थोडा है थोडे की जरुरत है @ 26.11.19

तटस्थ

पहाटे मी नेहेमीप्रमाणे फिरायला निघालो असताना मला दो वेगवेगळ्या व्यक्ती दिसल्या. या दोन्ही व्यक्ती परस्परांशी अजिबात संबंधित नव्हत्या. या दोन्ही व्यक्तींची मला दिसण्याची ठिकाणे वेगवेगळी होती. परंतू त्यांच्या कृती मात्र जवळपास सारख्या होत्या. तसे बघितल्यास सामाजिक दृष्टीने त्या कृतींमागील कारणे संपुर्णपणे वेगळी होती. परंतू त्यांच्या कृतीचा परीणाम सारखा असल्याने मला त्याबद्दल काही प्रमाणात साधर्म्य वाटले. मला त्या कृतीचा परीणाम जो माझ्या आणि माझ्यासोबतच्या काही लोकांना जाणवला त्याबद्दल सांगायचे आहे. शेवटी आपण कोणत्याही घटनेकडे किंवा कृतीकडे बघत असताना आपल्या मनावर असलेल्या विचारांचा प्रभाव बाजूला ठेऊ शकत नाही. वर्षानुवर्षे एका विशिष्ट विचारसरणीत मोठे होताना किंवा अनुभव घेताना आपले विचारांचे देखील एक विशिष्ट प्रकारचे व्यक्तिमत्व बनलेले असते. आपण त्याच अनुषंगाने सर्व बाबींकडे बघत असतो. म्हणूनच अनेक वेळा गरज असूनही आपल्याला तटस्थपणे बघणे जड जाते आपण कोणतीतरी एक बाजू घेत जातो. अर्थात विचार प्रक्रीयेचा हा एक महत्वाचा गुणधर्म असल्याने आपण काही  ना काही पूर्वग्रह ठेवून गोष्टींकडे बघणे किंवा मत बनविणे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतू त्या दिवशी मात्र मला त्या दोन्ही व्यक्तींच्या कृतीकडे तटस्थपणे बघावे वाटले त्यामुळे मला हे जाणविले की या दोघांचीही कृती सकृतदर्शनी संपुर्णपणे वेगळी वाटत असली किंवा त्यास संदर्भ जरी वेगळे असले तरी देखील त्या दोन्ही कृती त्रासदायकच होत्या

घरापासून काही अंतर गेल्यावर मला रस्त्याच्या मधोमध एक माणूस उभा दिसला. मी त्याच्या जवळ पोहोचेपर्यंत मला त्याच्या रस्त्यात उभे असण्याबद्दल कुतुहल वाटत होते. परंतू काही अंतर उरले असताना त्याच्या आवाजावरुन सारा प्रकार लक्षात आला. ते भाऊ सकाळीच दारु पिऊन तर्र झालेले होते. रस्त्याच्या मधोमध उभे राहून ते जोरजोरात कडेला असलेल्या एका दुकानदाराशी बोलत होते. त्या दुकानदाराला यांच्या पिण्याची आणि अश्या प्रकारे बडबड करण्याची सवय असावी म्हणून तो शांतपणे त्यांना काहीही उत्तर देता यांचे प्रभात बोल ऐकत होता. जवळपास आसपासच्या सर्वच घरातील प्रत्येकाला जाग येईल अश्या टीपेच्या स्वरांमधे हे भाऊ बोलत होते. बोलण्याचा आणि वाक्यांचा अर्था अर्थी संबंध नव्हता. त्यांचे स्वतःचेही त्यांना कळत नव्हते. परंतू जे काही सुरु होते ते फारच त्रासदायक होते. कशाला याच्या नादी लागता म्हणून कुणीही त्याला हटकत नव्हते. त्रास मात्र सर्वांनाच होत होता. प्रत्येकच जण त्याच्या पासून जरा दूरुनच पुढे जात होता. सकाळी साडेपाचच्या सुमारास जेव्हा बरेचसे लोक झोपलेले असतात अश्या वेळी हे महाशय रस्त्याच्या मधोमध उभे राहून कल्ला हल्ला करीत होते. तेवढ्यात एका माणसाने त्याला टोकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने पुढचे पाऊल म्हणजे शिवीगाळ सुरु केली. शेवटी त्याला टोकणाऱ्या माणसाला सर्वांनी समजावले दुर्लक्ष करा असा सल्ला देवून सारेच पुढे चालू लागले. मी देखील पुढे निघालो परंतू या महाशयांचा कल्ला हल्ला सुरुच होता. काय हे वागणे? आपल्या वागण्यामुळे लोकांना त्रास होतो याची जाणीवही नसते काही लोकांना असा विचार करीत मी पुढे निघालो. काही अंतर गेल्यावर मला पुन्हा मोठ्याने आवाज ऐकू यायला लागला. मला वाटले की आज काय झालेय की सारखे दारुडे भेटत आहेत. आवाज जसजसा जवळ येऊ लागला तसे माझ्या लक्षात आले की हा आवाज माणसाचा नसून एका महिलेचा आहे. बापरे, आता महिला देखील! मला जरा आश्चर्य वाटले. अर्थात हे आश्चर्य सामान्य सामाजिक प्रघातानुसारच वाटले होते. यामागे कुठलाही दुसरा हेतू नव्हता. जरा जवळ गेल्यावर मघाशी बघितल्याप्रमाणेच चित्र होते. एक महिला रस्त्याच्या मधोमध उभी होती जोरजोराने तिचे ओरडणे आणि बोलणे सुरु होते

