थोडा है थोडे की जरुरत है @ 19.11.19
गजरा
नेहेमीप्रमाणे संजय कार्यालयातून थकून भागून निघाला. परंतू त्याने गेल्या अनेक वर्षात लावलेली एक सवय फार छान होती. कार्यालयात असताना मनापासून काम करायचे. परंतू बाहेर पडताना मात्र कार्यालयाला जसे कुलूप लागते तसे कार्यालयातील कामांना आपल्या डोक्यातही कुलुपबंद करायचे आणि मग घराकडे निघायचे. कार्यालयातील कामांचा ताण, तेथील समस्या या साऱ्या गोष्टी तेथेच सोडून घराकडे जायचे. त्यामुळे थकलेला असला तरी संजय तसा फ्रेश असायचा. कारमधे बसल्यावर मस्त त्याच्या खास म्युझीक कलेक्शन मधून काही सुंदर गाणी सुरु व्हायची व त्या गाण्यांसोबत तो देखील आणखी फ्रेश व्हायचा. घरी जाताना काय काय सर्प्राईज न्यायचे आहे याचा विचार डोक्यात सुरु व्हायचा. कारण बायको व मुले वाट बघत असणार याची त्याला खात्री असायची आणि रोज काहीतरी छोटेसे का होईना परंतू घरी न्यायचे आणि आजचे सर्प्राईज म्हणून आपल्या त्या गोष्टीमुळे घरच्यांचे उजळलेले चेहेरे बघणे त्याला फार आवडायचे. कधी कधी तर लहान मुलांप्रमाणे डोळे वगैरे मिटायला लावून तो काही काही गोष्टी हातावर ठेवायचा. त्याचे म्हणणे होते, सर्प्राईज ही देवाने माणसाला दिलेली एक अफाट गोष्ट आहे. आपल्या आवडीच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून तिच्या हातावर असे सर्प्राईज ठेवल्यावर तिच्या डोळ्यात जो निखळ आनंद दिसतो ना ती खरी त्या वस्तुची किंमत असते आणि ती त्या वस्तूच्या बाजार मुल्यापेक्षा कितीतरी जास्त असते. घराकडे जाणारे शेवटचे वळण आले आणि सवयीप्रमाणे त्याने गाडी थांबविली. त्याचा हा नेहेमीचाच शिरस्ता असल्याने दुकानदाराला माहित होते. गाडीतून न उतरताच त्याने ती वस्तू गाडीत ठेवून घेतली. त्याचे पैसे देऊन तो घराकडे वळला. गाडीतून उतरतानाच त्याचे बायकोला हाका मारणे सुरु झाले होते. घरात गेला आणि बॅग वगैरे जागेवर ठेवण्याच्या नादात त्याची बायको त्याच्या समोर कधी येऊन उभी राहीली ते त्याला कळलेच नाही. त्याच्या उत्साही आवाजावरुन आज आपल्याला काहीतरी सर्प्राईज मिळणार आहे हे तिला लक्षात आले होते. डोळे मिटून हात पुढे करुन ती त्याच्या समोर उभी राहीली. तिच्याकडे न बघताच त्याने त्याच्या हातातील पळसाच्या पानाच्या पुडीत बांधलेली ती गोष्ट तिच्या हातावर ठेवली. आपल्या नवऱ्याने मोठ्या आवडीने आपल्या ओंजळीत काहीतरी ठेवले म्हणल्यावर तिने डोळे उघडले आणि बघते तर काय? टपोऱ्या मोगऱ्याचा बनलेला लांबसडक गजरा तिच्या हातात होता. तो तिने बघितला आणि तिच्या चेहेऱ्याचा रंगच पालटून गेला. तिचा असा भकास चेहेरा बघून घाईघाईने घरी येऊन सर्प्राईज देण्याच्या नादात आपण मोठ्ठी चूक केली हे त्याच्याही लक्षात आले. आपल्या चुकीमुळे आपल्या बायकोला काय वाटले असेल या केवळ कल्पनेने तो नख शिखांत घाबरला. त्याच्या बायकोचे डोळे भरुन आले. हाताच्या ओंजळीत असलेल्या गजऱ्याबद्दल तिला आनंद व्यक्त करता येत नव्हता आणि आपल्या नवऱ्याने एवढ्या प्रेमाने आणलेल्या गजऱ्याकडे तिला बघवत देखील नव्हते. अचानक तिच्या हातून तो गजरा खाली पडला. तिची स्थिती त्याच्या लक्षात आली. साॅरी साॅरी म्हणत ओठ दातामधे दाबून तिने हुंदका धरुन ठेवण्याचा असफल प्रयत्न केला. पटकन तिची ओंजळ आपल्या हाताने धरुन तिला आधार देण्याकरीता तो तिच्या जवळ गेला. प्रेमाने झालेला आपल्या नवऱ्याचा स्पर्श तिला कळला व त्याच्या कुशीत शिरुन ती ओक्सा बोक्शी रडू लागली. तिचे रडणे सुरु असेपर्यंत तो काहीही बोलला नाही. केवळ प्रेमाने तिला थोपटत राहीला. जरावेळाने ती शांत झाली व मग डोळे पुसत आपल्या नवऱ्याला म्हणाली, तुमचे सर्प्राईज मी जपून ठेवीन परंतू सध्या मला त्याचा वापर करता येणार नाही. मला माफ करा. तिच्या समजुतदारपणाला मनोमन सलाम करीत आणि अशी सुस्वभावी व संवेदनशील पत्नी देवाने त्याच्या जिवनात त्याला प्राप्त करुन दिली याबद्दल त्याने देवाचे मनोमन आभार मानले. नाही गं, काहीतरी काय? नाही तर नाही. माझ्याच लक्षात आले नाही. मीच वेडा आहे. तुला उगाचच दुखावले. एकमेकांना अश्या प्रकारे आधार देत त्या दोघांनीही त्या क्षणाला वाटलेले अतीव दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. पत्नीला प्रेमाने थोपटताना त्याला तिच्यासाठी मुंबईला घेतलेला तो गजरा त्याला आठवला. फार तीव्रतेने.
