थोडा है थोडे की जरुरत है @ 04.07.23

साधे..सोप्पे..नि सहज!!

काल डायनींग टेबलवर ब्रेकफास्ट करताना दोन गोष्टी सोबत दिसल्या. त्या अगदी सहजच तेथे ठेवलेल्या होत्या. त्या दोन्हीही गोष्टी एकत्र बघितल्यावर मन अचानक भूतकाळात रेंगाळू लागले. अचानक मी चाळीस वर्षे मनाने मागे गेलो. या दोन गोष्टी ज्या मला डायनींग टेबलवर दिसत होत्या त्यांचा त्या काळात केलेला वापर त्यामधून मिळणारा तो आनंद किती अफाट होता हे मी मनाने अनुभवायला लागलो. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व प्रक्रियेमधे किती सहजता होती. हे सारे मनात असतानाच अगदी योगायोगाने माझ्या एका मित्राचा फोन आला. माझ्या मनातल्या त्या विचाराच्या अगदी विरोधातील एका गोष्टीने त्रस्त होऊन त्याने फोन केला होता. तो मला म्हणाला, किती किचकट बनवलंय यार हे नवं शिक्षण तुम्ही लोकांनी? त्याच्या मुलांच्या शाळेत काहीतरी झालेय हे माझ्या लक्षात आले. नेमके काय झाले हे मला कळल्यावर मात्र माझ्या समोर डायनींग टेबलवरच्या त्या दोन गोष्टींनी किती सहजतेने माझ्या विद्यार्थी दशेत आनंद निर्माण केला याची तीव्रतेने जाणीव झाली.

मित्राने सांगितलेली त्रायदायक बाब अशी की त्याला मुलाच्या शाळेतून एक नोटीस प्राप्त झाली की शाळेमधे स्पोर्ट्स वीक साजरा केला जाणार आहे. त्याकरीताची तयारी वाचून त्याचे डोके चक्रावून गेले. प्रत्येक मुलाने तीन प्रकारच्या खेळांमधे भाग घेणे अनिवार्य करण्यात आले होते. त्या तीन प्रकारच्या खेळांकरीता तीन वेगवेगळे युनीफॉर्म घेणे बंधनकारक होते. सदर युनीफॉर्म एका विशिष्ट दुकानातूनच घ्यायचे होते कारण त्या टी शर्ट्स वर आय पी एल प्रमाणे नावे टाकलेली होती. ब्रेव्ह टायगर्स, जंपींग कांगारु, रोअरींग लॉयन्स वगैरे. टी शर्ट्स वर मागच्या बाजूने ते लिहीलेले असल्याने त्यांचे रंग देखील वेगवेगळे असल्याने एकून तीन टी शर्ट्स तीन गेम पॅन्ट्स याचा खर्च ३००० लागणार होता. या सोबत त्याच्या मुलाने फुटबॉल, खोखो बॅटमिंटन तीन खेळात नावे दिली असल्याने खेळानुसार त्याच्याकरीता तीन वेगवेगळे शुज घ्यावे लागणार होते. त्याची किंमत जवळपास ४००० रुपये होती. यासोबतच मनगटावर बांधायचे बॅन्ड, डोक्याला बांधायची पट्टी, एक स्पेशल ट्रेंडी वॉटर बॉटल, हे सारे ठेवायला स्पेशल बॅग अशी सारी किट घेऊन तो दुकानातून बाहेर पडला तेव्हा एकूण ८७०० रुपयांचे पेमेंट त्याने केले होते. ती सारी खरेदी केल्यानंतर आता आपले काम संपले असे त्याला वाटले परंतू तसे ते नव्हते. शाळेचा स्पोर्टस विक शाळेच्या मैदानावर नसून वेगळ्या कुठल्यातरी स्टेडीयमवर होता. तेथे मुलाला ने-आण करायला नेहेमीचा गाडीवाला तयार नव्हता त्यामुळे एक तर तेथे सोडणे किंवा घ्यायला जाणे याची आठवडाभराची वेगळी जबाबदारी मित्रावर आली होती. त्यात मुलाचा टी शर्ट दुकानात घालून बघण्याची जागाच नव्हती त्यामुळे तो घरी आणल्यावर नेमका लहान झाला. तुम्ही कामे नीट करत नाही या बायकोच्या विशेष टिप्पणीसह त्याला तो टी शर्ट बदलवून आणावा लागला होता. आधल्या दिवशी संपुर्ण बॅग लावून तयार झाल्यावर पुन्हा रात्री काही चॉकलेट्स, ग्लुकोज पावडर, छोटेसे हॅन्ड सॅनीटायझर या साऱ्या गोष्टी आणण्याकरीता परत त्याला एकदा बाहेर जावेच लागले. ही सारी तयारी झाल्यावर पोरगा म्हणाला की तो फक्त एकाच खेळात भाग घेणार, इतर दोन खेळांमधे त्याला खेळायचे नाही. त्यामुळे या संदर्भात त्याच्या क्लास टीचरकडे विनंती करण्याची जबाबदारी देखील, बाबा बोलले की ते ऐकतात, या सदराखाली त्याच्याकडे आली. म्हणूनच या साऱ्या गोष्टींनी कंटाळून जाऊन त्याने मला फोन केला. मी त्याचे सारे ऐकून घेतले. त्याच्या मतांशी मी सहमत होतोच. परंतू शाळांनाही स्पर्धेत टिकायचे आहे आणि अनेक पालकांना याच गोष्टी आवडतात त्यामुळे हे करावे लागते असा त्यांचा स्टॅन्ड देखील योग्यच असतो. परंतू या सर्व गोष्टींमधे ती निर्मळ सहजता संपते हे मात्र खरेच आहे. ती सहजता कशी होती हे मला माझ्या समोरच्या त्या दोन गोष्टींमधे दिसत होती. त्या दोन गोष्टी म्हणजे, एक लिंबू एक चमचा

आम्ही शाळेत असताना या दोनच गोष्टी दफ्तरात घेऊन जायचो. मधल्या सुटीनंतर आम्ही रांगेत उभे असायचो. चमचा तोंडात धरला असायचा, त्यात लिंबू ठेवलेले असायचे. शिट्टी वाजली की पुढच्या रेषेपर्यंत पळत सुटायचे. लिंबू चमच्यातून पडायला नको. अख्खी शाळा आजूबाजूला उभी असायची. कल्ला-हल्ला नि धमाल चालायची. धावताना कधी लिंबू पडायचे, तर कधी धावणारे पडायचे पुन्हा उठायचे, पुन्हा पळायचेनुसती धमालअगदी साधा, सोप्पा नि सहज आनंद!! आताही आनंद घेतला जातोय. परंतू तो घेण्याच्या क्लिष्ट दिखाऊ प्रक्रीयेमुळे त्यातील सहजता कमी होतेय. ती टिकवायला हवीयहोय ना?   




Comments

  1. प्रमोद मुळे4 July 2023 at 08:45

    आपल्या सगळ्या आयुष्यावर 'मार्केट' ने कब्जा केलाय सर! यातून आपल्याला बाहेर पडणे अवघड आहे. कोल्हापूरची सृजन आनंद शाळा, नाशिकची आनंद निकेतन शाळा, आणखीही काही असतील, जे एकांड्या शिलेदारा प्रमाणे लढताहेत. पण त्याचे महत्व समजून घेणारेही विरळचं.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23