थोडा है थोडे की जरुरत है @ 24.12.19

चक्राची गंमत

सातव्या किंवा आठव्या वर्गातील गोष्ट असावी. अचानक एक गोष्ट आपल्याजवळ असावी असे वाटू लागले होते. खरे तर छोट्याश्या गावात रहात असल्याने त्या गोष्टीची आवश्यकता होती असेही नव्हते. त्याशिवाय भागत होतेच. शिवाय माझ्यासह माझ्या अनेक मित्र मैत्रिणींकडे ती गोष्ट नसल्याने त्याचे काही वाटत नव्हते. परंतू तरीदेखील विशिष्ट वयात त्या त्या वयानुरुप काही गोष्टी घडत राहतात काही गोष्टी आवडू लागतात तसेच काहीसे माझे  देखील झाले होते. परंतू आतासारखी पटकन आई वडीलांकडे काहीही मागण्याची व्यवस्था नव्हती. आता मुले आपल्या आई वडीलांना मनात आल्याबरोबर काहीही मागू शकतात आई वडील देखील आपल्या मुलाबाळांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्पर असतात. त्यावेळी देखील आईवडील आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार असायचेच, परंतू ते करताना त्यांना बराच विचार करावा लागायचा. अनेक गोष्टींची उपलब्धता नव्हती त्यासोबतच पैश्याची तजवीज हा महत्वाचा भाग होता. ती सारी जुळवाजुळव करुनच काही करता यायचे. त्यामुळे मुलांच्याही मनातल्या इच्छा या हळू हळूच बाहेर यायच्या. आताच्या आता हवे असला काही प्रकार त्या काळात अस्तित्वात नव्हता. अश्या काळात माझ्या मनात ती गोष्ट आली होती. माझ्या अनेक मित्रांच्या देखील त्या वयात ती गोष्ट मनात येतच होती. मनात त्या गोष्टीबद्दल विचार आल्यापासून साधारण दोन महिन्यांनी तो हळूच आईच्या कानावर टाकण्यात मला यश मिळाले. आईच्या माध्यमातून मग तो बाबांकडे पोहोचला त्यानंतर प्रत्येक महिन्यात विशेषत्वाने त्यासाठी करण्यात आलेल्या बचतीच्या आधारे मला एके दिवशी ती माझ्या मनातली गोष्ट मिळाली. ती म्हणजे माझी सायकल. प्रचंड आनंद झाला मला त्या सायकलीचा. माझ्या पिढीतल्या आणि आताच्याही पिढीतल्या प्रत्येकाला जसा झाला असेल तसाच. माझ्या पिढीला जरा जास्त वाट बघून मिळाल्यामुळे काकणभर जास्त असेल. पण त्या सायकलवरची सवारी म्हणजे कोण्या राजाची सवारी असल्यागत रहायची. कारण सायकल म्हणजे देखील फार लोकांना परवडणारा विषय नव्हता. त्यामुळे ज्या मोजक्या मुलांना सायकल मिळायची त्यातील मी एक असल्याने मित्रांना चक्कर मारु देणे, त्यांचे नंबर ठरवून देणे, त्यांना डबलसीट बसवून फेरी मारणे यासारखे आनंद फार मिळत होते. त्यानंतर खूप दिवस पर्यंत ती सायकल सोबत होती. मी हे लिहील्यावर अनेकांना त्यांच्या आई वडीलांकडून मिळालेली पहिली सायकल आठवल्याशिवाय राहणार नाही. सायकलीच्या आनंदाचा हा काळ प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अनुभवला असतो. पण तो काळ हळूहळू मागे पडला. ज्या सायकलीचा इतका प्रचंड आनंद झाला होता तीच सायकल पुढे कुठेतरी अडगळीत पडून राहण्याचाही काळ आला.

आयुष्यात पुढे वेगाची आवड निर्माण झाली मग सायकलीवरचा वेग कमी वाटू लागला. तरी देखील बरेच दिवस म्हणजे अगदी पद्व्यूत्तर शिक्षण होई पर्यंत सायकलीवरचा प्रवास सुरुच होता. परंतू मग नोकरी लागली त्यानंतर मात्र सायकलीच्या ऐवजी मोटर सायकल हवी असे वाटू लागले. आता सायकलीपेक्षा वेगाने बाजूने जाणाऱ्या मोटरसायकलीचे फारच आकर्षण वाटू लागले. मुलाला नोकरी लागली म्हणून बाबांनी छान मोटरसायकल घेऊन दिली. त्यानंतर मात्र जुनी सायकल सुटली. मोटर सायकल वरची सवारी, वेगाने गाडी चालविणे, त्याचे उगाचच कौतुक, गाडीवर बसल्यावर स्वतःला मुकद्दर का सिकंदर मधला अमिताभ समजणे, फार वेगाने गाडी चालवित असल्याने आपल्या गाडीवर बसायला लोक घाबरतात वगैरे सारखे विचित्र आनंद देणारे विचार हे सारे सुरु राहीले. मोटरसायकलवरुन लांब लांब प्रवास, पावसात मोटरसायकल काढून भटकायला जाणे इत्यादी साऱ्या गोष्टी काही वर्षे सुरु होत्या म्हणजे माझ्या मेहनतीवर चालणाऱ्या दोन चक्राहून स्वयंचलित दोन चक्रांपर्यंत मी पोहोचलो होतो. चक्र होतेच परंतू आता आपोआप चालत होते. त्या मोटर सायकलचाही काळ मोठा आनंददायी ठरला. भरपूर भटकणे झाले. त्यानंतर दोन वेगवेगळ्या मोटरसायकली देखील वापरून झाल्या. त्यानंतर मात्र पुन्हा एक वेळ अशी आली की पाच जणांच्या परीवाराला ऑटोरीक्शा करुन जावे लागते किंवा पाऊस असला तर बरेच वेळा बाहेर जायला अडचण निर्माण होते यासारख्या सबबी मनात येणे सुरु झाले. सुदैवाने बाबांनी बांधलेल्या स्वतःच्या घरातच रहात असल्याने आता दोन चक्राच्या वाहनासोबत चार चक्राचे वाहन असावे असा विचार मनात येऊ लागला. सोबतच्या मित्र मंडळींकडे असलेले वाहन मनाला त्यामधील आनंद बाबा चार चक्राचे वाहन घेऊ शकले नाही म्हणून आपण घेतले पाहीजे असा विचार मनात घोळू लागला. काही दिवसांनी तो विचार पक्का झाला मग चार चक्राचे वाहन घरी आले

