थोडा है थोडे की जरुरत है @ 22.06.21

शेरनी

ॲमेझॉन प्राईम या ॲपवर नुकताच एक नवा सिनेमा प्रदर्शित झाला. सध्या कोरोना काळामुळे या मोबाईल ॲप्सवर खूप सारे चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलावंत यामधे सहभागी होत असल्याने या सर्व वेब सिरीज अतिशय जास्त लोकप्रीय झालेल्या आहेत. फक्त भारतात नाही तर संपुर्ण जगात या वेब सिरीज अतिशय लोकप्रीय आहेत. वेब सिरीज सोबतच आता या ॲपवर चित्रपट देखील प्रदर्शित होऊ लागलेत. अनेक कसदार नट नट्यांची ओळख देखील लोकांना या निमीत्ताने होते आहे. शेरनी या चित्रपटात तर अत्यंत प्रतिभावान नटी विद्या बालन हिने काम केले असल्याने या चित्रपटाबद्दल कुतुहल होतेच. मी स्वतः या चित्रपटाबद्दल फारच उत्सुक होतो कारण या चित्रपटाच्या संकल्पनेमागे माझा एक अत्यंत घनिष्ठ मित्र होता. त्यामुळे मी हा चित्रपट बघताना अतिशय शांतपणे बघण्याचे ठरविले. चित्रपट सुरु झाला आणि अगदी सुरुवातीलाच ज्या काही महत्वाच्या लोकांचे धन्यवाद मानण्यात आले आहे त्यात मला माझ्या मित्राचे नाव दिसले. अतिशय जास्त आनंद झाला. प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक असलेला माझा मित्र ज्या तळमळीने आपल्या विषयाच्या चौकटींच्या पलीकडे जाऊन विचार करतो गेल्या काही वर्षांपासून ज्याचे या संदर्भात मोठे काम आहे त्याच्या विषयाला एवढ्या प्रभावीपणे मिळालेला प्रतिसाद बघून त्याचा अभिमान वाटला. गेल्या काही वर्षात विशेषतः वाघांच्या संदर्भात एक मोठा विषय समस्या निर्माण झालीय. ती म्हणजे प्राणी - मानव संघर्ष. याच विषयावर माझ्या मित्राचे मोठे काम आहे. त्याने या संदर्भात लिहीलेल्या एका संशोधन पेपर वरील त्याचा फोन नंबर मिळवून त्याच्या पर्यंत पोहोचला एक अत्यंत हुशार दिग्दर्शक, अमित मसुरकर. न्युटन या चित्रपटाद्वारे प्रसिद्धीच्या झोतात असलेला हा प्रतिभावान दिग्दर्शक एका नव्या संकल्पनेवर चित्रपट बनविण्यासाठी माझ्या मित्राकडे पोहोचला तेथून सुरु झाला शेरनी या चित्रपटाचा प्रवास.

