थोडा है थोडे की जरुरत है @ 16.07.23

डीमोशनल

टीव्ही वरील एका प्रसिद्ध कार्यक्रमात मी सध्याच्या दोन यशस्वी सिने कलावंतांची मुलाखत बघत होतो. एका खूप छान विषयावर चर्चा सुरु होती. मुलाखतकाराने प्रश्न विचारला की बरेच वेळा चित्रपटातील एखाद्या सीनमधे तुम्ही जेव्हा पूर्णपणे समर्पित होऊन काम करीत असता तेव्हा मनाने तुम्ही त्या पात्राशी जोडले गेलेले असता. तसे केल्यामुळेच तुमचा अभिनय लोकांना भावतो. त्या पात्राच्या दुःखांशी जेव्हा तुम्ही समरस होता तेव्हाच डोळ्यातून आपोआप अश्रू येतात ते ग्लिसरीन लावून आलेले नसतात कारण त्यावेळी तुमच्या चेहेऱ्यावरील रेषा देखील बोलत असतात. याचाच अर्थ तुम्ही त्या कृत्रिम असलेल्या परिस्थितीमधे ती भूमिका जगत असता. परंतू हे सारे कॅमेरा रोलींग असतानाच राहते की दिग्दर्शकाने कट म्हणल्यावरही त्या दृष्याचा परीणाम मनावर राहतो त्याचा त्रास होतो? या अतिशय महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्या अभिनेत्रीने फार सुंदर शब्द वापरला. ती म्हणाली आम्ही डीमोशनल ही प्रक्रीया करतो. त्या अभिनेत्रीच्या कामाबाबत वापरला असला तरी देखील आपल्यासारखे जीवन जगणाऱ्या लोकांनी देखील या शब्दाचा अर्थ समजून ही प्रक्रीया जर आपल्या आधुनिक जगातील जीवनात राबविली तर आपल्याला जास्त आनंदी आयुष्य जगता येईल असे मला वाटले. त्या अभिनेत्रीने तो शब्द समजावून सांगितला.

ती म्हणाली, तुमचे खरे आहे. जेव्हा मी एखादी भूमिका करत असते तेव्हा इमोशनली मला त्या पात्रामधे गुंतावेच लागते. तसे गुंतल्याशिवाय प्रेक्षकांना अपेक्षित अभिनय मी सादर करु शकत नाही. माझ्या सुरुवातीच्या काळात मला या असल्या इमोशनल अटॅचमेंटचा प्रचंड त्रास व्हायचा परंतू मग अनेक ज्येष्ठ मंडळींकडून मार्गदर्शन मिळाल्यावर मला आता तो शब्द सापडला. डीमोशनल. म्हणजे इमोशनली गुंतणे आटोपल्यानंतर मला त्या भावनिक वर्तुळापासून डीटॅच होता आले पाहिजे. कारण त्या भावनिक गुंतणुकीचा परीणाम माझ्या खाजगी जीवनावर जेव्हा व्हायचा तेव्हा मला प्रचंड त्रास होत असे. म्हणूनच डीमोशनल होणे ही प्रक्रीया मला शिकणे गरजेचे वाटले. आता मी एखाद्या पात्रामधे संपुर्णपणे गुंतते. अगदी प्रेमाचे चित्रण असेल तर ज्याच्यासोबत ते प्रेम करणे दाखवायचे आहे त्या दृष्यांमधे देखील भावनिक गुंतणूक होतेच. परंतू दिग्दर्शकाने कट म्हणल्यावर त्या सर्वच भावना झरझर दूर करून पुन्हा माझ्या मूळ व्यक्तित्वाला धारण करणे मला आता जमू लागले आहे. हे केवळ सिनेमाच्या सेटवरच नाही तर सामाजिक जीवनातही मला वापरणे गरजेचे वाटते. मी तीच आहे जिला गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर ट्रोल केले गेले होते. मी आपल्याच एका कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींचे नाव चुकीचे सांगितले होते त्यावरून दोन तीन वर्षे माझी सबंध देशभर अक्कल काढण्यात आली होती. मला त्याचा प्रचंड त्रास झाला. अनेक ठिकाणी मला तोच प्रश्न विचारून माझी खिल्ली उडविली जायची. कधी कधी तर माझा तोल जायचा. परंतू नंतर मी डीमोशनल होणे शिकली. कोणत्या गोष्टींना भावनिक पातळीवर मनाला स्पर्श करु द्यायचा कुणाला नाही याचे बटन मी आता माझ्या हातात घेतले आहे. त्यामुळे आता मला भावनिक दृष्टीने कुणीही त्रास देऊ शकत नाही किंवा कामाच्या ठिकाणीही मी त्वरित डीमोशनल होण्याची प्रक्रीया करते. त्यामुळे दिग्दर्शकाचा कट म्हणजे सारेच कट हे मला आता जमले आहे

हे सारे ऐकून मला असे वाटले की या बदलत्या काळात आपल्यापैकी प्रत्येकानेच काही ना काही प्रमाणात डीमोशनल होण्याची प्रक्रिया शिकणे गरजेचे आहे. आपल्या कामाबद्दल, आपल्या वागण्याबद्दल, बोलण्याबद्दल सध्या समाजमाध्यमांच्या माध्यमातून एक कडक पहारा बसविलेला आहे. तेथे आपल्या वागण्या बोलण्याचे हवे तसे अर्थ काढून हवा तसा रंग दिला जातो. परीणामतः काही क्षणातच कुणाच्याही जिवनाचे काहीही होऊ शकते. अश्या काळात आपण या सर्व बाबी किती आपल्या मनाला लावून घ्यायच्या, समाज माध्यमांवरील विचार हे किती प्रमाणात अधिकृत मानायचे समाजमाध्यमांपलीकडे जीवनच नाही असे किती प्रमाणात समजायचे हा महत्वाचा भाग आहे. याकरीता डीमोशनल होता येणे यासारखे देणे नाही. त्या अभिनेत्रीने सांगितल्याप्रमाणे आपल्या भावनांच्या गुंतणुकीचा वापर कुणी, किती नि कसा करायचा याचे बटन आपल्या हातातच हवे. त्याकरीता एकमेव उपाय.. डीमोशनल होणे..





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23