त्याचाही आनंद फार झाला. कारण आता सर्वांना सोबत बाहेर किंवा परगावी जाता येऊ लागले. भटकण्याची आवड असल्याने त्याचा जास्तच उपयोग होऊ लागला. मग दूर कोकणात गेल्यावर गाडीच्या टपावर मुलाला उभे करुन त्याच्याकरवी आंबे तोडून घेणे किंवा मनात येईल तेथल्या समुद्र किनाऱ्यावर गाडी थांबवून कितीही वेळ बसून राहणे यासारखा आनंद मिळू लागला. पाऊस पाण्याचे कुठे जायचे असेल तर सोय होऊ लागली. रात्रीच्या कार्यक्रमांना सहजच जाता येऊ लागले. कोणत्याही ठिकाणाहून घरी परतायचे कसे ही चिंता मिटली. आता काय बुवा तुम्ही तर मोठे लोक झाले वगैरे सारखे ठराविक साचेबद्ध उद्गार ऐकायला येऊ लागले. आई बाबांना देखील त्या गोष्टीचा आनंद झाला. त्यांचे लोकांना कौतुकाने सांगणे सुरु झाले. चार चाकी गाडीत बसण्याची हौस पोराने पूर्ण केली वगैरे. या सर्व बाबींचा आनंद घेताना त्या दोन चक्राच्या स्वयंचलीत मोटरसायकलचे महत्व आपोआपच कमी झाले होते. त्याचे अस्तित्व आता उपयोगीता म्हणून राहीले होते. चक्रांच्या वाढत्या संख्येनुसार बदलत जाणारी वाहने मनाला वेगवेगळ्या वेळी मनसोक्त आनंद देत राहीली. पण हे चक्राचे गणित उलट दिशेने देखील फिरते हे मात्र ज्या दिवशी कळले त्या दिवशी खऱ्या अर्थाने जीवनाचे मर्म कळले

माझ्या मेहनतीने चालणाऱ्या दोन चक्राच्या वाहनापासून स्वयंचलित चार चक्राच्या वाहनापर्यंत आनंद घेतल्यावर एकदा डाॅक्टरांनी एक गोष्ट सांगितली ती ऐकल्यावर मला मनापासून हसू आले. प्रवास जेथून सुरु झाला होता पुन्हा तीच अवस्था आल्याचा आनंद देखील झाला. त्यावेळेपेक्षा आता तो जरा वेगळ्या स्वरुपात होता. डाॅक्टर म्हणाले की चाळीशी ओलांडल्यावर आता नियमित व्यायाम करायला हवा त्यासाठी ताबडतोब एक सायकल विकत घ्यावी. ती घ्यायला गेलो तेव्हा आता सायकल चालविणे म्हणजे एक नवे ब्रॅंडींग झाले आहे असे कळले. सायकलींच्या किंमतीवरुन तर ते मला फारच जास्त पटले. आता केवळ सायकल विकत घेऊन चालत नाही. त्यासोबत स्पेशल पॅंट, ग्लोव्ज, इंडीकेटर, बाॅटल होल्डर, हाॅर्न, मोबाईल चार्जर, स्पेशल टी शर्ट, हेल्मेट, गाॅगल्स, फ्लॅश लाईट. या साऱ्या गोष्टी घ्याव्या लागतात. परंतू एक गोष्ट महत्वाची माणसाच्या मेहनतीने चालणारे दोन चक्रांचे वाहन पुन्हा माझ्या हाती आले. यावेळी जरा वेगळ्या संदर्भाने दुसऱ्याच्या सल्ल्यावरून. परंतू ते आले हे मात्र नक्की

या चक्राशी माणसाच्या जीवनातील चढ उताराच्या चक्राचे किती साधर्म्य आहे. ते देखील जेथून सुरु झाले तेथे येऊन पोहोचतेच. आपल्या हातात इतकेच आहे की चक्र किती आहेत किंवा त्यांची स्थिती कशी आहे याचा विचार करता आणि चक्रांमधे अडकता त्या त्या चक्रांचा आनंद घेणे परंतू हा आनंद कायम नाही हे देखील त्याच वेळी मनात ठेवणे. असे केल्यासच आपले जीवन चक्र संपुर्णतया आनंदी होऊ शकेल आणि चक्रांची संख्या कमी झाली तर दुःख होणार नाही. अशी आहे चक्राची गंमतच!! 





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18