थोडा है थोडे की जरुरत है @ 19.06.18
प्रेमाच्या लावालाव्या!!
दुपारी कार्यालयात असताना वसुधा मॅडमचा अचानक लंडनहून फोन आला. मी कार्यालयात असेन याची त्यांना अचानक जाणीव झाली व वेळ असल्यासच बोलते असे त्यांनी अत्यंत विनयाने विचारले. खरे तर त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीचा फोन म्हणजे माझ्यासाठी आनंद पर्वणीच असते. मी देखील टी.सी. वर सह्या करुन जरा थकलो होतो. त्यामुळे वसुधा मॅडमशी जरा गप्पा माराव्या असे वाटले. सहजच विषय निघाले आणि मी त्यांच्या व माझ्या समान परीचयाच्या एका मॅडमबद्दल त्यांना खूप छान गोष्टी सांगितल्या. त्यांनी त्या साऱ्या ऐकून घेतल्या व फार कौतुक केले त्या मॅडमचे व माझे देखील. खरे तर यात माझ्या कौतुकाचा प्रश्न नव्हता परंतू चांगले म्हणायचे, कौतुक करायचे, आनंदपावत्या द्यायच्या हे व्रतच वसुधा मॅडमचे आहे. त्यामुळे मला माझे कौतुक ऐकूनच घ्यावे लागले. पण आमचे त्या मॅडमबद्दलचे संभाषण संपताना वसुधा मॅडम जे बोलल्या ते मात्र माझ्या मनात राहून गेले. किती छान होता तो शब्द. प्रेमाच्या लावालाव्या.
खरे तर आपल्या मराठीत लावालाव्या करणे हा शब्द तसा काही फार चांगल्या अर्थाने वापरत नाहीत. परंतू प्रेमाच्या लावालाव्या मात्र काही निराळ्याच असतात. या शब्दासोबत प्रेम जोडले की त्या मोहक होतात आणि सर्वांनीच अश्या लावालाव्या कराव्या अश्या त्या होऊन जातात. वसुधा मॅडमनी मला त्याचा अर्थ सांगितला. मला तो फारच भावला. अश्या लावालाव्या जर आपण सर्वांनी केल्या तर खरोखरीच मानवी नातेसंबंधांमधील खूपसा दुरावा कमी होईल. अकारण कधी कधी छोट्या छोट्या समज गैरसमजांवरुन नात्यांमधे तणाव निर्माण होतो. त्या तणावाच्या स्थिती फार जास्त राहील्या तर मग नात्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो. आपल्या आजुबाजूला बघताना अनेक अश्या प्रकारे दुरावलेली नाती आपल्याला आढळतात. ज्यांची नाती दुरावतात त्या दोन व्यक्तींसोबत काही आणखी मंडळी हा दुरावा निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतात. कारण ही मंडळी खऱ्या लावालाव्या करतात. या शब्दाच्या खऱ्या अर्थानुसार ज्या दोन व्यक्तींमधे दुरावा निर्माण झालाय त्यांच्या एकमेकांबद्दलच्या वक्तव्यांना बरोबर हव्या तश्या पद्धतीने त्या दोघांपर्यंत पोहोचवून त्यांच्यातील दुराव्याची धग कायम चेतवत ठेवण्याचे काम करणारी काही मंडळी असतात. त्यांचे जे हे इकडचे तिकडे सुरु असते यालाच लावालाव्या असे आपण म्हणतो. या लावालाव्यामुळे दुखावलेली मने आणखी दुरावतात व नाती संपून जातात. एका छोट्याश्या उण्या पुऱ्या अदमासे ऐंशी वर्षांच्या आयुष्यातही अनेक नाती दुरावून, एकमेकांना दुखावून, वाईट व अपशब्द बोलून लोक तोडून टाकण्याचे काम करताना अनेक मंडळी आपल्याला दिसतात. परंतू काही मात्र या दुरावलेल्या किंवा एकमेकांबद्दल वाईट ग्रह केलेल्या लोकांची नाती जुळविण्यासाठी किंवा जुळलेली नाती दृढ करण्यासाठी काम करीत असतात. या कामांनाच वसुधा मॅडमनी शब्द दिला होता प्रेमाच्या लावालाव्या.
आमचा संवाद सुरु असताना मी ज्या मॅडमचे भरभरुन कौतुक करीत होतो, त्या विषयावरच आमचा संवाद संपला. बोलणे संपविण्याआधी वसुधा मॅडम मला म्हणाल्या, अविनाश किती छान बोललात तुम्ही तिच्याबद्दल. ती माझी मैत्रीण आहे. आता तुमचा फोन संपता क्षणी तिला फोन लावते व तुम्ही तिच्या बद्दल जे सारे चांगले बोललात ते तिच्या कानावर टाकते. मला मिळणारा बराचसा वेळ मी अश्या प्रकारच्या प्रेमाच्या लावलाव्या करण्यात घालवित असते. मला माझ्या वडीलांनी हे शिकविले आहे. कुणी कुणाबद्दल वाईट बोलले तर ते वाईट त्या संबंधित व्यक्तीला त्वरीत जाऊन सांगणे ही तर मानवी प्रकृती आहे ज्यामधून अनेक जण एक प्रकारचा विचित्र आनंद मिळवितात. परंतू आपण मात्र अगदी याच्या उलट करायचे. आपण कुणी कुणाबद्दल वाईट बोलले असल्यास ते विसरुन जायचे परंतू चांगले बोलले असल्यास ते त्वरीत संबंधित व्यक्तीला आवर्जून सांगायचे. अश्या सुंदर सवयी मुळे आपण फार छान गोष्टी साधू शकतो.
