थोडा है थोडे की जरुरत है @ 29.05.18

आनंद घंटा

आपल्याला आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर खूप कष्ट घ्यावी लागतात असे बऱ्याच मंडळींना वाटत असते. त्यामुळे त्या समजापोटी आनंदनिर्मीतीच्या सोप्या सोप्या प्रक्रीया त्यांना ठाऊक नसतात. परंतू मुळात आनंद निर्मीतीची प्रक्रीया ही कष्ट किंवा पैसा या बाबींशी निगडीत नसून प्रवृत्तीशी निगडीत आहे. जिवनावर मनापासून प्रेम करुन वेगवेगळे क्षण साजरे करण्यासाठी त्या प्रवृत्तीसोबत कल्पकता देखील हवी असते. कारण कल्पकता असली की जिवनातील अपरीहार्य असलेली दुःखे देखील अचानक आनंदामधे परावर्तीत होऊ शकतात. त्या कल्पकतेमुळे सामान्य पद्धतीने जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्याही जिवनात आनंदाची बरसात होऊ शकते, त्याचे नेहेमीचे आणि तेच ते वाटणारे रुटीन आयुष्य देखील त्याला सुंदर भासू लागते या सोबतच अशी व्यक्ती तिच्या सहवासातील इतरांनाही जीवनाचा आनंद मिळवून देऊ शकते. अश्या पद्धतीची कल्पकता, त्या कल्पकतेची गंमत आणि त्यामधून सर्व वयोगटाच्या मंडळींना मिळणारा आनंद याची सांगड घालणारी एक मजेदार गोष्ट मला नुकतीच बघायला मिळाली. ती गोष्ट होती एका दुकानासमोर त्या अत्यंत कल्पक दुकानदाराने बांधलेली एक घंटा

आपण सर्व मध्यमवर्गीय मंडळी किराणा कश्या प्रकारे आणतो? प्रश्नाने चमकलात? विचार करुन बघुया. काही घरी महिला आणि काही घरी पुरुष आणि काही मोजक्या घरी दोघे मिळून किराणा आणायला जातात. किराणा आणण्याच्या दोन तीन पद्धती आहेत. सर्वात सोपी पद्धत म्हणजे घरुन तयार केलेली यादी पिशव्या घेऊन निघणे, इतर कोणतेही काम करायला जाताना यादी पिशव्या किराण्याच्या दुकानात देऊन देणे परत येताना त्या पिशव्या उचलून आणणे. ही पद्धत सहसा पुरुष मंडळी अवलंबताना दिसतात. याऊलट महिला मंडळी दुकानात जाऊन प्रत्येक वस्तू समोर काढायला लावून मग किराणा आणतात. यासोबतच घरपोच किराणा ही देखील एक पद्धत प्रचलीत आहे. गेल्या काही वर्षांमधे यामधे आणखी एक पद्धत समाविष्ट झालीय. विशेषतः शहरी भागात किराण्याचे मॉल्स तयार झाले त्यामुळे किराणा खरेदीचा एक वेगळा प्रकार निर्माण झाला. भल्या मोठ्या दुकानात जायचे, ट्रॉली घ्यायची आणि मग मनसोक्त खरेदी करीत जायचे. तेथे खूप साऱ्या वस्तू त्या वस्तूंचे विविध प्रकार उपलब्ध असतात. त्यामुळे किराण्याचा आकार पर्यायाने बिलाचा आकार देखील वाढतो. त्यामुळे ही पद्धत कधीकाळी वापरण्यासाठी चांगली आहे शिवाय यात खूप वेळ जातो असाही एक सूर ऐकायला मिळतो. त्यापेक्षा पिशव्या नेऊन ठेवण्याने कामात काम होते घरचे देखील इतर एखादे काम आटोपून टाकता येते असे बऱ्याच मंडळींचे मत असते. एकंदरीत किराणा आणणे हे महिन्यामधून एकदा करावयाचे काम आहे ते इतर कामांच्या यादीप्रमाणे पार पाडले जाते. परंतू फार कमी लोक असतात ज्यांच्याकरीता किराणा आणणे किंवा घरातील महिन्याकाठी करावयाची कामे म्हणजे आनंदक्षण असतात. घरचा किराणा आणणे ही एक अत्यंत आनंदाची बाब असू शकते, त्यामधून आपल्याला खूप छान सुखाचे क्षण मिळू शकतात महिन्याकाठी तो आनंद आपण मिळवायलाच हवा अश्या पद्धतीचा विचार शिकविणारी ती आनंद घंटा ही संकल्पना मला त्या नागपूरच्या एका मोठ्या किराणा दुकानासमोर बघायला मिळाली.

