थोडा है थोडे की जरुरत है @ 22.05.18

तर्कटरावांची तडजोड

मला हे सारे विधी किंवा उपचार पटत नाहीत. माझ्या मनाला या साऱ्या संकल्पना रुचत नाहीत. आता आपण नव्या युगात आहोत. आपले जग झपाट्याने बदलत आहे. धार्मिक संस्कारांमधे देखील आता आपण नव्या बाबी स्विकारल्या पाहीजेत. हे जुने पुरातन विचार आता नव्याने मांडण्याची गरज आहे. कुणीतरी याची सुरुवात करावी लागते. काळ बदलतोय आणि या बदलत्या काळासोबत आपण जर बदललो नाही तर काही दिवसात हे सारे कालबाह्य होईल. या सर्व प्रथा परंपरा यामधे जर काही तथ्य आहे असे वाटत असेल आणि काही प्रमाणात त्याची जपणूक व्हावी असे वाटत असेल तर या सर्व पद्धतींचे नवे स्वरुप जे सुदैवाने काही लोक जपण्याचा प्रयास करीत आहेत त्याचा स्विकार करायला हवा. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे जी गोष्ट मनाला पटत नाही, जी गोष्ट मनाला खटकते ती केवळ हट्टापोटी मी का करायची? माझ्या विचारांचा आपल्याला सन्मान करता येत नसेल तरी निदान मला स्वतःला विचार करण्याची मुभा मिळायला हवी. या सर्व उपचारांना चांगले पर्याय माझ्याजवळ आहेत. हे पर्याय सामाजिक दृष्टीने अत्यंत उपयोगी आणि खऱ्या अर्थाने मनाला समाधान देणारे आहेत. मी सारेच काही सोडून देऊ असेही म्हणत नाही. परंतू यामधील बऱ्याच गोष्टी कमी करता येतात ज्या व्यक्तीच्या स्मरणार्थ हे सारे आपण करतोय त्या व्यक्तीच्या आत्म्याला देखील संतुष्टी लाभेल असे सामाजिक कार्य आपल्या हातून घडेल जी बाब फार स्पृहणीय राहू शकते. माझ्या बोलण्याचा एकदा आपल्या डोळ्यावर असलेला परंपरागत विचारांचा पडदा बाजूला करुन विचार करा. निदार विचार तर करा. जर पटलेच नाही तर नका करु परंतू आपण या बाबत विचारच करायला तयार नाही आणि भावनिक कल्लोळापोटी तेच ते पुन्हा पुन्हा करतोय. एका बाजूने नवा काळ, नवा विचार, नव्या पद्धती सर्वच आपण स्विकारायला लागलो. तेथे बरोबर हव्या त्या पद्धतीचे तर्क देऊन सोयीचे वागू लागलो. परंतू खऱ्या अर्थाने जेथे बदलांची गरज आहे ज्या बदलांमुळे चांगल्या सामाजिक पद्धती निर्माण होऊ शकतात तर अश्या ठिकाणी या विचारांचे नेतृत्व करण्यासाठी आपण कमी पडतो. अश्यावेळी आपली तर्कबुद्धी वापरता आपण भावनिक होतो त्या पोटी पुन्हा एकदा त्याच त्या गोष्टींची पुनरावृत्ती व्हायला लागते. माझे ऐका, मी म्हणतो तसा विचार करुन बघा. आपण या सर्व प्रकारात आज करीत असलेला जरासा बदल येणाऱ्या पिढीला एक नवी दिशा देऊन जाईल. त्यांनाही या सर्व गोष्टी करण्याची इच्छा राहील अन्यथा एक पिढी उलटून गेल्यावर हे सारे बंद होईल. मग उलटणाऱ्या पिढीने या सर्व परंपरा जोपासण्यासाठी मनाला जराशी मुरड घालावी की आता हट्टाने सारे करुन घ्यायचे पुढचे कुणी पाहिले असा विचार करायचा? त्यासाठी मी जे म्हणतो त्या संदर्भात निदान एकदा विचार करा. मी हे सारे सांगतोय याचा अर्थ मी फार बुद्धीवान आहे किंवा आपल्या कुणापेक्षाही जास्त ज्ञान आहे असे नाही. मी एक नवा विचार मांडतोयस्विकारण्याचा प्रयत्न तर कराअतिशय पोटतिडीकीने तर्कटराव बोलत होते. त्याचे सारे शांतपणे भावनाताईंनी ऐकून घेतले नंतर ती त्याला म्हणाली, तुझे मी इतके ऐकले ना? आता माझे जरासे ऐकतोस?

