थोडा है थोडे की जरुरत है @ 12.09.23

संपर्काविना मी

माझ्या जवळच्या सर्व वस्तू सर्वात महत्वाचा म्हणजे मोबाईल फोन त्यांनी काढून घेतल्यानंतर आता माझ्या जगाशी मी संपर्क कसा करणार, काही अडचण आली तर ते सारे लोक मला संपर्क कसा करणार याचा विचार करतच मी गांधीनगरच्या त्या अतिभव्य अक्षरधाम या वास्तूमधे प्रवेश केला. २००२ मधे या मंदीरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे हा सर्व सुरक्षा प्रबंध करण्यात आला आहे असे मला सांगण्यात आले. एखाद्या अभेद्य किल्ल्यात प्रवेश केल्यागत मला वाटले, जेथून जगाचा संपर्क तुटून गेला आहे असेही वाटले. परंतू त्या प्रशस्त परीसरात प्रवेश केल्यावर, तेथील रचना, तेथील विविध देखावे, बगीच्याची रचना सर्वात महत्वाचे म्हणजे त्या संपुर्ण वास्तुचे पावित्र्य टिकविणारी स्वच्छता आणि शांतता. कामाचा दिवस असल्याने फार गर्दी देखील नव्हती. मी हळू हळू त्या मुख्य स्वामी नारायण मंदीराकडे चालू लागलो त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागे असलेले जग हळूहळू माझ्या मनातून दूर जाऊ लागले. सभोवतालचा सुंदर परीसर बघून मन प्रसन्न होऊ लागले. खरा दिव्यानुभव तेव्हा आला जेव्हा मी त्या नारायणस्वामींच्या मुख्य मंदीरात त्यांच्या त्या भव्य प्रसन्न मुद्रेच्या मुर्तीसमोर उभा राहीलो.

मुख्य मंदीरातील मुर्तीसमोर बसल्यावर मन शांत झाल्यागत वाटू लागले. बाहेरचे जग बाहेर ठेवलेल्या मोबाईलच्या माध्यमातून माझ्या संपर्कात असलेले अनेक लोक, समस्या, वेगवेगळे विषय, माझे काम, कामातील आवश्यकता, शासनाची पत्रे, त्याला द्यायची उत्तरे, कार्यक्रम, उपक्रम, लिखाण, परीवार, मित्रमंडळी, एकंदरीत माझे बाहेरचे संपुर्ण जीवन मी काही क्षणांकरीता विसरतो आहे असे मला वाटायला लागले. चमत्कार अजिबात नाही परंतू कदाचित माझ्या मनाची अवस्था अशी झाली की त्या स्वामींच्या मुर्तीकडे पाहून मला असे वाटले की यांच्यावर सारे सोपवून द्यावे निवांत व्हावे. जसा जसा हा विचार माझ्या मनात स्थापित होऊ लागला तसा तसा माझ्या जगाच्या संपर्काविना मी कसा राहू हा येथे प्रवेशाच्या वेळी मला त्रास देणारा विचार मागे पडला मी त्या स्वामी नारायण मंदीरात रमलो. तेथून शांतपणे स्वामींच्या जीवनाचा प्रवास मांडणाऱ्या प्रदर्शनी बघितल्या. अजिबात घाई करता सारे काही वाचले, बघितले. त्या ठिकाणी मुख्य मंदीराच्या खाली असलेल्या भव्य प्रदर्शनीसोबत सभोवताली भरपूर गोष्टी आहेत. मी त्या सर्व पहिल्या. माझ्या सोबतचे माझे गुजरात मधील सहकारी मला सारे समजावून सांगत होते

सकाळी ११ च्या सुमारास त्या भव्य परीसरात प्रवेश करताना माझ्या जगातील प्रत्येक गोष्टीशी संपर्क संपविताना मी अस्वस्थ होतो. त्या स्वामीनारायण मंदीरात जवळपास साडेचार तास घालविल्यानंतर मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मला माझेच आश्चर्य वाटले. गेले तार साडेचार तास मला माझ्या जगाबद्दल ती काळजी वाटत होती, माझा संपर्क राहीला नाही तर कसे व्हावे असे मला वाटत होते, मी जर सल्ला दिला नाही तर माझ्या महाविद्यालयाचे काय होईल असे वाचत होते, माझ्या मुलांना जर माझी गरज पडली तर ते काय करतील याची चिंता वाचत होती, मी असा चार साडेचार तास जर जगापासून तुटलो तर जणू जगाचे काय होईल या पद्धतीचे भाव माझ्या मनात होते ते पार नाहिसे झाले होते. मला शांत वाटत होते. त्याहून भ्रमनिरास झाला जेव्हा मी माझा फोन ताब्यात घेतला. माझ्या जगाची काळजी वाटून मी फोन बंद केला नव्हता तर सायलेंट करून त्यांच्या ताब्यात दिला होता. तो फोन बघितल्यावर मला त्या अक्षरधाममधे प्रवेश करताना वाटत असलेल्या काळजीचा मीच मोठा केलेला फुगा फुटल्यागत झाले मला जीवनातील सर्वात मोठ्या सत्याचा आविष्कार झाला. त्या चार साडेचार तासाच्या कालावधीत फोनवर कोणताही मीस कॉल नव्हता किंवा अन्य सोशल मिडीयावर फार महत्वाचे संदेश देखील नव्हते. माझ्या अपरोक्ष सारे जग बरोबर सुरु होते.

आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला एकमेकांच्या संपर्कात ठेवायला मदत करत असले तरी ते नसले तर आपण पंगू होऊ आपले आयुष्य चालूच शकणार नाही या माणसाच्या आत्मकेंद्री विचाराला बाजूला सारण्याकरीता असे संपर्कविरहित तास फार उपयुक्त ठरतात. कारणमी जाता राहील कार्य काय…. हे भा.रा. तांबेंनी लिहीलेले या जगातील त्रिकालाबाधित सत्य आहे.








Comments

  1. Dnyaneshwar Gatkar12 September 2023 at 09:32

    ❤️❤️❤️❤️

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लिहिले आहे sir... Phone शिवाय मनाची अवस्था ही पाण्याविना मासोळी च असते... पण विचार केल्यास खरंच फोन शिवाय आपले आणि इतरांचे काही अडत नाही... त्यामध्ये सकारात्मक विचार केल्यास समोरच्याला आपल्याशिवाय सुध्दा एखादा प्रॉब्लेम कसा सोडवता येईल याचे धडे मिळतात...
    मोबाईल सोबत असला की सेल्फी, कॅमेरातून त्या सुंदर फोटो काढण्याचा मोह आवरत नाही... त्यामुळे नजरेचे आणि मनाचे कॅमेरा बंद होऊन आपण चीर्कलिन स्मरणात राहणाऱ्या आनंदाला मुकतो. Memory full झाली की फोटो पण delete करतो. इतके. सुंदर क्षण सगळीकडून delete होत जातात.

    ReplyDelete
  3. खुप छान

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23