थोडा है थोडे की जरुरत है @ 05.11.19
दिल की उम्र
एक सहल सुरु झाली. सहलीमधे सहभागी सर्वच मित्र मैत्रीणी चाळीशीच्या वरचे होते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सुस्थितीत होता. काही जण उच्च पदस्थ अधिकारी होते, काही व्यावसायीक होते, काही मार्केटींगमधे होते तर काही गृहीणी होत्या. काहींनी नुकतीच चाळीशी पार केली होती तर काही निवृत्तीला पोहोचले होते. गेल्या पंचेवीस ते तीस वर्षांपासूनचा हा मैत्रप्रवास सुरु होता व तेवढ्याच तीव्रतेने आजही टिकून होता. बसमधे बसल्यापासून सर्वांची धमाल सुरु झाली. प्रत्येकच गोष्टीचा भरभरुन आनंद घेणे ही प्रवृत्ती गेल्या काही वर्षांमधे विकसित झालेली असल्याने हास्याचा नुसता खळखळाट होता. सर्वात महत्वाचे म्हणजे बसमधे बसलेले सर्व केवळ मित्र मैत्रीणी होते. त्या सर्वांनी त्यांची पदे, समाजातील स्थान, साम्पत्तिक स्थिती, मानमरातब वगैरे सर्व बसच्या बाहेरच सोडून दिले होते. त्यामुळे वागण्या बोलण्यातील सहजता हा सहलीचा सर्वात महत्वाचा भाग होता. सर्वांनी घरुन खायला आणलेले पदार्थ सर्वांनी मिळून संपविले. एका मैत्रिणीने केलेले लाडू खाताना सोबत बत्ता घ्यायला हवा होता या काॅमेंटपासून ते मित्र मैत्रीणींसोबत ट्रीपला जातोय म्हणून तुझ्या बायकोने रागारागात चिवडा जास्त तिखट केला का रे? अश्या सर्व काॅमेंट बिनधास्त सुरु होत्या व सर्वात महत्वाचे म्हणजे कुणालाही कशाचाच राग येत नव्हता. प्रवासात नेहेमीची ट्रेकींगची गाणी म्हणल्या गेली, जुन्या जुन्या गोष्टी आठवून झाल्या, त्यावेळचे भन्नाट किस्से याआधी दहा बारा वेळा ऐकले असले तरी पुन्हा नव्याने ऐकविल्या गेले. प्रवास कधी संपला ते कळलेच नाही.
या समुहाच्या एकत्रीकरणाकरीता जे ठिकाण ठरले होते ते देखील या सर्वांना आवडणारे मेळघाटातील एक सुंदर ठिकाण होते. दिवसभर क्रिकेट, फुटबाॅल असले खेळ खेळून झाल्यावर जेवण आटोपून मंडळी नेहेमीप्रमाणे कॅम्पफायर करीता जमली. आणि मग काय, मधून मधून मिळणाऱ्या गरमागरम चहासोबत थेंडीच्या दिवसात शेकोटीभोवती बसून गाण्याची जी मैफल रंगली त्याला तोड नाही. समुहात ढोलकी वाजविणारे, बासरी वाजविणारे आणि गाणारे अश्या सर्वांचाच समावेश असल्याने आणि सर्वच जण गाण्यांच्या बाबतीत शौकीन असल्याने एकाहून एक गाणी सादर होऊ लागली. कुणालाही झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. सुरुवातीची तालबद्ध गाणी आटोपल्यावर खास ठेवणीतल्या गाण्यांचा दौर सुरु झाला. मग मेहदी हसनच्या रंजीश ही सही पासून ते आशाबाईंच्या जिवलगा पर्यंत आणि त्या गाण्याच्या मूळ बंदीशी पर्यंत गाणी सादर होऊ लागली. रात्री अकराच्या सुमारास सुरु झालेली गाण्यांची मैफल सकाळी