थोडा है थोडे की जरुरत है @ 10.06.18
वीस वर्षांपूर्वीची रात्र!!
परवा मित्राचा फोन आला. आठवतंय का? बरोबर वीस वर्षांपूर्वी आपण दोघे सोबत कुठे होतो? ८ जून १९९८. आठवतंय का काही? जरासा ताण दिला आणि अचानक सारे काही समोर चित्रपटागत सरकून गेले. आपले आयुष्य जगत असताना आपण प्रत्येकच क्षण आनंदामधे परावर्तीत करत जगले पाहीजे असे तत्वशः मान्य असले तरी देखील कधी कधी रोजच्या त्याच पद्धतीच्या जीवनाचा कंटाळा येतो व त्यामुळे त्या नेहेमीच्या ठराविक साच्यापासून जरा दूर आणि निवांत जाण्याच्या संधी आपण कायम शोधत असतो. यामधील काही संधी इतक्या अप्रतीम असतात की त्यांच्या स्मृती मनःपटलावर कोरल्या जातात. त्या स्मृतींना जेव्हा जेव्हा स्मरतो तेव्हा तेव्हा पुनःप्रत्ययाचा आनंद प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही. अश्याच एका कायम लक्षात राहीलेल्या रात्रीची आठवण माझ्या मित्राने मला करुन दिली. ८ जून १९९८ रोजी मी आणि माझा जिवलग मित्र विजय, आम्ही दोघे होतो किल्ले रायगडावर!
प्रत्येक मराठी मनाला जेथे गेल्यानंतर अभिमान वाटावा व जेथे नतमस्तक झाल्याने कृतार्थ झाल्यागत वाटते असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभेद्य गड म्हणजे रायगड. मुळातच त्या गडाच्या पायथ्यापासून तर माथ्यापर्यंत आपण भारावलेले असतो व त्यामुळे तेथील वास्तव्य आपल्या कायम स्मरणात राहणारेच असते. परंतू मी व माझ्या मित्राने अनुभवलेले रायगडावरील क्षण फारच निराळे होते. सायंकाळी महाडला असलेल्या माझ्या मामाकडून मोटरसायकलने आम्ही दोघे रायगडाला गेलो. गाडी ठेवली व गड चढायचे ठरले. परंतू पावसाचे वातावरण असल्याने आम्ही रोप वे नेच जावे असे सुचविण्यात आले. रोप वे ची देखील शेवटचीच ट्रीप होती. हवा फार जास्त वाहत असल्याने जरा हळूहळूच ती ट्रॉली आम्हाला दोघांना व गडावर रात्री मुक्कामाला असलेल्या वॉचमनला घेऊन निघाली. वर जाता जाताच महाराजांची राजधानी असलेल्या त्या गडाची अभेद्यता जवळून बघता येत होती. ट्रॉली मधेच थांबत होती कारण वाऱ्याचा जोर वाढला होता. हळू हळू आम्ही वर पोहोचलो. तोपर्यंत अंधार झाला होता. मामाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रेस्ट हाऊसची चावी दिली होती. देशमुखांच्या खानावळीत मस्त गरम गरम पिठले भाकरीचे जेवण आटोपून आम्ही दोघे रेस्ट हाऊसला पोहोचलो. सोसाट्याचा वारा सुटला होता. रात्रीचे नऊ वाजले होते. परंतू गडावर फार गर्दी नव्हतीच. नुताच राज्याभिषेक सोहळा आटोपला होता व त्यामुळे लोक निघून गेले होते. आणि तसाही तो सोमवार असल्याने नवा आठवडा सुरु झाला होता व त्यामुळे पर्यटक देखील नव्हते. एक प्रकारची नीरव शांतता पसरली होती. मनावर त्या सबंध वातावरणाचा पगडा होताच. त्या सुंदर रेस्ट हाऊस समोर आम्ही दोघेही मस्त शाली पांघरुन खुर्च्यांवर बसलो. वारा फारच थंड होता आणि अश्या सर्व वातावरणात आम्ही दोघे समान आवडी निवडी असलेले दोन मित्र सोबत होतो. अश्यावेळी सारख्या आवडी निवडी असलेली व्यक्ती सोबत असणे फार गरजेचे असते. महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या वातावरणामधे जे भारावलेपण होते ते त्याच पातळीवरुन समजणारा मित्र माझ्यासोबत होता त्यामुळे त्या वातावरणाचा आनंद आम्हाला एकाच पातळीवरुन समजत होता.
