थोडा है थोडे की जरुरत है @ 29.06.21

भाजणी

त्या दिवशी रात्री जेवताना तिला सारखे भरून येत होते. नेहेमीसारखी तिची बडबड देखील सुरु नव्हती. रात्रीच्या जेवणाच्या वेळी घरातील सर्वांनी सोबत जेवायला बसायचे आणि दिवसभराच्या आपापल्या गमती जमती सर्वांनी एकमेकांना सांगायच्या असा तिचा दंडकच होता. जेवणाच्या वेळी टीव्ही वगैरे काही नाही. परंतू या तिच्या नियमामुळे घरातील प्रत्येकाचा तो जेवणाचा अर्धा तास मज्जेत आणि धमाल करण्यात जायचा. जेवण तर छान व्हायचेच परंतू सर्वांना सर्वांबद्दल माहिती रहायची. अन्यथा बऱ्याच घरांमधे घरातल्याच लोकांबद्दलची माहिती सोशल मिडीयावरून कळते. घरातल्या घरात एकमेकांच्या उपक्रमांबद्दल एकमेकांशी चर्चा करण्याकरीता देखील वेळ उरत नाही. त्यामुळे सुरुवातीला मुलांनी जरा टीव्ही बघण्याचा हट्ट धरला होता परंतू तिने ठामपणे नकार दिला. परंतू काहीच दिवसात मुलांना देखील असे सोबत जेवायला बसणे आवडू लागले. सर्वात जास्त बडबड मात्र तिचीच असायची. दिवसभर बराच वेळ घरी एकटी असल्याने तिला किती बोलू नि किती नाही असे होऊन जायचे. परंतू त्या दिवशी मात्र ती शांत होती. निमूटपणे तिचे जेवण सुरु होते. त्या दिवशी तिने भाजणीचे थालीपीठ केले होते सर्वांकरीता. त्यासोबत छान चटणी होती. जेवण सुरु असतानाच मुलांचे आणि बाबांचे एकमेकांना खुणा करुन आईला काय झालेय असे विचारून झाले. बाबांनी मुलांना खुणेनेच सांगितले की मी बघतो. जेवण आटोपल्यावर मुले आपल्या अभ्यासाला पळाली आणि ती आणि तो नेहेमीप्रमाणे फेरी मारायला निघाले. तिच्या मनात काहीतरी होते हे त्याला कळले होते. जरा दूर गेल्यावर रस्त्यालगतच्या त्यांच्या आवडत्या बेंचवर दोघेही बसले. तिच्या हातावर हळूवार पणे हात ठेवून त्याने तिला विचारले, काय झाले तुला? आज गप्प गप्प आहेस? स्वयंपाक सुरु केल्यापासून तिला आज एका कारणामुळे सारखे भरून येत होते. आपल्या अश्रुंना तिने कसेबसे आवरले होते. परंतू आता मात्र तिच्या नवऱ्याने आस्थेने चौकशी केल्यावर तिच्या आसवांचा बांध फुटला. त्याच्या खांद्यावर डोके ठेवून तिने आसवांना वाट मोकळी करून दिली. तिच्या अश्या अवस्थेत काय करायचे हे त्याला ठाऊक होते. तो केवळ तिच्या हातावर थोपटत राहीला. एकही शब्द बोलता त्या शांत वातावरणात तिला देखील तेच हवे होते. तिच्या मनातील भावना एकही शब्द बोलता तिला व्यक्त करायच्या होत्या तिच्या नवऱ्याने अगदी तेच केले. तिला शांत होऊ दिले. तिचा हळवा स्वभाव त्याला माहीत होता. आणि आज नेमके काय झाले असेल याचा अंदाजही त्याने केला होता. आपला नवरा आपल्या अस्वस्थतेचे कारण नक्की ओळखेल याची तिला खात्री होती. ती जरा शांत झाल्यावर त्याने तिला हळूच विचारले. भाजणी? होय ना? त्या क्षणी तिला आपल्या नवऱ्याच्या सोबत असण्याबद्दल कमालीचा आनंद झाला. असा सोबती हवा जो काही बोलता आपले मन जाणून घेईल. डोळ्यातली आसवे पुसत मानेनेच तिने होकार दिला आणि परत एकदा त्याच्या खांद्यावर डोके ठेवून आठवणींच्या जगात रमली. जरा वेळाने त्याने एक फोन लावला. फोनवर तिच्या आईचा आवाज ऐकून तो म्हणाला, आई हिला तुमच्याशी बोलायचेय. त्वरीत आई तिकडून म्हणाली, भाजणी का? खळखळून हसून त्याने होकार दिला आणि फोन तिच्याकडे दिला

