थोडा है थोडे की जरुरत है @ 12.11.19
ती पण आईच!!
आपण आई होणार ही जाणीव ज्या क्षणी तिला झाली तो क्षण तिच्याकरीता अभूतपूर्व होता. तिच्या उदरात नवा जीव अंकुरलाय ही भावनाच मुळी विलक्षण होती. त्या क्षणापासून आता केवळ आपल्या जिवाची नाही तर आपल्यावर अवलंबून असलेल्या आणखी एका जिवाच्या पालनपोषणाची जबाबदारी आपल्यावर आलीय याची देखील तिला जाणीव झाली. खरोखरीच नवजीवन निर्माण करणे यासारखे अद्वितीय कार्य तिच्या करवी होणार होते. जोवर तिच्या उदरातला तो अंकूर पूर्ण वाढ होऊन तिच्या शरीरापासून वेगळा होऊन स्वतंत्र अस्तित्व प्राप्त करणार नाही तोवर तर त्याला जगविण्याची जबाबदारी तिचीच होती. त्यामुळे आपसूकच आपण खाल्ले पाहिजे ही जाणीव तिच्या मनात जास्त तीव्रतेने येऊ लागली. अर्थात स्वतःच्या भुकेपेक्षा तिला तिच्या पोटी असलेल्या जीवाच्या काळजीपोटी खाणे महत्वाचे वाटू लागले. परंतू त्या दिवशी तिच्या या आपल्या बाळाच्या काळजी घेण्यामुळेच मोठा बाका प्रसंग निर्माण झाला.
तीन दिवस झाले तिला काहीच खायला मिळाले नाही. तिची सगळीकडे शोधाशोध सुरु होती. परंतू काही केल्या काहीच मिळेना. ती फारच बेचैन झाली. काय करावे तिला सुचेना. जसा जसा वेळ जाऊ लागला तशी तशी ती जास्त कासाविस होऊ लागली. काही वेळानंतर मात्र तिने बाहेर पडायचे ठरविले. काहीही करुन तिला काहीतरी खायचे होते. आपल्या पोटातला तो चिमुकला जीव कसानुसा झाला असेल या जाणिवेने ती बरीच लांब आली आणि अचानक तिला कसलातरी आवाज आला. काही माणसांचा तो आवाज होता हे तिच्या लक्षात आले. एका झाडामागे लपली. ती अंदाज घेत होती. चांगले आठ दहा माणसे होती. त्यांच्या हातात लाठी काठ्या देखील होत्या. ते बहुदा मेंढपाळ होते. परंतू हिला मात्र त्यांची भितीच वाटत होती. आठ दहा माणसे, नको रे बाबा, उगाच भलते साहस करणे उपयोगाचे नाही. ती योग्य संधीची वाट बघू लागली. जसा जसा वेळ जाऊ लागला तशी ती जास्त बेचैन होऊ लागली. काही वेळानंतर मात्र तिला संधी मिळाली. या लोकांपैकी जवळपास सर्वच तेथून निघून गेले व एकच माणूस तेथे राहीला. झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी तो तेथे थांबला होता. फांद्या तोडल्यावर त्याने तेथेच त्यांची पाने तोडून मोळी बनविण्याचे ठरविले असणार म्हणून तो पाने तोडत बसला. आता हिला जरा धीर आला. आता आपल्याला मदत मिळू शकेल आणि खाण्याची सोय होईल असा अंदाज तिला आला. हळूच आवाज न करता ती झाडामागून बाहेर आली. पोटात बाळ असल्याने तिच्या हालचाली जरा मंदावल्या होत्या. परंतू त्या क्षणी मात्र तिला त्याच बाळाच्या भुकेची चिंता होती. हळू हळू ती त्या माणसाच्या दिशेने सरकू लागली. त्या माणसाच्या हातात कुऱ्हाड होती याचा अंदाज घेत ती त्याच्या डाव्या बाजुने जरा पुढे आली. आता ती त्या माणसापासून केवळ सहा