गप्पा सुरु झाल्या व बाबासाहेब पुरंदरेंच्या राजा शिवछत्रपती पुस्तकापासून बोलणे सुरु झाले. आम्ही दोघांनीही ते पुस्तक सातव्या वर्गात असताना वाचलेले. महाराजांच्या जीवनातील रायगडाशी संबंधित असलेले सर्व प्रसंग आम्ही दोघेही आठवू लागलो. आश्चर्य म्हणजे जवळपास सर्व ठळक प्रसंग आम्हाला आठवले. त्यानंतर गप्पांची गाडी वळली शिवकल्याण राजा या नुकत्याच ऐकलेल्या गाण्यांच्या कॅसेटकडे. त्यामधील लताबाईंनी म्हणलेली गाणी, छत्रपतींसाठी गायलेले अंगाई गीत आणि त्यामधे लताबाईंनी लावलेले सुर. त्या गाण्याच्या कडव्यातील अपरात्रीचा प्रहर लोटला बाई ही ओळ म्हणताना अपरात्रीचा प्रहर दाखविण्यासाठी लताबाईंनी किंचीत व्याकूळ केलेला स्वर, तो गाऊन दाखविण्याची मित्राने केलेली विनंती, ती ओळ तशीच म्हणण्याचा केलेला प्रयत्न सारेच कसे छान. कवितांचा विषय निघाला आणि आम्हा दोघांनाही एकाच वेळी आमचा आवडता कवी गुलजार न आठवला तरच नवल. गाणे म्हणून दाखविणे माझे काम आणि कवितांचे प्रचंड पाठांतर असल्याने त्या कविता म्हणून दाखविणे त्याचे. गुलजारच्या एकाहून एक कविता व सोबत त्या कवितांमधे मांडलेला विचार, त्यामधील अफाट कल्पना या साठी दोघांनीही एकाच वेळी दिलेली दाद. दोघेही वाड़मयाचे विद्यार्थी असल्याने सपनो पे पाँव पड गया था, पासून तर इजाजत सिनेमामधे गुलजारने दाखविलेले खरे खुरे ओलेचिंब रेल्वे स्टेशन, ती रेखा, तो नासीर आणि आशाबाईंच्या आवाजातील ते एक सौ सोला चाँद की रातें, एक तुम्हारे कांधे का तील पर्यंतचा सगळा कलात्मक चर्चांचा प्रवास. आशाबाईंचे नाव निघाल्यावर मग दिल पडोसी है अल्बम, तिथून गुलाम अलींसोबत आशाबाईंनी गायलेल्या गजल व तेथून थेट भाऊसाहेब पाटणकरांच्या मित्राच्या पाठ असलेल्या गजलांपर्यंत बोलणे सुरुच होते. त्यानंतर अचानक परत गप्पांची गाडी महाराजांकडे वळली. दुसऱ्या दिवशी गड बघायचा होता म्हणून गो. नि. दांडेकरांचे रायगडाची संपुर्ण माहिती देणारे पुस्तक चाळून ठेवायचे ठरविले. मी काही भागाचे वाचन केले व दुसरा संपुर्ण दिवस रायगडावर प्रत्यक्ष चालून सर्व काही बघायचे या विचारांनीच चैतन्य आले. झोप कुठल्याकुठे पळाली होती. छत्रपतींना महाराष्ट्राच्या घराघरात पुन्हा एकदा पोहोचविणाऱ्या बाबसाहेबांचे स्मरण झाले. नांदेडला बाबसाहेबांची सात दिवसांची सलग महाराजांवरची व्याख्यानमाला व त्याचा रोमांचकारी अनुभव मी माझ्या