थोडा है थोडे की जरुरत है @ 08.06.21

आमचा फॅन्टम

लहानपणी जी पुस्तके मी वाचायचो त्यात आवर्जून लक्षात राहीलेले एक कॉमिक्स बुक या सदराखाली वाचलेले फॅन्टम मला अजूनही आठवते. बालपणी भेटलेला पहिला सुपर हिरो. कोणत्याही संकट प्रसंगी हा हजर होणार आणि लोकांना संकट प्रसंगी मदत करुन, त्यांना सुरक्षित करुन हा परत निघून जाणार. कुठे अडचण निर्माण होतेय का ते हा गडी शोधतच असायचा. तो आला की त्याच्या जवळील सर्व साधनांचा वापर करुन मनापासून मदत करणे हेच त्याच्या जीवनाचे ध्येय होते. परंतू मदत आटोपल्यानंतर लोकांकडून वाहवा मिळविण्यासाठी फॅन्टम कधी थांबलाय हे माझ्या वाचण्यात आले नाही. लोक संकटाच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच संकट टळल्याची खात्री करुन हा तेथून निघून जायचा. मला त्या वेळी देखील वाटायचे की एवढ्या लोकांना मोठ्या मोठ्या संकटातून वाचविणाऱ्या फॅन्टमने काही वेळ तेथे थांबावे जेणेकरून आपल्याला नेमकी मदत कुणी केली हे तरी लोकांना कळावे. परंतू लोकांनी काही म्हणावे किंवा केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी तो मुळात काम करत नाही. लोकांना निरपेक्षपणे मदत करणे हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय होते. अनेक वर्षांनंतर परवा आमच्या समुहातील एका फॅन्टमच्या एका मोठ्या कामाचा आम्हा मित्र मंडळींना शोध लागला. त्याच्या नावाचा एका मोठ्या माणसाच्या तोंडून केल्या गेलेला उल्लेख आम्हा सर्वांना सुखावून गेला. परंतू त्या सोबतच आजच्या आधुनिक आणि व्यवहारी जगतात देखील असा एक सामाजिक फॅन्टम आमचा जीवलग मित्र आहे याचा सार्थ अभिमान वाटला

परवा एबीपी माझा या वाहिनीवर थोर समाजसेवक डॉ. शंकरबाबा पापळकर यांची मुलाखत सुरु होती. त्या मुलाखती दरम्यान बाबांनी त्यांच्या लाजवंती या मुलीच्या विवाहाची कहाणी सांगत असताना आमच्या मित्राचा वहिनींचा उल्लेख केला. मतिमंद असलेल्या लाजवंतीचे जेव्हा लग्न ठरले तेव्हा तिला सामान्य व्यवहारज्ञान यावे म्हणून तिला बाबांनी आमच्या फॅन्टम मित्राच्या घरी दोन महिने ठेवले होते. या आमच्या मित्राने वहिनींनी तिला दोन महिने सांभाळले, तिला संस्कारित केले, संसाराकरीता मानसिक शारीरिकदृष्ट्या तयार केले. तिला सांसारिक जिवनाबद्दलचे धडे दिले त्यानंतर लाजवंतीचे लग्न झाले. दोन महिने बाबांच्या या उपक्रमाला शांतपणे कुणालाही फार काही कळू देता आमच्या फॅन्टम मित्राने परीवारासोबत हे काम केले. याबद्दल आम्ही काही लोक सोडलो तर समुहात देखील फार ठाऊक नव्हते. मदत लागली तेव्हा कुणालाही कळण्याआधी हजर व्हायचे. आपले सर्वचे सर्व स्रोत वापरायचे, मदत करायची आणि आभाराचे शब्द उच्चारले जाण्याआधी तेथून निघून जायचे हा आमच्या मित्राचा स्थायी भाव आहे.