आपण सर्वांनी मुला बाळांसकट बघावा आणि त्यांच्याशी त्यानंतर चर्चा करावी असा हा चित्रपट. वाघ हा विषय केवळ दोनच प्रकारे आपल्याला ठाऊक आहे. एक तर जंगलामधे जाऊन त्याच्या दर्शनाकरीता जंगल सफारी करणे किंवा एखाद्या प्राणी संग्राहलयात पिंजऱ्यात बंद असलेल्या वाघाचे फोटो काढणे. परंतू पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विचार केल्यास सजीव साखळीमधे वाघाचे स्थान फारच महत्वाचे आहे. परंतू यापेक्षाही पुढे जाऊन वाघांच्या संदर्भात निर्माण झालेली एक फारच वेगळी समस्या म्हणजे प्राणी - मानव संघर्ष ज्याबद्दल हा चित्रपट प्रकाश टाकतो. चित्रपट बघत असताना तो शांतपणे प्रत्येक फ्रेम मनापासून अनुभवत बघावा लागतो. चित्रपटाचे नाव शेरनी असले तरी त्यामधे फार थरारक पाठलाग, गोळाबारी, किंवा गाणी वगैरे असे काहीही नाही. एखादी डॉक्युमेंटरी बघावी असा हा चित्रपट आहे परंतू अतिशय उत्तम आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्र, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक घटना अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारी आहे. या सर्वांच्या केंद्रस्थानी आहे एक शेरनी जी गरोदर आहे. जंगलांच्या आजुबाजूने वाढत जाणारी लोकवस्ती, त्यामुळे जंगलातून बाहेर येऊन माणसांच्या वस्त्यांवर त्या वाघिणीने केलेले हल्ले, त्याचा राजकीय दृष्टीने फायदा करुन घेण्याची स्थानिक राजकारण्यांची पद्धत, या सर्व परीस्थितीत त्या वाघीणीचा जीव वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न करणारे वनविभागाचे अधिकारी असा सर्व या चित्रपटाचा पॅनोरामा फिरत राहतो. जंगलातील विश्व कसे आपल्या जगापासून वेगळे असते असल्या समस्यांचा सामना कसा करायचा असतो याबद्दल या चित्रपटात फारच उत्तम विश्लेषण केले आहे. विद्या बालन या गुणी अभिनेत्रीने संवेदनशील वन अधिकारी ही भुमिका फारच अप्रतिम वठविली आहे. एक अधिकारी म्हणून तिची शिस्त राबविण्याची पद्धत परंतू एक महिला अधिकारी असल्यामुळे वाघिणीला वाचविण्याकरीता करावा लागणारा संघर्ष, मनाची तगमग, प्रशासकीय यंत्रणेमधे काम करताना होणारा त्रास या सर्व भावना विद्या बालनने फार अचूक दाखविल्या आहेत. त्या व्यक्तिरेखेच्या सर्व शेड्स जंगलाच्या पार्श्वभूमीवर तिने कमालीच्या दाखविल्या आहेत. गरोदर वाघीण जेव्हा पिल्लांना जन्म देते तेव्हा त्यांच्या त्या आईला वाचविण्याची धडपड विद्याने फारच अप्रतिम दाखविली आहे. याच चित्रपटात प्राध्यापक नुरानी या नावाची व्यक्तिरेखा म्हणजे माझ्या मित्राची व्यक्तिरेखा आहे. ज्याचे या सबंध प्रसंगातील अस्तित्व फारच महत्वाचे आहे. हा असा विषय फारच परीणामकारकतेने लोकांपर्यंत पोहोचविणारा माणूस म्हणजे अमित मसूरकर, या चित्रपटाचा दिग्दर्शक.

खरे तर असले विषय घेऊन चित्रपट बनविणे हेच मुळी धारीष्ट्याचे काम असेत. असल्या चित्रपटाला प्रेक्षक मिळतील का हा महत्वाचा प्रश्न असतो. परंतू टी सीरीज आणि अमित मसूरकर या दोघांनीही या चित्रपटाचा आर्थिक दृष्टीने फार विचार करता एक अत्यंत महत्वाचा विषय जनतेपर्यंत पोहोचावा या हेतून निर्माण केलेली ही कलाकृती आहे आणि या प्रयत्नात अमित मसूरकर पूर्णपणे यशस्वी झाले आहे. कॅमेरा मुव्हमेंटपासून ते ध्वनीसंयोजनापर्यंत प्रत्येक गोष्ट अतिशय विचारपूर्वक योजीली आहे. जंगलाच्या वातावरणाचा फील यावा यासाठी जंगलातील योग्य आवाज रेकॉर्ड करण्यात आले आहे. लाईट्सचा वापर देखील फारच अप्रतिम पद्धतीने करण्यात आला आहे. अंधाऱ्या रात्री जंगल कसे अंगावर येते तेथे एक प्रकारची भयाण शांतता निर्माण होते याचा अनुभव वेगवेगळ्या फ्रेममधे आपल्याला दिसून पडते. पहारा देणाऱ्या गाड्यांचे दिवे हळू हळू दूर जाताना परसरत जाणारा काळोख जंगलाच्या घनदाट असण्याची जाणीव करुन देते. जंगलाच्या टॉपवरून घेतलेले शॉट्स देखील जंगलांची व्याप्ती जाणवून देतात. जंगलात काम करत असताना कश्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो या सर्व अत्यंत प्रभावीपणे केलेल्या छायाचित्रणामुळे मनाला भिडते. जंगलातील वेगवेगळे आवाज जसेच्यातसे रेकॉर्ड केल्यामुळे फारच परीणामकारक झालेले आहेत. सिनेमाला दिलेले माफक पार्श्वसंगीत आणि त्यामधे जंगलाच्या आवांजांची केलेली सरमिसळ फारच चपखल आहे

