थोडा है थोडे की जरुरत है @ 10.12.19
प्रेमाची पद्धत
त्या दिवशी सुरेशला कार्यालयात खूप काम होते. तसे त्याच्या पदानुसार त्याची व्यस्तता फार होतीच. परंतू तो दिवस तर फारच जास्त कामाचा निघाला. सारखे काही ना काही सुरु होते. दोन तीन मिटींग्स सोबतच आणखी काही कामे त्याला करावी लागली. त्यासोबतच त्याच्या कार्यालयाकडून एक अहवाल नवी दिल्लीला पाठवायचा होता त्यामुळे तो तपासणे सुरु होते. त्यामधील दुरुस्त्या झाल्या की पुन्हा ते अंतीमतः नीट करणे अशी सर्व कामे सुरु होती. एरवी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयातून घराकडे निघणारा तो, आज साडे आठ होऊन गेले तरी काम आटोपलेले नव्हते. त्याच्या कार्यालयातील सर्वांनाच त्या कामाचे महत्व लक्षात आल्याने ते सर्वच लोक देखील थांबले होते. अखेरीस रात्री सव्वानऊ वाजता तो अहवाल अपलोड झाला आणि दिल्लीच्या कार्यलयातून तो मान्य झाला आणि सर्वांनी निःश्वास टाकला. नेहेमीप्रमाणे सुरेशने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले, त्यांना उशीरापर्यंत थांबावे लागले त्यामुळे काही गमतीदार बोलून, विनोद करुन त्याने त्यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. ही त्याची सवय फार छान होती. मधूनच काहीतरी गमतीदार बोलून किंवा हसवून तो सहकाऱ्यांवरील ताण कमी करायचा. सहकाऱ्यांना हसत खेळत ठेवून त्यांच्याकडून काम करुन घेणारा एक चांगला बाॅस तो होता. उगाच चिडचिड करीत, आणि आपल्या पदाचा धाक दाखवित लोकांना कामाला जुंपणारा खडूस बाॅस तो नव्हता. त्या दिवशीचे काम खूपच महत्वाचे होते. त्या कामामुळे त्याच्या संस्थेला मोठे अनुदान मिळण्याची शक्यता होती. म्हणून त्याने सर्वांना कामासाठी थांबवून ठेवले होते. परंतू काम आटोपल्यावर त्याच्या खेळकरपणामुळे सर्वजण हसत घरी निघाले. त्याने सर्वांचा ताण घालविला. परंतू त्याच्या ताणाचे काय? त्या कार्यालयाचा प्रमुख म्हणून तर त्याला सर्वात जास्त ताण आला होता. तो अहवाल जर त्या दिवशी अपलोड झाला नसता तर सर्व जबाबदारी त्याच्यावर येणार होती व काही कोटी रुपये अनुदानापासून त्याची संस्था वंचित राहीली असती. परंतू त्याच्या मनावरचा तो ताण त्याला कुणालाच दाखविता आला नाही. सर्वजण निघाल्यावर तो देखील घरी जायला निघाला. कारमधे बसल्यावर नेहेमीच्या सवयीप्रमाणे त्याने छान गाणी लावली. मनावर दिवसभर ताण होता त्यामुळे नीट काही खाल्ले देखील नव्हते. आता मात्र खूप भूक लागली होती. त्याला उशीर झाला तरीही घरुन फोन आला नव्हता. घरी काय झाले असेल याची कल्पना त्याला आली होती. तो घरी पोहोचला तेव्हा वहिनी रागावलेल्या होत्या. शांतपणे सुरेश फ्रेश होऊन जेवायला बसणार तोच वहिनींनी त्याच्यावर शब्दांचा मारा सुरु केला. काय हा उशीर? असे काय काम असते का? अश्यामुळे तुमची तब्येत बिघडून जाईल. मी कितीही वेळा सांगितले तरी तुम्ही ऐकतच नाही. तुमच्या संस्थेत तुम्हीच एकटे आहात का? बाकी इतरांना कामे करु द्याल की नाही? तुम्हाला देखील कामाचा जरा जास्तच उत्साह आहे. तुमच्यासारख्या उत्साही लोकांना आणखीच काम देतात. जरा स्वतःची काळजी करा. तब्येत बिघडली म्हणजे मग काय करायचे? मलाच करावे लागेल. तुमच्या कार्यालयातले कुणी येईल का? मला तर वाटते की तुम्ही कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाही. कामाच्या गडबडीत काही खाल्ले देखील नसेल मला माहित आहे. तुमची काम करण्याची पद्धत मी जाणून आहे. पण मी कितीही सांगितले तरी तुम्ही माझे ऐकणार आहात का? माझे बोलणे शेवटी उगाचची बडबडच ठरते. जाऊ द्या मी बोलतच नाही. सुरेशचे जेवण होईपर्यंत वहिनी रागारागाने बोलत होत्या आणि सोबतच गरम गरम पोळ्या त्याला करुन वाढत देखील होत्या. शेवटी सुरेश आपल्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रीया देत नाही म्हणल्यावर त्या शांत झाल्या. सुरेश शांतपणे जाऊन झोपला. त्यानंतर वहिनींनी स्वतःचे पान वाढून घेतले. आपला नवरा काही न बोलता झोपी गेला व जेवलीस का हे देखील त्याने विचारले नाही याचे वहिनींना फारच वाईट वाटले. रडत रडतच त्यांनी जेवण आटोपले व रागातच झोपी गेल्या. या सबंध प्रसंगाबद्दल एकदा सहजच सुरेश माझ्याजवळ बोलला. त्यावर मी फार प्रतिक्रीया दिली नाही. त्याला त्याचे मन मोकळे करायचे होते. मी त्याचे ऐकून घेतले. परंतू त्या प्रसंगावर मी पुन्हा विचार केला तेव्हा नेमकी काय चूक झाली ते माझ्या लक्षात आले.
