थोडा है थोडे की जरुरत है @ 10.07.18
सूर वेडा
अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा ओ माय गॉड नावाचा एक सुंदर चित्रपट आला होता. त्यामधे अक्षय कुमार कृष्णाच्या भूमिकेत होता व परेश रावलचा मित्र बनून त्याच्या घरी रहायला येतो. या त्याच्या मैत्रीपूर्ण सहवासामधे अनेक मजेदार गोष्टी घडत जातात. यामधे एक प्रसंग फार सुंदर दाखविला आहे. पहाटे पहाटे अक्षय कुमार बासरी घेऊन सुंदर धुन वाजवित असतो. त्याच्या त्या बासरीच्या आवाजाने झोपमोड झालेला परेश रावल चिडून त्याला विचारतो, सकाळी सकाळी हे काय करतोय? तेव्हा अक्षय कुमार त्यास एक अनोखे उत्तर देतो, पक्षांना जागवित होतो. बासरीच्या सुरांनी पक्षांना जागवित होतो. किती सुरेख विचार आहे. जे पक्षी पहाटेला तांबडे फाटताच किलबिलाट करतात व ज्यांच्या किलबिलाटाने सारे विश्व रोमांचित होते अश्या पक्षांना बासरीच्या सुमधूर सुरांनी जागे करणे. हे कार्य केवळ परमेश्वरच करु शकतो. परंतू परमेश्वराचे असे सांगणे चित्रपटात शक्य आहे. तुमच्या माझ्या जगात अश्या प्रकारे परमेश्वर स्वतः बासरी वाजवून हे कार्य करु शकत नाही कारण माणसांच्या जगात परमेश्वर अद्वैत रुपात असल्याने त्याचा भौतिकदृष्ट्या प्रत्यक्ष सहभाग शक्य नाही. परंतू तसेच पवित्र कार्य करणारे लोक मात्र परमेश्वराने या जगात पाठविले आहेत जे कायम आपल्या कल्पकतेने व जिवनावरील अतूट प्रेमामुळे स्वतःच्या व सोबतच अनेकांच्या जीवनात सुरेल आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. परमेश्वराच्या त्या चित्रपटात वर्णन केलेल्या आनंदमयी तत्वानेच प्रेरीत होऊन हे आनंदमार्गावरचे पथिक निरंतर कार्य करीत असतात. असाच एक सूरवेडा मला सापडला, अमरावतीच्या नव्या (नया अमरावती) रेल्वे स्थानकाच्या बाहेर.
साधारण तीन महिन्यांपूर्वी माझ्या वरुडच्या मावशीला भल्या पहाटे नरखेड पॅसेंजर गाडीवर सोडण्यासाठी गेलो होतो. सकाळी सव्वा पाच वाजता मावशीला गाडीत बसविले व गाडी जाईपर्यंत तिच्याशी बोलत बसलो होतो. अचानक मला स्टेशनच्या बाहेरुन एक सुंदर मराठी गाणे ऐकू आले, मेंदीच्या पानावर मन अजून झुलतंय गं. लहानपणापासून लताबाईंचे हे व अशी सुंदर सुंदर गाणी ऐकत मोठ्या झालेला पिढीचा मी प्रतिनिधी. मला त्या सुंदर पहाटे त्या शांत वातावरणात लताबाईंचा सुरेल आवाज मनाला खूप भावून गेला. गाडी निघून गेल्यानंतर मी स्टेशनच्या बाहेर पडलो तर मला त्या गाण्याचा उलगडा झाला. बाहेर एका सूरवेड्या माणसाने चक्क पोर्टेबल स्पिकर आणून त्यावर ही गाणी लावली होती. एक पोर्टेबल स्पिकर ज्याला बॅगसारखी ट्रॉली असते व ज्याला पेन ड्राईव्ह लावून छान मोठ्या आवाजात गाणी ऐकता येतात. हा माणूस रोज तो बॅगपेक्षाही वजनी स्पीकर आपल्या दुचाकीवर ठेवून