थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18

आनंदहेतूच्या मागण्या

दोन्ही घरांमधे ट्रीपला जायचे ठरल्यापासून त्या घरांतील वातावरण बदलून गेले होते. प्रत्येकाची स्वतंत्रपणे तयारी सुरु झाली होती. बॅगा, कपडे, एरवी वापरता येणारे परंतू ट्रीपमधे घातले तर चालतील असे कपडे अश्या साऱ्या तयारी सुरु झाल्या. सोबत खायला काय काय न्यायचे याची व्यवस्था सुरु झाली. पोरांची तर वेगळीच गंमत होती. समुद्रकिनारी जाणार असल्याने तेथे काय काय धमाल करायची आहे याची लिस्ट तयार होत होती त्यानुसार त्यांचे खेळांचे साहित्य सोबत घेणे सुरु होते. बदलत्या काळानुसार पोरांनी प्रत्येकाची आवड असलेली स्वतंत्र गाण्याची प्ले-लीस्ट बनवून ती गाणी पेन ड्राईव्ह आईच्या मोबाईल मधे टाकून घेतली होती. आईच्या मोबाईलवर तसेही मुलांचा अधिकार असतो. बाबांजवळ त्यांचे लाड चालत नाहीत. या सगळ्या तयारीच्या गर्दीत बाबांचे कोणकोणत्या गावांना जायचे, कसे जायचे, त्या त्या ठिकाणचे बुकींग वगैरे सारे बघणे सुरु होते. एकंदरीत प्रवास म्हणला की सारेच ठरवावे लागते प्रत्येकाने त्यात आपआपले योगदान दिले की सर्वांनाच त्या सहलीचा आनंद घेता येतो. अश्या प्रकारे सहलीला जाण्यासाठी तयार झालेले दोन मित्रांचे परीवार मी बघत होतो. माझा या उन्हाळ्यात सहलीचा खंड असल्याने त्यांच्या तयारीचा आनंद मी घेत होतो. मित्रांना काही बुकींग वगैरे करुन दिलीत. सहलीचा दिवस जवळ आला. हे दोन्ही परीवार जवळपास एकाच दिवशी निघणार होते. त्यामुळे सहलीच्या आधल्या दिवशी मी दोन्ही मित्रांकडे जाऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो. दोन्ही मित्रांकडे तयारी जवळपास सारखीच होती दोन्हीही घरांमधे उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता. या दोन्ही सहलींमधला एकच ठळक फरक मला जाणवत होता तो म्हणजे एक परीवार आपल्या कारने सहलीला जाणार होता दुसरा परीवार ट्रेनने. हा फरक सांगितल्यावर मात्र अनेकांच्या मनात या फरकाच्या अनुषंगाने निर्माण होणारे  इतर फरक पटापट डोक्यात येतात. दोन्ही परीवारांच्या आर्थिक परिस्थितींपासून तर सहलीच्या रचनेपर्यंत सारे काही अचानक बदलून जाते. वयाने मोठे झालेले आपण साऱ्या गोष्टी त्या आर्थिकतेच्या निकषांवर मोजायला लागतो. जसा फरक आपल्याला जाणवतो तसाच मुलांनाही जाणवतो परंतू त्यांची त्या फरकांकडे बघण्याची दृष्टी आर्थिक संदर्भात तयार झालेली नसल्याने त्यांचा या फरकाबाबतचा दृष्टीकोन अतिशय निरागस मनमोहक असतो. सहलीच्या आधल्या दिवशी या दोन्ही घरात गेल्यानंतर माझ्या सवयीनुसार मी घरातल्या पोरांशी देखील जरा गप्पा मारल्या. त्या दोन्ही घरांतील पोरांच्या तोंडून सहजच निघालेली दोन वेगवेगळी वाक्ये मला विचारात टाकून गेली. त्या दोन वेगवेगळ्या वाक्यांनी मला माणसाच्या जिवनात असलेल्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत विचार करायला बाध्य केले. जीवन जगत असताना माणूस स्वतःचा विकास करीत असतो जो त्याचा स्थायी भावच आहे त्या अनुरुप विकासाकरीता त्याच्या जिवनाकडून मागण्या असणे देखील अत्यंत स्वाभाविक आहे. परंतू या मागण्याचे हेतू काय आहेत यावरच त्या मागण्यांची यथार्थता ठरते. या मागण्यांमागचे हेतू जर स्वच्छ निखळ आनंदाचे असतील तर त्या मागण्या असायला त्यांची पूर्तता करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना एक वेगळी झळाळी प्राप्त होते. बरेच वेळा मागण्यांमागचे हेतू फार विचित्र विखारी असतात त्यामुळे असल्या व्यक्तींच्या आयुष्यात त्या मागण्या पूर्ण जरी झाल्या तरी त्यांस हवी तशी प्रतिष्ठा प्राप्त होत नाही किंवा खरा आनंद त्यामधून प्राप्त होत नाही. निखळ आनंदाकरीता मागण्या कश्या असाव्या हे त्या दोन घरातील मुलांनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या प्रतिक्रीयांवरुन सहजच स्पष्ट होते.