फुटावर होती. लाकडे तोडण्याच्या नादात हिच्या आगमनाची चाहुल त्याला लागली नव्हती. मधेच लाकडे तोडणे थांबवून त्या माणसाने कुऱ्हाड बाजुला ठेवली व तो पाणी प्यायला लागला. तोच क्षण तिने साधला. एक झेप मारुन तिने त्या माणसाला दाणकन खाली पाडले. असा अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तो गांगरुन गेला. दिडशे किलो वजनाची अजस्त्र वाघीण अशी अचानक अंगावर कोसळल्यावर त्याचे काय झाले असेल याचा आपण अंदाज करु शकतो. तो जोरजोरात ओरडायला लागला पण क्षणात तिने त्याचा आवाज बंद केला कारण आपले अणकुचीदार दात तिने त्याच्या गळ्यातच घुसविले. त्याच्या नरडीचा घोटच तिने घेतला आणि त्याचा मृतदेह ओढत ती झाडामागे घेऊन गेली. तिथे तिने काही वेळातच त्याचा फडशा पाडला व त्याचे सोबती परत येण्या आधी ती पुन्हा जंगलातल्या आपल्या ठिकाणावर निघून गेली. जंगलात वेगवान प्राण्यांच्या मागे धावून आपले पोट भरण्यासाठी आपल्या बाळाचा जीव धोक्यात टाकण्यापेक्षा अश्याप्रकारे एकट्या सापडलेल्या माणसांना मारुन खाणे तिला जास्त सोयीचे वाटले. या माणसानंतर तिने दोन वेगवेगळ्या गावाजवळ दोन माणसांना अजून मारले. एकूण तीन माणसांचा जीव घेतल्यामुळे तिच्या बाबतीत काय गहजब झाला हे तिच्या लक्षातच आले नाही.
सगळीकडे एकच कोलाहल. अनेकांचे जीव धोक्यात, प्रशासन काय करतेय? प्रचंड तणाव वाढला. या सारख्या वाढत जाणाऱ्या धुमाकुळानंतर आणि वाढलेल्या ताणाला बघून त्या परीसरातील वनसंरक्षक अधिकाऱ्याने नाईलाजास्तव मनावर दगड ठेवून एका कागदावर स्वाक्षरी केली ज्यामधे या वाघिणीला ठार मारण्याकरीता एका शिकाऱ्याच्या नियुक्तीचे आदेश होते. आदेशाप्रमाणे शिकारी आला. त्याने या वाघिणीचा पाठलाग केला. काही गावकऱ्यांची मदत घेतली. एका बाजूने काही प्रमाणात जाळ करण्यात आला. दुसऱ्या बाजूने दोनशेच्या वर लोक हातात ढोल ताशे घेऊन मोठा आवाज करु लागले. एकच गलका झाला. या वाघिणीचे तीनही रस्ते लोकांनी वेगवेगळ्याप्रकारे बंद केले. ती घाबरली, बावरली. काय करावे तिला कळेना. पोटात बाळ असल्याने फार वेगात हालचाल करता येत नव्हती. आगीचे पलीते हातात घेतलेल्या समुहावर चालून जाता येत नव्हते. अचानक तो चौथा व मोकळा रस्ता दिसला. तिला वाटले, चला सुटका झाली. त्या दिशेने झेपावत ती पुढे निघाली एका मोठ्या झाडाखालून पुढे निघाली आणि अचानक बंदुकीच्या एका गोळीने तिच्या मस्तकाचा ठाव घेतला. झाडावर बसलेल्या शिकाऱ्याचा नेम अत्यंत चांगला होता. त्याने पाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. तीनही गोळ्या मस्तकात लागल्यामुळे जरासे पुढे जाऊन ती वाघीण धाडधूड जमिनीवर कोसळली आणि काही क्षणातच ढोल ताशे वाजवत लोक तिच्या मृतदेहाभोवती नाचू लागले. नरभक्षी वाघीण मारल्या गेली. ती मारल्या गेली पण या दुसरीचे काय?
