थोडा है थोडे की जरुरत है @ 10.07.18
सूर वेडा अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा ओ माय गॉड नावाचा एक सुंदर चित्रपट आला होता . त्यामधे अक्षय कुमार कृष्णाच्या भूमिकेत होता व परेश रावलचा मित्र बनून त्याच्या घरी रहायला येतो . या त्याच्या मैत्रीपूर्ण सहवासामधे अनेक मजेदार गोष्टी घडत जातात . यामधे एक प्रसंग फार सुंदर दाखविला आहे . पहाटे पहाटे अक्षय कुमार बासरी घेऊन सुंदर धुन वाजवित असतो . त्याच्या त्या बासरीच्या आवाजाने झोपमोड झालेला परेश रावल चिडून त्याला विचारतो , सकाळी सकाळी हे काय करतोय ? तेव्हा अक्षय कुमार त्यास एक अनोखे उत्तर देतो , पक्षांना जागवित होतो . बासरीच्या सुरांनी पक्षांना जागवित होतो . किती सुरेख विचार आहे . जे पक्षी पहाटेला तांबडे फाटताच किलबिलाट करतात व ज्यांच्या किलबिलाटाने सारे विश्व रोमांचित होते अश्या पक्षांना बासरीच्या सुमधूर सुरांनी जागे करणे . हे कार्य केवळ परमेश्वरच करु शकतो . परंतू परमेश्वराचे असे सांगणे चित्रपटात शक्य आहे . तुमच्या माझ्या जगात अश्या प्रकारे परमेश्वर स्वतः बासरी वाज...