थोडा है थोडे की जरुरत है @ 03.12.19

गायलेला सूर

एक गाण्याची मैफल सुरु होती. जवळपास संपुर्ण आयुष्य संगीताच्या सेवेमधे अर्पण केलेले दोन बुजुर्ग गायक त्यांच्या संगीत साधनेचे अत्यंत प्रभावी सादरीकरण करीत होते. गाणे म्हणजे आमची साधना आहे त्या साधनेचा आविष्कार आज आम्ही अंबामातेच्या चरणी अर्पण करतोय असे सुरुवातीलाच त्यांनी सांगितले होते. त्या दोन साधकांची नावे म्हणजे प्रख्यात शास्त्रीय संगीत गायक, पं. राजन पं साजन मिश्र. साधारणपणे वाद्य संगीतात गायला जाणारा राग झिंझोटी त्यांनी गायला घेतला. गायन सादर करताना ते केवळ सादर करायचे नाही तर ऐकणाऱ्या प्रत्येकाला त्या गायनाच्या संगीत लहरींमधे सामावून घ्यायचे आणि सुरांचा आनंद द्यायचा ही त्यांच्या गायनाची हातोटी. रागाची सुरावट सुरु झाली. विलंबित बंदीशीद्वारे रागविस्तार करुन त्या रागाचे संपुर्ण स्वरुप दाखविणे सुरु झाले. सभागृहात बसलेल्या काही मंडळींना त्या स्वरांचे ज्ञान होते त्यामुळे त्यांना आनंद होणे स्वाभाविकच होते. परंतू केवळ शुद्ध संगीत आवडते म्हणून गाणे ऐकणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना देखील त्या सुरावटीने गुंगवून टाकले होते. त्या रागातील सुरांची एक एक रचना सादर करत सुरांची सुरेल इमारत उभी होऊ लागली होती. षड्जापर्यंत पोहोचत असताना वेगवेगळ्या मार्गांवरुन सुरावट जात होती. हे सारे सुरु असताना त्यांनी दोन तीन वेळा एक विलक्षण गोष्ट केली. खरे तर अनेक शास्त्रीय गायकांच्या विविध पद्धती असतात. सांगीतिक घराण्यांनुसार त्या बदलत देखील जातात. परंतू त्या दिवशीच्या पं. राज पं. साजन मिश्र यांच्या मैफीलीमधे तो एक अद्भूत प्रकार ज्यांना संगीत फारसे कळत नाही केवळ सुरांवरील प्रेमापोटी संगीत ऐकले जाते अश्या देखील प्रत्येकाला अनुभवायला मिळाला. तो प्रकार इतका सुरेल अद्वितीय होता की आजही त्या गाण्याचा आनंद मनात उत्पन्न होतो तेव्हा त्यांच्या संपुर्ण गाण्याची आठवण येतेच परंतू त्या एका अप्रतिम गोष्टीची जास्त आठवण येते. सर्वाच महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ती गोष्ट गायलीच नाही. साधारण दोन तास पर्यंत त्यांनी जे अद्भूत गायन केले ते तर स्मरणात आहेच परंतू ते जे गायले नाही ते जास्त स्मरणात आहे. तो म्हणजे त्यांनी गायलेला तो एक सूर.

गाणे संपल्यावर मनापासून लाभलेली तृप्ती जेव्हा शांतपणे मी परत एकदा अनुभवत होतो तेव्हा तो सूरच डोक्यात येत होता जो त्या श्रेष्ठ गायकांनी गायलाच नाही. एक विलक्षण अनुभूती होती तो सूर. संगीत मनापासून आवडत असल्याची एक पावतीच होती तो सूर. रोजच्या कार्यप्रक्रीयेमधील कार्यव्यस्ततेमधील वेगवेगळ्या गोष्टी संपुर्णपणे विसरुन त्या ज्येष्ठ गायकांच्या संगीत साधनेमधे समरस होता येण्याचा आनंद होता तो सूर. गाण्याच्या आनंदासोबतच आपल्या मनातील सांगीतिक संवेदना जागृत असल्याचा पुरावाच होता तो सूर. संगीत हे माणसाला त्याच्या अवतीभोवतीचे विश्व विसरायला लावून एका अनोख्या विश्वात नेऊ शकते जेथे केवळ पावित्र्याने भारलेले क्षण आपल्या मनाला सक्षम बनवू शकतात या तत्वाची थेट प्रचिती होती तो सूर. व्यक्त होणे ही माणसा माणसातील संवादाची एक अत्यंत महत्वाची गरज असली तरी मानसिक पातळीवर व्यक्त होणाऱ्या भावनांपेक्षा अव्यक्ताची ताकद कितीतरी जास्त असते हे आपल्याला पटवून देणारा विश्वास होता तो सूर. माणसांच्या या आपल्या जगात दृष्य स्वरुपात अनेक बाबी आपल्याला आनंद देत असतील किंवा आपल्याला त्यांच्या सौंदर्याने खिळवून ठेवत असतील परंतू या दृष्य जगाच्याही पलीकडे आपल्या मनाच्या अंतस्थ स्वरुपात असे काहीतरी विलक्षण आहे ज्याचा आनंद शब्दांमधे मांडता येत नाही, त्या सौंदर्यस्वरुपाचे प्रतिक होता तो सूर. ते विलक्षण काहीतरी त्या संगीत साधकांनी त्यांच्या त्या एका अद्भूत कृतीने लख्ख उजळून दाखविले आणि तोच सर्वात महत्वाचा भाग असतो. आपल्या मनात ती विलक्षण गोष्ट असताना ती कुणीतरी अशी उजळून दाखविली की मग अवघा रंग एक झाला ची स्थिती होते. त्या मैफीलीमधे माझ्यासोबत जवळपास सर्वांच्याच मनाची तशी स्थिती बनविणारा विस्मयकारी चमत्कार होता तो गायलेला सूर.