पाच वाजेपर्यंत सुरुच होती. सकाळी पाच वाजता कॅंटीनवाल्याला उठवून पुन्हा गारठलेल्या पहाटे गरमागरम चहा घेऊन मंडळी पुन्हा ताजीतवानी झाली. सकाळी कुणीतरी पोर्टेबल स्पीकरवर धमाल गाणे लावले तर सर्वांनी मनसोक्त नाचून वगैरे देखील घेतले. या सर्व आनंद प्रक्रीयेमधे कुणालाही संकोच वगैरे वाटत नव्हता कारण हा समुहच मित्र मैत्रीणींचा होता. या सर्वांची मैत्री त्या वेळची होती ज्यावेळी हे कुणीच नव्हते. यापैकी कुणाचेही नाव नव्हते, कुणीच मोठ्या पदावर नव्हते किंवा कुणाचीही सांपत्तिक स्थिती फार चांगली नव्हती. परंतू त्यावेळी देखील जेवढे होते तेवढे पैसे गोळा करुन अश्याच प्रकारच्या सहलींचा आनंद घेतला असल्याने प्रत्येक जण इतर सर्वांना ओळखून होता. सर्वांचे वय वाढले होते परंतू एक गोष्ट वाढली नव्हती आणि ती म्हणजे दिल की उम्र.
काय असते ही दिल की उम्र? माणसाच्या आयुष्याचा विचार केला तर ते उणेपुरे काही वर्षेच मिळाले असते. साधारण आयुषमान ऐंशी जरी धरले तरी सुरुवातीचा वीस ते पंचेवीस वर्षाचा काळ तर तारुण्याच्या धुंदीत निघून जातो. जिवनात आनंद कसा घ्यायचा हा विचारही या वयात मनाला शिवत नाही कारण तोवर तो घेतलेला असतो. पुढे संसारामधे जबाबदारींचे निर्वहन करताना आणि सामाजिक दृष्टीने आपले योगदान देताना पुढची पंचेवीस वर्षे निघून जातात. त्यानंतर मग जरा आनंदाने जगुयात म्हणल्यावर मुलांच्या भविष्याकरीता काम करणे सुरु होते व त्यामधे पुढची दहा पंधरा वर्षे निघून जातात आणि शेवटी मग वृद्धापकाळ सुरु झाला की मग शारीरिक व्याधी जडतात आणि मग दिवस ढकलणे सुरु होते. या सर्व जीवन प्रक्रीयेचा विचार करता आनंदी जीवन जगण्याकरीता सर्व गोष्टींसोबत गरज असते ती म्हणजे दिल की उम्र वाढू न देण्याची. त्यासाठी गरज असते जगण्याच्या फार जास्त चौकटी न ठेवणे.
चौकटी न ठेवणे याचा अर्थ वागण्यात उन्माद निर्माण करणे असा अजिबात नाही. सामाजिक परिस्थीतीमधे जगत असताना आपल्याला मर्यादा पाळाव्याच लागतात व सारासार विचार करुनच आपण जगत असतो. इतरांचा विचार करत जगणे ही आपली मुलभूत संस्कृती असल्याने त्याबद्दल फार सांगण्याची गरज नसते. परंतू काही मंडळींनी या जगण्याच्या चौकटी इतक्या आवळून घट्ट करुन ठेवलेल्या असतात की त्यांना दिल की उम्र नही बढनी चाहीये ही संकल्पनाच लक्षात येत नाही. ही मंडळी चर्चा खूप करतात परंतू गंभीरतेने राजकारणावर बोलत असतात किंवा लोकांनी कसे वागले पाहिजे, लोकांचे कसे चुकते, सगळे कसे वाईट आहे अश्या स्वरुपाच्या गप्पा करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ही सारी मंडळी मनापासून हसत देखील नाहीत. धमाल करणे, आनंद प्राप्त करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या