थोडा है थोडे की जरुरत है @ 17.12.19
हॅसल फ्री टॅग
कार्यालयीन कामानिमीत्त किंवा भावाकडे नागपूरला माझे नेहेमीच जाणे होते. परंतू परवा नागपूरला जाताना मी जरा जास्त उत्साहात होतो. अमरावतीहून नागपूर हे आता सुंदर रस्त्यामुळे घर आंगण झालंय. सहजच नागपूरला जाऊन येणे होते. त्यामुळे माझे नागपूरला जाणे काही फार कौतुकाचा विषय नव्हता. परंतू तरी देखील मी उत्साहात होतो. यावेळी माझ्या मित्र मंडळींनाही नागपूर प्रवासाबद्दल सांगून झाले होते. बरे! मी प्रवास नेहेमी धमाल करीत करतो हे सर्वांनाच ठाऊक असल्याने, गाणे, खाणे, मधे कुठेतरी थांबून छान फोटो वगैरे सारे नेहेमीप्रमाणे होणार होते त्यामुळे त्याचेही नवल नव्हते. तरीदेखील यावेळच्या माझ्या नागपूर ट्रीपची एक खास विशेषता होती ज्यामुळे मी उत्साहीत होतो. ती विशेषता म्हणजे माझा यावेळचा प्रवास हॅसल फ्री होणार होता. म्हणजे कोणत्याही अडचणी शिवाय होणार होता. खरे तर या अमरावती नागपूर प्रवासात अडचण तशी काहीच येत नाही. सुंदर रस्ता, दुतर्फा छान छान फुलझाडे, चौपदरी रस्ता असल्याने निवांत गाडी चालविता येणे, मधे मधे थांबायला सुंदर ठिकाणे असा तो सारा मार्ग आहे. एकच छोटीशी अडचण त्यामधे होती व ती म्हणजे टोल भरण्याकरीता लागणाऱ्या लांब लांब रांगा. एकूण तीन टोल नाक्यांवर कधी कधी बराच वेळ थांबायला लागायचे. माझ्या यावेळच्या प्रवासामधे तो त्रास पण दूर होण्याची खात्री मिळाली होती कारण या सर्व टोल नाक्यांवर एक नवी व्यवस्था सुरु करण्यात आली आहे ज्यामुळे जाहीरातीत सांगितल्याप्रमाणे माझा प्रवास हॅसल फ्री होणार होता. त्या नव्या व्यवस्थेचे नाव फास्ट टॅग.
संपुर्ण देशात कार्यरत असलेल्या टोल नाक्यांवर गाड्यांना रांगांमधे थांबावे लागू नये म्हणून एक नवी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. याचे नाव फास्ट टॅग. यामधे काही कागदपत्रे जमा करुन गाडीत लावण्यासाठी एक टॅग मिळतो. तो टॅग टोल नाक्यावर आपोआप स्कॅन होतो व एका सेकंदात आपली गाडी टोल नाक्यावरुन पुढे जाते. आपल्याला बँकेद्वारे या टॅगमधे इलेक्ट्राॅनीक पद्धतीने पैसे जमा करता येतात म्हणजेच मोबाईलसारखे त्याला रीचार्ज करता येते. त्यामुळे कुठेही फार न थांबता प्रवास होतो. हा प्रवास हॅसल फ्री होणार अशी खात्री या व्यवस्थेने दिली आहे. मी ती व्यवस्था पहिल्यांदाच वापरणार होतो त्यामुळे मी उत्साहित होतो. अमरावतीहून निघाल्यावर पहिला टोल आला. तेथे ज्यांनी हे टॅग लावले नाहीत त्या गाड्यांची भली मोठी रांग होती आणि मी टॅग लावला असल्याने मला सरळ पुढे जाता आले. खरोखरीच टोलनाक्यावर रांगेत उभे राहून पेट्रोल वाया जाण्यापेक्षा ही सुविधा छान होती. एकदम हॅसल फ्री. एका सेकंदात गाडी पुढे निघाली परंतू माझे मन मात्र त्या हॅसल फ्री व्यवस्थेजवळच थांबले. हॅसल म्हणजे भांडण, त्रास किंवा अडचण. त्यापासून