स्टेशनवर घेऊन येतो. तेथे फिरायला येणाऱ्या समुहाचा तो सदस्य असावा. सर्वात प्रथम येऊन भल्या पहाटे त्या वातावरणाला प्रसन्नेचा साज चढविण्याकरीता सोबत आणलेल्या स्पिकरवर छान छान मराठी किंवा हिंदी गाणी लावतो. संपुर्ण परीसरात त्या सुरांचे आल्हाददायी वातावरण निर्माण होते. त्या वातावरणात अनेक लोक तेथे पहाटे व्यायाम करतात, फिरतात. कधी लताबाईंचे मेंदीच्या पानावर त्यांच्या सोबत असते तर कधी अरुण दातेंचे स्वरगंगेच्या काठावरती सोबत असते. कधी सुधीर फडकेंचे तोच चंद्रमा नभात, कधी आशा भोसलेंचे मी मज हरपून बसले गं, ह्रदयनाथांचे त्या फुलांच्या गंधकोशी, सुरेश वाडकरांचे दयाघना, कधी रफीचे याद न जाये बिते दिनोकी असते तर कधी हळूवारपणे तलत मेहमुद जलते है जिसके लिये गात असतो. मनाला वेड लावणारी आणि त्या परीसरात आलेल्या प्रत्येकाची पहाट सुरेल व प्रसन्न बनविणारी अनेक गाणी सारा परीसर मोहवून टाकतात. शरीराच्या तंदुरुस्तीसाठी तर लोक त्या प्रदुषण विरहीत वातावरणात येतातच परंतू या माणसाच्या सुरेल उपक्रमामुळे त्या सर्व लोकांना मनाचा देखील व्यायाम घडतो. शरीरासोबतच हा मनाचा व्यायाम देखील फार महत्वाचा असतो. आधल्या दिवसातील वेगवेगळ्या पद्धतीच्या सुख दुःख मिश्रित अनुभवांमुळे शरीरासोबत मनही थकले असते. परंतू तसे असले तरी पुढचा दिवस उजाडला की आपल्याला तो दिवस जगण्यासाठी शरीर व मन दोन्हीही तयार ठेवावे लागते. अश्या वेळी पहाटेच्या सुंदर वातावरणाला मोहीत करण्यासाठी मी वर्णन केल्याप्रमाणे प्रयत्न करणाऱ्या सुरांच्या भक्ताला काय म्हणावे? त्याचे ते योगदान किती मोठे आहे!
होय, हे खरोखरीच मोठे योगदानच आहे. अनेक लोकांच्या जिवनात भल्या पहाटे असा सुरांचा आनंद निर्माण करुन त्यांचा दिवस सकारात्मक बनविणाऱ्या या माणसाचे हे कार्य मोठेच आहे. एकदा दिवस सुरु झाला व आपल्या कामाच्या परीक्षेत्रामधे आपण वावरायला लागलो की वेगवेगळ्या परीस्थिती निर्माण होत जातात. कधी त्या मनाला प्रसन्नता देणाऱ्या असतात तर कधी राग आणणाऱ्या असतात, कधी त्या उद्विग्न करतात तर कधी थकवून टाकतात. अश्या सर्व परिस्थितींचा सामना करुन यशस्वीपणे दिवस घालविण्यासाठी व आपले कर्तव्य करण्यासाठी पहाटे सुरांच्या ताकदीने आपले मन जर तयार झाले तर दिवसभराचा हा प्रवास छान सुखकर होतो. काही मंडळींना दिवसाची सुरुवातही त्रागा, चिडचिड किंवा मने दुखवित करण्याची सवय असते. असे मंडळी बरेच वेळा वातावरणात नकारात्मक भाव निर्माण करतात. दिवसाची सुरुवातच नकारात्मकतेने केली तर तो सबंध दिवस हसत हसत कसा घालवायचा. परंतू ही सुरुवात अगदी सहजच सुरेल व्हावी व स्वतः सोबत इतर अनेकांची व्हावी या साठी प्रयत्न करणारा हा माणूस असल्याने त्याचे महत्व जास्त आहे. बदलत्या व वेगवान जगात