थोडा है थोडे की जरुरत है @ 01.08.23

तुम इतना जो… 

कवी मंडळींचे मला नेहेमीच कौतुक वाटते. सुदैवाने साहित्याचा अभ्यासक बनून राहण्याची संधी परमेश्वराने दिली असल्याने अनेक कवींच्या वेगवेगळ्या कविता वाचण्याची संधी मिळते. माणसाच्या मनाचे किती यथार्थ वर्णन कवी करतात. परवा रेडीओवर अनेक वेळा ऐकलेले एक सुंदर गाणे पुन्हा ऐकण्यात आले. कैफी आझमी यांनी लिहीलेल्या त्या गाण्याच्या ओळी सारख्या मनात रुंजू घालत आहेत.

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो।

क्या ग़म है जिसको छुपा रहे हो॥

किती सुरेख वर्णन आहे. एखाद्या हसऱ्या चेहेऱ्यामागचे दुःख समजून घेणे ही किती मोठी पात्रता आहे एखाद्या सुरेख नात्याची. कधी कधी आयुष्यभर सोबत राहुनही नात्यांमधे नेमके काय अपेक्षित आहे हे कळल्यामुळे नाते दुरावलेली अनेक उदाहरणे आपण बघतो. परंतू या ओळींमधे केलेले वर्णन हे एका अत्यंत संवेदनशील मनाचे चित्रण आहे. एखाद्याला समजून घ्यायचे तर ते या पातळीपर्यंत की ती व्यक्ती जगाच्या दृष्टीने हसत असेल तरी ते हसणे म्हणजे कोणती तरी वेदना लपविण्याचा केलेला प्रयास आहे हे समजणे. याचाच अर्थ नात्यांमधे केवळ सहवास उपयोगाचा नाही तर सह-संवेदना देखील तेव्हढीच महत्वाची आहे. अन्यथा केवळ सोबत राहणे आहे परंतू नात्यांमधे संवेदना नसून व्यवहार उरला असेल तर त्याला अर्थ उरत नाही

कधी कधी दूर राहूनही मने समजणारी नाती असतात. समजून घेणारी नाती असतात. अश्याच नात्याला या दोन ओळी ठळकपणे दाखवतात. मनातल्या वेदना, दुःख हे बरेचवेळा अनेकांना व्यक्त करता येत नाही. आपले मन मोकळे करण्याचा स्वभाव नसतो. शेवटी तो स्वभावच. बदलत नाही. परंतू मग अश्या व्यक्तींच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येते जी काहीही सांगता देखील भावना ओळखू शकते. माझ्या मते हेच एखाद्या खऱ्या नात्याचे सर्वात महत्वाचे लक्षण आहे. शेवटी आपण नाती निर्माण करतो किंवा जपतो म्हणजे एकमेकांना जाणून घेत असतो. एकमेकांना काहीही सांगता समजून घेणे हे सुदृढ नात्याचे लक्षण आहे. सुरुवातीला नाते स्थापित होईस्तोवर भावना व्यक्त केल्या जाणे स्वाभाविक आहे. परंतू काही काळानंतर मात्र या दोन ओळींमधे व्यक्त केलेल्या संवेदना जर निर्माण झाल्या तर ते नाते किती सुंदर निर्माण होईल.

असे आरश्यासारखे नाते ज्या व्यक्तीच्या डोळ्यात आपल्याला आपले मन दिसेल. आपल्या मनात चाललेल्या वेदना त्याच्या ह्रदयात जाणवतील त्यावेळी जे आवश्यक आहे तेच तो करेल. ते म्हणजे आपल्या हातावर हात ठेऊन आश्वासक स्पर्शातून जो सांगेल, काळजी करु नको, मी आहे. तूझे हसणे हे जगासाठी आहे. तुझ्या मनातल्या वेदना या कुणालाही दिसू नये म्हणून तुझा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे. त्यासाठी हे हसण्याचे खोटे अवसान आणले आहेस चेहेऱ्यावर. पण मला कळलंय. या हे तुझे नेहेमीसारखे निखळ हसणे नाही. या हसण्यामागे वेदना आहे. हसण्याचा हा प्रयास कदाचित ती वेदना कुणालाही, अगदी मलाही कळू नये हा तुझा प्रयास आहे. पण मी मात्र तुला जाणून आहे. म्हणूनच या हसण्यामागे कोणती तरी वेदना दडवली आहेस हे कळतंय. सांगणे गरजेचे नाही. परंतू एवढेच स्मरणात ठेव, जशी मी तुझ्या हसण्यामागे लपविलेली वेदना ओळखली तसेच या प्रसंगात मी तुझ्या सोबत आहे हे विसरू नको. हातावर प्रेमाने ठेवलेल्या हाताचा तो आश्वासक स्पर्श हे सारे शब्दाविना सारे सांगतो. असे नाते त्या नात्यामधला दोघांनाही जाणविणारा आधार त्या दोन ओळींमधे कैफी आझमी किती प्रभावीपणे मांडतात

असा आश्वासक आधार देणार नाते जर आयुष्यात असेल तर ते नाते घट्ट टिकवून ठेवावे कारण ते नाते कोणत्याही व्यवहाराच्या पलीकडचे असते. देण्याघेण्याच्या हिशोबाच्या पलीकडचे असते. अश्या नात्याचा आधार सह्रदयतेने जपलेली सहसंवेदना असते. त्यामुळे असे नशीबाने मिळणारे एखादेच  असलेले नाते कायम जपावे. कृत्रीमतेने जगणाऱ्या जगायला लावणाऱ्या व्यवहारी जगात तोच आयुष्याचा सर्वात मोठा आधार दिलासा राहू शकतो. होय ना?






Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23