कसा होता तो सूर? झिंझोटी रागाची सुरावट षड्जाच्या जवळपास रेंगाळत होती. अलगद त्याला स्पर्श करीत त्याचे दर्शन घडवत होती. सा रे च्या पुढे धैवतापर्यंत स्वर जाऊन पुन्हा रे सा असे परत समोवर येत होते. मनामधे त्या सुरांची लयकारी जागविली जात होती. आता षड्ज लागणार असा आभास होतानाच पुन्हा सुरावट अवरोह घेऊन येऊन समेवर पोहोचायची. पुन्हा सुरांची इमारत बांधणे सुरु व्हायचे. कधी कधी तर षड्जाच्या वरचा सूर देखील लावला जायचा परंतू त्या षड्जाच्या नेमक्या सुराला टाळून तो कोणता सुर असावा याची मनामधे पूर्वतयारी त्यांनी करुन दिली. सर्व श्रोते तो षड्ज लागण्याची आतुरतेने वाट बघत होते. आणि मग चांगला श्वास भरुन पुन्हा एकदा स्वर वरपर्यंत पोहोचले. सुरावटीच्या अंदाजावरुन लक्षात आले की आता ही सुरांची रचना षड्जावर स्थिरावणार आणि तसेच झाले. धैवत लावून त्यांनी षड्ज लावला. पण हे काय झाले? कुणाला काही कळायच्या आत तो विलक्षण प्रकार घडला. त्यांनी तो षड्ज लावला पण गायलाच नाही. तो सूर तसाच सोडून दिला त्याक्षणी तो सूर त्या सांगितीक सुरावटीसोबत मनातून जोडल्या गेलेल्या प्रत्येकाच्या मनात तो षड्ज आपोआप उमटला. मनातून तो लख्खपणे दिसला, ठळकपणे जाणवला त्याक्षणी झालेला तो साक्षात्कार अक्षरशः रोमांच उभे करुन गेला. षड्ज प्रत्यक्ष ऐकविण्यापेक्षा त्यांनी तो प्रत्येकाच्या मनात निर्माण करुन प्रत्येकाला अनुभवायला लावला. केवळ अद्घूत. व्यक्तापेक्षा अव्यक्ताची ताकद त्याक्षणी जाणवली. ही बाब शतप्रतिशत खरी आहे कारण व्यक्त झालेले समजायला सहजच असते परंतू अव्यकताची प्रचिती होण्याकरीता मनाची मनाशी एकरुपताच लागते.

नव्या काळातील नवा मंत्र आपल्याला सांगतो की जास्तीत जास्त व्यक्त व्हा. ते देखील एका दृष्टीने खरेच आहे कारण तंत्रज्ञानाच्या जाळ्यात अडकल्यानंतर सारेच कसे वरवर असल्यागत वाटू लागते. तंत्रज्ञानाच्या आधारे व्यक्त केलेल्या भावना या मनापर्यंत पोहोचतातच असे नाही. म्हणून निदान नात्यांमधील ओलावा टिकविण्यासाठी व्यक्त झाले पाहीजे ही काळाची गरज आपल्याला ओळखायला हवी. परंतू दोन व्यक्तींमधे एकदा दृढता निर्माण झाली की मग मात्र अनेकदा व्यक्त होण्यापेक्षा अव्यक्ताचा आनंद अधिक असतो. अव्यक्त राहीलेले जेव्हा समजून घेतले जाते ना तेव्हा ते थेट मनाच्या अंतरंगापर्यंत पोहोचलेले असतेयाकरीता दोन व्यक्तींचा सहवासच घडावा लागतो असेही नाही. कारण कधीकधी आयुष्भराचा सहवास परमेश्वराने नेमून दिला असला तरी असे मनातील अव्यक्त समजल्या जात नाही. याउलट बरेचवेळा नित्य सहवासाच्या पलीकडेही अव्यक्त जाणून घेण्याची क्षमता असलेली मने असतात. त्याचा आधार देवाणघेवाण नसून निखळ प्रेम असते. प्रेमाचे खरे स्वरुप कदाचित अव्यक्ताच्या आधारेच जास्त तीव्रतेने मनाला भावते. व्यावहारिक जगात हा विचार तसा अनेकांना रुचणे कठीण असतो कारण या सर्व प्रकारामधे भावना ही व्यवहारापेक्षा वरचढ असते. यामधे नफा किंवा तोटा याचा विचार केला जाऊ शकत नाही. पं. राजन पं. साजन मिश्र यांनी सादर केलेली संगीत साधना ही देखील व्यवहाराच्या पलीकडे जाऊन मनातील पवित्र भावनांचा आविष्कारच होती त्यामुळेच ती ऐकणाऱ्यांच्या मनाला देखील थेट भिडू शकली. परंतू त्या संपुर्ण मैफीलीमधे त्यांनी सादर केलेल्या प्रत्येक सुरावटीचा आनंद घेत असताना मात्र स्मरणात राहीला तो त्यांनी गायलेला सूर जो ऐकणाऱ्यांच्या मनात उत्पन्न झाला, ज्या सुराने अहं ब्रह्मास्मी ची अनुभूती प्रत्येकाला प्राप्त करुन दिली आपल्या ह्रदयातही संगीतासारख्या पवित्र संवेदनेचा वास आहे याची जाणीव करुन दिली, असा होता तो गायलेला अव्यक्त सूर!!






Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18