ट्रेनने सहलीला जाणाऱ्या घरातील मुले मला म्हणाली, काका आम्हा खूपच धमाल करणार आहोत. परंतू आम्ही जर कारने गेलो असतो ना तर किती मजा आली असती. केवळ आम्ही चौघेच, बाबांनी गाडी चालविली असती, आम्हाला मस्त पेन ड्राइव्ह त्या गाडीत लावून केव्हाही आमच्या आवडीची गाणी लावता आली असती. मस्त गाडीतला एसी लावून बढीया थंड थंड जाता आले असते. कोकणात झाडांना खूप आंबे आहेत म्हणे, मस्त कुठेही गाडी थांबवून गाडीवर चढून आंबे तोडता आले असते, मज्जा आली असती अजून खूप. खरंच काका आम्ही ट्रेनमधेच जायला हवे होते ट्रीपला. ट्रेनमधे आपल्याला पाहिजे तेथे थांबता येत नाही, खूप सारे लोक असतात, गोंधळ, गडबड, शिवाय एसी नसतो कारण बाबांनी स्लीपरची तिकीटे काढलीत, त्यामुळे कार किती छान राहीली असती ना? मुलांची मागणी योग्यच होती. त्या मागणी मागचा त्यांचा भरपूर आनंद घेण्यामागचा हेतू स्पष्ट होता म्हणून मला ती मागणी रास्त वाटत होती. त्यानंतर मी कारने सहलीला जाणाऱ्या मित्राकडे गेलो तेथेही मुलांशी गप्पा मारताना बाकी सर्व गोष्टी त्यांची तयारी बघताना त्यांनी दिलेली प्रतिक्रीया फारच सुरेख होती. ती पोरे मला म्हणाली, काका आम्ही छान आठवडाभर धमाल करणार आहोत पण आम्हाला एकच गोष्ट जरा आवडत नाहीये ती म्हणजे आम्ही कारने जाणार आहोत. त्यांचे वाक्य ऐकल्याबरोबर मी जरा सावरुन त्यांचे म्हणणे ऐकायला तयार झालो. ती पोरे म्हणाली, काका कारमधे काय केवळ आम्ही चौघेच, कंटाळा येतो, कुठे फिरता देखील येत नाही. ट्रेनमधे मस्त खिडकी उघडी ठेवली की हवा येते मस्त, त्यासोबतच पाहीजे तेव्हा झोपता येते. समोरासमोर बसून मस्त गाण्याच्या भेंड्या खेळता येतात, सर्वात महत्वाचे म्हणजे बाबा आमच्या सोबत खेळू शकतात. कार असली की त्यांना गाडी चालवावी लागते ते काही बोलू देखील शकत नाही फार. ट्रेनमधे मस्त काही काही विकणारे येतात, त्यांच्या जवळची भेळ किंवा काकडी किती बढीया वाटते. खरंच काका, आमची ही ट्रीप ट्रेननेच हवी होती. आधीच्या घरा प्रमाणे येथेही मी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला परंतू आता आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी मस्त सहल प्लॅन केली आहे त्यामुळे त्यांना आपण असे बोललो तर वाईट वाटेल म्हणून काहीही बोलता मस्त सहलीचा आनंद घ्यायचा असा माझा सल्ला देखील त्यांना दिला. आम्ही खूप मजा करु असे त्यांनी मला आश्वासन दिले. या दोन्ही परीवारांना शुभेच्छा देऊन मी परतलो पण त्या दोन वेगवेगळ्या परस्परभिन्न मागण्या मात्र मला जगण्याचा एक नवा आयाम सांगून गेल्या.

त्या दोन्हीही मागण्या आपापल्या जागी योग्यच होत्या. मुलांना जे वाटले ते कुणालाही वाटू शकते परंतू मला जी भावली ती त्या मागण्यांच्या मागची निरागसता आनंद मिळविण्याचा सद्हेतू. सहलीला जायचे म्हणून ती पोरे आनंदीच होती परंतू त्यांना त्यांच्या मागण्यांनी तो आनंद द्विगुणित करायचा होता. मुलांच्या ठायी असलेली ही मागण्यांमागची निरागसता, वय अनुभव वाढल्यानंतर लोप पावताना दिसते. नंतर त्या मागण्याचे हेतू वेगवेगळ्या स्वार्थांनी लिप्त होताना दिसतात म्हणूनच त्या मागण्यांची पूर्तता करताना भ्रष्टाचार केला जातो हे सारे घडले की त्या सर्व मागण्यांच्या पूर्ततेतील निखळ आनंद लोपतो. मग या स्वार्थी मागण्यांची यादी घेऊन लोक मंदीरांमधेही जातात, तेथे वेगवेगळे नवस बोलून देवालाही वेठीस धरतात. मुलांसारखे निरागस मन निखळ आनंदाची प्रवृत्ती असेल तर त्या भावनेतून उत्पन्न झालेल्या सर्व मागण्या पूर्ण करताना परमेश्वर देखील भरभरुन आनंद देतो अश्या माणसाला मिळणारा आनंद शाश्वत असतो, ती त्याची प्रवृत्ती बनते. तो खराखुरा आनंदयात्री होतो. संदिप खरे लिहीतो त्या प्रमाणे,

मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,

नवसांची ठेऊन लाच लावतो बोली,

तो मुळात येतो इच्छा अर्पून साऱ्या,

अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो!!





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24