थोडा है थोडे की जरुरत है @31.07.18

दीवार

अमिताभ बच्चनच्या यशस्वी कारकिर्दीत अमुल्य योगदान दिलेल्या महत्वाच्या चित्रपटांपैकी एक होता दीवार. व्यावहारीकता आणि आदर्शवाद याचा संघर्ष या चित्रपटाला फार उंची प्रदान करुन गेला होता. नकारात्मक किनार असलेली भुमिका अमिताभच्या वाट्याला आलेली होती तरी त्याने जगातील अन्यायाच्या विरोधात विद्रोह करणारा विजय फारच अप्रतिम वठविला होता. चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचे फार कौतुक झाले. या चित्रपटातील संवाद देखील फार गाजले कारण ते सर्व थेट मनाला भिडणारे होते. मै आज भी फेके हुये पैसे नही उठाता म्हणणारा अमिताभ म्हणजे अँग्री यंग मॅन म्हणून खऱ्या अर्थाने स्थापित झाला. पैसा मिळवायला हवा कारण पैश्यानेच जगाला काबीज करता येते, पैश्यामुळेच जगाला आपल्या टाचेखाली ठेवता येते पैसा नसेल तर लोक वाटेल त्या प्रकारे अवहेलना करतात या जाणिवा धगधगत मोठा झालेला विजय, जो पैसा कमावण्यासाठी काहीही करायला तयार होतो. परंतू त्याचे साध्य मात्र आपल्या आईला सुखी करण्याचे असते. ज्या इमारतीच्या बांधकामाच्या वेळी त्याच्या आईने विटा उचलून मोलमजूरी केली असते ती संपुर्ण इमारत खरेदी करुन आईला भेट देण्याची आकांक्षा बाळगणारा विजय त्याच्या हातावर बळजबरीने गोंदविल्या गेलेले वाक्य मेरा बाप चोर है मिटविण्याचा प्रयत्न करत असतो. तो डाग मिटविण्याचा त्याला रुचलेला मार्ग म्हणजे प्रचंड पैसा कमावणे त्या पैश्याच्या बळावर जगाला आपल्या ताब्यात ठेवायचे, मग पैसा मिळविण्याचा मार्ग कोणताही असो. याउलट काहीही झाले तरी आपल्या तत्वांशी तडजोड करता सत्शील मार्गानेच जीवन जगायचे हा आपल्या आईचा आदर्श उराशी बाळगून आपल्या गुन्हेगार भावाला कैद करण्यासाठी तयार झालेला त्याचा सख्खा लहान भाऊ, रवी. जीवन जगण्याचे दोन महत्वाचे पैलू या चित्रपटात फार ठळकपणे मांडलेले आहेत आणि या दोन मुलांच्या परस्परभिन्न दृष्टीकोनाच्या मधे उभा आहे त्या दोघांची जन्मदात्री आई. या चित्रपटात त्या आईची भुमिका वठविली होती श्रेष्ठ अभिनेत्री निरुपा रॉय यांनी. अमिताभ बच्चन आणि शशी कपुर या तगड्या अभिनेत्यांमधे साजेसा किंवा अगदी तुल्यबळ अभिनय त्यांनी पण केला होता. तत्वांशी तडजोड करता प्रामाणिकतेच्या मार्गावर चालणाऱ्या मुलाला स्विकारुन दुसऱ्या मुलाला नाकारणारी कणखर आई म्हणून त्यांचे संवाद देखील अतिशय प्रभावी स्मरणात राहणारे होते. तू तो मेरा अपना था, फिर तुने कैसे लिख दिया मेरे माथे पे, के मेरा बेटा चोर है, हे विचारणारी आई मन पिळवटून टाकते. एका बाजूने तत्वांशी तडजोड करायची नाही म्हणून कोणतीही किंमत चुकवायला तयार असणारी आई, ती किंमत म्हणजे पोटचा पोर आहे हे कळल्यावर एकाच वेळी कोलमडते दुसऱ्याच क्षणी पुन्हा ताठ उभी राहते. या सर्व संवेदना निरुपा रॉय यांनी अतिशय प्रभावीपणे दर्शविल्या. तू अभी इतना बडा नही हुवा विजय, के अपनी माँ को खरीद सके, असे म्हणून त्याला सोडून प्रामाणिकपणे जिवन जगणाऱ्या मुलासोबत निघून जाणारी स्वाभीमानी आई निरुपा रॉय. जिच्या पडद्यावरील भुमिकेचा आदर्श अनेकांना प्रत्यक्षात जीवन जगताना सहायक ठरतो ती आई निरुपा रॉय. आपल्या दोन मुलांमधे दिवार उभी राहते आहे हे बघुनही तत्वांशी तडजोड करणारी स्वाभीमानी आई निरुपा रॉय. या अश्या पडद्यावरील स्वाभीमानी आईच्या पडद्यावरील मुलांमधे तर दीवार उभी राहीलीच होती, परंतू प्रत्यक्षातही तिच्या मुलांमधे तिच्या संपत्तीवरुन दीवार उभी राहील्याचे वृत्त मनाला स्पर्शून गेले.

