थोडा है थोडे की जरुरत है

फितरत

फितरत या शब्दाचा अर्थ स्वभाव असा होतो. कधी कधी हा शब्द नकारात्मक स्वभाव दाखविण्या करीता देखील वापरला जातो. परंतू मुळात या शब्दाचा अर्थ स्वभाव असाच आहे. कोणत्याही माणसाच्या जीवनाबद्दल सांगत असताना आपण त्याच्या स्वभावाबद्दल बोलत असतो. तसे जैवशास्त्रीय दृष्टीकोनातून स्वभाव नावाचा अवयव कोणत्याही मानवाच्या शरीरात आढळून येत नाही परंतू माणसाचा एकंदर जीवन प्रवास, त्याच्या जीवनाचा आलेख, त्याचे कर्तृत्व किंवा त्याचे कार्यवर्तुळ या सर्व गोष्टींना त्याचा स्वभाव कारणीभूत असतो. तसे बघितले तर माणसाचे जीवन बदलत राहते, नवनविन स्थित्यंतरे त्यात येत राहतात परंतू माणसाचा स्वभाव मात्र तसाच राहतो कारण स्वभाव ही प्रत्येक व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाची ओळख असते. व्यक्तिमत्व हे स्वभावाशी जोडलेले असेत त्यामुळे ते कधीच बदलत नाही असे सर्वसाधारणपणे सांगितले जाते. या स्वभावामुळेच प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्या मनात काही आडाखे तयार असतात. त्या स्वभावानुरूप आपण त्या व्यक्तीशी कसे वागायचे हे बरेच वेळा ठरवत असतो. एकंदरीत स्वभाव ही व्यक्ती ओळखण्याची सर्वात महत्वाची कसोटी आहे. स्वभाव हा प्रत्येक व्यक्तीच्या लहानपणापासूनच्या जडणघडणीवर देखील काही प्रमाणात अवलंबून असतो. मानसशास्त्र असे सांगते की प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचा नमुना हा काही प्रमाणात त्याच्या शरीरातील जीन्स मुळे तर काही प्रमाणात त्याच्यावर जन्मल्यापासून होत असलेल्या संस्कारांमुळे घडत जातो. आता या दोन्हीही बाबी प्रत्येकाच्या बाबतीत एवढ्या भिन्न असतात की तीच भिन्नता स्वभाच्या वैविध्यांमधे आपल्याला आढळते. त्यासाठीच कदाचित स्वभावाला औषध नाही असेही कधी कधी म्हणले जाते. आधुनिक काळात या स्वभावाला बदलण्याकरीता काही व्यावसायीक प्रयत्न केले जातात. आजकाल काही वेगवेगळे वर्ग देखील आयोजित केले जातात ज्यामधे स्वभाव बदलण्याची गरज समजाविली जाते. अर्थात स्वभावातील ज्या दोषांमुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी निर्माण होतात ते दोष दूर करण्याकरीता हे वर्ग आयोजित केले जातात. यामधे कसा नि किती फायदा होतो याबद्दल निश्चित सांगता येत नाही. परंतू स्वभाव जर चांगला असेल म्हणजे तो इतरांना चांगला वाटत असेल तर तो बदलविण्याची गरज नसते. परंतू आपल्या स्वभावाचा इतरांना त्रास होतोय, किंवा लोक आपल्यापासून दूर जात आहेत, लोकांना आपण नकोसे होऊ लागलोय, लोक आपल्याला टाळू लागलेत असे जाणवल्यावर मात्र स्वभावाबद्दल काहीतरी करायला हवे असा सर्वसाधारण प्रघात आहे. त्यातही असे सारे होत असले तरीही मी बदलणार नाही असे म्हणणारे त्यानुसार वागणारे काही धैर्यवान लोक असतात. त्यांना या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टीचा काहीही फरक पडत नसतो त्यामुळे बदल करायचा असेल तर इतरांनी बदलावे, मी माझी फितरत सोडणार नाही अशी देखील भूमिका काही जण घेतात. परंतू चांगली फितरत ही कायम स्वागतार्ह असते. चांगल्या फितरतीमुळे इतरांना सक्षम आधार देण्याची वृत्ती तयार होते. आपल्या व्यतिरीक्त इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो सर्वात महत्वाचे म्हणजे इतरांची मने त्याच संवेदनशीलतेने सांभाळता देखील येतात. माणसांना तर अशी चांगली फितरत ठेवणे सहज शक्य व्हायला हवे कारण एखाद्या निर्जीव गोष्टीमधे देखील सांभाळ करण्याची किंवा आधार देण्याची फितरत असते. होय अगदी एखाद्या निर्जीव वस्तू मधे देखील. हे सिद्ध केले एका छोट्याश्या प्रयोगातून ज्येष्ठ फोटोग्राफर अशोक सेलीयन यांनी आणि हा प्रसंग मला सांगितला नागपूरचे माझे ज्येष्ठ कलावंत मित्र विवेक रानडे यांनी.