मला सुरुवातीला मघाशी बघितला तसाच प्रकार आहे की काय असे वाटत होते मघापेक्षाही जास्त आश्चर्य वाटत होते. परंतू हा प्रकार जरा वेगळा होता. तेथे त्या दारुड्या समोर एक दुकानदार होता तो दारुडा त्या दुकानदाराशी जोरजोरात बोलत होता. येथे दुकानाच्या जागी रस्त्याच्या अगदी कडेला असणारे दुर्गा मातेचे मंदीर होते दुर्गा मातेची ही भक्त रस्त्याच्या मधोमध उभी राहून देवीशी बोलत होती. तेथे दुकानदार जसा स्थितप्रज्ञ होता म्हणून तो संवाद एकतर्फीच होता तसेच येथेही दुर्गा माता शांत होती तिची ही भक्त जोरजोरात एकतर्फी संवाद साधत होती. तेवढाच आवाज, तेवढाच कल्ला, तेवढाच उपद्रव. कार फक्त वेगळे. देवीला विनवण्या सुरु होत्या, परीवाराच्या सुखशांतीसाठी साकडे घालणे सुरु होते, जोरजोराने, माते तू सुन रही है ना म्हणून घोष सुरु होता आणि या सोबतच देवीच्या मंदीरातील घंटेला लांब दोरी बांधून रस्त्यावरुन जोरजोरात घंटा वाजविणे सुरु होते. माता, तुझे मेरा सुनना पडेगा असे काहीसे सुरु होते. येथेही एका काकूंनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला परंतू तू मुझे रोक रही है, माता से बात करने से रोक रही हा, तू नरक मे जायेगी वगैरे बोलणे झाले शेवटी समजावणाऱ्या काकू निमूटपणे आपल्या दिशेने निघून गेल्या. या देखील कल्ल्याने आजुबाजूला शांतपणे झोपी गेलेल्या अनेक लोकांची झोपमोड झालीच असणार एकंदरीत यामुळे जो उपद्रव व्हायचा तो झालाच हे निश्चित.

प्रसंग दोन वेगवेगळे होते. दोन्हीही प्रसंगांमधे सामाजिक नियमांना सोडूनच वागणे होते. परंतू या दोन्हीही प्रसंगांमधे लोकांच्या प्रतिक्रीया मात्र जरा वेगवेगळ्या होत्या. पहिल्या प्रसंगातील माणसाच्या ओरडण्याला त्रास देण्याला सरसकट सर्व लोक दुषणे देत होते असे वागायला नको अशी प्रतिक्रीया देत होते. परंतू दुसऱ्या प्रसंगामधे काही लोक मात्र असते एखाद्याची भक्ती, आपण समजून घ्यायला हवे असेही बोलत होते. सकाळी अश्यामुळे इतरांचेही सकाळी उठणे होते ते चांगलेच आहे वगैरे देखील मंडळी बोलत होती. काहींनी अर्थात या अश्या भक्तीमय ओरडण्याला थांबविण्याचा प्रयत्न केला परंतू तो फारच नगण्य होता. बऱ्याच अंशी लोकांना या प्रकारच्या ओरडण्याचा त्रास नव्हता. मी सुरुवातीलाच लिहील्याप्रमाणे तटस्थपणे बघता येणे ही मानवी प्रवृत्ती आहे. परंतू अनेक वेळा तेच आपल्या समस्यांचे मूळ देखील असते.

आपले जीवन जगताना बरेच वेळा आपण आपल्या पूर्वानुभवाच्या किंवा पूर्वग्रहांच्या आधारे अनेक गोष्टींकडे बघतो त्यामुळे आपल्या मनाने दिलेला कौल मानून आपण आपले निर्णय करीत असतो. परंतू सध्याच्या काळात जेव्हा आपल्या मनावर अनेक प्रकारचे बहुअंगी विचार अक्षरशः आदळताना आपण जर केवळ आपल्याच सिमित अनुभवाच्या आधारे निर्णय घेतले तर अडचणी निर्माण होऊ शकतात. आपल्याला या बदलत्या काळात तटस्थ होऊन आपल्या सभोवतालच्या घटनांकडे व्यक्तींच्या कृतींकडे बघता यायला हवे त्यानुसार निर्णय करता यायला हवेत. आपल्या मुलांना याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. सध्या या तटस्थ विचार करण्याच्या सवयीच्या अभावामुळेच आपल्याला मुलांमधे काही मोठ्या मंडळींमधे कृती करताना संभ्रमावस्था निर्माण झालेली आढळते. येत्या काळात आणखी काही वेगळ्या समस्या आपल्यासमोर येणार आहेत ज्यांचा सामना करताना तटस्थपणे विचार करण्याची शक्ती फार मदतीची राहू शकते. म्हणूनच आपल्या मनाला पटत नसले तरी देखील वरील दोन्ही प्रसांगामधे दोन्ही व्यक्तींकडून होणारा त्रास हा वाईटच आहे. त्यामधे एक चांगला एक वाईट असे करता येणार नाही. असा तटस्थ विचार आपल्या सर्वांना करता येईल?




 



Comments

  1. खूप बारकाईने निरीक्षण करून मांडलं आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. Very minute observation of human behavior and perception neutral attitude may help us these days

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18