थोडा है थोडे की जरुरत है @ 05.02.24

पॉज..

तू अचानक गावाकडे कशी आलीस? एवढ्या दिवसांनंतर कशी काय गावाची आठवण आली तुला? तिच्या बालपणीचा मित्र तिला विचारतो. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने हा शॉट अप्रतिम पोझीशनवर घेतलाय. दोघेही आकाशपाळण्यात बसलेले असतात आणि तो पाळणा हे दोघे वर असताना थांबलेला असतो. गरगर फिरणारा, घाबरवणारा, मनात धडकी भरविणारा, पोटात गोळा आणणारा, आनंद देणारा, एक्साईटमेंट देणारा असा तो पाळणा थांबलेला असतो ती त्याला तिच्या गावाकडे परतण्याचे कारण सांगत असते

थ्री ऑफ अस नावाच्या एका आर्ट फिल्म मधील मी वर्णन केलेला हा एक अप्रतिम सीन त्यामधे सांगितले जाणारे एक जीवनसत्य. दहावीच्या शिक्षणानंतर गाव सोडून शहरात गेलेली ती, नोकरीतील निवृत्तीच्या जवळ पोहोचताना आपल्या नवऱ्यासोबत परत एकदा गावात येते. गावातल्या तिच्या बालपणाला पुन्हा एकदा भरभरून कवटाळण्यासाठी, पुन्हा गावातील शुद्ध हवेमधे मोकळा श्वास घेण्यासाठी, स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावरील शुभ्र वाळूमधे चालण्यासाठी, गाव सुटल्यापासून आयुष्यातून पार सुटून गेलेला निवांत मिळविण्यासाठी ती परत येते. बालपणीचा मित्र भेटतो आणि त्याच्या समवेत ते मागे पडलेले बालपण पुन्हा एकदा ती जगते. शाळे पासून तर घरापर्यंत, घराच्या मागील अंगणातल्या विहीरीपासून तर गावातल्या टेकडीवरील चेटकीणीपर्यंत सारे काही पुन्हा एकदा अनुभवते. परंतू या सर्व अनुभव घेण्यामागचे एक वेदनादायी सत्य ती त्या बालपणीच्या मित्राला त्या थांबलेल्या आकाशपाळण्यात सांगते. तिचे ते शब्द ऐकल्यावर तो गहिवरून जातो. अचानक त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. तिला ते दिसू देण्याचा तो कसोशीने प्रयत्न करतो. कारण त्याने जे ऐकले असते त्याचा विचारही त्याच्या मनात आलेला नसतो

ती त्याला सांगते..शहरातले माझे जीवन सुरु होते. सतत आणि एकसुरी. घरची कामे करणे, धावपळ करत कार्यालय गाठणे, कार्यालयात तेच ते काम करत राहणे, परत सायंकाळी घरी येणे, पुन्हा घरची कामे आटोपणे याच क्रमाने अनेक वर्षे दिनचर्या सुरु राहीली आणि अचानक असे वाटले की धावता धावता थांबावे. एक पॉज घ्यावा. आणि म्हणून थांबले. तो थांबलेला आकाशपाळणा या नंतर बोलताना तिने घेतलेला पॉजहे एवढे अंगावर येते. शेफाली छायाने केवळ डोळ्यांनी व्यक्त केलेल्या भावना थेट आपल्या मनापर्यंत पोहोचतात. त्यानंतर मात्र ती जे सांगते त्याने आपल्या तिच्या बालपणीच्या मित्राच्या अंगावर सरसरून काटा उभा राहतो. कारण ज्या आशाळभूतपणे ती त्या गावाचा कोपरा कोपरा अनुभवत असते, ज्या पद्धतीने ती तिच्या बालपणीच्या त्या गावाची प्रत्येक गोष्ट पुन्हा एकदा मनात साठवून घेत असते त्यामुळे तिच्या गावाकडे येण्याचे कारण काहीतरी वेगळे आहे असा अंदाज येत राहतो. पण ते खरे कारण ती जेव्हा सांगते तेव्हा मात्र तिच्या गावाकडच्या पुन्हा नव्याने घेतल्या जाणाऱ्या अनुभवाचा अर्थ उमगतो