पडद्यावरचे आदर्श जिवन जगताना ज्या आई अभिनेत्रीला आपल्या दोन मुलांमधे भिंत निर्माण झालेली बघावी लागली त्याच अभिनेत्री आईच्या मुलांमधे तिच्या संपत्तीवरुन वाद निर्माण झाल्याचे वृत्त जेव्हा वर्तमानपत्रात वाचले तेव्हा खरोखरीच जीवनाच्या प्रवासाचे नवलच वाटले. अर्थात मोठी अभिनेत्री असली तरी देखील तिच्या वाट्याला पडद्यावरील कथेप्रमाणेच प्रत्यक्षातही तसेच काहीसे यावे याची गंमत वाटली. मुलांमधे भिंती निर्माण झाल्या की सर्वात जास्त दुःख मला असे वाटते आई ला होत असावे. कारण तिच्यासाठी तर ते दोघेही तिच्याच शरीराचा भाग होते. तिच्यासाठी तर ते दोघेही तिचेच होते ना? पण मग तिच्या शरीरापासून विलग झाल्यानंतर असे काय झाले की त्या दोघांना किंवा तिघांना जगात जगत असताना एकमेकांपासून इतके दूर जावे वाटले की आईची संपत्ती वाटून घेत असताना त्यांच्यात वाद व्हावे? आईने तर त्यांचे पालनपोषण करताना भेदभाव केलाच नसणार. आईने तर दोघांनाही आपल्या अस्तित्वाचा भाग बनविले. मग असे काय झाले किंवा असे काय होते की काही वर्षांनंतर एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या भावंडांमधे एक मोठी आणि मजबूत भिंत तयार होते. बारकाईने अवलोकन केल्यास अश्या प्रकारच्या भिंतींचा पाया मात्र कायम दोन गोष्टींनी बनलेला असतो. त्या गोष्टींची नावे स्वार्थ आणि अहम.

एका विद्यार्थिनीकडे एकदा जाण्याचा योग आला. तिच्या घराच्या अंगणामधे बाजूच्या घराच्या कंपाऊंडला लागून चिकूचे झाड दिसले. छान चिकू लागले होते. मी सहजच म्हणालो, अरे वा! काय सुंदर चिकू आहेत. गोड आहेत का? एखादा खायला देतेस? आपल्या प्राचार्यांनी चिकू मागितलाय त्यामुळे द्यावा लागेल या भावनेने ती पटकन उठली परंतू दरवाजाच्या जवळ तिचे पाय घुटमळले. एक चिकू तोडून आणायला ती का कचरते आहे ते माझ्या ध्यानात आले नाही. मी चिकू मागितल्यावर त्या घरातले वातावरणच बदलून गेले. सर्वजण अचानक शांत झाले. मला कळेना. शेवटी माझी विद्यार्थिनी माझ्या जवळ आली काकुळतीने तिने मला चिकू देऊ शकत नसल्याबद्दल माझी क्षमा मागितली. मी देखील सहजच बोललो होतो त्यामुळे मी तिला काही हरकत नाही म्हणालो परंतू कारण सांगायला हवे असे मात्र म्हणालो. रडवेल्या आवाजात ती म्हणाली, सर बाजुचे घर माझ्या मोठ्या बाबांचे आहे. माझे बालपण तिवसा नावाच्या  गावात गेले असल्याने मोठे बाबा म्हणजे मोठे काका हे माझ्या लक्षात आले. ती पुढे म्हणाली, सर आमचे माझ्या मोठ्या बाबांशी संबंध चांगले नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जात नाही. चिकुचे झाड त्यांच्या हद्दीत आहे त्यामुळे आम्ही एखादा चिकू जरी तोडला तरी भांडण होते. मी लगेच नको म्हणालो. तिचे वडील आणि त्यांच्या भावात निर्माण झालेली भिंत मला दिसायला लागली होती. ती मुलगी म्हणाली, गेल्या दहा वर्षांपासून आमचे त्यांच्याशी काहीच संबंध नाही. आम्ही त्यांच्याकडे लग्नसमारंभाला देखील जात नाही. घराच्या वाटणीवरुन भांडण झाले होते तेव्हापासून असेच आहे. पण सर तुम्ही वर्गात त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे किती दिवस वैर ठेवायचे? एकच जन्म मिळाला तर प्रेम करायचे की द्वेष करायचा हे आमच्या घरच्या मोठ्यांना कळत नाही. आम्ही पुढाकार घेऊन हे मिटवायचे म्हणालो तर आम्हाला ते करु देत नाही. आम्हाला आमच्या चुलत भाऊ, बहिणीला भेटावे वाटते, त्यांनाही वाटत असेल. पण आमच्या दोन्ही घरातले मोठे लोक हे करु देत नाही. स्थिती माझ्या लक्षात आली. त्या पोरीचे वडील आणि घरातील इतर लोक तिच्या बोलण्यामुळे अस्वस्थ होत होते. त्यांचा निरोप घेऊन मी निघालो. त्या मुलीचे वडील मला दारापर्यंत सोडायला आले. पोरीच्या बोलण्यामुळे ते देखील अस्वस्थ झाले होते. जाता जाता सहजच त्यांना विचारले, हे चिकुचे झाड कुणी लावलेय? बरेच मोठे आहे. दबल्या आवाजात ते म्हणाले, आमच्या आईने. एकच क्षण त्यांच्याकडे बघितले, भिंत ढासाळू लागली होती जराशी. त्यांच्या हातावर थोपटून परत निघालो. पुढे काय झाले कळले नाही

कोणत्याही नात्यांमधे क्षणिक स्वार्थापोटी तयार झालेल्या भिंती आपण फार पक्क्या होऊ देता कामा नये. त्यापेक्षा पुढाकार मीच का घेऊ? हा अहम बाजूला ठेऊन ही द्वेषाची दीवार पाडण्यासाठी आपणच प्रेमाचा हातोडा चालविला तर! एकच जन्म मिळालाय, दीवार पेक्षा पुल केव्हाही चांगला!!




 

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18