सर्वात महत्वाचा भाग म्हणजे वाघ आणि मानव असा संघर्ष उभा झाल्यावर कश्या प्रकारच्या वातावरणाचा आणि स्थानिक लोकांच्या प्रतिसादाचा सामना वन अधिकाऱ्यांना करावा लागतो आणि हा प्रश्न किती जटील आहे याची आपल्याला जाणीव होते. स्थानिक राजकारण, स्थानिक लोकांच्या समस्या, त्यांच्यासमोर उभे राहीलेले वाघाचे संकट, वाघालाही स्थलांतर करताना येणाऱ्या अडचणी, शासकीय पातळीवर या समस्येला समजावून घेण्याच्या पद्धती आणि मग वाघीणीला मारण्यासाठी आलेला शिकारी तिला वाचविण्यासाठी बेशुद्ध करुन पकडण्याकरीता संघर्ष करणारे संवेदनशील वन अधिकारी हा सारा प्रकार बघण्यासारखा मनापासून अनुभवण्यासारखा आहे. डोमीनोज पिझ्झा शॉप आणि मॉल्स मधून फिरणारे आपण शहरी लोक, परंतू आपल्या पासून दूर कुठेतरी जंगलात त्याच्या सभोवताली राहणाऱ्या लोकांच्या जीवनात निर्माण झालेली एक समस्या तीव्रतेने हा चित्रपट आपल्यालाही जाणवून देतो. केवळ पर्यटन या पलीकडे पर्यावरण संवर्धनामधे आपल्यापैकी प्रत्येकाच्या सहभागाची गरज आहे याची जाणीव देखील हा चित्रपट करुन देतो. चित्रपट संपतानाचा प्रसंग तर संपूर्ण चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला विचारात टाकतो. एरवी सहजच वाटणारी ती बाब संपुर्ण चित्रपटातील प्रसंग मनात असल्याने विलक्षण बेचैन करते. ती बेचैनी विद्या बालन एका ठिकाणी काही सेकंद थांबून केवळ अभिनयाने व्यक्त करते. आणि मग एक एक दिवा विझत जाऊन चित्रपट संपतो. एका फारच वेगळ्या पातळीवरचा परंतू नव्या पिढीतल्या प्रत्येकाने बघावा असा हा चित्रपट आहे. केवळ बघू नये तर सर्वांनी त्या बाबत चर्चा करावी. मला तर निश्चितच या चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल अभिमान वाटला कारण या चित्रपटाचा वैज्ञानिक सल्लागार आहे माझा प्राध्यापक मित्र, चित्रपटातील प्राध्यापक नुरानी या भुमिकेचे प्रत्यक्षात काम करणारा, आणि ज्याचे नाव चित्रपटाच्या सुरुवातीलाच बघून माझा उर अभिमानाने भरुन आला असा, पांढरकवडा येथील शिवरामजी मोघे महाविद्यालयातील प्राणीशास्त्राचा प्राध्यापक डॉ. रमझान विराणी. डॉ. रमझान विराणी याच्या अनेक वर्षांपासूनच्या एका महत्वाच्या विषयाला समजून घेण्याकरीता, वन अधिकाऱ्यांच्या कामाचे खरे स्वरुप समजावून घेण्याकरीता आणि त्यामधे आपल्या सकारात्मक सहभागाच्या संभावना तपासण्याकरीता हा चित्रपट जरुर बघुयात, होय ना?





