थोडा है थोडे की जरुरत है @ 12.11.19
ती पण आईच !! आपण आई होणार ही जाणीव ज्या क्षणी तिला झाली तो क्षण तिच्याकरीता अभूतपूर्व होता . तिच्या उदरात नवा जीव अंकुरलाय ही भावनाच मुळी विलक्षण होती . त्या क्षणापासून आता केवळ आपल्या जिवाची नाही तर आपल्यावर अवलंबून असलेल्या आणखी एका जिवाच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावर आलीय याची देखील तिला जाणीव झाली . खरोखरीच नवजीवन निर्माण करणे यासारखे अद्वितीय कार्य तिच्या करवी होणार होते . जोवर तिच्या उदरातला तो अंकूर पूर्ण वाढ होऊन तिच्या शरीरापासून वेगळा होऊन स्वतंत्र अस्तित्व प्राप्त करणार नाही तोवर तर त्याला जगविण्याची जबाबदारी तिचीच होती . त्यामुळे आपसूकच आपण खाल्ले पाहिजे ही जाणीव तिच्या मनात जास्त तीव्रतेने येऊ लागली . अर्थात स्वतःच्या भुकेपेक्षा तिला तिच्या पोटी असलेल्या जीवाच्या काळजीपोटी खाणे महत्वाचे वाटू लागले . परंतू त्या दिवशी तिच्या या आपल्या बाळाच्या काळजी घेण्यामुळेच मोठा बाका प्रसंग निर्माण झाला . तीन दिवस झाले तिला काहीच खायला मिळाले नाही . तिच...