मित्राला सांगू लागलो. या साऱ्या गोष्टी आमच्या मनाचाच भाग असलेले आम्ही दोघे जीवलग मित्र सोबत असल्याने त्या गप्पा विलक्षण रंगल्या होत्या. एव्हाना रात्रीचा प्रहर खरोखरीच लोटू लागला होता. दाट धुके जमायला लागले होते. अचानक, झोप येतच नाहीये तर अंधारात जरा गडावर भटकून यायचे का? हा माझ्या मनातला विचार माझ्या मित्राने लगेच उचलून धरला. रात्री साधारण एकच्या सुमारास गडावर संपुर्ण शांतता असताना व बोचरा वारा आनंदाने अंगावर घेत आम्ही रेस्ट हाऊस पासून जुन्या महालापर्यंत वर चढलो. अजून जरासे पुढे गेलो अन् आवाज आला, कोण आहे रे तिकडे?
अश्या अंधारात कुणी आवाज म्हणून चमकून मागे वळून बघितले तर काय! साक्षात महाराज उभे. करड्या आवाजात महाराजांनी विचारले काय करताय गडावर? आणि कसल्या गप्पा सुरु आहेत तुमच्या? लताबाई काय, गुलजार काय, मला ऐकविलेली अंगाई काय? आहात कोण? येथे येण्याची पद्धत नाही का ठाऊक? आणि हे काय? बाटल्या कुठे आहेत तुमच्या हातातील दारुच्या? चिकन मटन शिजविले नाहीत का? काय हे, काय सुरु आहे? येथे येताना बाटल्या हव्या, या थंडगार हवेत ती दारु चढली की त्या बाटल्या फोडायच्या, शिवीगाळ करायची, मटन वगैरे बनवून आणायचे, गडाच्या कोपऱ्यात उभे राहून सिगारेटी प्यायच्या, मग गडावरच्या भिंतींवर आपली नावे लिहायची, दारुसोबत आणलेल्या चकण्याचे प्लॅस्टीकचे पुडके गडावरच फेकून द्यायचे, टकमक टोकावर उभे राहून मुद्दाम अश्लील काहीतरी बोलायचे आणि सारे करताना गळ्याभोवती भगवा पटका गुंडाळायचा म्हणजे तुम्ही ब्रॅन्डेड शिवभक्त होता. काय हे तुम्ही फारच बालीशपणा करताय! ते बाबासाहेब पुरंदरे देखील येऊन गेले दोन दिवसांपूर्वी, राज्याभिषेक सोहळा केला. काय नि कशाला करतात देवजाणे! त्यांचे ते कार्य वाया जातंय कारण या गडावर फोडल्या जाणाऱ्या बाटल्यांची संख्या काही कमी होत नाही. तुम्ही हे भलतेच काय करताय? बराच वेळ महाराज बोलत राहीले आणि आम्ही निमूटपणे ऐकत राहीलो.
आज वीस वर्षे उलटल्यावर मित्राने आठवण करुन दिली, साऱ्या स्मृतींना उजाळा मिळाला. मित्राला म्हणालो, चल यार पुन्हा जाऊ एक तशीच रात्र रायगडावर घालवायला, सोबत पुन्हा लताबाई, गुलजार, राशीद खान, आणि बाबासाहेबांनाही घेऊन जाऊयात. कोण कोण येणार आमच्यासोबत वीस वर्षांपूर्वीसारखी एक अप्रतिम रात्र घालवायला?, किल्ले रायगडावर!!
Comments
Post a Comment