विवेक रानडे यांनी खूप वर्षांआधी मुंबईला जेव्हा फोटोग्राफीच्या एका वर्कशॉपमधे भाग घेतला त्यावेळची ही गोष्ट. फोटोग्राफी शिकवत असताना त्यामगील संकल्पना समजून घेणे गरजेचे असते. फोटोग्राफर जेव्हा एखादी फ्रेम निवडतो तेव्हा त्यामागे त्याचा स्वतःचा एक छान विचार असतो. असाच विचार समजावून सांगताना अशोकजी म्हणाले होते, फितरत कभी बदलती नही. किसी एक चिज को आप अलग हालातोमें भी डाल दो फिर भी उसकी फितरत नही बदलती. उसे हरदम जहाँ रखा जाता है वहाँ रखो या कही और बस फेंक दो, फितरत नही बदलती. आपले बोलणे सिद्ध करण्यासाठी अशोकजींनी विवेक रानडेंना आणि इतर सर्वांना एकाच ऑब्जेक्टचे रोज फोटो काढण्यास सांगितले. तो ऑब्जेक्ट म्हणजे एक विट. एक विट बगिच्यामधे ठेवून दिली होती. काही दिवसांनी त्याचा फोटो काढायचा होता. अशोकजींनी सांगितल्या प्रमाणे विवेकजींनी त्या विटेवर कॅमेरा फोकस केला. त्यानंतर अशोकजी म्हणाले की आता ते ती विट जराशी बाजूला करणार आहेत. त्वरीत त्याचा फोटो काढायचा. सूचनेप्रमाणे विवेकजींनी कॅमेरा सेट केला अशोकजींनी विट बाजूला केली. लगेच विवेकजींच्या कॅमेरातून फोटो क्लिक झाला. जेव्हा फोटो बारकाईने बघितला तेव्हा लक्षात आले की त्या विटेच्या खाली काही किड्यांनी आपला निवारा बनविलेला आहे. त्यानंतर अशोकजी जे बोलले ते विवेक रानडे यांनी मला सांगितले ते म्हणाले, प्रतिभावंत कुणाला म्हणायचे या प्रश्नाचे उत्तर अश्या श्रेष्ठ कलाकारांसोबत राहून मिळते. त्या विटेच्या खालच्या किड्यांचा निवारा विवेकजींना दाखवून अशोकजी म्हणाले, इट को या तो किसी घर की दिवार मे लगा दो या यूँही कहीं फेंक दो, उसकी तो फितरत ही है सहारा देनेकी, वो सहारा देकर ही रहेगी, कभी इन्सान को तो कभी इन छोटे छोटे किडों को

अशोक सेलीयन यांनी समजावून सांगितल्याप्रमाणे अगदी निर्जिव असलेली विट देखील आपली चांगली फितरत परिस्थिती कितीही टोकाची बदलली तरी सोडत नाही. माणसांच्या जगात असे का होत असावे की बरेच वेळा चांगुलपणा सोडून दिला जातो. चांगली फितरत ठेवणे हे मुळात प्रत्येक माणसाच्या माणुसपणाचे लक्षण आहे. कारण फितरत चांगली कशी ठेवावी याबद्दल विचार करण्याची क्षमताच मुळी फक्त माणसाकडे आहे. परंतू तीच गोष्ट बरेच वेळा जमत नाही. टोकाचे इगो, टोकाचा द्वेष, किंवा फक्त स्वतःच्याच मताचा विचार करत असताना समोरच्या व्यक्तीलाही मन आहे, बुद्धी आहे, विचार करण्याची क्षमता आहे हे मान्य करणे देखील अनेक वेळा काही मंडळींना शक्य होत नाही. त्यामुळे फक्त स्वतःच्याच दृष्टीने विचार करून करून एवढा जास्त आत्मकेंद्रीपणा निर्माण होतो की मग तिच फितरत बनते ती बदलत नाहीच कारण वर सांगितलेल्या उदाहरणाचा देखील सोयीचा अर्थ काढला जातो. अशोक सेलीयन यांनी विवेक रानडेंसमोर ठेवलेल्या उदाहरणावरून एखादी निर्जिव वीट देखील आपली चांगली फितरत सोडत नाही तर मग माणसांनी तर ती सोडूच नये. होय ना?




