थोडा है थोडे की जरुरत है @ 17.07.18

दीप से दीप

सध्याच्या व्यावसायीक शैक्षणिक वातावरणात मी जे आज सांगणार आहे त्यावर सहज विश्वास ठेवणे कठीण आहे. परंतू एका महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी हा अनुभव वारंवार घेत असतो. परंतू आपल्या आजूबाजूचे व्यावसायीक शैक्षणिक वातावरण आपल्याला या असल्या बाबींवर विश्वास ठेवू देत नाही जे अत्यंत स्वाभाविक आहे. आजकाल या नव्या युगात मुलांचे शिक्षण हा एक मोठ्या खर्चाचा स्वतंत्र भाग झाला आहे. मुलगा किंवा मुली होण्याची चाहूल लागल्यापासूनच पालक त्याच्या किंवा तिच्या शिक्षणाच्या दृष्टीने सजग होतात. जन्माला येण्याआधी कोणत्यातरी चकाकणाऱ्या शाळेत प्रवेशाची नोंद केली जाते. ही सजगता प्रवेशापुरती मर्यादित रहात नाही तर त्या प्रवेशासोबत भरावे लागणारे शुल्क हा देखील एक महत्वाचा भाग असतो. प्ले स्कुल मधील प्रवेशासाठीही काही शाळांमधे काही हजार रुपये भरावे लागतात. सोबत शाळा नामांकित असेल तर मग विकास निधी द्यावा लागतो. परंतू चांगली शाळा असेल तर तशी तयारी करावीच लागते. या शुल्कासोबत वेगवेगळे गणवेष, पुस्तके यासाठी देखील बराच खर्च करावा लागतो. एकंदरीत सध्याचा अंदाज घेतल्यास प्ले स्कुल पासून ते दहावी पर्यंत वर्षाकाठी पन्नास ते साठ हजार रुपयांची तरतूद पालकांना करुन ठेवावी लागते. शहरांचा आकार वाढला की ही तरतूद त्यानुसार वाढत जाऊन कधी कधी लाखाच्या घरात देखील जाते. मुलांची इतकी फी भरुन चांगला शास्त्रोक्त पद्धतीने विकास होत असावा, मुलांना चांगल्या प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेले प्रशिक्षण मिळत असावे तसेच चांगल्या प्रकारच्या भौतिक सुविधा देखील पुरविल्या जात असाव्या त्यामुळेच पालक मंडळी एवढी रक्कम शुल्क म्हणून देण्यास तयार असतात. जशी मागणी तसा पुरवठा त्याच योग्यतेचे शुल्क हा व्यवसायाचा नियमच आहे त्यात वावगे काहीच नाही. मुद्दा असा आहे की अश्या शाळांमधे सामान्य आर्थिक स्थिती असलेले पालक देखील आपल्या मुलांना प्रवेश देतात. कसेही करुन त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याची त्यांची धडपड असते. परंतू या पालकांपैकी काही पालकांचा मात्र त्यांचे पाल्य उच्च शिक्षणात प्रवेशित झाल्यावर दृष्टीकोन बदलतो. उच्च शिक्षण ही अजूनही काही पालकांसाठी त्यांच्या पाल्यांकरीता प्राथमिकता नाही. किंबहुना बारावी पर्यंत शिक्षण झाल्यावर विशेषतः मुलींच्या शिक्षणाला त्याकरीता लागणाऱ्या शुल्काला प्राथमिकता दिली जात नाही. काही प्रसंगी तर ती देताही येत नाही. विशिष्ट वर्गवारीमधे असल्यानंतर शासनाकडून शिष्यवृत्ती मिळत असताना देखील उर्वरीत नगण्य रक्कम देखील भरु शकणारे पालक मला जेव्हा भेटतात तेव्हा प्ले स्कुलमधे लाख रुपये प्रवेश शुल्क भरणाऱ्या पालकांच्या पार्श्वभूमीवर मला हा अनुभव फारच ठसठशीत वाटायला लागतो. म्हणूनच त्यावर विश्वास बसणे जरा कठीण आहे

