थोडा है थोडे की जरुरत है @ 11.07.23

उर्मट नकार

रविवारी नेहेमीप्रमाणे फळे घेण्याकरीता मी माझ्या नेहेमीच्या दुकानामधे गेलो. एक फारच वेगळा अनुभव मला यावेळी तेथे आला. खरे सांगायचे तर अश्या प्रकारचा अनुभव मला पहिल्यांदाच आला. व्यवसायामधे येणारी नवी पिढी कश्या प्रकारे पुढे येते आहे याचे ते उदाहरण होते. अर्थात या अनुभवामुळे हे सार्वत्रिक आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही परंतू असे जर नव्या पिढीचे होत असेल तर ही गोष्ट त्यांच्याच भविष्याकरीता फार घातक ठरणारी आहे. कारण मी जो प्रकार अनुभवला तो नोकरीमधे काही प्रमाणात सहन केल्या जाऊ शकतो तो देखील सरकारी नोकऱ्यांमधे. परंतू खाजगी नोकऱ्या किंवा व्यवसायांमधे जर असा प्रकार होत असेल तर मात्र काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आता नव्या पिढीच्या मुला मुलींना स्वयंरोदजगाराशिवाय पर्याय नाही किंना नवे शैक्षणिक धोरण देखील स्वयंरोजगाराकरीता तरुणांना प्रशिक्षण देण्यावर भर देणारे आहे. अश्यावेळी व्यवसायामधल्या इतर सर्व गोष्टी शिकल्या तरी मला आला तसा अनुभव देणारा ॲटीट्यूड मात्र घातकच ठरणार आहे. मुळात सध्या नव्या पिढीला जश्या संधी उपलब्ध आहेत तसेच प्रत्येक क्षेत्रात स्पर्धेचे आव्हान आहे. त्या आव्हानाचा सामना करताना ॲटीट्यूडला फार जास्त महत्व आहे. कारण जशी स्पर्धा वाढते तसे व्यवसायाचे स्वरुप ग्राहक केंद्रीत व्हायला लागते, त्यामुळे वस्तूं सोबतच सेवेला देखील महत्व आले आहे. वस्तू चांगल्या देऊन ॲटीट्यूड जर चांगला नसेल तर मात्र अडचणी निर्माण होऊ शकतात.

घटना अशी घडली की मी त्या दिवशी फळे आणायला ठरवून निघालो नाही. मित्राकडे गेलो मग रस्त्यात ते दुकान दिसले म्हणून थांबलो. त्यामुळे माझ्याजवळ पिशवी नव्हती. माझ्याकडे नेहेमीप्रमाणे पिशवी नसल्याने त्याने जाड प्लॅस्टीकच्या पिशवीमधे फळे पॅक केली. मी टुव्हीलर नेली असल्याने त्याला मी म्हणालो की मी ही फळे डिक्कीमधे ठेवतो तुला ही प्लॅस्टीकची पिशवी परत करतो. परंतू माझ्याजवळ दोन तिन पॅकेट्स असल्यामुळे मला ते ठेवणे जमत नव्हते. कारण एका हाताने डिक्की उघडणे फळे ठेवणे शक्य नव्हते. म्हणून त्याने त्याच्या मुलीला फळांची उर्वरीत पाकिटे माझ्या गाडीजवळ न्यायला सांगितली. मला आणि कदाचित त्यालाही आश्चर्य वाटावे अशी प्रतिक्रीया त्या मुलीने दिली. ती पाकीटे माझ्या गाडीपर्यंत आणून द्यायला तिने स्पष्ट अत्यंत उर्मटपणे नकार दिला. मी आता माझे काम करते आहे. मला तुम्ही जास्तीची कामे सांगू नका. तो दुकानदार तिचा बाप तिला समजावू लागला, बेटा, असे करु नये, ग्राहकाला मदत केली पाहीजे. या ग्राहकांमुळेच आपले दुकान चालते. ग्राहक आपल्यासाठी देवासारखा असतो. मी एवढी वर्षे हे दुकान चालवतो कारण मी ग्राहक जोडून ठेवले आहेत. हे ऐकल्यावरही तिचा उर्मटपणा कमी झाला नव्हता. ती त्याच तोऱ्यात म्हणाली, बाबा, झाले तुमचे भाषण सुरु. तुम्ही आता जुने झाले. उद्या तुम्ही ग्राहकाच्या घरी फळे नेऊन द्यायला सांगाल तर मी ते पण करायचे का? हे सारे काही ती अत्यंत उर्मटपणे आपल्या वडीलांशी माझ्या समोर बोलत होती. तिचे ते बोलणे माझ्यासमोर होत असल्याने तो दुकानदारच ओशाळला तोच आपल्या जागेवरून उठला त्याने त्या फळांच्या पिशव्या माझ्या गाडीपर्यंत आणल्या. त्यासाठी त्याला जास्तीत जास्त एक मिनीट लागला परंतू ते काम त्याच्या मुलीने केले नाही. उलट ग्राहकाला अश्याप्रकारे मदत करणे म्हणजे जास्तीचे काम आहे असा तिचा समज होता. पैसे घेताना तो फळेवाला मला म्हणाला, पहा सर, नव्या पिढीची मुले अजिबात ऐकत नाही. स्वतःच्या मर्जीनेच वागतात आणि वाईट म्हणजे यांना जास्त बोलता येत नाही. या पोरीच्या हवालेच मला सगळे करायचे आहे. कसे व्हावे हे कळत नाही. कठीण काळ आलाय. मी त्याला हसून प्रतिसाद दिला तेथून निघालो. पण राहून राहून त्या मुलीचा विचार मनातून जात नव्हता.

ज्या सचोटीने तिच्या वडीलांनी गोड बोलून ग्राहक जोडून ठेवले होते त्यांच्या बद्दल तिचा ॲटीट्यूड कसा विचित्र होता तो तसा राहिला तर त्या वय्वसायाचे कसे होईल असे मला वाटू लागले. सारे काही तिच्या वडीलांनी तिच्यासाठी तयार करुन ठेवलेय परंतू तो ग्राहकांना बांधून ठेवणारा ॲटीट्यूड जर तिने सांभाळला नाही तर कसे होईल? अशी बरीच उदाहरणे आजकाल बघायला मिळत आहेत. काही यापेक्षा निराळी देखील आहेत. एकंदरीत ॲटीट्यूड चांगला ठेवणे ही नव्या पिढीकरीता अत्यावश्यक बाब आहे हे मात्र निश्चित!!





  

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23