थोडा है थोडे की जरुरत है @ 03.07.18
शब्दांच्या पलीकडले..
मोबाईल फोन टेबलवर ठेवला होता. काकू पाळण्यावर बसून त्याच्याकडे एकटक बघत होत्या. त्याच्या रींगचा आवाज ऐकण्यासाठी कधी नव्हे त्या अतिशय आतूर झाल्या होत्या. काका तर सारखे टेबलसमोरुन फेऱ्या मारत होते. ते पण त्या मोबाईलच्या रींगची वाट बघत होते परंतू त्यांना ते काकूला कळू द्यायचे नव्हते. मला काही फरक पडत नाही असा आव त्यांनी आणला होता. परंतू सारखे काहीना काही कारण काढून त्या मोबाईल समोरुन जात येत होते व हळूच काकूंच्या नकळत त्याच्याकडे बघून घेत होते. काकुंना ते सारे कळत होते. परंतू आज त्या काकांची गंमत करण्याच्या अवस्थेतच नव्हत्या. एरवी काकांच्या अश्या वागण्यावर त्या त्यांची फिरकी घ्यायच्या परंतू आज त्यांना केवळ एकाच गोष्टीची आस लागली होती. मधेच त्या काकांना म्हणाल्या, अहो तो फोन सुरु आहे ना? की बंद झाला एकदा बघता का? काका देखील धावत आले व पटकन फोन उचलून बघितला. हो ना! मी पण किती वेळचा विचार करतोय, सुरु आहे की नाही? काकांच्या मनातले बाहेर पडले व काकांनी लगेच सावरुन घेतले. म्हणजे तुला फोन येणार आहे ना म्हणून म्हणतोय. काकू केवळ कसेनुसे हसल्या. काकांच्या मनाची अधीरता त्यांना कळत होती. आज फोन येणार म्हणून काकांनी काल रात्रीच फोन चार्ज करुन ठेवला होता. विनाकारण अडचण नको जायला. तश्या तर काकू खूप बोलक्या होत्या. कोणताही विषय आणि बोलायला कुणीही असो, काकू सहजच संवाद साधण्यात तरबेज होत्या. भाजी घेताघेता त्याच्याशी, ऑटोरीक्षात बसल्यावर त्याच्याशी, साफसफाईवाला कचरा न्यायला आला त्याच्याशी, धुणी भांडी करायला आलेल्या बाईशी सहजच त्या बोलायच्या व त्यामुळे या साऱ्यांची मुले बाळे काय करतात, यांच्या घरी कोण कोण सदस्य आहेत, त्यांचा व्यवसाय किंवा काम कसे चालते या सर्व गोष्टींची खबर त्यांच्याकडे असायची. परंतू आजच्या फोनवर मात्र काय काय बोलायचे याचा त्यांनी सराव करुन ठेवला होता. काय काय विचारायचे, कसे विचारायचे याची त्यांनी मनातल्या मनात उजळणी केली होती. त्यातील काही गोष्टी काकांना देखील सांगून ठेवल्या होत्या. त्यांना बजावले होते की मी बोलण्याच्या नादात या महत्वाच्या गोष्टी विसरली तर मला आठवण द्यायची. काकांनी देखील ते सारे मुद्दे काकुंच्या आग्रहाखातर लिहून ठेवले होते. गेली तब्बल साडे पाच वर्षे या फोनची त्या वाट बघत होत्या. साडे पाच वर्षे. तसा विचार केला तर आयुष्यातला पटकन निघून जाणारा काळ पण काकुंसाठी मात्र ही साडे पाच वर्षे फार लांब व कंटाळवाणी होती. तुळशीजवळ दिवा लावताना अशी एकही सायंकाळ नव्हती ज्यावेळी काकुंचे डोळे पाणावले नसतील. पण अखेर फोन येणार असे कळले. बोलता येणार. आणि फोन वाजला! काका जोरात धावले, काकुंच्याही ह्रदयात एकदम धडधड झाली. पाळण्याची दांडी त्यांनी घट्ट धरुन ठेवली. काकांनी पटकन फोन उचलला. हॅलो हॅलो! तिकडून आवाज आला, आपल्या मोबाईलवर उत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी आम्ही काही नवीन अॅप सुरु केले आहे त्याची माहीती देण्यासाठी आम्ही आपणाशी संपर्क केला आहे, मराठीत माहीती सुरु ठेवण्यासाठी वगैरे वगैरे. नको!!! काकांनी जोरात ओरडून फोन ठेवून दिला. या कंपनीवाल्यांना कळतच नाही केव्हा फोन करावा आणि केव्हा करु नये. इथे आम्ही कशाची वाट बघतोय आणि यांचे काहीतरी भलतेच सुरु आहे. कसले अॅप काढतात, इथे जीव जायची वेळ आलीय. काकांनी त्रागा केला पण काकुंना हे सारे ऐकू आले म्हणल्यावर त्यांनी लगेच सावरुन घेतले व कसेनुसे हसत म्हणाले, म्हणजे तू वाट बघत आहेस आणि मधेच हा फोन. चिडल्यामुळे आपल्या डोळ्यात आलेली आसवे लपविण्यासाठी ते बाजूच्या खोलीत गेले. एरवी काकुंनी त्यांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना आधार दिला असता. पण आज! आज त्यांना त्या खोलीतून आणि मोबाईल समोरुन उठायचे नव्हते. नियोजित