एका छोट्या शहरामधे देखील काही हजार रुपये चिमुकल्यांच्या प्रवेशाकरीता भरले जातात परंतू त्याच शहरात स्नातक वर्गात प्रवेश घेताना एखाद्या विद्यार्थिनीचा शुल्का मधे हफ्ते करुन देण्याचा अर्ज येतो. एकूण भरावयाची फी असते अंदाजे पाचशे रुपये. सबंध वर्षाची शिष्यवृत्ती वगळता भरावी लागणारी फी केवळ पाचशे रुपये. या पाचशे रुपयाचे देखील दोन हफ्ते करण्यासाठी अर्ज येतो. प्रथमतः त्या अर्जाबाबत शंका निर्माण होते. परंतू जेव्हा माझ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची चमू या अश्या विद्यार्थिनीच्या पालकांना प्रत्यक्ष भेटते तेव्हा मात्र साऱ्या गोष्टीचा उलगडा होतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना मदत करण्यासाठी आमच्या महाविद्यालयात असलेल्या मदत निधीतून अश्या विद्यार्थीनींना मदत करण्याकरीता पालकांशी प्रत्यक्ष बोलल्यावर विश्वास बसणार नाही अशी विद्यार्थिनींची आर्थिक परिस्थीती समोर येते. आई वडील दोघेही मजुरीवर जात असतात अमरावतीपासून १५ किमी अंतरावरील छोट्याश्या गावातून ही मुलगी शहरातील महाविद्यालयात शिकायला येण्याचे स्वप्न बघते. चांगले शिक्षण घेण्याची तिची इच्छा असते परंतू शहरात येण्याजाण्याचा खर्च, शिवाय काही प्रमाणात तिला भरावे लागणारे शुल्क, गणवेष या सर्व बाबींकरीता खर्च लागतो जो करणे तिच्या आर्थिक स्थितीमधे शक्य नसते. महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या निधीमधून मदत केलीच जाते परंतू या संदर्भात एक अतिशय वेगळा अनुभव मला माझ्या सहकारी प्राध्यापकांना आला ज्यामुळे चांगले कार्य मनापासून केल्यासच चांगले जग निर्माण होऊ शकते या गोष्टीवर विश्वास दृढ झाला. सामान्यतः जग अतिशय वाईट आहे अश्या चर्चा आपण ऐकत असतो. काही वेळी मनाला उद्विग्न करणारे अनुभव वारंवार येत असल्याने देखील असे बोलले जाते त्यात वावगे काही नाही. परंतू या जगातून माणूसकी संपली आहे असे मानण्याचे काही कारण नाही. काही छोटे छोटे प्रसंग देखील आपल्याला जगण्याचे बळ देतात त्याहून महत्वाचे म्हणजे सारे वाईट नाही तर खूप काही चांगले आहे असा सकारात्मक आशावाद आपल्या मनात निर्माण करतात असा अनुभव आम्हा काही मंडळींना आला. या अनुभवामधून आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे या जगातील चांगुलपणा जपण्याकरीता फार मोठे व्यक्तीत्वच असायला हवे असे नाही. ते तसे असल्यास चांगलेच असते कारण त्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावामुळे अनेकांना प्रेरणा मिळू शकतात. परंतू सकारात्मकतेने जगण्याकरीता तसे असायलाच हवे याची गरज नाही. दुसऱ्यांच्या संवेदना समजून घेणारे सहानुभूती दाखविणारे एक मन असले की सारे काही छान होते. असेच संवेदनशील मन असलेल्या एका कला शाखेच्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या माझ्या एका विद्यार्थी मैत्रीणीने जगातील सकारात्मक विचारांवरचा माणुसकी जिवंत असल्याचा माझा विश्वास चांगलाच दृढ केला

तो प्रसंग असा होता. एका गरीब विद्यार्थिनीला शुल्काची मदत करायची होती. कोणत्याच प्रकारे ती केली जाऊ शकत नव्हती. म्हणून मी स्वतः तीन हजार रुपयाची मदत तिला करुन टाकली. ही फार मोठी गोष्ट नव्हतीच मी तसे करणे क्रमप्राप्तच होते. खरे तर ही गोष्ट मला कुणालाही सांगायची नव्हती परंतू माझ्या एका सहकारी प्रध्यापकाला समितीत असल्याने ती बाब कळली. आज येथेही त्या गोष्टीचा उल्लेख मी एका वेगळ्या कारणाकरीता करतोय. मी काय केले त्यापेक्षा त्याचा परीणाम काय झाला हा भाग फार महत्वाचा ठरला. मी अश्या प्रकारे एका प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीला मदत केली हे माझ्या त्या सहकारी प्राध्यापकाने कला शाखेच्या अंत्य वर्षाच्या वर्गात सांगितली. मला ती गोष्ट अजिबात आवडली नाही. परंतू त्या सांगण्याचा जो परीणाम झाला तो मात्र मला थक्क करुन गेला. एखाद्या विद्यार्थिनीला अश्या प्रकारे शिक्षणासाठी शुल्कासाठी मदतीची गरज पडू शकते ही बाबच मुळात काही मुलींना चकित करुन गेली. आई वडील आर्थिक सुस्थितीत असल्याने त्यांना हे माहितच नव्हते. शिवाय माझ्या त्या प्राध्यापक सहकाऱ्याने ती गोष्ट इतकी प्रभावीपणे सांगितली की ते ऐकून काही विद्यार्थीनी रडू लागल्या. परंतू त्या पैकी एकीने मात्र कमाल केली. ती उभी राहीली म्हणाली, सर आपण ज्या मुलीबद्दल बोलताय तिची परीस्थिती फार कठीण आहे. ती बदलविणे मला शक्य नाही पण, मी आपणाला शब्द देते की पुढील सर्व वर्षांमधे  माझ्या फी सोबत तिची पण फी भरुन तिला मी शिक्षणासाठी मदत करीन. माझ्या त्या छोट्या परंतू अतिशय मोठ्या मनाच्या मैत्रीणीने मनापासून बोललेले हे वाक्य मला जेव्हा कळले तेव्हा नकळत आनंदाश्रू ओघळले. मनात एकच विचार आला, मनापासून साकारत्मकतेचा दिवा आपल्या अंतरी लावल्यास त्याच्या ज्योतीने किमान एक दिवा तर निश्चित लागू शकतो. अश्या प्रकारे दिवेलागण झाल्यास सारेच कसे उजळून निघेल. होय ना!!



Comments

  1. वस्तुस्थीती आहे

    ReplyDelete
  2. Khup Sunder articles sir. Arthik sahhay samiticha ullekh Ani gaurao aaplya lekhat kelyabaddal thanks!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18