थोडा है थोडे की जरुरत है @ 04.04.23
राईट टर्न आज पुन्हा ४ एप्रील . मला आठवते ती ४ एप्रील २०१४ ची रात्र . दवाखान्यात वेटींग रुम मधल्या बाकड्यावर मी कसाबसा झोपण्याचा प्रयत्न करीत होतो . दुपारपासून सुरु झालेली धावपळ शांत झाली होती . दवाखान्यात भरती करणे , आयसीयू मधे शिफ्ट करणे , नागपूरला सध्या नेण्याची गरज नाही अशी शाश्वती मिळणे , भेटायला येणाऱ्यांची गर्दी , असे कसे होऊ शकते या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न , सारे सारे आटोपून आयसीयू मधे ते व बाहेर रात्री गरज पडली तर रहावे म्हणून मी असे दोघेच दवाखान्यात होतो . सारी धावपळ संपेस्तोवर रात्रीचा एक वाजला होता . त्यामुळे झोप लागण्याची वेळ टळून गेली होती . झोपण्याआधी एकदा आयसीयू मधे जाऊन मी त्यांना बघून आलो . ते शांतपणे झोपले होते . खरे तर बोलण्याची इच्छा होती परंतू झोप लागली असल्याने मी फक्त जवळ जाऊन उभा राहीलो . क्षणभर . त्यांना असे दवाखान्यात भरती झालेले मी कधीच बघितले नव्हते . माझ्या स्मृतीपटलावर ते चित्रच नव्हते . इतर कुणी भरती झाले असेल तर मात्र त्...