थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24
निखळ आनंदाची शाळा
रविवारी शाळा भरली. खरे तर रविवारी सुटी असते. परंतू ही एक विशेष शाळा होती. या शाळेत येणारे बहुतांश विद्यार्थी वय वर्षे ५० ते ७० या वयोगटातले होते. वयं मोठी असली तरी ते सारे आज विद्यार्थी होते. या विद्यार्थ्यांपैकी जवळपास सर्वांजवळ चार चाकी गाड्या असुनही सर्व जण पायी किंवा सायकलवर शाळेत आले होते. सोबत डबा आणला होता. खास या शाळेकरीता शिवलेला गणवेष त्यांनी परीधान केला होता. खूप वर्षानंतर पुन्हा सर्व विद्यार्थी शाळेत आले होते. त्यातले जे लोक समुहाने आले त्यांचे ठीक होते परंतू जे एकटे आले ते तर भांबावून गेले होते. तीस पस्तीस वर्षांनंतर परत एकदा शाळेत आल्यावर त्यांना त्यांच्या वर्गातील मित्र शोधणे फार कठीण झाले. दूर उभा असलेला माणूस पाहिल्यासारखा वाटतोय परंतू नक्की कळत नाही कारण त्याच्यात फारच बदल झालेला दिसतोय. परंतू जेव्हा वेगवेगळ्या बॅचनुसार रांगेत उभे राहण्याची वेळ आली तेव्हा मात्र लक्षात यायला लागले. हा तर माझा बेंचमेट आहे. ओळख पटली आणि मग काय धमाल सुरु झाली. आपल्या बेंचवर सोबत बसणाऱ्या मित्राला कडकडून मिठी मारताना त्या दोघांच्याही डोळ्यात आलेले आनंदाश्रू त्यांच्या प्रेमाचे व शाळेवरील प्रेमाचे साक्षीदार होते. अश्या साऱ्या भेटी सुरु होत्या. गंमती जमती सांगितल्या जात होत्या. आजोबा शाळेत निघाले म्हणून घरी नातवंडाची हसून हसून पुरेवाट झाली हे एकमेकांना सांगणे सुरु झाले. आज माझ्या पोराने माझे दफ्तर भरुन दिले व सोबत वॉटरबॉटल देखील दिली हे सांगणारे बाप देखील हसून हसून सारे एन्जॉय करत होते. मोठे मोठे अधिकारी, डॉक्टर्स, राजनेते एकमेकांना गण्या, नाऱ्या, विश्या, अतल्या, पांड्या अश्या भन्नाट नावांनी हाका मारत होते. एकमेकांचे वर्ग कुठेकुठे होते ते एकमेकांना दाखवत होते. हे सारे सुरु असतानाच अचानक शाळेची बेल वाजली. सारे विद्यार्थी रांगेत उभे झाले. प्रार्थना झाली, प्रतिज्ञा म्हणल्या गेली, राष्ट्रगीत झाले व त्यानंतर रांगेत विद्यार्थी वर्गांमधे गेले. त्यांचे काही शिक्षक देखील आले होते. त्यांनी तास घेतले. शिक्षकांकडून अनेक विद्यार्थ्यांनी पुन्हा कान देखील पिळून घेतले. त्यानंतर मधली सुटी झाली. सर्वांनी घरून आणलेले डबे खाल्ले. शाळेकडून त्यांना खिचडी देण्यात आली. परत एकदा एकमेकांच्या डब्यांतील पदार्थ पळविणे झाले. मधल्या सुटीत गेली चाळीस वर्षे शाळेच्या समोर खारे दाणे व बोरकुट विकणारे काका पुन्हा आले व त्यांच्याकडून सर्वांनी खारे दाणे विकत घेऊन त्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर पीटी चा क्लास झाला. सरांनी सर्व वयोवृद्ध विद्यार्थ्यांना कवायती करायला