हळू हळू एकेक शब्द सावकाश उच्चारत ती सांगते, हा पॉज घेणे गरजेचे होते रे. कारण धावता धावता मी काही दिवसांपासून माझ्या आयुष्यातील काही काही गोष्टी विसरु लागलीय. डॉक्टरांनी निदान केलंयमला डीमेन्शीया झालाय. आता मी हळू हळू सारे काही विसरत जाणार. सगळेच विसरण्याआधी मला माझा बालपणीचा गाव परत एकदा मनात भरून घ्यायचा होता. परत एकदा सारे काही मनात साठवून घ्यायचे होते कारण काही दिवसांनी हे काहीच नसणारमाझ्या मनातून सारेच पुसले जाणार.. हे गाव, या आठवणी, तू.. सारेचहे सारेच विसरून जाण्याआधी मला परत एकदा खऱ्या अर्थाने मुक्तपणे जगायचे होते. त्यासाठी पॉज घेतलाते ऐकल्याबरोबर धक्का बसून काय बोलावे हे तिच्या बालपणीच्या मित्राला सुचत नाही.. त्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात. मावळतीच्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर जयदीप एहलावतने ही भावना आपल्या अभिनयातून चपखलपणे व्यक्त केली आहे. त्याच्या बालपणीच्या मैत्रीणीचा तो पॉज त्याचे आपलेही ह्रदय पिळवटून काढतो. खरोखरीच धावणाऱ्या आयुष्याच्या धकाधकीत असा पॉज गरजेचा असतो. तो घेतलाच पाहीजे.

वाचक मंडळी, एक पॉज मी देखील घेतो आहे. २०१४ साली मार्च महिन्यातच मी, माझे हे सदर थोडा है थोडे की जरुरत है, दै हिंदुस्थानमधे लिहीणे सुरु केले होते. या दरम्यान मधला दोन तीन महिन्याचा काळ सोडला तर हे सदर अव्याहतपणे दर मंगळवारी सुरु आहे. दै. हिंदुस्थान परीवाराचे विलास मराठे, विनोद मराठे, मनिषा मराठे सर्व सदस्य यांच्या प्रेमामुळे सहकार्यामुळे मला हे सदर एवढी वर्षे चालविता आले. आता मात्र एक पॉज घेतोय. थोडा है थोडे की जरुरत है हे माझे सदर आता थांबवतोय. तुम्हा सर्वांप्रती मनःस्वी ऋणनिर्देश करतो. तुमचे प्रेम प्रतिसाद ही माझी फार मोठी मिळकत कायम मनात ठेवतो. काही काळानंतर पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन एक पॉज मी देखील घेतो. धन्यवाद.

- प्राचार्य डॉ. अविनाश भास्कर मोहरील




 

Comments

  1. वाक्यातील फुल स्टॉप नंतर सुरु होणारे दुसरे वाक्य बरेचदा आणखी सुंदर असते तसेच पॅरेग्राफ संपल्यानंतर सुरू होणारा पॅरेग्राफ त्याहीपेक्षा सुंदर असु शकतो, पॉज घेतल्यानंतर आपणही आणखी सुंदर सुंदर विचार आम्हा पुढे ठेवाल या प्रतीक्षेतच आपल्या लेखाचा वाचक रसिक🌹🌹🙏🙏

    ReplyDelete
  2. Manish Moharir Nagpur14 March 2024 at 16:31

    Khup sunder lihile aahe.Amchya offfice madhil Gadling sahebanni mala tumche lekh fwd kele tewhapasun me aple likhan wachat aahe.tumhala pudhil watchalikarita khup khup shubheccha.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23