वेळ उलटून गेली होती. साडेपाच वर्षांची वाट बघितल्यावरही हा एक तास काकुंना सहन झाला नाही. काकांनी मधेच काही खाऊन घेतेस का म्हणून चौकशी केली होती पण ती खाणार नाही हे त्यांना ठाऊक होतेच. एक तास उलटून गेल्यामुळे आता त्या दोघांनाही वाट बघणे अगदी असह्य झाले होते. इतक्या दिवसांनंतर मनात निर्माण झालेली आस आणि आता फोनसाठी लागणारा वेळ! काकुंच्या मनात परत धाकधुक सुरु झाली आणि काकांच्या मनात राग. अजून पंधरा मिनीटे गेली आणि फोन घणघणला. यावेळी फोन उचलण्याआधी काकांनी त्यावरील नंबर बघितला. नंबर च्या आधी +४४ लिहून आले होते. आला! फोन आला! त्या क्षणी हातात फोन धरुन त्यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी तो काकुंना दाखविला. काकुंच्या लक्षात आले, ज्या फोनची ती दोघे गेली साडेपाच वर्षे वाट बघत आहेत तो फोन आला. आतापर्यंत सारख्या फेऱ्या मारणारे काका बाजूच्या खुर्चित बसूनच गेले. काकुंकडे फोन निर्देशित करुन त्यांनी तो केवळ धरुन ठेवला. काकू पाळण्यावरुन उठून फोन पर्यंत पोहोचल्या. एका हाताने काकांच्या हातून फोन घेऊन त्यांनी दुसऱ्या हाताने फोन सुरु केला व परत तो हात आपल्या डोळ्यांमधील अश्रू लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या काकांच्या हातावर ठेवला व थरथरत्या आवाजात त्या हॅलो म्हणाल्या, पलीकडून आवाज आला, हॅलो आई, कशी आहेस?
एखाद्या पाण्याच्या बांधाला मर्यादेच्या पलीकडे रोखल्यावर एखाद्या दिवशी तो जसा सारे काही फोडून वाहू लागतो तसे काहीसे काकुंचे झाले, ते शब्द ऐकल्यावर. आई, कशी आहेस? सातासमुद्रापलीकडच्या देशातून त्या माऊलीचा मुलगा साडेपाच वर्षांनंतर तिला विचारत होता, आई तू कशी आहेस? काकुंना त्याला खूप काही सांगायचे होते. साडेपाच वर्षांपूर्वी वडीलांशी एका किरकोळ कारणावरुन भांडून परदेशी निघून गेलेला तिचा पोटचा पोर तिच्याशी बोलत होता. या साडेपाच वर्षांमधे त्याच्या वडीलांनी साडेपाच हजारवेळा तरी त्या भांडणाबद्दल माफी मागितली होती स्वतःच्या मनात. पोराला सांगता मात्र आले नव्हते. परंतू तो निघून गेल्यानंतर एक एक क्षण किती कठीण गेला, जणू शरीरातून प्राण निघून गेला असे काकुंना सांगायचे होते. पण काकू एक शब्दही बोलू शकल्या नाही. पुढचे दहा मिनीटे सिद्धार्थ पलीकडून आई आई करत राहीला आणि काकुंचे शब्दच खुंटले. केवळ अश्रू नि हुंदके एवढेच काय ते सिद्धार्थला ऐकू येत होते. काकुंच्या शब्दांपलीकडले जे मनातून पाझरत होते ते शब्दाविना सिद्धार्थला कळावे अशी अपेक्षा होती. परंतू शब्दांपलीकडले समजण्यासाठी मनाने जोडलेले असणे आवश्यक असते.
तशी शब्दांची ताकद फार मोठी असते. शब्दांच्या आधारे मग ते लिखीत असो वा बोललेले, जग जिंकण्याची उदाहरणे सापडतात. शब्दांचे महत्वच थोर असते. परंतू असे महापराक्रमी शब्द देखील मनाच्या साम्राज्यापुढे थिटे पडतात. अतूट भावनांनी बांधलेल्या मनाची साथ लाभली की शब्दांची गरजच पडत नाही. अशी शब्दांच्या पलीकडले समजणाऱ्या व्यक्तीची सोबत जेव्हा आयुष्यात लाभते ना तेव्हा, जग सुंदर भासू लागते कारण त्या सुंदर जगात आपण एकटे नसतो तर आपल्या मनाची भाषा ओळखून आपला सांभाळ करणारे, आपली घट्ट सोबत करणारे कुणीतरी असते. सिद्धार्थने देखील त्याच्या आईच्या शब्दांपलीकडले गुज समजून घ्यावे असे आपल्याला वाटत असेल. त्याने ते समजून घेतले. त्या शब्दांपलीकडल्या संवादाने त्या पोराच्या मनाला पार हेलावून टाकले. तो संवाद इतका प्रभावी होता की दहा मिनीटे आपल्या आईचे ते मूक रुदन ऐकल्यावर, सिद्धार्थने फोन ठेवून दिला आणि केवळ एका महिन्याच्या आत लंडनमधील आपला सगळा गाशा गुंडाळून तो आपल्या आई बाबांकडे भारतात परत आला. आपली पत्नी, मुले आणि आई बाबांसह आता तो अतिशय आनंदात राहतो आहे. ही ताकद आहे शब्दांपलीकडल्या संवादाची, केवळ तो संवाद ऐकू जाणारे मन मात्र आपण जपायला हवे.
अप्रतिम
ReplyDelete