किराणा मॉल या सदरामधे मोडणारेच ते दुकान होते. ज्यामधे मी वर उल्लेख केल्या प्रमाणे वेगवेगळ्या वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या त्याची मनसोक्त खरेदी आपल्याला करता येते. दुकानात प्रवेश करतानाच माझे लक्ष त्या आनंद घंटेकडे गेले होते. अगदी दुकानासमोरच ती घंटा टांगली होती त्याची दोरी खालपर्यंत म्हणजे कुणाचाही हात पोहोचू शकेल अशी बांधली होती. म्हणजे अगदी तीन वर्षाच्या लहानग्याला देखील ती घंटा वाजविता येईल याची काळजी घेतलेली होती. घंटेवर मोठ्या अक्षरात हॅपी बेल असे लिहीले होते त्या दोरीला लावलेल्या बोर्डवर एक सुंदर संदेश लिहीला होता. किराणा खरेदी करणे ही आपल्यासाठी एक आनंद पर्वणी आहे, आज आमच्या दुकानात आपण जर हे आनंदक्षण मिळवू शकलात तर परत जाताना ही घंटा वाजवून आपल्या आनंदाचे प्रकटीकरण करात्यामुळे आमचा आनंद द्विगुणित होईल!! ते वाक्य वाचून मी खरोखरीच काही क्षण तेथे थांबलो मला त्या दुकानदाराच्या कल्पकतेचे कमालीचे कौतुक वाटले. किती छोटी परंतू किती सुरेख कल्पना आहे  ही!! दुकानात प्रवेश घेतेवेळीच तेथे कसे वावरायचे आहे हे आपल्याला सूचित करणारी ती सूचना काय अफलातून होती. त्या दोन ओळींनी मनावर असा काही परीणाम होतो की दुकानात शिरल्यावर आपण वेगवेगळ्या वस्तू तर विकत घेतोच परंतू त्यासोबत आपल्याला आनंद मिळवायचा आहे ही गोष्ट मनात असल्याने तो प्रत्यक्ष मिळतो देखील. त्या संदेशामुळे ते महिन्याकाठी पार पाडायचे काम रहात नाही तर ती खरोखरीच एक आनंदयात्रा बनते. माझ्या समोरच एक आई तिच्या चार वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन किराणा खरेदी करीत होती. त्या दोघी कदाचित तेथे नेहेमीच येत असाव्या. ती आई मुलीला सारखी त्या पाटीवरील संदेशाची आठवण करुन देत होती. जेथे जेथे ती पोर काही गोष्ट घेण्यासाठी हट्ट करीत होती ती गोष्ट अनावश्यक असेल तर ती आई तिला आठवण करायची, बेटा आपल्याला हॅपी बेल वाजवायची आहे ना? त्यामुळे हट्ट करता हॅपी राहून खरेदी करायची. तू जर हट्ट केलास तर मग ते काका तुला बेल वाजवू देणार नाही. आश्चर्य म्हणजे आपल्याला ती हॅपी बेल वाजवायची आहे या आनंदामुळे ती पोर हट्ट सोडून द्यायची निमूटपणे आईचे ऐकायची. हा सारा प्रकार मला फारच गोड वाटत होता. मी देखील नकळत त्या बेल वाजविण्याच्या इच्छेने एका वेगळ्या आनंदासह खरेदी केली. परत जाताना ती छोटी पोर अतिशय आनंदाने ती बेल वाजविताना मला दिसली. याहू करत तिच्या आईने देखील ती बेल वाजविली. किराणा खरेदी करण्यासारखी एक रुटीन गोष्ट देखील अत्यंत आनंददायी बनविणाऱ्या त्या कल्पक दुकानदाराचा हात हातात घेऊन मी त्याचे मनापासून कौतुक केले. साऱ्या वस्तू सुंदर डीझाईनच्या कापडी पिशव्यांमधे त्याने मला भरुन दिल्या. दुकानातून बाहेर पडताना पायऱ्यांजवळच्या त्या बेलकडे मी एक मिनीटे बघितले. ती छोटीशी निर्जीव गोष्ट किती जणांना आनंद देत होती. किराणा खरेदीचा मनसोक्त आनंद आठवून मी देखील हलकेच याहू म्हणालो आणि बेल वाजविली. बाजूला उभ्या असलेल्या मुलीने मला मी बेल वाजविल्याबद्दल एक मस्त टॉफी दिली. ती टॉफी चघळत, एका कल्पक आनंदयात्रेमधे सहभागी झाल्याचा आनंद स्मरत मी निघालो. त्या टॉफीची चव आणि त्या आनंदाचा आठव अद्याप मनःपटलावर रेंगाळतोय.

प्रशांत दामलेच्या नाटकातील गाण्याच्या ओळी आठवतात.. सुख म्हणजे नक्की काय असतं? कल्पकतेने जीवन जगायचे ठरवून जीवनावर मनापासून प्रेम करण्याची प्रवृत्ती असेल तर आनंद हा सहजच मिळतो. त्यासाठी कल्पकता जोपासावी लागते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या कल्पकतेतून इतरांनाही आनंद देता यावा हे खरे जीवनसूत्र आहे. चिडचिड करत, त्रागा करत, सर्वच बाबतीत नकारात्मक भूमिका ठेवत, माझीच भूमिका सर्वश्रेष्ठ आहे ती मी बदलणार नाही अश्या थाटात वावरणारे लोक जीवन जगत नाहीत, ढकलत राहतात. जमेल त्या पद्धतीने सहवासातील लोकांची मने दुखावून अश्या लोकांच्या हाती काही लागत नाही. मिळतो तो केवळ एकटेपणा. त्या किराणा दुकानदाराच्या ठायी असलेली कल्पकता मिळविता आली आणि रोजच्या ठराविक साच्यातील जीवनातील वेगवेगळ्या बाबींना आनंदक्षणांमधे बदलविणे आपल्याला जमले तर!!! तर, आपल्यालाही कळेल, सुख म्हणजे नक्की काय असतं!!





Comments

  1. जगण्याचा सुर गवसला की सुख शोधाव लागत नाही हेच खर ....सुंदर लेख...👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18