मुक्तता म्हणजे हॅसल फ्री. मनात सहज विचार आला की तंत्रज्ञान आपले जीवन सुलभ व सुखकर बनविण्यासाठी किती मदत करते. आपल्या जीवनाचा भौतिक आधार असलेले तंत्रज्ञान आपल्या वेगवेगळे त्रास व अडचणींवर मात करण्याकरीता नवनविन शोध लावते. त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात रीसर्च ॲंड डेव्हलपमेंटची कामे चालतात. अनेक संशोधक त्यासाठी झटत असतात. अहोरात्र परीश्रम करुन आपल्या जीवनाला हॅसल फ्री बनविण्याकरीता नाविण्यपूर्ण बाबी आपल्याला देत राहतात. एका बाजूने आधुनिक व वैशिष्ट्यपूर्ण भौतिक सुविधांच्या आधारे आपले आयुष्य सुखकर करणाऱ्या व्यवस्था मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना आपल्या जीवनाचा खरा हॅसल ज्याच्यामुळे आहे ते मात्र दुर्दैवाने आधुनिक काळात दुर्लक्षित राहीले आहे. आधुनिक काळातील नवनविन टॅगमुळे आपला भौतिक प्रवास हॅसल फ्री होऊ लागलाय परंतू आपला मानसिक प्रवास सुखकर व्हावा यासाठी मात्र टॅग बनत नाहीत व त्यामुळे आधुनिक काळ असला तरी त्या हॅसलमधे दिवसांगणिक वाढ होतेय.
गेल्या वीस वर्षात प्रचंड वाढत जात असलेल्या ताणामुळे आपल्या देशातील ह्रदयविकार आणि मधुमेह या रोगांचे प्रमाण जवळपास २५ टक्क्यांहून अधिक वाढले आहे. त्याच प्रमाणात घटस्फोटांचे प्रमाण देखील वाढले आहे. तरुण मंडळींमधे व्यसनांचे प्रमाण तर इतके जास्त वाढलेय की त्यावर नियंत्रण कसे करावे हा एक चिंतेचा विषय आहे. ड्रग्जचा वापर देखील वेगवेगळ्या प्रकाराने होऊ लागलाय. मोठ्या मोठ्या शहरात तर मुले मुली आपले वाढदिवस पबमधे साजरे करुन सर्रास दारु ठोसून धिंगाणा घालून तसा ट्रेंड सेट करु लागल्यात. दारु पिणे ही बाब तर पुरुष मंडळींकरीता पुरुषार्थ आणि महिलांकरीता स्टाईल बनतेय. हे सारे एन्जाॅयमेंट या सदराखाली केले जात असतानाही मानसिक अवस्था स्थिर मात्र नाही. मनामधे राग, तिरस्कार, त्वेष, अस्थिरता आहे. या सर्व तीव्र भावनांचे प्रगटीकरण आपल्याला सोशल मिडीयावर दिसतेय. एकमेकांबद्दल राग, एकमेकांच्या विचारांबद्दल टोकाचा विरोध, त्यामधून पातळी सोडून एकमेकांबद्दल केले जाणारे भाष्य, एकमेकांची काढली जाणारी लायकी या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा हॅसल आहे. आधुनिक काळात तणाव, डीप्रेशन या सारख्या शब्दांची चलती असणे हे त्याचेच द्योतक आहे. कधी नव्हे ते वेगवेगळ्या समस्यांकरीता समुपदेशनाची गरज भासू लागली आहे. आधीच्या काळी समुपदेशनाची प्रक्रीया जी कौटुंबिक व्यवस्थांमधेच होऊन जात असे ती आता समुपदेशकाकडे जाऊन करुन घ्यावी लागते. भौतिक जीवनातील आपला हॅसल दूर करण्याकरीता वेगवेगळे संशोधन करुन टॅग बनविले जात आहेत. आपल्या जीवन प्रवासातील मानसिक ताणतणाव, अस्वस्थता, विवंचना यांचे निराकरण करण्यासाठी एखादा टॅग बनविता येईल का? असा विचार माझ्या मनात आला. कसा धमाल टॅग असेल तो!
