थोडा है थोडे की जरुरत है @ 13.07.21
रीक्राफ्टींग सुटलो बुवा एकदाचा ! निवृत्तीच्या एक दिवस आधी काकांची उत्स्फुर्त प्रतिक्रीया होती . उद्या एकदाचा निरोप समारंभ झाला की डोक्यामागचे टेन्शन गेले . गेले वर्षभर एक एक दिवस मोजत होतो मी . हे शेवटचे दोन तीन वर्षे मी कसे काढले हे माझे मला ठाऊक . या सर्व परीस्थीतीमधे सगळे आजार लागले मला . म्हणूनच माझ्या पेन्शन केसचे काम मी आधीच करून घेतलेय . पेन्शन मंजूर देखील झाली . आता उद्यानंतर त्या ऑफीसचे तोंडही बघायला नको . नको ती खिडकीवरची गर्दी , नको ते वेगवेगळे प्रश्न , ताप नुसता डोक्याला . शिवाय डोक्यावर साहेब बसलेलाच . मशीनसारखे काम करायला लावणारा . आता मात्र सुटका रे बाबा . मला एवढे मोकळे वाटतेय की काय सांगू ? आम्ही सारे हे ऐकत होतो . काकांचा एकूण स्वभाव आणि आपल्या वेगवेगळ्या कार्यालयांमधील कामाची पद्धत ठाऊक असल्याने आमच्यापैकी कुणालाही त्यांच्या बोलण्याचे आश्चर्य वाटत नव्हते . परंतू जपानमधे नोकरीला असलेला काकांचा भाचा मात्र हे सारे ऐकून चकीत झाला . त्याने हे सारे ऐकले ...