Comments

  1. फितरत या एका शब्दाला केंद्रस्थानी ठेवून आपण माणसाच्या फितरतीचे महत्त्व खूप छान प्रकारे अधोरेखित केले.माझा एक मित्र आहे तो कधीच त्याची फितरत बदलायला तयार नसतो.आजवर त्याच्या संपर्कात आलेल्या जवळजवळ सर्वांनाच त्याने बोलण्याने घायाळ अगदी रक्तबंबाळ सुद्धा केलेले आहे. परंतू तो त्याची फितरत बदलायला तयार नाही. खूप छान.👍👍

    ReplyDelete
  2. कोणत्याही बाबतीत सूक्ष्म विचार केल्यानंतर त्यामधून खूप काही सकारात्मक आणि विधायक गोष्टी निघू शकतात हे आपल्या प्रस्तुत लेखावरून स्पष्ट होते.

    प्रा. संजय पाटील वाशीम

    ReplyDelete
  3. 'फितरत '.. लेखकाने चोहोबाजूंनी विचार करून लिहिला आहे.
    वाचतांना साॅक्रेटिस, तुकाराम, गांधी यांनी उदात्त हेतूने केलेल्या चांगुलपणाच्या उदाहरणांची यादीच डोळ्यांसमोरून तरळून गेली. त्यांच्या दिशादर्शक आणि
    वागणुकीतून आदर्श निर्माण मानसिकतेला मनापासुन नमस्कार.

    पण कधी कधी अश्या प्रवृत्तीशी गाठ पडते.. ज्यांना चांगुलपणाचा ' च ' देखील ठाऊक नसतो. तेव्हा मात्र आपला patience.. class 12 th चा Physics किंवा maths चा पेपर लिहायला बसला आहे की काय असे वाटायला लागते . (डोक सुन्न होत).

    पालथ्या घड्यावर पाणी
    किंवा माझ एक fav character आहे
    House.. तो नेहमी अस म्हणतो "people don't change!"
    किंवा एक वाक्य आहे Suits ह्या serial मधे
    ".. They think you care, they will walk all over you."
    कारण काही लोकांना समोरच्या व्यक्तीने दाखवलेला चांगुलपणा म्हणजे weakness वाटतो.
    असा अनुभव आला की मात्र(त्या व्यक्तीपुरती) चांगुलपणाची वळकटी बांधुन ठेऊन देणे हाच मार्ग उरतो.

    चांगुलपणाची भेट झाली तर जपून ठेवावी, दुसर्‍या मनामधे चांगुलपणाची फितरत रुजविण्यासाठी प्रयत्न करावा आणि चांगुलपणावरचा आपला विश्वास कुणीही उध्वस्त करणार नाही ह्यासाठी सजग राहावे.
    रुका करता हू
    हर एक चौराहेपे
    खुदसे.. गुफ्तगू कर लेता हू

    खुशबू फूलोंकी भर लेता हू सासोंमें में
    और पत्थर वही छोड देता मैं |

    ReplyDelete
    Replies
    1. "...दुसर्या मनामधे चांगुलपणाची फितरत रुजविण्यासाठी प्रयत्न करावा आणि चांगुलपणावरचा आपला विश्वास कुणीही उध्वस्त करणार नाही ह्यासाठी सजग राहावे." ... अगदी बरोबर !





      Delete
    2. ��...����

      Delete
    3. Yessssss!

      Delete
  4. नेहमी प्रमाणे उत्तम लेख. ओघवती भाषा शैली आणि चपखल दाखले यामुळे विषय मनाला आनंद देतो.

    ReplyDelete

  5. Superb Sir ! Very well expressed.

    Yes... heredity and environment do determine a person's "fitrat", yet there's hope of change through positive experiences.
    .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23