Comments

  1. Khup sunder analysis kela aapan , excellent

    ReplyDelete
  2. या लेखाच्या दृष्टीने बघितला तर चित्रपटाचे वेगळे आयाम लक्षात येतील

    ReplyDelete
  3. आपला वरील लेख वाचूनच हा चित्रपट पाहत असल्याचा भास होतो. सुंदर लिखाण केले. आपले व विराणी सरांचे दोघांचेही खूप खूप अभिनंदन व असेच महत्वाचे कार्य आपल्या दोघांच्याही हातून घडो यासाठी खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  4. Great... नक्कीच बघण्यासारखा सिनेमा असावा. आजकाल सिनेमा बघणे बंदच केले होते. मुलांसोबत बसून पहाण्याजोगे सिनेमा नसतोच. पण हा सिनेमा बघेल.

    ReplyDelete
  5. Bhai ye kya kiya….i am yet to see the movie and you have now ignited the appetite to see the movie ASAP. Had planned to see this movie on coming weekend but now i will have to prepone it.

    Miss my jungle detours and i fulfill them by watching shows on jungles.

    You can explore to start writing as a film critic as well, well composed writeup, you have a great sense of buildup that you create through your writing. You may even contemplate on writing fiction. Give it a shot.👍🏻

    ReplyDelete
  6. लेख नेहमीप्रमाणेच उत्तम लिहीलाय.लेख वाचुन सिनेमा कसा बघावा हेही कळेल मुलांना. आणि मित्राच्या कामाची स्तुती करणे हा ही अलीकडे दुर्मिळ गुण. तुझे खुप अभिनंदन.आणि विराणी सरांचे देखील अभिनंदन.

    ReplyDelete
  7. खुप छान लेख अविदा. अमित मासुरकरांचे दिग्दर्शन, विद्या बालन चा अभिनय आणि तांत्रिक कौशल्य टिपताना डॉ. विराणी यांचे मनापासून केलेले कौतुक खुप आवडले.

    ReplyDelete
  8. अविनाश.....सकारात्मक ताकद (वाघ) आणि नकारात्मक झुंड (गुंडशही) ही लढाई पूर्वी पासूनच आहे....शिवाय वन्य प्राणी आणि माणूस ह्यांच्यातील संघर्ष देखील वारंवार पाहतो आहे.....
    कोणाचाही पोटा पाण्यावर....भाकरीवर...जीवनात उगीच अतिक्रमण होणार असेल तर प्रतिकार हा होणारच....
    शेरणी सिनेमाची कथा कदाचित प्रत्यक्ष घटनांवर आधारित असू शकते...अशा घटना मला देखील माहीत आहेत....
    वाद्य कधीही एकदम आदमखोर होत नाही....त्याची विशिष्ट प्रक्रिया आहे.....म्हणजे विशिष्ट घटनांचा क्रम सांगू शकतो की....वाघ कसा कसा आदमखोर होतो...
    असो....तुझे अभिनंदन...विषय चांगला मांडला....मुळात तू चांगला असल्यामुळे चांगलं बोलतो..... चांगलं लिहितो....

    ReplyDelete
  9. "वर्म सर्वेश्वर पूजनाचे" ही आपली भूमिका 'शेरनी ' या प्रस्तुत लेखामधून व्यक्त झालेली आहे . " भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे " हा संदेश आपण या लेखामधून दिलेला आहे .खूपच सुंदर लेख .
    आपले आणि आपले मित्र डॉक्टर विराणी सरांचे हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  10. "वर्म सर्वेश्वर पूजनाचे "ही आपली भूमिका 'शेरनी ' या प्रस्तुत लेखामधून व्यक्त झालेली आहे. "भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे "अशाप्रकारचा सुंदर संदेश या लेखामधून आपण दिलेला आहे. खरोखरच आपण आणि आपले मित्र डॉ. विराणी सर यांचे हार्दिक अभिनंदन.

    प्रा. डॉक्टर संजय पाटील
    वाशीम

    ReplyDelete
  11. एकमेकांना पूरक अशी नैसर्गिक ecosystem आणि त्याविरुद्ध
    मानवाने स्वतःची निर्माण केलेली अशी एक 'स्वार्थी ecosystem' जिच्यामुळे अवघ्या जीवसृष्टीचा होणारा ऱ्हास
    ह्याचे अत्यंत प्रामाणिक आणि परिणामकारक example म्हणजे 'शेरनी' हा चित्रपट आहे.

