थोडा है थोडे की जरुरत है @ 30.12.19
निघालास?
निघालास? वेळ झाली देखील जाण्याची? किती रमलो आम्ही तुझ्यासवे. कधी आला होतास रे तू? काही आठवत देखील नाही. पण आभाळभर आनंद घेऊन आला होतास सोबत. तुझ्या येण्याने बागेतल्या फुलांनाही आनंद झाला होता कारण त्यांनाही दिसले होते आमचे उजळलेले चेहेरे. अजूनही आठवतोय तो तुझ्या येण्याचा दिवस. तू नसताना लागलेल्या काही सवयी मोडताना सुरुवातीला झालेला त्रास देखील आठवतो. सारे नव्यागतच होते ना रे! तुझ्या येण्याने किती आनंदलो आम्ही सगळेच. काय काय ठरविले तूझ्या आगमनासोबत! अमूक करायचे, तमूक करायचे. नाही म्हणायला तू नसतानाची स्थिती मधून मधून डोकावतच होती सुरुवातीला. परंतू मग तू स्थिरावलास अगदी अलगद. एखाद्या सुरेल पहाटेवर धुक्याची चादर पडावी ना, अगदी तस्साच अलगद. आणि मग सुरु झाला तुझा सहवास. काय मस्त होता तो. त्याचा आनंद घेत घेत पुढे जातच होतो की अचानक तुझ्या जाण्याची वेळ येऊन ठेपली. काय हे? तुझ्यामुळे जे काही मिळाले त्याचा आनंद भरभरुन घेण्याला व ती थेट ह्रदयाला जाणवायला आता कुठे सुरुवात झाली होती आणि तू निघालास? किती किती नि काय काय देऊन जातोयस, काय काय आठवू?
जे काही तू दिलेस ना ते देताना कोणतीच कमतरता ठेवली नाहीस तू! आनंद दिलास, खूप सारा आणि वेदनाही दिलीस तर थेट मनाला खोलवर बोचणारी. चौकटी बदलल्यास, नवे लोक जोडलेस, आधीचे जरा दूर नेलेस. नवे लोक, त्यांच्यासमवेत मिळणारे नवे अनुभव हे सारे समजून घेताना आनंद तर फार झाला परंतू जूने जरा दूर गेल्याचे दुःख देखील झालेच रे! कारण ते देखील सारे आमचेच ना रे! माणसे जोडली जातात ती काय देण्याघेण्याच्या व्यवहारामुळे नाही तर मनाचे मनाशी नाते जोडले जाऊन. या साऱ्या चौकटी बदलण्याच्या प्रक्रीयेत काही माणसांनी तोंडावर सुखावणारे चेहेरे लावले होते हे देखील कळले. पण हरकत नाही. शेवटी माणसाला त्याच्या खऱ्या चेहेऱ्याचा शोध कुठे लागलाय मुळी. चेहेरेच तर घेऊन फिरत असतो हल्ली आम्ही. त्यामुळे जे जसे होते ते आपलेच होते ना रे! त्यांनी देखील जे जाणवून दिले तो एक नवा अनुभवच मानायचा. बरेच वेळा आपल्याला समोरच्याच्या जागी स्वतःला ठेवणे जमतच नाही रे! मुळात अडचण ती आहे. आपण आपल्या जागेवरून त्याला बघत असतो नि तो त्याच्या जागेवरुन त्याला पटेल तसे वागत असतो. या दोन जागांमधील अंतरालाच मतभेद असे म्हणतात. परंतू तूच तर शिकविलेस की मतभेदांना मतभेद न म्हणता, नवा अनुभव म्हणायचे. छोट्या छोट्या किती गोष्टी शिकवल्यास तू? तूझे हे असले बोल ऐकले की कठीण बाबी देखील सोप्प्या होऊन जायच्या रे! आणि तुझ्या अश्या पाठबळ देणाऱ्या सहवासाची आम्हाला सवय झाल्यावर तू निघालास? हे बरोबर नाही. पण असे म्हणल्यावरही तूझ्या आगमनाच्या वेळी तूच सांगितलेल्या गोष्टी आठवतात व मग आम्हाला तुझ्या निरोपाची तयारी करावी लागते.
काय सुरेख सांगितले होतेस तू त्यावेळी! तुझ्या आगमनाने आम्ही बावरलेलो असतानाच तू बोललेले शब्द आज जास्तच स्पष्टपणे आठवतात. तू म्हणाला होतास, माझ्या सहवासामधे तुम्हाला रहायचेय आणि त्यामधील प्रत्येक क्षण हा देखणा असेल ही जबाबदारी माझी. परंतू मी एका कौन्सीलर सारखा काम करणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मी त्यालाच मदत करणार आहे जो माझी मदत घ्यायला उत्सुक आहे. आम्ही माना डोलाविल्या होत्या कारण तुझे स्वागत करण्यास आम्हीच उत्सुक होतो. परंतू त्यापुढे तू जे बोलला होतास त्याचा खरा अर्थ आता तुझ्या जाण्याच्या वेळी कळतोय. तू पुढे म्हणाला होतास, मी तुमच्यासोबत रहाणार परंतू माझे नि तुमच्या सहवासाचे दिवस ठरले आहेत. त्यामधे कमी किंवा अधिक होऊ शकणार नाही. परंतू जो काही सहवास आहे त्यामधे तुम्हाला माझ्या म्हणण्यानुसार वागायचे आहे कारण तुम्हाला पर्याय नाही. मी आता आलोय. शिवाय मी तुमच्याकरीता काहीच करणार नाही. मी केवळ तूम्ही स्वतःकरीता कसे नि काय करायचे हे सांगणार आहे. तेवढे जर तुम्ही केलेत ना तर बघा, तुमच्या रोजच्या जीवनातील साधे साधे क्षण देखील सोनेरी झाले असतील. आणि एकदा का तुम्हाला ही क्षणांना सोनेरी करण्याची कला अवगत झाली की बघा, एक दिवस माझी गरजच भासणार नाही. सुरुवातीला आम्हाला गंमतच वाटली तुझ्या या बोलण्याची. हा तर फारच फुशारक्या मारतोय असेही वाटून गेले क्वचित. परंतू हळू हळू तुझ्या त्या कौन्सिलींगची गंमत कळायला लागली. खरे तर तू कौन्सेलींग हा शब्द एकदाच वापरला होतास परंतू त्याची प्रक्रीया मात्र तू करत राहीलास आणि नकळत आम्ही त्यात गुंतत गेलो. फार सुंदर असते काही काही वेळा गुंतणे देखील याची जाणीव झाली. आयुष्यात आनंदाचे एक सुरेख दालन उघडून दिलेस तू आम्हाला आणि काय धमाल! छोट्या छोट्या गोष्टी ज्यांची आम्ही दखलही घेत नव्हतो त्या देखील महत्वाच्या व आनंददायी बनल्या.
