थोडा है थोडे की जरुरत है @ 10.09.23

श्री गणेशा

वेगवेगळ्या वर्गांमधे अचानक भेट देऊन तरुण विद्यार्थ्यांशी बोलणे ही माझी जुनी सवय आहे. त्यांना काही सांगण्यापेक्षा त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे याचा अंदाज घेणे हा या असल्या भेटींमागचा माझा हेतू असतो

माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होतात मी त्यांच्याशी छान मैत्री प्रस्थापित केली असल्याने मोकळेपणाने बोलतात. आपल्याला महाविद्यालयात काय नवीन करता येईल याचे सर्वात चांगले इनपुट मला  या असल्या भेटींमधेच मिळते. मी ते माझ्या सहकाऱ्यांशी शेअर करतो त्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही सारे मिळून कार्यक्रमांची उपक्रमांची आखणी करतो. परंतू आम्ही महाविद्यालयात चालवित असलेल्या शिक्षण प्रणालीवरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक प्रश्न मला एका विद्यार्थिनीने विचारला. तो प्रश्न मला एवढा अस्वस्थ करून गेला की अनेक वर्षांपासून चालत आलेली ही संपुर्ण शिक्षण प्रणाली आमुलाग्र बदलणारे नवे शैक्षणिक धोरण का आवश्यक आहे हे मला मनोमन पटले. नवे धोरण आले की त्या बद्दल ते राबविणारी व्यवस्था काही प्रमाणात आक्षेप घेतच असते. कारण सुखनैव सुरु असलेले जीवन मग ते कोणत्याही क्षेत्रात असो त्यात बदल फारसा पटणारा नसतो. परंतू त्या मुलीच्या प्रश्नाने मात्र या नव्या धोरणाची त्याच्या प्रभावी अंमलबजावणीची किती आवश्यकता आहे याची मला जाणीव झाली. एका परंपरागत शिक्षण देणाऱ्या कला वाणिज्य महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी काही वेळ त्या माझ्या विद्यार्थी मैत्रीणीचा प्रश्न ऐकून सुन्न झालो. तू महाविद्यालयात नियमीत का येत नाहीस असे मी तिला जरा रागानेच विचारल्यावर अत्यंत नम्रपणे तिने मला विचारले, सर, मी येथे येऊन काय करु?

खरे तर बरेच ठिकाणी असा प्रश्न शिक्षक देखील विचारु देत नाही. परंतू विद्यार्थिनींसोबत माझा मैत्रीपूर्ण संपर्क असल्याने तिने तसे बोलण्याचे धारीष्ट्य केले. तिने फारच तार्किक प्रश्न मला विचारला. तो विचारताना ती अतिशय स्पष्टपणे सारे बोलली. ती मला म्हणाली, सर, मी येथे येऊन काय करु? मला एका दवाखान्यात रीसेप्शनीस्ट म्हणून नोकरी लागली आहे. सकाळी १० ते सायंकाळी या कॉलेजच्या वेळातच मी तेथे काम करते. मला पाच हजार रुपये पगार मिळतो. सर, आज तेथे सुटी असल्याने मी कॉलेजमधे आली. सर, मी निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. माझे आई वडील दोघेही मजुरीवर जातात. ते मला शिकवू देखील शकत नाही. ही नोकरी लागल्यामुळे मी काही फी भरली. पण सर, मला पण मोबाईल वापरावा वाटतो, मला देखील एखाद्या दिवशी मॉलमधे जावे वाटते किंवा पिझ्झा खावा वाटतो. मी आई बाबांना पैसे मागूच शकत नाही कारण त्यांच्याजवळ घर चालवायलाच पैसे कमी पडतात. मग माझ्या खर्चासाठी मी नोकरी करते माझ्या इच्छा पूर्ण होतात. सर, कॉलेजमधे येऊन ग्रॅज्युएट झाल्यावर मला दहा किंवा पंधरा हजार रुपयाची नोकरी लागेल अशी गॅरेंटी मिळत असेल तर मी सध्याची पाच हजाराची नोकरी सोडू शकते. पण ग्रॅज्युएट झाल्यावरही पाच हजाराचीच किंवा अशीच नोकरी मिळत असेल तर मग आताच केलेली काय वाईट? सर, अशी गॅरेंटी कॉलेज मला देईल का

मला वाटलेच नाही की अश्या एखाद्या प्रश्नाला मला सामोरे जाऊन त्याचे सकारात्मक उत्तर देणे मला एवढे कठीण जाईल. खरे सांगतो, अनेक वर्षांपासून शिकवत आलेले परंपरागत कोर्सेस शिक्षण पद्धतीत अजिबात झालेला बदल या पार्श्वभूमीवर मला त्या माझ्या मैत्रीणीला गॅरेंटी देता आली नाही. परंपरागत शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाच्या कोणत्याही शिक्षकाला अशी गॅरेंटी देणे कठीण आहे. ही गॅरेंटी देण्याची सक्षमता, नव्या शैक्षणिक धोरणातून मिळणार आहे. कौशल्य विकास, उद्योजकता विकास, व्यवसायाभिमुख प्रशिक्षणे, व्यक्तिमत्व विकसन योजना, प्रत्यक्ष कामकाजाची संधी, वर्गखोलीच्या चार भिंतीपलीकडील प्रशिक्षणे, नवनविन विषय, आंतरविद्याशाखीय प्रणाली या साऱ्या बदलांच्या आधारे माझ्या विद्यार्थिनीने मागितलेली गॅरेंटी देता येऊ शकते. नवे शैक्षणिक धोरण राबविण्यातील अडचणींचा विचार करता, त्यावर मात करून विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची गॅरेंटी देण्याचा श्री गणेशा करण्याचा निर्धार आजच्या पावन दिवशी करुयात.. होय ना?





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.06.21

थोडा है थोडे की जरुरत है @ 10.12.19