ती पण आईच. तिच्या देखील पोटी नव अंकुर. ती देखील अशीच गावात राहणारी. तिला देखील आपण एका जिवाला सांभाळतोय याचे खूप जास्त कौतुक. तिलाही आपल्या बाळाच्या भुकेची चिंता सतावायची. परिस्थिती बेताचीच असल्याने व पती परगावी नोकरीला असूनही फार पैसे पाठवू शकत नसल्याने तिला अश्या स्थितीतही कामे करावी लागायची. एक दोन घरी घरकाम करायची. एकदा असेच सकाळी काही खाल्ले नव्हते. दुपारपर्यंत कामे करत राहीली आणि दुपारी कडाडून भूक लागली. ज्या घरी ती काम करायची त्या घरी टेबलवर फळे ठेवली होती. राहून राहून हिची नजर त्या फळांकडे जात होती. पोटातल्या बाळाची तिव्रतेने आठवण येऊन त्याच्यासाठी तरी आता मी खायला हवे काहीतरी अन्यथा घेरी येऊनच पडेन असा विचार तिच्या मनात आला. न राहवून, स्वभावाच्या विपरीत जाऊन तिने त्या फळांपैकी एक सफरचंद उचलले व घराबाहेर पडली. घाई घाईने तिला एखादी जागा शोधायची होती जिथे बसून तिला ते सफरचंद खायचे होते. पण हे काय? चौकात दहा बारा लोक उभे होते. रोखून तिच्याकडे बघत होते. सर्वांनी एका सूरात तिला चोर चोर म्हणणे सुरु केले. तिला बिचारीला रडू येऊ लागले. ती नाही नाही म्हणू लागली. पणे ते सारे सारखे तिला चोर चोर म्हणायला लागले. त्या गडबडीत तिच्या जवळचे ते सफरचंद पडले. त्या सर्व लोकांचे चेहेरे आणखीनच उजळले. छोटीशी का होईना पण तिची चोरी पकडल्या गेली होती. तिच्या पोटातल्या बाळाकरीता तिने ते केले होते पण शेवटी ती चोरीच. आता हे लोक आपले काय करतील याची तिला भिती वाटू लागली. दरदरुन घाम फुटला तिला. तिनही बाजूने ती घेरल्या गेली. एकच मार्ग मोकळा होता. तो बघून ती धावायला लागली आणि धाडकन आवाज झाला. तिच्या पाठीवर कुणीतरी बंदुकीतून तीन गोळ्या झाडल्या आणि ती कोलमडून खाली पडली आणि दचकून ती जागी झाली. काय भयानक स्वप्न पडले होते. खरे तर आपल्या बंगल्यात ती अगदी सुरक्षित बेडवर बसली होती. परंतू अंग घामाने थबथबलेले होते व थरथरत होते. ते भयानक स्वप्न सलग तिसऱ्या रात्री तिला पडले होते. ती कोण होती ठाऊक आहे?
पोटात बाळ असलेल्या वाघीणीला मारण्यासाठी शिकाऱ्याची नेमणूक करणाऱ्या कागदावर स्वाक्षरी करणारी वनसंरक्षक अधिकारी. तिच्याही पोटात बाळ होते. ती देखील आई होणार होती.
हृदयस्पर्शी कथा. शहारे आले कथा वाचतांना.
ReplyDeleteसाधे शब्द पण मनाला चटका लावतात.
अद्भुत अनपेक्षित शेवट , साहित्य म्हणून छानच आणि कथाविषय म्हणून विचार करायला लावणारी कथा,आईच आईला समजू शकते हे अधोरेखित करणारी
ReplyDeleteDiscription of a mother, perfectly penned 👍
ReplyDeleteKhuppch sunder baba!! Khuppp chaan!! 😘😘😘
ReplyDeleteKhup Charan Ani hrudaysparshi Katha 🙏🙏
ReplyDelete