आपल्याला नकळत अनेक प्रकारच्या ताणांना सामोरे जावे लागते. वाहन चालविण्यापासून ते कामाच्या ठिकाणच्या व्यवस्थांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे ताण डोक्यात जमा होत राहतात. त्या ताणांचे नियोजन प्रत्येकालाच जमते असे नाही व म्हणूनच सहजच उपलब्ध होणाऱ्या आनंदाने दिवसाची सुरुवात होत असल्यास ती नेहेमीच फायद्याची बाब आहे. कानात इयरफोन लावून कानाच्या पडद्यांवर फार ताण येण्यापेक्षा अश्या प्रकारे संगीत ऐकणे ही फायद्याची बाब आहे. परंतू त्यासाठी या सूरवेड्याप्रमाणे आनंदयात्री मिळायला हवेत. जसे अश्या प्रदुषण विरहीत वातावरणात जाऊन आपण शरीरासाठी भरपूर प्रमाणात ऑक्सीजन मिळवितो तसेच नया अमरावती या रेल्वे स्थानकाच्या परीसरात आपल्याला आपले मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी आनंदाचा ऑक्सीजन मिळतो.
परवा परत एकदा मावशीला त्याच गाडीवर सोडण्याची संधी मिळाली. गाणे ऐकता येईल या आशेने मी रेल्वे स्थानकावर गेलो. परंतू पाऊस पडत होता. त्यामुळे गाणे सुरु नव्हते. मावशीला गाडीत बसवून दिले. एखादे सुंदर मराठी गाणे ऐकण्याची आस मनात होती परंतू पावसाची रीपरीप सुरु असल्याने इच्छा अपूरीच राहीली. रेल्वे गाडीने शिटी वाजवून प्रस्थान केले. मी परत फिरलो. पावसाचा आनंद घेणे आवडत असल्याने छत्री न घेताच पावसातच चालत निघालो आणि अचानक त्या सबंध वातावरणाला शोभेसे एक गाणे कानावर पडले. सलील कुळकर्णीचा आवाज कानावर आला, पाऊस असा रुणझुणता, पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना, चाहूल विरत गेलेली! रेल्वे स्थानकाच्या बाहेर येऊन बघतो तर काय? त्याच स्पिकरला पाऊस लागू नये म्हणून प्लॅस्टीकच्या जाड कव्हरमधे लपेटलेले होते व त्यामधून निघणाऱ्या सुरांनी परत एकदा तो आसमंत भारावून गेला होता. त्या सुरमयी आनंदनिर्मात्याची भेट घेण्याची इच्छा झाली परंतू तो स्पिकर तेथे ठेऊन तो फेरी मारायला निघून गेला होता. रीमझीम पावसाच्या धारांनी मी चिंब भिजलो होतो परंतू त्या आनंद सुरांनी माझे मन त्याहून जास्त चिंब झाले होते. माझ्या सारख्या अनेकांच्या जिवनात सुरेल पहाट सातत्याने आणणाऱ्या त्या आनंदमुर्तीला मी मनोमन नमस्कार केला व निघालो. मी पुढे जात होतो परंतू त्या सुरमयी वातावरणात संदीप खरेचे शब्द ऐकू येत होते,
पाऊस सोहळा झाला, कोसळत्या आठवणीचा
कधी उधाणता अन् केव्हा थेंबांच्या संथ लयीचा
पाऊस असा रुणझुणता, पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना, चाहूल विरत गेलेली!!
Waa! Sundar artical
ReplyDeleteMastach
ReplyDeleteसंगीत आनंदी जिवनाचे साधन आहे
ReplyDeleteखुप सुंदर लिखान.अप्रतिम लेख.👌👌👌
ReplyDeleteआणखी ऐक अप्रतिम लेख,नेहमी सारखाच पण वेगळा।।
ReplyDelete