शोधणे, आनंद मिळविण्यासाठी मनसोक्त भटकणे, या सर्व बाबी या मंडळींकरीता निरुपयोगी व वेळ वाया घालविणाऱ्या असतात. ही अशी मंडळी अत्यंत किचकट पद्धतीने आयुष्याचे दिवस ढकलत राहतात. प्रत्येकाला नावे ठेवणे, प्रत्येकामधे काय उणे आहे याच्या चर्चा करीत राहणे, अनेक वर्षांआधी घडलेल्या घटनांचा पुन्हा पुन्हा उल्लेख करुन दुषणे देणे, प्रत्येकाचे काय चुकते हे शोधत राहणे व त्यावरुन त्याला कमी लेखत जाणे, सतत नकारात्मक विचार करणे, जो व्यक्ती हजर नाही त्याच्या मागे त्याची इतरांजवळ निंदा करणे आणि सर्वात वाईट म्हणजे वर उल्लेखित सर्व गोष्टी करुन आपण इतरांपेक्षा कसे श्रेष्ठ आहेत हे दाखविण्याचा फोल प्रयत्न करीत राहणे यामधे गुंतलेल्या व्यक्तींची दिल की उम्र फार लवकर वाढून जाते. यांच्या अश्या वागण्याचा विचार केल्यावर असे वाटू लागते की खरोखरीच काय प्राप्त होत असेल या मंडळींनी अशी दिल की उम्र वाढवून? यापेक्षा ती वाढूच दिली नाही तर किती आनंद घेता येईल जगण्याचा!
प्रत्येकाचे वय वाढणे ही क्रमप्राप्त बाब असली तरी दिल की उम्र न वाढू देणे आपल्याच हातात आहे. ती जर वाढली नाही तर मात्र काय कमाल होतात. कुणाबद्दलही वाईट बोलताना ते दिल दुखते व प्रत्येकामधील केवळ चांगल्या बाबी बघितल्या की ते हसू लागते. दिल की उम्र छोटी असली की मग त्याला छान संगीत ऐकण्याची इच्छा होते, ढोलच्या तालावर नाचण्याची इच्छा होते, सेल्फी काढावा वाटतो, तो सोशल मिडीयावर शेअर करावा वाटतो, मुलांसोबत वावरताना त्यांच्यासारखे यो देखील करता येऊ लागते, पिझ्झा खाताना मैद्याचा त्रास होऊन पोट दुखेल असा विचार मनात न येता, काय मज्जा येईल हा गरम गरम पिझ्झा खाताना असा विचार मनात येऊ लागतो, पावसात भिजावे वाटते, पावसात भिजल्यावर चिखलाचा त्रास न दिसता गरमागरम भजे खाण्याची इच्छा होते, गरमागरम चहा देखील अमृततुल्य वाटू लागतो, मित्र मंडळींसोबत भटकायला जाण्याची इच्छा होते, जोरजोरात गाणे म्हणण्याची इच्छा होते, परीवारासोबत वेळ घालवायला आवडू लागते, त्यांच्या आवडी निवडी जपायला, त्यांना वेळ द्यायला आवडू लागते, आनंद देण्याकरीता वेगवेगळे सर्प्राईझेस द्यायला जमू लागते, समोरच्याला मनापासून आवडेल म्हणून आपल्या मनाला मुरड घालणे जमू लागते, सर्वात महत्वाचे म्हणजे आपणच किती थोर आहोत हा विचार मनात कायम न बसता इतरांमधेही काही चांगल्या गोष्टी आहेत हे बघता येते.
आपली दिल की उम्र किती आहे हे तपासून घेणे गरजेचे आहे होय ना? वर दिलेल्या किंवा त्यासारख्या गोष्टीवरुन ते तपासता येईल. याकरीता डाॅक्टरची गरज भासत नाही. ती उम्र आपणच आपली तपासू शकतो. मग, तपासताय ना?
Comments
Post a Comment