा नवा षड्ज लागला आणि पुन्हा आहाहा चा समुह उद्गार उमटला. पंडीतजी म्हणाले, आता या वेळी मी निषादाला षड्ज मानून राग सादर केला त्याचाही तुम्हाला भरभरुन आनंद मिळाला म्हणून तुम्ही प्रतिसाद दिला. कल्पकता असेल तर कोणत्याही स्वरावर षड्जाच्या पुर्णत्वाचा आनंद मिळू शकतो. गरज असते कल्पक सकारात्मकतेची आणि तेवढ्याच सकारात्मक प्रतिसादाची

सखे, तू निषादापर्यंत पोहोचलीस, त्यालाच षड्ज बनवून पूर्णत्व प्राप्त कर. तुझ्यातील कल्पक विचारक्षमता सकारात्मक वृत्ती तुला निषादावरील षड्जावरही तेवढाच आनंद देईल त्यामुळे तार सप्तकातील षड्ज लागला नाही याची खंत राहणार नाही. मनापासून त्या निषादावर थांब, त्याला षड्ज बनव, तेथून सुरावटी बांध, भरभरुन विविधता आण, प्रतिसाद मिळेल, आनंद मिळेल आणि तुला हवे असलेले पुर्णत्व देखील तुला बहाल होईल. त्यानंतर अवरोह बघ कसा रंगतदार होईल. कारण जीवनाचा असा आरोह अवरोह गाण्याची संधी एकदाच मिळते. त्यामधे तार षड्जाची खंत बाळगता निषादाचा नवा षड्ज बनव आणि बनव तुझी स्वतःची सुरेल सुरावट. बघ कसा सुंदर प्रतिसाद मिळतो ते!! जमेल ना? मनापासून कर, सहज जमेल!! तुलाच नाही तर चाळीशीतल्या प्रत्येकालाच जमेल!!





Comments

  1. Ek atishay sundar vichar. Kontyahi swarala shadja manun ayushyat satisfied rahayche. A very sweet and positive message

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18