या प्रसंगाच्या काही दिवस आधीची वेळ. नेहेमीप्रमाणे आई घाईतच होती. पटापट कामे आटोपण्याची तिची सवय. आता एव्हाना तिचे पाय फार दुखत असले तरीही कामे करण्याची गती काही कमी झाली नव्हती. स्वतः तर कामे करायचीच परंतू सर्वांनाच कामाला लावायचे ही तिची पद्धत. बाबा देखील तिच्या या पद्धतीमुळे सकाळी कुठेतरी फिरायला निघून जायचे. आईला ते कळायचे परंतू ती त्याबद्दल फार बोलायची नाही. मुळात बाबांनी स्वयंपाक घरात लुडबुड केलेली तिला आवडायचीच नाही. तिच्या मते ते कामे कमी करतात पसारा जास्त वाढवून ठेवतात त्यामुळे स्वयंपाक घरात बाबांना ती शक्यतोवर जेवणाची वेळ सोडून प्रवेश देत नसे. एरवी फार घाईने सारे काही करणारी आई त्या दिवशी आणखी वेगाने कामे करत होती. तिला आज एक महत्वाचे काम करायचे होते ते देखील केवळ दोन तासात. भराभर तिने स्वयंपाक आटोपला आणि मग ती त्या महत्वाच्या कामाला लागली. सुरुवातीला तिने बेसनाचे लाडू केले. ते डब्यात भरुन डबा पॅक करून ठेवला. त्यानंतर मोठ्या बरणीतून लोणचे काढून एका छोट्या बरणीत भरले. ती बरणी नीट पॅक करून ठेवली. त्यानंतर तिला भाजणी करायची होती. ती करायला घेतली आणि अचानक आईच्या हातात कळ आली. जोराने ओरडून तिने हातातला झारा खाली ठेवला. कसाबसा गॅस बंद केला खुर्चीवर जाऊन बसली. जरावेळाने बाबा आले तर त्यांना झालेला प्रकार कळला. आईला हात दुखण्यापेक्षा दोन तासाच्या आत भाजणी देखील तयार व्हायला हवी अशी इच्छा होती. परंतू आता ते बहुदा शक्य नव्हते. आता तिने तयार केलेल्या दोनच गोष्टी पाठवायच्या ठरविल्या. पण अचानक आईला आश्चर्य वाटावे अशी गोष्ट घडली. कधी नव्हे तो बाबांनी हातात झारा घेतला भाजणी करायला सुरुवात केली. आईला फार आनंद झाला कारण तिची इच्छा पूर्ण होणार होती कारण तिला बेसनाचे लाडू, लोणचे यासोबतच थालीपीठांकरीता ती स्पेशल भाजणी पाठवायची होती तिच्या आवडत्या लेकीला. दोन तासांनी त्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ तिच्या आवडत्या लेकीच्या गावाला जाणार होते लेकी साठी हे सारे पाठविण्याची तिची लगबग सुरु होती. परंतू आता तर तिच्या आनंदाला पार उरला नाही कारण बाबांनी व्यवस्थित भाजणी बनवून डब्यात भरून डबा तयार करून दिला. कधीही प्रेम व्यक्त करण्याची सवय नसणाऱ्या बाबांनी आपल्या लेकीबद्दलचे आत्यंतिक प्रेम अश्या प्रकारे व्यक्त केले होते. अश्या आई बाबांच्या प्रेमाने भारलेल्या भाजणीचे थालीपीठ खाताना लेकीच्या डोळ्यात आनंदाश्रू येऊन तिला तिच्या माहेराची तीव्र आठवण येणारच ना?