मुंबईला जाताना दोघेही काहीच बोलत नव्हते. प्रवास सुरु होता परंतू मनामधे वादळे होती दोघांच्याही. हे असे कसे झाले? आपण तर कधीच कुणाचे काही वाईट केले नाही. कधी कुणाला फार दुखावले देखील नाही. उलट परीवाराची सारी कर्तव्ये मनापासून पार पाडलीत. अनेक वेळा तर त्रास होत असतानाही तो कधी व्यक्त केला नाही व सारखे कुणासाठी तरी करतच राहीलो. परंतू तरी देखील असे का व्हावे? या एका प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करुन देखील ते मिळत नव्हते. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात व त्यामुळे जे समोर आले आहे त्याला सामोरी जाणे हेच काय ते आपल्या हातात असते अश्या एका स्वतः ला समजावणाऱ्या स्थितीपर्यंत ते पोहोचले. दुसऱ्या दिवशी ते सारे दिव्य सुरु होणार होते. काय काय बदल आता आपल्या आयुष्यात होतील याचा विचार त्या दोघांच्याही मनात सुरु होता. केवळ एकमेकांकडे बघूनही त्यांना तो कळत होता. म्हणूनच केवळ डोळ्यानीच सांगणे सुरु होते की, तू काळजी करु नकोस. मी तुझ्या सोबत आहे. आणि आपण दोघे जर नेहेमीप्रमाणे मजबुतीने सोबत असू ना तर मग हे दिव्य देखील लिलया पार होईल. काळजी करु नको.
मुंबईतील त्या प्रचंड मोठ्या इमारतीच्या पायऱ्या चढताना तिने अगदी सहजच त्याला म्हणले, अहो, मला एक गजरा घेऊन द्या ना! आज मस्त गजरा लावून घेते. माझा गजरा लावलेला एक फोटो काढा. नंतर कोण जाणे मला गजरा लावता येईल की नाही ते? चर् झाले त्याच्या मनात. परंतू तिचे मन राखण्यासाठी गजरा घेतला व तिच्या ओंजळीत ठेवताना दोघांच्याही डोळ्यात अश्रु होते. गजरा लावून ती त्याचा हात धरुन मोठ्या हिमतीने त्या इमारतीच्या पायऱ्या चढू लागली होती. त्या इमारतीचे नाव होते. टाटा मेमोरीयल कॅन्सर हाॅस्पीटल.
आज परत त्याला त्या गजऱ्याची आठवण झाली. तिच्या ओंजळीत गजरा दिल्यावर जेव्हा तिच्याकडे त्याने बघितले तेव्हा डोक्याला रुमाल बांधलेला तिचा चेहेरा बघितल्यावर तिला आपण फार जास्त वेदना दिल्या असे त्याला जाणवले. परंतू शांत झाल्यावर ती जे म्हणाली ना ते खरे सकारात्मक जीवनाचे स्वरुप आहे. ती म्हणाली, अहो, यात वाईट काय मानायचे? उलट तुम्ही अजाणतेपणी हा इतका सुंदर गजरा माझ्यासाठी आणलात हा तर एक सकारात्मक संकेत आहे. आता लवकरच माझे केस पहिलेसारखे लांबसडक आणि घनदाट होणार आहेत. काहीच महिन्यांचा प्रश्न आहे. मग तोवर तुम्ही मला सर्प्राईज देण्याचे का थांबवता? तुम्ही जेव्हा गजरा सर्प्राईज म्हणून माझ्या हातात देता ना, तेव्हा मी डोळे मिटले असले तरी देखील तुमचे सर्प्राईज मला त्याच्या सुगंधावरुन केव्हाच कळलेले असते. परंतू माझ्या ओंजळीत गजरा दिल्यावर मी जेव्हा कौतुकाने त्याकडे बघते तेव्हा माझ्या लकाकलेल्या डोळ्यांमधे दिसणारा आनंद बघण्यासाठी तुम्ही आतुर असता हे मला माहीत आहे. तो आनंद तुम्हाला देण्यासाठी याही स्थितीत मी तुमच्या हातून माझ्या ओंजळीत गजरा घ्यायला तयार आहे. मला तो लावता आला नाही म्हणून काय झाले? त्याच्या सुगंधाच्या साक्षीने आपल्यातील हे घट्ट नाते किती छान दरवळते, होय ना? आनंदाश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी तिच्याही डोळ्यातून ओघळणाऱ्या आनंदाश्रूंकडे तो केवळ बघत राहीला. आणखी तो करु तरी काय शकत होता? आणि त्याच वेळी या अतीव प्रेमाच्या आविष्काराने तो मोगऱ्याचा गजरा देखील भारावून आणखी सुगंधित झाला.
Extremely excellent sir
ReplyDeleteशब्दांत प्रशंसा करावी एवढे शब्द नाहीत माझ्याकडे पण
ReplyDeleteसरते शेवटी डोळे पाणावले .
खूपच सुंदर। विषय, लिखाण व मांडणी
ReplyDelete