थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23

स्पर्श.. ()

वाचक मंडळी, मी आज एका अतिशय संवेदनशील विषयावर लिहीत आहे. सदर विषय दोन भागांमधे लिहीला आहे. असल्या विषयांसंदर्भात अजूनही आपल्या समाजात बोलले जात नाही ही मोठी खंत आहे. आपण सर्वांनी याबाबत विचार करावा जमेल त्या पद्धतीने ही समस्या कमी होईल याबाबत प्रयत्न करावा ही विनंती. सदर विषयावर मी काहीतरी लिहावे असे माझी मैत्रीण प्राची पालकर हिने मला सुचविले. त्याक्षणी मला महाविद्यालयात घडलेली एक घटना आठवली. वर्णन केलेली घटना मागच्या वर्षीची आहे. खरे तर मला देखील हा विषय मांडायला उशीरच झाला आहे, त्याबद्दल क्षमस्व.

सर, माझ्या मुलीचे नाव तुमच्या कॉलेजमधून नाव काढायचे आहे. आता मला माझ्या मुलीला शिकवायचे नाही. माझ्यासमोर माझ्या केबीनमधे एका मान खाली घालून बसलेल्या मुलीची तिच्या सोबत आलेली आई मला हे सांगत होती. एखादी विद्यार्थिनी असे महाविद्यालयातून नाव काढत असेल तर स्वाभाविकपणे मी स्वतः पूर्ण चौकशी करूनच तशी परवानगी देत असतो. मी त्यांना काय अडचण आहे असे विचारले. महाविद्यालयाबद्दल काही तक्रार असेल तर आपल्याला सुधारणा करता येतील असे सांगून आश्वस्त देखील केले. ती आई मला म्हणाली, नाही सर, कॉलेजची काहीच समस्या नाही. येथे तर तुम्ही तुमचे सर्व प्राध्यापक किती काळजी घेता. माझी पोरगी मला मला सांगते की कश्या प्रकारे येथे वेगवेगळे उपक्रम घेतले जातात, मनापासून शिकविले जाते सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्याही बोलण्यातून या सर्व तुमच्या लहान बहिणीच आहेत असे येते त्यामुळे आम्हाला त्याबाबत काहीच अडचण नाही. मी म्हणालो, महाविद्यालयाबद्दल काहीच अडचण नसताना मग तुम्ही आपल्या अकरावी झालेल्या मुलीला महाविद्यालयातून का काढत आहात? तिचे निदान बारावी पूर्ण होऊ द्या. असे मधेच शिक्षण सोडून काय साध्य होईल? तुम्ही शिकू शकल्या नाही परंतू निदान मुलीला तरी शिकवा. चांगले महाविद्यालय तिला मिळाले आहे. एकदा शिक्षण झाले तर तिला स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. कृपया समजून घ्या. एका मुलीचे शिक्षण बंद होण्यापासून थांबविण्याकरीता मी पूर्ण प्रयत्न करीत होतो. ती आई मला म्हणाली, सर तुम्ही म्हणता ते सारे मला कळते आहे. खरे तर आम्ही खेड्यातले लोक आहोत. पण तुम्ही सांगता त्याच कारणासाठी तर मी नवऱ्याच्या इच्छेविरोधात पैश्यांची खूप अडचण असतानाही हिला येथे शहरात शिकायला ठेवले. मी विचार केला की दुर्दैवाने माझे वडील मला शिकवू शकले नाही पण मी माझ्या मुलीला शिकविनच. माझी मुलगी माझ्यासारखी शेतावर मजूरी करणार नाही तर कुठेतरी नोकरी करेल असे मी ठरवले. हिच्या वडीलांचा मोठा विरोध होता. शहरात गेल्यावर पोरगी बिघडून जाईल म्हणून गावातच तिला ठेव असे ते सारखे म्हणत होते. पण आता माझा नाईलाज झाला आहे. मला समस्या लक्षात आल्यासारखी वाटली

मी त्या ताईंना म्हणालो, काय झालेय? हिच्या वागण्यामधे काही अडचण आहे का? तर क्षणात ती माऊली म्हणाली, सर, अजिबात नाही. माझ्या मुलीचा मला याबाबतीत मनापासून अभिमान वाटतो. शहरात येऊनही माझ्या मुलीने तिच्या वागण्या बोलण्याचे ताळतंत्र अजिबात सोडले नाही. उलट अतिशय काटकसर करून माझी मुलगी राहते. शिवाय खर्च जास्त होऊ नये म्हणून तिला येथे माझ्या भावाकडे, तिच्या मामाकडे ठेवले आहे. पण मी माझ्या भावाला हिच्या राहण्याचे पैसे देते. पण माझी पोरगी मात्र मी तिला वैयक्तिक खर्चासाठी जेवढे पैसे दिले त्यातलेही पैसे वाचवते. माझी तिच्या बाबतीत अजिबात तक्रार नाही. आमची अडचण जरा वेगळीच आहे. ती तुम्हाला सांगावी की सांगू नये हेच मला कळत नाही. असे सांगून ती माऊली जरा अडखळली. आता मात्र मी जरा संभ्रमात पडलो. साधारणपणे महाविद्यालय सोडण्याची काही ठराविक कारणे असतात, त्यापैकी कोणतेही कारण येथे लागू पडत नव्हते. मी त्यांना म्हणालो, मला नेमके कारण सांगावे लागेल. विश्वास ठेवा, मी कुणाजवळही बोलणार नाही. जरा धीर धरून ती माऊली सांगायला तयार झाली. ती आई बोलत असताना सुरुवातीपासूनच मी त्या मुलीचे निरीक्षण करीत होतो. आता पर्यंत ती जरा नॉर्मल होती. परंतू जसे मी खरे कारण काय असे विचारले तशी ती अस्वस्थ होऊ लागली. जोरजोरात एक पाय हलवू लागली. तिने तिचे दोन्हीही हात खुर्चीच्या हातावर घट्ट दाबून ठेवले. तिला घाम आला होता. कदाचित जे तिची आई सांगणार होती ते तिच्याकरीता फारच वेदनादायी असे असावे म्हणून तिला तसे होत असावे. मी तिच्या आईला म्हणालो, तुमच्या मुलीला कदाचित जे काही सांगणार आहात ते ऐकायचे नसेल तर तिला बाहेर पाठवूयात का? माझे वाक्य ऐकल्यावर ती पोर म्हणाली, नाही सर, मी इथेच बसते आणि असे म्हणताच तिचे डोळे पाण्याने डबडबले. मी तिला प्यायला पाणी दिले. ती जराशी शांत झाल्यावर सावरून बसली. विषय संवेदनशील वाटत असल्याने मी माझ्या महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेस तेथे बोलावून घेतले. तिच्या उपस्थितीत शांत हळू आवाजात तिची आई मला समस्या सांगू लागली.. (क्रमशः)





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18