गोष्ट खरे तर छोटीशी आहे. काही जणांना अगदी क्षुल्लक वाटावी अशी. परंतू आपल्या लेकीसाठी आवडीने काहीतरी छान बनवून प्रेमाने पाठविणारी आई, तिचा हात दुखावला असताना कधीही जे काम केले नाही ते करून आपले प्रेम व्यक्त करणारे बाबा, आई बाबांचा असा प्रेमाचा स्पर्श असलेल्या भाजणीच्या थालीपीठाचा एक घास घेताच गहीवरून जाणारी संवेदनशील लेक, आणि आई वडीलांच्या आठवणीने मन भरून आलेल्या आपल्या पत्नीला सहानुभूतीने सांभाळणारा तिचा नवरा. ही सारी नाती किती छान वाटतात. एकमेकांना समजून घेणारी, सांभाळणारी, प्रेम करणारी, मने जपणारी. अशी प्रेमाने भारलेली भाजणी प्रत्येकाच्या नशीबात असायला हवी हे साऱ्यांनाच वाटत असते पण बरेचवेळा ती निर्माण करण्यासाठी टिकविण्यासाठी प्रयत्न कदाचित सर्वच बाजूने कमी पडतात. अशी भाजणी टिकायला हवी. शेवटी सुख म्हणजे नक्की काय असतं? फार मोठ्ठ काहीच नसतं, कधी कधी साध्या भाजणीमधूनही भरभरून जाणवतं. होय ना?






Comments

  1. फारच सुंदर... सध्या सध्या शब्दांतून भावनांची एक विशिष्ठ उंची भाजणीतून व्यक्त केली आहे. टेबल वर बसून आपल्या परिवारासोबत जेवण्याची मज्जा काही ओरच असते. एकमेकांचा आनंद दुःख, गप्पा गोष्टी, दिवसभरातील घडामोडी share करण्याची सुरेख जागा आणि वेळ म्हणजे संध्याकाळचे जेवण. आम्ही नशिबाने हे छान अनुभवतो. माझ्या सासूबाई मुलांना छान गोष्टी सांगतात. सासरेबुवा मधूनच आजीला चिडवतात. त्यावर आम्ही सगळे खूप हसतो... निखळ आनंद देणारा वेळ म्हणजे सहभोजन... भाजणीतून तर कोणाकडे आंब्याचे लोणचे नाते टिकवत राहते... सुरेख... आई गेली पण त्याच मायेने वडिल मला माझ्या आवडीचे पदार्थ पाठवत राहतात...

    ReplyDelete
  2. "चला!पुन्हा नाते जपूयात!"

    छानच!
    प्रा. डॉ. संजय पाटील वाशीम

    ReplyDelete
  3. अगदी लहान शा गोष्टी अतिशय सुंदर पध्दतिने मांडण्याची आपली शैली अप्रतीम आहे.

    ReplyDelete
  4. सर छान आपण लिहीलेल्या लेख उत्तम छान

    ReplyDelete
  5. खूप सुंदर बाबा❤️

    ReplyDelete
  6. Vivek B. Joshi29 June 2021 at 23:14

    जिव्हाळा असणारी, आपुलकी असणारी माणसे हिच खरी ठेव आहे

    ReplyDelete
  7. Here in this article you have discussed about strong ties between different people. While reading I asked myself..
    "How they can read the feelings? "
    "Why these people are sharing such a strong and healthy bond?"
    " How they can rely completely on others?"
    And as I read further I captured the soul of article..
    'Emotional availability is an essential part of every relationship!'
    Sometimes just being there is more than enough. Offering a shoulder to cry on is more sensible than giving a blueprint of logical wisdom. People may forget what you said but they will never forget how you made them feel.
    Everyone should create their own core support system in order to survive the emotional waves.

    And along with this I would like to add a quote by Paul F. Davis
    'Go where you are celebrated, not merely tolerated.' Relationships are a two way street. So choose the people who choose you. Find someone who can be trusted completely otherwise there are chances of getting manipulated emotionally.

    ReplyDelete
  8. फार सुंदर लेख सर डोळे भरून आले वाचता वाचता
    Dr.Rohini Deshmukh

    ReplyDelete
  9. सुंदर नातेसंबंध मंडलात . काहीही ना बोलता मनातले समजून घेणारा नवरा, आईचे काहीतरी बिनसले आहे हे अचूक ओळखणारी मुले, पोरीला मायेने खाऊ पाठवणारी आई अन् काहीही ना बोलता आईला त्यासाठी मदत करणारे बाबा. अशी प्रेमाची सरमिसळ असल्यास जीवनाचे चटके खाऊनही सुखाची खमंग भाजणी तयार होते आणि जीवनाची चव वाढवते. खूपच सुंदर लेखन.

    ReplyDelete
  10. अप्रतिम लेख!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23