    Ecosystem च्या systematic arrangement मुळे अवघी जीवसृष्टी तग धरून आहे ह्याची जाणीव असलेले एका हाताच्या बोटांवर मोजता येतील असे काही प्रामाणिक लोक त्याविरुद्ध सत्ता आणि उन्मत्त विचारप्रवृत्ती ह्याच अत्यंत संयतपणे केलेल चित्रीकरण ही, ह्या सिनेमाची strength आहे.

    'An empty vessel makes the loudest sound' अशी मानसिकता आणि त्याविरुद्ध जंगलातील हुरहुर लावून जाणारी शांतता, खळखळून वाहणारे स्वच्छ ओहोळ, मोकळ निळशार आभाळ, हिरवाईची निरनिराळी रूपं.. हे contrast अगदी चपखलपणे मनावर ठसतं.
    "नाम में क्या रख्खा है, असली मजा तो काम करनेमे है |" अस म्हणणारा विजय राज आणि शब्दांपेक्षा डोळ्यांनी बोलणारी विद्या बालन ह्यांची effortless acting ह्यामुळे आपण मंत्रमुग्ध होऊन जातो.
    गावकऱ्यांच्या भूमिकांमधे ज्योती नावच character (वाघिणीच्या बछड्यांना खाऊ घालणारी) अगदी ठळकपणे लक्षात रहात.

    Of course सिनेमा म्हणजे एक team effort असतो, त्यामुळे ह्या ' team शेरनी ' च अभिनंदन कराव तेवढं कमीच आहे.

    जगण्यासाठी जीवसृष्टी स्वतःला परिस्थितीनुसार adapt करत आली आहे. पण ह्या प्रचंड वेगाने बदलणार्‍या स्थितीत जीवन कस तग धरून रहाणार हा प्रश्न ह्या चित्रपटाच्या निमित्ताने ठळकपणे आपल्यासमोर उभा राहतो.

    ReplyDelete

  12. सर सगळ्यात पाहिले आपले मनापासून आभार व अभिनंदन . आपल्या लेखनात नेहमीच विविधता असते हा चित्रपट बघतांना चित्रपटातील शेरणी विद्याबालनजी त्या गरोदर
    अनियंत्रित वाघिणीला पकडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतांना एक स्त्री म्हणून त्यांच्यातील संवेदनशीलता जाणवते इतकेच नाही तर खंबीरपणे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी झगडत आहे आणि आजही तिला कुठेतरी प्रत्येक पावलावर पुरुषप्रधान समाजाचा सामना करावा लागतो ही मात्र खेदाची बाब आहे
    एकंदरीतच एक स्त्री किती संवेदनशील असू शकते पण त्याच बरोबर ती शेरणी पण आहे हे विसरता कामा नये याचे उत्तम प्रदर्शन या चित्रपटात पाहवयास मिळते

    ReplyDelete
  13. 'प्राणी-मानव' संघर्ष...अतिशय सुंदर आणि उत्सुकता निर्माण करणारा विषय। काय असेल तो संघर्ष? काय असेल ही कहाणी? त्या मागची भावना, प्रयत्न आणि त्याचे चित्रीकरण..? या सगळ्या बाबतींचा एक सुंदर विचार म्हणजे आजचे तुमचे हे लेखन। फार बारीक details आणि एक एक frame च्या मागची emotion तुम्ही समजुन घेतली आणि त्याला अतिशय सुंदर शब्दांमध्ये मांडले। खरेच.. चित्रपट समजावा तर तुमच्या सारखे। आणि विद्या बालन म्हटले की त्या चित्रपटा ला समजून घेण्यात फारच मज्जा। डॉ. रमझान विराणी काकांना खरच salute आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन।

    ReplyDelete
  14. सर्वांचे खूप खूप आभार.. भरभरुन प्रतिक्रीया दिल्याबद्दल…

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23