भावनाताईंनी सांगणे सुरु केले. या साऱ्या पद्धती, उपचार काही एका दिवसात तयार झालेले नाहीत. आपल्या धर्मामधे हे वर्षानु वर्षे सुरु आहे. या सर्व बाबी आमच्या पिढीने मनापासून जोपासल्या त्याबद्दल कधी प्रश्न देखील विचारला नाही. तो सारा आमच्या अंगवळणी पडलेला भाग आहे. आता आमची उलटणारी पिढी आहे असे तूच म्हणतोस. मग उलटणाऱ्या या आमच्या पिढीकडून आमच्या रक्तामधे असलेल्या मानसिकतेला बदलविण्याचा जो आग्रह तू धरतोय तो कितपत योग्य आहे? आमची अशी मान्यता आहे की परंपरागत पद्धतीने अनेक वर्षांपासून ज्या गोष्टी आपला समाज पाळत आलाय त्यात काहीतरी तथ्य आहे म्हणूनच तर ते इतके वर्षे टिकले अजूनही टिकते आहे. या सर्व व्यवस्था समाजानेच निर्माण केल्यात त्या समाजच पाळतो आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे तू या प्रक्रीयेत सहभागी झाल्याने जर उलटणाऱ्या पिढीच्या काही ज्येष्ठ लोकांना बरे वाटत असेल, त्यांना समाधान लाभत असेल त्यांच्या दृष्टीने ती एक अत्यंत चांगली बाब होत असेल तर मग तुला त्यात सहभागी होण्यास काय अडचण आहे? आपल्या ज्येष्ठांसाठी, त्यांच्या मनाला बरे वाटावे म्हणून त्यांची इच्छा आहे म्हणून केवळ त्यांच्या समाधानास्तव तुझ्या विचारांना मुरड घातलीस तर कोणते मोठे आकाश कोसळणार आहे? आपल्या परीवारातील वयोवृद्ध लोकांसाठी इतकेही जर करता येत नसेल तर मग काय अर्थ आहे? समजून घ्यायचेच नाही असे ठरवल्यावर पुढे काय बोलायचे? भावनाताईचा विळखा पडतोय हे तर्कटरावांच्या लक्षात आले परंतू सर्व ऐकून घ्यायचे होते त्यामुळे ते चूप बसले. भावनाताईंचे पुढचे आवाहन सुरु झाले. समजा बदल करायचा हा हेका सुरु ठेवलास आणि जर या परंपरागत पद्धतीमधे तू सम्मीलित झाला नाहीस तर काय परीणाम होतील याची कल्पना केली आहेस? पहिले तर या एका वेगळ्या निर्णयामुळे तू एकाचवेळी अनेकांची मने दुखावणार आहेस. ती देखील ज्येष्ठांची ज्यांचे फार थोडे आयुष्य राहीले आहे. त्यासोबतच जेव्हा जेव्हा अश्या प्रकारचा विषय निघेल तेव्हा तेव्हा तू कशाप्रकारे असंवेदनशीलता दाखविलीस याचा उल्लेख होईल. मने जपली पाहीजेत हे सांगणारा तू स्वतःच ज्येष्ठांची मने जपण्यात कमी पडलास हे वारंवार सांगितले जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे, विळख्याचा शेवटचा बंध आता बांधला जाणार याची तर्कटरावांना कल्पना आली.

सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही कुणीही आयुष्यभर तुला माफ करु शकणार नाही. त्यामुळे तू विचार कर. परंतू मी सांगितल्याप्रमाणे विचार केलास तर फायद्यात राहशील अन्यथा मोठा तोटा आहे. भावनाताईंचा विळखा शेवटी एक गर्भित धमकी देखील देऊन गेला. सारे ऐकल्यावर तर्कटराव एवढेच बोलू शकले, ठीक आहे, तू म्हणतेस ते मान्य.

तर्कटराव भावनाताई यांचे हे असले संवाद कायम सुरु राहतात. कुणाचे बरोबर कुणाचे चूक यासंदर्भात तर्क वितर्क होत राहतात. जगरहाटी सुरु राहते. भावनाताईंच्या भावनिक आवाहनामुळे शांत बसलेल्या तर्कटरावांना अचानक त्यांच्या वाचनातील काही संदर्भ आठवले. नवी वाट चोखंदळायची असेल, नवे काही निर्माण करायचे असेल किंवा नवे पायंडे पाडायचे असतील तर बरेचवेळा अप्रीय निर्णय घ्यावे लागतात. त्याकरीता जवळच्या लोकांनाही दुखवावे लागते. अश्या वेळी भावनिकतेच्या आधारे चारही बाजूने अडवणूक होते. पण हे सारे सहन केल्यावरच नव्या पद्धती रुढ होतात अन्यथा परंपरागत आहे म्हणून आता बदलता नंतर बदला असेच सांगितले जाते. उलटणाऱ्या पिढ्या उलटतात, पुढच्या उलटण्याच्या स्थितीला येतात पण बदल होत नाही. तो करायचा असेल तर, वाईटपणाची तयारी ठेवावी लागते. हे सारे वाचनातील संदर्भ आठवल्यावर तर्कटराव डोके गच्च धरुन बसले. महत्प्रयासाने त्यांनी ते सारे बदलाचे विचार बाजूला सारले आणि ज्येष्ठांच्या पिढीचे मन राखण्यासाठी त्यांना समाधान देण्यासाठी परंपरागत विधी उपचारांच्या वाटेवर चालू लागले. कसे? आपले डोके त्यांना समजून घेणाऱ्या व्यक्तीकडे सोपवून आणि सर्वांचा विचार करणारे मन हातात घेऊन.





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18