आपल्या भारतीय संस्कृतीमधे आपण सहसा स्पष्टपणे व्यक्त होण्याचे टाळत असतो. या आपल्या परंपरागत सवयीमुळे बरेच वेळा कुणाबद्दल चांगले वाटत असूनही हे काय बोलायचे असते का? असे म्हणून आपण व्यक्त होणे टाळतो. त्यात काय सांगायचे, हे तर समजून घेण्याचे आहे असे म्हणून आपण अनेक वेळा बोलतच नाही व मग आपल्या मनातल्या भावना तश्याच राहतात. त्यातही जर व्यक्त झालो तर ज्या व्यक्तीबाबत बोलायचे आहे त्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगण्यापेक्षा इतर कुणाजवळ तरी ते बोलले जाते. अश्या हे एकमेकांबद्दलचे चांगले विचार, चांगल्या भावना प्रेमाच्या लावावाव्या करुन संबंधितापर्यंत पोहोचविण्याचे गोड काम ज्याला जमेल तो खऱ्या अर्थाने चांगले काम करु शकतो. या असल्या प्रकारांमुळे आपल्याबद्दल अमूक एखादी व्यक्ती आपल्या पाठीमागेही चांगलीच बोलते याचा आनंद त्या व्यक्तीला कमालीचा सुखावून जात असतो आणि सोबतच एकमेकांबद्दलचे छान छान विचार प्रसरीत होत राहतात ज्यामुळे नकळत गैरसमज दूर होऊन छान नाती तयार होतात व ती छान नाती पुढे जाऊन दृढ होतात. माणसे एकमेकांशी मनाने घट्ट जोडण्याचा यापेक्षा उत्तम मार्ग नाही.
या नव्या व वेगवान काळात तसे बघितल्यास आपल्याकडे वेळ सोडून बाकी सारे आहे. त्यामुळे एकंदरीतच नाती निर्माण होण्याच्या प्रक्रीया हळू हळू लुप्त होत आहेत. लोकांना एकमेकांसाठी वेळ नाही. त्यात आता तंत्रज्ञानाच्या आधारे सोशल मिडीयावर भावना देखील रेडीमेड सजवून मिळतात. त्या केवळ पुढे पाठवायच्या. ज्याला त्या मिळतात तो देखील तितक्याच यांत्रिकपणे एक अंगठा दाखवतो व त्याला हव्या असलेल्या समुहाला त्या भावना पाठवून देतो. पहिला पाऊस आल्यानंतर त्या पावसात चिंब भिजल्यावर कसे वाटले याबद्दल चार ओळी स्वतःच लिहून आपल्या जिवलग व्यक्तीला प्रत्यक्ष सांगणे कुठे आणि पावसात न भिजता, दारे खिडक्या बंद करुन पावसात भिजल्यामुळे रोमांच उभे राहीले या अर्थाच्या कुणाच्यातरी चार ओळी जिवलग व्यक्तीला पाठवून देणे कुठे? एखादा लेख मित्राला पाठविल्यावर दुसऱ्याच क्षणी अंगठा येतो. मला कधी कधी आश्चर्य वाटते की केवळ अर्धा मिनीटात या माझ्या जिवलगाने माझा लेख वाचला देखील! तो त्याने वाचावा हा माझा आग्रह अजिबात नाही. ती आपली स्वतंत्र आवड असू शकते. प्रत्येक वेळी प्रतिसादही दिलाच पाहीजे असा देखील आग्रह नाही कारण लिखीत प्रतिसाद हा लेखन मनाला भिडण्यावर अवलंबून असते व ही बाब व्यक्तीपरत्वे बदलत जाते. परंतू लेखनाचा एकही शब्द न वाचता अंगठे पाठविणाऱ्यांना काय म्हणावे? केवळ नोंद घेतली हे मला कळावे म्हणून पाठविलेले यांत्रिक अंगठे मनाला दिलासा देत नाहीत. त्यामुळे भावना देखील यंत्रवत व्यक्त होतात. अश्या प्रकारे भावनांच्याही यांत्रीकीकरणाच्या स्वरुपात लोक एकमेकांशी मनाने जोडले जाण्याच्या शक्यता मावळत असताना, हा मला कळलेला प्रेमाच्या लावालाव्यांचा प्रकार फारच सुरेख आहे.
त्यामुळे या प्रेमाच्या लावलाव्या मोठ्या प्रमाणात करुया. कुणाबद्दलही वाईट सांगितलेले शांतपणे ऐकून बोलणे संपता क्षणी मनातून विसर्जित केले पाहीजे. परंतू चांगले सांगितलेले मात्र मनात नोंदवून, अगदी ठरवून व जाणिवपूर्वक त्या संबंधित व्यक्तीपर्यंत पोहचवायलाच हवे जेणे करुन दोन व्यक्तींना मनाने जोडण्याचा दुवा आपण बनुया. कारण लोकांना मनाने जोडणे हे सध्याचे सर्वात महत्वाचे कार्य आहे व त्या करीता कुणी काहीही म्हणले तरी त्याची तमा न बाळगता अश्या प्रेमाच्या लावालाव्या जरुर करुया!! बघा, या लावालाव्यांचे फलीत किती सुंदर असते ते!!
Comments
Post a Comment