थोडा है थोडे की जरुरत है @ 16.07.23
डीमोशनल टीव्ही वरील एका प्रसिद्ध कार्यक्रमात मी सध्याच्या दोन यशस्वी सिने कलावंतांची मुलाखत बघत होतो . एका खूप छान विषयावर चर्चा सुरु होती . मुलाखतकाराने प्रश्न विचारला की बरेच वेळा चित्रपटातील एखाद्या सीनमधे तुम्ही जेव्हा पूर्णपणे समर्पित होऊन काम करीत असता तेव्हा मनाने तुम्ही त्या पात्राशी जोडले गेलेले असता . तसे केल्यामुळेच तुमचा अभिनय लोकांना भावतो . त्या पात्राच्या दुःखांशी जेव्हा तुम्ही समरस होता तेव्हाच डोळ्यातून आपोआप अश्रू येतात व ते ग्लिसरीन लावून आलेले नसतात कारण त्यावेळी तुमच्या चेहेऱ्यावरील रेषा देखील बोलत असतात . याचाच अर्थ तुम्ही त्या कृत्रिम असलेल्या परिस्थितीमधे ती भूमिका जगत असता . परंतू हे सारे कॅमेरा रोलींग असतानाच राहते की दिग्दर्शकाने कट म्हणल्यावरही त्या दृष्याचा परीणाम मनावर राहतो व त्याचा त्रास होतो ? या अतिशय महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्या अभिनेत्रीने फार सुंदर शब्द वापरला . ती म्हणाली आम्ही डीमोशनल ही प्रक्रीया करतो . त्या अभिनेत्...