गेल्या तीस वर्षांपासून आमच्या या मित्राने कितीतरी वेगवेगळ्या उपक्रमांमधे आपले फार मोठे योगदान दिलेले आहे. मनापासून केल्या जाणाऱ्या एखाद्या सामाजिक प्रकल्पाची हा सुरुवातीला माहिती घेतो. मग आपल्या जवळच्या काही मित्रांना त्याबद्दल माहिती देतो. मग पुढाकार घेऊन त्या सर्वांना त्या प्रकल्पाच्या भेटीला नेतो. जमेल त्या ठिकाणी त्या प्रकल्पाची माहिती प्रसारित करतो. अनेक वर्षांपासून याने सामाजिक राजकीय क्षेत्रात देखील अनेक लोकांशी परीचय प्रस्थापित केलेला आहे. परंतू या परीचयांचा उपयोग त्याने कधीही व्यक्तिगत कामांकरीता केलाच नाही. परंतू वेगवेगळ्या संस्थांना किंवा उपक्रमांना मदत मिळवून देण्याकरूता मात्र त्याने तो मोठ्या प्रमाणात वापरला. एकदा लोकांचा संपर्क प्रस्थापित केला की त्यानंतर तो त्या संस्थेला कश्या प्रकारची मदत केली जाऊ शकते याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतो. शासनाकडून, समाजातून किंवा काही व्यावसायीक संस्थांकडून या सामाजिक प्रकल्पांकरीता तो आर्थिक इतर सर्व प्रकारची मदत मिळवून देतो. त्यासाठी स्वतः सुरुवात करतो. यवतमाळजवळच्या उमरीपठार येथील वृद्धाश्रमाची माहिती त्याने अनेकांना दिली. आपल्या मुलीचा वाढदिवस तेथे साजरा केला. आज यवतमाळ आजुबाजूच्या परीसरातून तेथे मदतीचा मोठा ओघ सुरु झालाय. प्रकाश आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पाला भेटीसाठी जाताना एलईडी बल्बचे काम करणाऱ्या मित्राला घेऊन गेला. तो मित्र ते काम बघून प्रेरीत झाला त्याने स्वतःच्या कंपनीकडून त्या प्रकल्पात एलईडी बल्ब बसवून दिले. शंकरबाबांच्या आश्रमाबद्दल अनेकांना सांगितले बाबांच्या मुलीचे लग्न यवतमाळला मोठ्या थाटामाटात पार पाडताना अनेकांना त्या कामात सामावून घेतले. अर्थात हे सारे करीत असताना तो स्वतः या बाबतीत पुढाकार घेतो. लाजवंतीला आपल्या परीवारासोबत ठेवून आधार दिला. अनेक ठिकाणी नव्या संस्थेला मदत करुयात असे म्हणताना स्वतःचा वाटा सर्वात पहिल्यांदा तो ठेवतो नंतर सर्वांना त्यात भर टाकायला सांगतो. वेगवेगळ्या संस्थांच्या शोधात तो असतो. त्या संस्थेच्या कामाची खात्री पटली की याचे काम सुरु होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना तो त्यांच्या योग्यतांनुसार त्या संस्थेशी जोडत राहतो. प्रत्येकाची योग्यता बघून त्यांच्याकडे कामे सोपवितो. अश्या प्रकारे फॅन्टम बनून अनेक संस्थांना आधार देण्याकरीता हा आमचा मित्र पोहोचतो आणि त्या संस्थेचे सारे काही सुरळीत सुरु झाले की तेथून आभाराचे पुष्पगुच्छ मिळण्याआधीच गायब होतो. अश्या कितीतरी संस्था आणि समाजिक उपक्रम आहेत जेथील पवित्र सामाजिक कामाच्या मोठे होण्यामधे या आमच्या फॅन्टमचा काही ना काही सहभाग आहे. बडनेरा (अमरावती) येथील संत गाडगेबाबा रक्तपेढी, शंकरबाबांचा आश्रम, उमरीपठार येथील वृद्धाश्रम, प्रयास या संस्थेचे यवतमाळ गावातील कार्य, यवतमाळला नव्याने उभे झालेले कोव्हीड रुग्णालय अश्या अनेक प्रकल्पांमधे याचा प्रत्यक्ष सहभाग आहे. डॉ. शंकरबाबा पापळकरांनी त्याच्या मदतीचा उल्लेख केला तेव्हा मी त्याचे काल अभिनंदन केले तर विनम्रपणे त्याने त्याचा स्विकार केला परंतू सोबतच पुण्याजवळ नुकताच सुरु झालेल्या एका वृद्धाश्रमाची माहीती देखील दिली. त्याचे त्यांच्याशी प्राथमिक बोलणे झाले देखील आहे. आता आमच्यापैकी काहींना तो तेथे नक्की घेऊन जाणार. फॅन्टमचे नवे काम सुरु झाले आहे.