मग एका नव्या सिनेमाचे गाणे, गाडीमधे बसून मोठ्या आवाजात आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत ऐकणे, नंतर फार आवडले म्हणून त्या गाण्याची वेड्यासारखी पारायणे करणे, गाडीचे विशिष्ट अंकी किलोमीटर चालवून झाले म्हणून तो क्षण साजरा करणे, जमेल तेव्हा मस्त फोटो सेशन करणे, कुणाला तरी आवडतेय म्हणून व्हाॅट्स ॲपवर नवनवीन फोटो डीपी म्हणून ठेवणे, चंद्र किती सुंदर दिसतो हे जाणवून पटकन अनेकांना तो बघायला लावणे, पावसात चहा पिऊयात रे म्हणून साद देणे, थंडीच्या दिवसात मित्र मंडळींना एकत्रीत करुन गरमागरम दूध प्यायला जाणे, पारिवारीक बीसी मधे घसा बसेपर्यंत गाणे म्हणणे, घरासमोरील बागेत बहरलेली फुले फोटो काढून अनेकांना पाठवणे, आपल्या आवडत्या व्यक्तीकडे कसले कसले हट्ट करणे, गाण्याच्या कार्यक्रमांमधे सुरेल सुरांचा मित्रमंडळीसोबत आस्वाद घेणे, ते करीत असताना गायक समेवर आला की त्याचा आनंद सोबत न बोलता डोळ्यांनीच व्यक्त करणे, वाटाण्याच्या शेंगा भाजून त्यावर मसाला व लिंबू टाकून सर्वांसमोर ठेवणे, मुलांना आवडते म्हणून त्याच्यासोबत एखाद्या गाण्यावर सारे विसरुन नाच करणे, किती किती करायला लावलेस रे! आणि आम्ही हे सारे करत असताना तू मात्र दूरुन हे सारे बघत होतास हे मात्र आता जाणवतेय. आम्हाला ही सारी सवयच लावून दिलीस तू आणि आता तू निघालास? हा असा तटस्थपणा तूला कसा काय जमला रे? बहुदा तुला ठाऊक होते की तुझा जाण्याचा दिवस ठरलाय, आम्हीच ते विसरुन गेलो होतो. परंतू आता मात्र मन गलबलून गेलंय. आनंदाचे क्षण निर्माण करुन त्यांचा आनंद घेणे, शक्यतोवर काहीही नकारात्मक न बोलणे किंवा टिका टिप्पणी न करणे हे किती छान शिकवलेस रे तू!! तुझे मोठेपण हे आहे की तू यात कुठेही नव्हतास, एखाद्या लहान बाळाला सुरुवातीला बोटाला धरवून चालायला शिकविले जाते व मग काही दिवसातच ते बाळ स्वतःचा तोल सांभाळून चालू लागते, चालण्याचा आनंद घेऊ लागते आणि बोट धरणारा व्यक्ती डोळे भरुन दूरुन ते चालणे बघत राहतो. तू तेच केलेस. सुरुवातीला आनंदी क्षणांच्या वर्तुळात जाताना तू आमचे बोट धरले होतेस पण नंतर आम्हाला क्षणांची सुरेख निर्मीती करता येऊ लागल्यावर तू कधी दूर झालास नि दूरुन डोळे भरुन आम्हाला बघत राहीलास. पण आज मात्र तुझ्या जाण्याची वेळ आलीय आणि हे काय? तुझे पण डोळे भरुन आलेय.
पण तरीदेखील तू जाणार हे आम्हाला ठाऊक आहे रे! पण एक करशील, आमच्यासाठी? तू गेल्यानंतर तुझ्यासारखाच एक कौन्सेलर नक्की पाठव रे, आम्ही सारे काही करतोय रे मित्रा, पण ते का करतोय ठाऊक आहे? तू आहेस ही भावना होती रे, कायम!! ती भावना तशीच रहावी असेच कुणीतरी छानसे पाठशील ना रे? आजच्या निरोपाच्या दिवशी एवढे तरी ऐकशील ना रे?
कमी अधिक प्रमाणात आपण सर्वजण २०१९ या सरत्या वर्षाला असेच काहीसे म्हणतोय आणि नव्या २०२० च्या स्वागताची तयारी करतोय, होय ना?
बढिया 👌
ReplyDelete