लावल्या. मध्यमवयीन पोरांची रस्सीखेच झाली. कुणी पडले, धडपडले परंतू आपल्या ब्रॅन्डेड कपड्यांना शाळेच्या मैदानाची माती लागली म्हणून वाईट न मानता सर्वांनी त्याबद्दल धन्यता मानली. कपड्यांना लागलेली शाळेच्या मैदानावरची ती माती अभिमानाने घरच्या लोकांना दाखविण्याकरीता तशीच ठेवण्यात आली. शाळेची शेवटची घंटा होऊन शाळा संपवून हे सारे वयाने मोठे परंतू तीन चार तास बालपणात शिरलेले सारे विद्यार्थी जेव्हा घराकडे निघाले तेव्हा प्रत्येकाच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या होत्या. कारण जीवनात कितीही मोठे झालो तरी शाळेमधे घालविलेला काळ पुन्हा जगायला मिळाला व त्यामुळे मागे पडलेले व काळाच्या गर्तेत हरवून गेलेले निरागस बालपण त्या प्रत्येकाला पुन्हा मिळाले होते. काही तासांचाच तो प्रवास परंतू अद्वितीय असाच ठरला. हे सारे यासाठी झाले की ज्या काळात सारेच निरागस व निखळ होते त्या काळातली ही दोस्ती होती, त्या काळातले ते क्षण होते, त्या काळाचा तो महिमा होता. आपल्या गुरुजनांनी आपल्याला ज्या परीसरामधे घडविले, प्रसंगी छड्या मारल्या पण जीवनाला खरा आकार जेथे मिळाला त्या परीसरात, त्या शाळेत येऊन जे सुख त्या दिवशी त्या साऱ्या विद्यार्थ्यांना लाभले ते पुढील आयुष्यात लाखो रुपये खर्च करूनही मिळू शकत नाही ही भावना तेथील प्रत्येकाची होती. आपल्या पैकी प्रत्येकाने खरे तर हा प्रयत्न करायला हवा. ही सुंदर कल्पना राबवायला हवी. कधीतरी पुन्हा दफ्तर पाठीवर घेऊन एकदा शाळेत जायला हवे. परत एकदा तो निखळ आनंद अनुभवायला हवा. हरवलेले बालपण व ती निरागसता या बदलत्या स्पर्धात्मक जगात परत एकदा काही काळ तरी अनुभवायला हवी… होय ना?
वर मी वर्णन केलेले सारे काही घडले, अमरावतीच्या नूतन विदर्भ शिक्षण मंडळाद्वारे चालविल्या जाणाऱ्या न्यू हायस्कूल मेन या शाळेच्या शताब्दी समारोहाच्या निमित्ताने…२१ जानेवारीला भरली होती… निखळ आनंदाची शाळा!!
Khup mast idea sir kharach aanand आश्रु आले
ReplyDeleteजबरी. खरच खुप अविस्मरणीय क्षण. धन्यवाद सर तुम्ही येवढ्या चांगल्या प्रकारे वर्णन केल्याबद्दल. डोळ्यांसमोरून सगळे क्षण गेलेत. काही कारणास्तव मला यायला जमले नाही, पण ग्रुप वरील सर्व फोटो, वीडियो बघून, मित्र मंडळी बघून डोळे पाणावले. एक अद्भुत आनंद झाला. हे क्षण, हे मित्र, परत मिळणे नाही. धन्य ती शाळा, धन्य ते शिक्षकगण ज्यांनी आम्हाला घडवले. न्यू high-school मेन शाळेचे नाव असेच पुढे जात राहो व अजरामर होवो हीच सदिच्छा 🙏
ReplyDeleteलेख आवडला
ReplyDeleteMast
ReplyDeleteसुंदर अनुभव कथन 👍
ReplyDeleteअत्यंत भावना स्पर्शी वर्णन केलेलेआहे। खूपच छान।
ReplyDeleteशाळेची आठवण झाली .सुरेख लेख.
ReplyDelete