थोडा है थोडे की जरुरत है @02.01.24

अकाऊंट बंद करुयात

नवे वर्ष आले. नव्या वर्षासोबत अनेक नवे रीझोल्युशन्स ठरले. काहींनी ते मनात ठेवले, काहींनी ते सोशल मिडीयावर सर्वांना सांगितले. प्रकार कोणताही असो, नव्या वर्षापासून आता काहीतरी करायचे असे प्रत्येकानेच ठरविलेले असते. म्हणूनच नवे वर्ष म्हणजे केवळ एक तारीख बदलून दुसरी तारीख येणे एवढाच भाग नाही तर मानसिकदृष्ट्या तो एक चार्जींग पॉईंट असतो. वर वर बघता अनेक मंडळी या नव्या वर्षात काहीना काही नवे सुरु करून त्याचे स्वागत करतात. परंतू अनेक अश्या गोष्टी असतात ज्या मात्र वर्षानूवर्षे सांभाळल्या जातात. मनाच्या खास अकाऊंटमधे त्या ठेवल्या जातात. त्यांच्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून त्यावर व्याज देखील वाढविले जाते. हे व्याज म्हणजे वेगवेगळ्या लोकांप्रती आपल्या मनात जमा होत असलेला ग्रह असतो जो चक्रव्याढ व्याजाने वाढत जातो. मनात साठविलेल्या या अकाऊंट सोबत आणखी काही अकाऊंट लिंक केलेले असतात. त्यांचाही सांभाळ काही मंडळी मनापासून करतात. या लिंक अकाऊंटचे उदाहरण द्यायचे झाल्यास, जसे मागल्या वर्षी एका प्रसंगात माझ्या एका मित्राने मला असे म्हणले होते. त्याच्या त्या वाक्याचा अर्थ असा होता. त्या अर्थामुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांसमोर मला अपमानित झाल्यासारखे वाटले होते. तो अपमान माझ्या मनात अजूनही आहे. तो मित्र माझ्या सोबतच असतो. त्यामुळे तो जेव्हा जेव्हा माझ्यासमोर येतो तेव्हा त्याने माझ्या संबंधात वापरलेले ते वाक्य माझ्या मनात उमटते त्याच्या बद्दलचा राग मनात उफाळून येतो. हा झाला मी सांभाळलेला एक अकाऊंट. याचा लिंक अकाऊंट म्हणजे, माझ्या मित्राने मला एक वाक्य उच्चारून अपमानित केले होते तो अपमान मी अजूनही विसरु शकलो नाही. आता यावर उपाय म्हणजे मी कायम एक संधी शोधतो आहे ज्यावेळी तश्याच पद्धतीचे वाक्य उच्चारून माझ्या मित्राने केलेल्या अपमानाची मी परतफेड करीन. जेव्हा जेव्हा आम्ही सोबत असतो विशेषतः लोकांमधे असतो तेव्हा मी ती संधी शोधत असतो. या वर्षात तशी संधी मिळाली तर मी ती परतफेड करणारच आहे. म्हणजे मूळ वेदनेचा अकाऊंट वेगळा आणि ती वेदना देणाऱ्याला तशीच वेदना देऊन परतफेड करण्याचा अकाऊंट वेगळा. अश्या पद्धतीचे कितीतरी अकाऊंट्स मनामधे काही मंडळी जतन करतात त्यांचे व्याज चक्रव्याढ दराने वाढत राहते. या अकाऊंट्सचे वैशिष्ट्य असे असते की त्यांची मर्यादा कितीही मोठी राहू शकतो तेवढे दिवस ते व्याज ही मंडळी जमा करत राहतात. या व्याजाचे खरे नाव आहेताण

भूतकाळात काय झाले याचे जमाखर्च मांडत बसणे त्याचा ताण आपल्या मनावर साचवत राहणे हा काही लोकांसाठी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. वर्षे बदलत जातात, नवनवीन वर्षे येतात पण यांचे असे अकाऊंट्स वाढत असतात. अश्या मंडळींना याबद्दल सांगितल्यास, या सर्व प्रकाराचा दोष आपल्या स्वभावाला देऊन स्वभावाला औषध नाही असे वाक्य ते आपल्याला ऐकवून जातात. परंतू अश्या मंडळींच्या आयुष्यात समाधान त्यांना कायम हुलकावणी देत राहते कारण अश्या व्यक्तींच्या मनातील त्या अकाऊंटमधे केवळ नकारात्मक विचार गोळा केलेले असतात. कोणत्याही व्यक्तीबद्दलचे सकारात्मक चांगले विचार ते गोळा करत नसल्याने त्यांचे अकाऊंट ताणालाच जतन करतात. असली मंडळी आयुष्यातील जुने वर्ष मागे सारून नव्या वर्षात प्रवेश तर करतात आणि आयुष्याचेही एक वर्ष पुढे नेतात पण समाधानी आयुष्य जगण्याचे सूत्र त्यांना गवसतच नाही. अश्या सर्व मंडळींकरीता इतरही सर्वांकरीता एक मुक्तक

अकाऊंट बंद करुयात..

मानापमानाचे, हेव्यादाव्यांचे, रुसव्याफुगव्यांचेअन् परतफेडीचेही..

काही दिल्याचे, काही घेतल्याचे, काही नाकारल्याचेअन् काही ओरखड्यांचेही.. 

पुढे ढकलल्याचे, मागे खेचल्याचे, जागीच रोखल्याचेअन् पूर्णपणे नाकारल्याचेही..

अकांऊट बंद करुयात..

आणि कोणतीही कॅश इन हॅन्ड ठेवता

बॅलन्स शीट कोरी करुन, अकाऊंट बंद करुयात..

थोडा हैच्या वाचकांना नववर्षाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!!






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18