त्याचे नाव हॅपी टॅग ठेऊयात. तो आपल्याला आपल्या स्वभावामधे थोड्याफार प्रमाणात बदल करुन प्राप्त करता येईल. समोरच्याच्या मनाला समजून घेण्याची प्रवृत्ती, आपल्या ठराविक साचेबद्ध विचारसरणीला बदलण्याची तयारी आणि प्रत्येकामधील वाईट गोष्टी बाजूला सारुन चांगले तेवढेच बघण्याची क्षमता या तीन गोष्टींची तयारी झाल्यावर हा टॅग आपल्याला प्राप्त होणार. तो आपल्या चेहेऱ्यावरील रागीट, तणावग्रस्त, आक्रस्ताळ्या भावांवर लावला जाणार. यामुळे आपला चेहेरा हसमुख, आनंदी व सौम्य दिसणार. या टॅगमधे आपल्याला आनंदाचा, प्रेमाचा व सांभाळाचा रीचार्ज करावा लागणार. त्यासाठी फक्त मलाच नाही तर लोकांना देखील विचार करण्याची क्षमता आहे हे समजून घेणे, प्रेमाचे चार शब्द हे माणसे जोडण्याकरीता कामात येतात हे जाणून घेणे व आपल्या वर्तणूकीमुळे समोरच्याला त्रास होऊ शकतो याची जाणीव निर्माण करणे या बाबींमुळे हा रीचार्ज करता येईल. असा हा आगळा वेगळा हॅपी टॅग लावून प्रवासाला सुरुवात केली तर काय मजा येईल! आपला प्रवास सुरु असताना हॅसलची स्थिती असलेल्या ठिकाणी आपण पोहोचू. हॅपी टॅग न लावलेले अनेक मंडळी अडचणीच्या स्थितींमधे अडकून पडलेले असतील व आपण लावलेला हॅपी टॅग व त्यामुळे सुंदर दिसणारा आपला चेहेरा आपोआप स्कॅन होईल. त्यामुळे आपण सहजच हॅसल असलेल्या स्थितीवर मात करुन हसत हसत पुढे निघून जाऊ. असा टॅग तयार झाला तर!
खरे सांगायचे झाले तर आपल्या भावनिक जिवनाला सुखकर करणारा असा टॅग बनवावा लागत नाही. तो परमेश्वराने आपल्याला मानवाचे जीवन प्रदान करताना बसवूनच दिला आहे. प्रत्येक चेहेऱ्यावर तो असतोच. गरज आहे ती म्हणजे तो टॅग नव्या काळानुसार रीचार्ज करण्याची. अनेकांनी त्याला खूप दिवसांपासून रीचार्ज न केल्यामुळे त्याची वॅलीडीटी संपली आहे. त्यामुळे निखळ आनंदाच्या स्रोतांनी जसे सुंदर संगीत, विचारी लेखन, प्रभावी कलाकृती किंवा सुरेख मैत्री यांनी त्याला रीचार्ज करुन घेता येईल व त्यानंतर नियमितपणे वर चर्चिल्याप्रमाणे त्यास रीचार्ज करीत राहील्यास हा हॅपी टॅग आपला भावनिक जीवन प्रवास १०० टक्के हॅसल फ्री बनवेल. टोल नाक्यावरील हॅसल टाळण्यासाठी नव्या फास्ट टॅग सोबतच जीवनातील हॅसल टाळण्यासाठी हा नवा हॅपी टॅग वापरुयात?
अविनाश.. खूप दिवसांनी आरामात तुझा लेख वाचला .आनंदी जगण्यासाठी तुझा मूलमंत्र सगळ्या वाचकांनी वापरावा.कारण कला,लिखाण,निसर्ग सौंदर्य,मैत्री ह्यात सध्या मी रमत आहे म्हणूनच तुझ्यासोबत मैत्री झाली😊
ReplyDeleteThanks...
Deleteमस्त👌
ReplyDelete