कोणत्याही समाजात काही वर्ग असा असतो ज्यांचे कुणीच नसते. यात दिव्यांग, अपंग, मतीमंद, बेवारस मुले, स्त्रीया, वृद्ध मंडळी, आदीवासी अश्यांचा सहभाग आहे. त्यांच्यासाठी काही फार मोठी मंडळी स्वतःचे आयुष्य समर्पित करतात. परंतू या मोठ्या लोकांच्या संस्थांना सामाजिक आधार देण्याकरीता आमच्या या मित्रासारख्या फॅन्टमची गरज कायम असते. त्यांच्यामुळे हे प्रकल्प लोकांना माहित होतात, लोकांच्या मनामधे या प्रकल्पांबाबत विश्वास निर्माण होतो त्यानंतर मग मदतीचा ओघ सुरु होतो. हा मदतीचा ओघ सुरु करण्याकरीता या फॅन्टमची फार गरज असते. ज्या समाजात आपण जगतो ज्या समाजामुळेच आपले अस्तित्व आहे त्याचे आपण देणे लागतो असे नेहेमी बोलले जाते. हे करण्याकरीता आपल्याला आपली भूमिका ठरवावी लागेल. एखादा प्रकल्प स्वतःहून सुरु करण्याकरीता फार समर्पण आवश्यक असते जे सर्वसामान्यपणे कुणाला जमत नाही. पुढचा पर्याय आमच्या फॅन्टम प्रमाणे काम करण्याचा देखील राहू शकतो. तिसरा सोपा परंतू सहजच करता येणारा म्हणजे फॅन्टमच्या हाकेला देणे. आम्ही सर्व मित्रमंडळी तेच करतो. आमचा आमच्या फॅन्टमवर पूर्ण विश्वास आहे आमच्या समुहातील प्रत्येकाच्या योग्यतेनुसार तो आमच्याकडून हे सामाजिक दायीत्व पूर्ण करून घेतो. आम्ही केवळ त्याच्या सोबत राहतो तो आमच्याकडून समाजपयोगी गोष्टी करून घेतो. बारकाईने विचार केल्यास लक्षात येईल की अश्या फॅन्टमची समाजाला सध्या फार गरज आहे. आमच्याकडे तो आहे आणि त्याच्या माध्यमातून अशी अनंत कामे आम्हाला करता येणार आहेत कारण आमचा फॅन्टम अनंत कौलगीकर नावाचा आमचा जीवाभावाचा मित्र आहे





Comments

  1. समाजात असे फँटम किना स्पायडरमॅन बुरखे घालून, त्यांचे खरे चेहरे लपवून समाजकार्य करीत आहेत म्हणून जगणे सुसह्य होत आहे.

    ReplyDelete
  2. फँटम....खूपच छान...मला स्वतःचाच अभिमान वाटतो की ही सावली मलाही थोडी बहुत अनुभवायला मिळाली.

    ReplyDelete
  3. An apt narrative, such Phantoms like Anantrao are the representatives of the Divine FORCE, inspiring and maintaining the sanity of the society and creating hopes for the needy👍🏻

    ReplyDelete
  4. Our society needs such phantoms in abundance. Very inspiring article indeed.👏

    ReplyDelete
  5. This Phantom helped me when I was in trouble. Salute!!

    ReplyDelete
  6. सर,आपल्या लिखानामुळे, अनेक लोक जे समाजासाठी खूप मोठं योगदान देत आहेत त्यांना तर प्रोत्साहन मिळतेच परंतू अनेक लोक नव्याने सहभागी होवून ते कार्य आणखी जोमाने पुढे जाते. खूप छान.. 👏👏

    ReplyDelete
  7. आज अनंत कौलगीकर सरांची नव्याने ओळख झाली.. मला त्याच्या कार्याची अजिबातच माहीती नव्हती.. सलाम त्याच्या कार्याला..

    ReplyDelete
  8. रिअली व्हेरी नाईस लाईन्स (ड्रॉफ्ट)
    It is admirable and gives energy
    Keep it up..

    ReplyDelete
  9. खरं तर म्हणजे जिथे लहानपणापासूनच समाजसेवेच्या अखंड व्रताची सुरुवात होते. त्या गेटच्या आतील बुधवारा भागात त्याचं बालपण गेले. प्रत्येक क्षेत्रातील क्रिडा सांस्कृतिक सामाजिक कार्य राजकारण संस्कार नकळतपणे घडले जातात अनंतराव यांनी समाजसेवेचा धनुष्य उचलून बुधवारी बाणा संपूर्ण महाराष्ट्रात दाखवून प्रेरणादायी वातावरणाचा अमरावती पॅटर्न सुरु झाला...💐

    ReplyDelete
  10. खूपच छान मला तूमच्या दोघांचाही खूप अभिमान आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23