दिवसभराच्या ताणामुळे थकून गेलेल्या सुरेशला वहिनींनी जे काही ऐकविले त्यामधून त्यांना नवऱ्याबद्दल वाटत असलेली काळजी व प्रेम मला जाणवलेच. निश्चितच त्याच्या वाढत्या कामाची, त्याच्या व्यापाची, त्याच्या तब्येतीची काळजी त्यांना होती व ती नवऱ्यावरील प्रेमापोटीच होती. परंतू थकून घरी आल्यानंतर सुरेशला जे अपेक्षित होते त्याच्या संपुर्ण उलट वहिनींनी केले होते. तेच जर जरासे वेगळे त्यांना करता आले असते तर हाच प्रसंग एका वेगळ्या पद्धतीने समोर आला असता व परीणाम फार वेगळा राहीला असता. प्रेम व काळजी असली तरीदेखील ते व्यक्त करण्याच्या पद्धती व वेळ ही फार महत्वाची असते. ती नेमकी आमच्या वहिनींनी चुकविली होती. त्यामुळे भलतेच घडले. सुरेशबद्दल वाटणांऱ्या काळजीपोटी त्यांनी जे ऐकविले त्याच्या ऐवजी दोनच वाक्ये अत्यंत प्रेमळ स्वरात त्यांनी बोलायला हवी होती. ती म्हणजे, खूप थकलात ना हो आज? चला पटकन फ्रेश व्हा आणि मी गरमागरम जेवण वाढते. त्याक्षणी सुरेशला वहिनींनी आत्यंतिक काळजीपोटी दिलेल्या भाषणाची गरज नव्हती तर प्रेमाने उच्चारलेल्या या दोन वाक्याची निकड होती. वहिनींनी बोललेल्या साऱ्या गोष्टींमागे त्यांना त्याच्या बद्दल वाटणारे प्रेम व काळजी त्याला कळत होती. परंतू प्रेम व्यक्त करण्याची वहिनींची पद्धत मात्र संपुर्णपणे चुकलेली होती. त्यामुळे सारा अनर्थ झाला. दिवसभराच्या ताणामुळे थकून गेलेला सुरेश वहिनींच्या बोलण्यामुळे आणखी जास्त ताणग्रस्त झाला व निमूटपणे झोपी गेला. याउलट ती प्रेमाची दोन वाक्ये बोलून, त्याला शांतपणे जेवण करु देऊन, त्याच्या मनापासून काम करण्याच्या प्रवृत्तीचे त्याक्षणी कौतुक करुन जर त्याचा ताण कमी केला असता तर वहिनींना फार वेगळा प्रतिसाद मिळाला असता. कदाचित तू पोळ्या करुन घे, आपण सोबत बसूयात जेवायला असेही तो म्हणाला असता. त्यानंतर दिवसभर काय काम झाले याबद्दल दोघांनाही एकमेकांची चौकशी करता आली असती व ताणामधे गेलेल्या दिवसाची सुरेशकरीता आनंददायी समाप्ती झाली असती. किती छोटीशी गोष्ट होती ही!
मुळात ही छोटीच गोष्ट असते. प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतींमुळे देखील अनेक वेळा आनंदनिर्मीती होऊ शकते. मोजायचीच झाली तर केवळ दहा वाक्ये आपण अशी काढू शकतो ज्यामुळे आपल्याला सकारात्मक व आनंदी क्षणांची निर्मिती करता येऊ शकते. थकलात ना!, खूप काम पुरले ना आज तुला!, किती करतेस गं तू घरासाठी!, बरे वाटत नाही ना, आराम कर!, तुमच्याकरीता मस्त गरमागरम चहा करु ना!, तुझ्यामुळे मी हे सारे करु शकतोय!, तुमचा किती आधार आहे!, आता पहिले शांतपणे आराम करायचा!, किती सांभाळून घेतेस सारे!, मी तुझ्या सोबत आहे, काळजी करु नकोस! ही दहा वाक्ये नाते जपण्याची इच्छा असलेल्या कुणीही वापरावी, नाटे टिकतेच आणि बहरते देखील. या वाक्यांना कशाचेही बंधन नाही. नवरा, बायको, सासू, सून, मित्र, मैत्रीण, वडील, मुलगी, मावशी, भाचा अगदी कोणत्याही नात्यांमधे ही दहा वाक्ये टेन कमांडमेंटसारखी कामात येतात. यांचा वापर प्रभावीपणे आणि मनापासून करुन बघा, नात्यांची वीण कशी घट्ट होत जाते ते आपोआपच अनुभवाला येईल.
आमच्या वहिनींनी यातीलच काही वाक्यांचा वापर करुन त्या दिवशी प्रेम व्यक्त केले असते तर, नंतर सावकाश त्यांना त्यांचे म्हणणे पटवता देखील आले असते. कारण नात्यांमधे केवळ प्रेम असून चालत नाही तर ते व्यक्त करण्याची योग्य पद्धत देखील कळावी लागते. होय ना?
Khup chan ....
ReplyDelete