थोडा है थोडे की जरुरत है @ 25.07.23

मुव्ह ऑन

तू मुव्ह ऑन करायला हवे. तो एकमेव पर्याय आहे या सर्व गोष्टींवर. हे बघ, मला मान्य आहे की त्या व्यक्तीचे तुझ्या आयुष्यात फारच महत्वाचे स्थान आहे. त्याच्या सहवासामधे घालविलेले सारे क्षण हे तुझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामधील सर्वोत्तम क्षण होते. ज्या पद्धतीचे नाते तुम्ही दोघांनीही अनुभवले ते खरोखरीच छान होते. परंतू काही कारणांमुळे आता त्या नात्यामधे तुला अपेक्षित असे प्रेम उरलेले नाही. तुला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. याची तुला जी कारणे वाटतात ती तू मला सांगितलीस ती सारी मला पटलेली आहेत. अर्थात या नात्याची दुसरी बाजू त्या दुसऱ्या व्यक्तीकडून मी अद्याप ऐकलेली नाही. परंतू तू माझा पेशंट असल्याने मी तुझीच बाजू समजून तुला काही गोष्टी सांगतोय ज्या तू ऐक त्यानंतर निर्णय घे. मी फक्त मार्ग दाखविणार. निर्णय तुलाच करायचा आहे. नाते विस्कळित झाल्याने मनाने कोलमडून गेलेला एक तरुण माझ्यासमोर बसला होता. मनापासून त्याने ते नाते जपण्याचा प्रयत्न केला होता परंतू तरीही नाते टिकू शकले नाही त्याच्या म्हणण्यानुसार दुरावा निर्माण झाल्यासारखा त्याला वाटत होता. मी काही पर्याय त्याला सुचविले

सुरुवातीला मी त्याला काही प्रश्न विचारले ज्यामुळे ते नाते पुन्हा याला वाटते तश्या मूळ पदावर येऊ शकेल का याची शक्यता मी पडताळून बघितली. परंतू नाते पूर्वीसारखे व्हावे यासाठी त्याने सारे प्रयत्न करून बघितले होते त्यामधे त्याला यश आले नाही. त्यानंतरचा पर्याय होता की नाती ही सारख्याच पातळीवर कधीच रहात नाही. कालानुरुप प्रत्येकच नात्याचे स्वरुप बदलत असते. त्यामुळे त्या व्यक्तिसोबतच्या नात्यामधे त्याला जे बदल जाणवितात ते स्वाभाविक असेच होते त्या बदलांसह नाते पुढे नेणे हा देखील चांगला पर्याय त्याच्यासाठी होता. परंतू त्याची समस्या ही होती की त्याला पूर्वीसारखेच नाते हवे होते आणि त्यामधे झालेले बदल तर त्याला सहनच होत नव्हते. अंतिमतः मी त्याला सांगितले, तू मूव्ह ऑन करायला हवे

बदल हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे ते एक वरदान देखील आहे. याचे कारण माणसाच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक अश्या गोष्टी असतात की ज्यांवर त्याचा कसलाही ताबा नसतो. रेल्वेच्या रुळाप्रमाणे एक टर्न आला की माणसाचे आयुष्य अतिशय वेगळ्या दिशेने जायला लागते. मग या बदललेल्या स्थितीमधे सारेच बदलावे लागते. सोबतच्या व्यक्ती बदलतात. संपर्क बदलतात. प्राथमिकताही बदलतात. अर्थात यामुळे जिवनाशी जोडल्या गेलेली नातीही बदलतात असे मला म्हणायचे नाही. परंतू त्याचे स्वरुप बदलू शकते. नात्यातील संपर्क कमी होऊ शकतो परंतू ओढ तशीच टिकवता येऊ शकते. परंतू ते जर नात्यातल्या कुणा एकालाही पटत नसेल तर मग वाद निर्माण होतात. तणातणी वाढते पर्यायाने ताण निर्माण होतो. मग दोघेही आपली बाजूच खरी आहे हे सिद्ध करण्याची चढाओढ सुरु करतात. त्यानंतर मात्र नात्याची सर्वात वाईट स्थिती सुरु होते ती म्हणजे जाणिवपूर्वक केली जाणारी टाळाटाळ. ही स्थिती आली की मग नाते संपू लागते. एखाद्या नात्यात जर असे काही होत असेल तर मग मी सांगतो तो तिसरा सर्वोत्तम पर्याय उरतो. मुव्ह ऑन करणे

या जगात प्रत्यक्ष आयुष्यभर सोबत राहणारी नाती फार कमी असतात. किंबहुना नसतातच. कधी ना कधी दूर जावे लागते. वेगळे अस्तित्व निर्माण होते किंवा करावे लागते. म्हणूनच दूर राहूनही जर नाते टिकवता आले तर त्यासारखी छान गोष्ट नाही. परंतू तसे जर होत नसेल तर मुव्ह ऑन करणे हाच चांगला मार्ग आहे

वर मी विषद केलेल्या विस्कळित नात्याबद्दल सर्वांना कल्पना आली असेलच. याचे कारण आपण साधारणपणे त्याच चष्म्यातून अश्या नात्याचा विचार करतो. पण एकदा मी सांगितलेल्या गोष्टींवर बारकाईने विचार केल्यास आपल्याला जाणवेल की हे नियम जगातल्या सर्वच नात्यांना लागू पडतात. कोणतेही नाते सुंदर राहू शकते तेच नाते काही कारणांनी टोकाचे बिघडू देखील शकते. अश्यावेळी सर्वच नात्यांच्या बाबतीत सावरण्याचे सारे प्रयत्न संपल्यावर एकच शेवटचा पर्याय असतो. मुव्ह ऑन. बघा पटतंय का ते?




Comments

  1. खर आहे. एका गाण्याची ओळ कितपत जुळते हे मला निश्चित सांगता नाही येणार पण...
    "मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया."

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23