थोडा है थोडे की जरुरत है @ 26.06.18

काय काय शिकवाल?

हा लेख वाचू शकणाऱ्या प्रत्येकाला मी आज एक छोटीशी गंमत करायला लावणार आहे. प्रत्येकाने काही क्षणापुरते आपले आयुष्य टाईम मशीन मधे टाकल्यागत मागे न्यायचे आणि मनाने थेट बालपणात पोहोचायचे. पोहोचलात? अरेरे.. लगेच स्वप्नाळू होऊ नका. लगेच बालपण देगा देवा वगैरे तुर्तास नको. कारण मला एका महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचे आहे. चला तर मग! झालात मनाने लहानगे? ठिक! आता आठवा पाहू आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या आई वडीलांनी किंवा गुरुजींनी किंवा स्पेशल ट्रेनरने शिकविल्या? आणि आपणच आपल्या किती गोष्टी शिकलो? जसे, आपल्याला पाढे आणि इंग्रजी ग्रामरचे नियम गुरुजींनी शिकविले, सायंकाळी देवाजवळ शुभं करोति म्हणायला आजीने शिकविले, आकडेमोड करायला आजोबांनी शिकविली, नीट वागणे बोलणे आई बाबांनी शिकविले. साधारणपणे आपल्या प्रत्येकाच्याच बाबतीत जीवनाचे हे सारे प्राथमिक धडे याच मंडळींकडून आपण शिकलो. परंतू आता मी आपल्या बालपणीच्या काही गोष्टी सांगणार आहे ज्याचे ट्रेनर आपल्याला सापडत नाहीत. या सगळ्या गोष्टींचे आपण शिक्षण घेतले नाही परंतू तरी देखील आपण सारे या सर्व बाबींमधे तरबेज होतो. किंबहुना आपल्यापैकी काही जण तर या सर्व गोष्टींचे माहीर होते. मुद्दाम त्याच काळातला शब्द वापरला. कोणत्या गोष्टी होत्या त्या? लोकांच्या बागेतून पेरु किंवा चिंचा गुपचूप तोडून आणणे आणि त्या फस्त करणे, कंचे खेळणे, गारा खेळून ढोपर फुटणे, लपाछपी, एकमेकांच्या खोड्या काढणे, मित्रांच्या नकला करणे, भांडणे करणे त्यात सपाटून शिव्या देणे, आपल्या गुरुजींच्या नकला करणे, त्यापायी त्यांच्या हातचा मार खाणे, मातीत खेळणे, एकमेकांचे शर्ट ओढणे, अंगावर शाई उडविणे, होळीच्या दिवशी इतके रंगणे की आईलाही ओळखायला येणे, सर्वात महत्वाचे म्हणजे धुमाकुळ करणे. ज्या घरांमधे पोरे आहेत त्या घरात केवळ हैदोस चालायचा, ते घर नीट नेटके राहण्याचा प्रश्नच नव्हता. त्या गोंधळापायी पोट्टे मारही खायचे, आया ओरडायच्या, पुन्हा आवरायच्या परंतू परत आमची पोरे किती मस्ती करतात म्हणून कौतुकही असायचे. परंतू या साऱ्या गोंधळ गडबड करण्याच्या गोष्टी आपल्याला कुणी शिकविल्या का? या गोष्टी काय शिकवायच्या असतात का? या सर्व मुलांच्या अंगभुत बाबी आहेत किंबहुना मुलांचे धमाल बालपण याच बाबींनी सिद्ध होते. परंतू या सर्व गोष्टी मुलांनी कराव्या म्हणून आजकाल मुलांना या सर्व गोष्टींचे ट्रेनींग दिले जाते ते देखील पालंकांकडून फी घेऊन, या गोष्टीवर विश्वास बसेल का? माझाही विश्वास नव्हता. खरे तर असे काही होऊ शकते ही गोष्ट मी मानायलाच तयार नव्हतो. परंतू अश्या पद्धतीचे ट्रेनींग प्रत्यक्ष बघितल्यानंतर मात्र मी चक्रावून गेलो. आधुनिक काळात आपण प्रोफेशनॅलीझम स्विकारायला हवा त्या करीता लहानपणापासूनच मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनींग द्यायला हवे हे मी काही प्रमाणात समजू शकतो. पण मी बघितला तो प्रकार मात्र वेगळा धक्कादायक होता. प्रोफेशनॅलीझम या थराला पोहोचावा की लहान लहान पोरांना केवळ मशीन समजून त्यांच्याशी वागावे?

आधुनिक काळात बरेच पालक आपल्या मुलांच्या विकासाबद्दल जागरुक राहतात. स्पर्धेच्या युगामधे ते योग्यच आहे. म्हणूनच बऱ्याच लहान वयापासून मुलांना निटनेटके राहणे, चांगले कपडे नीट परीधान करणे, जेवण नीट करणे वगैरे शिकविले जाते. या गोष्टींमुळे खरे तर मुले अकारणच बालपण हरवून बसतात. मुंबईच्या त्या चमकदार शाळेमधे जवळपास मशीन झालेली साधारण शंभर पिटुकली मुले मला मैदानावर उभी दिसली. एका शिबिरांतर्गत ही मुले तेथे होती. माझ्या बहिणीने मला त्या प्रकाराबद्दल कल्पना दिली होती परंतू प्रत्यक्षात असे काही घडू शकते हे बघून मात्र मला काही सुचेना. या साऱ्या मुलांचे मायबाप देखील त्या दिवशी हजर होते. त्या शिबीराचा तो शेवटचा दिवस होता. त्या दिवशी जे काही दहा दिवसांमधे त्या मुलांना शिकविण्यात आले त्या सर्व गोष्टींचे सादरीकरण केले जाणार होते. प्रत्येकच पालक मोठमोठ्या चमकदार गाड्यांमधून आलेले होते. गाड्यांची मोठी रांग शाळे समोर होती. कारण ज्या पोरांचे सादरीकरण होते ती पोरे नर्सरीतील होती नर्सरीची त्या शाळेची फी पावणे दोन लाख रुपये आहे. ज्या शिबीराचा समारोप होता त्या शिबीराची दहा दिवसांची फी तीस हजार रुपये होती. इतकी फी घेऊन त्या छोट्या छोट्या पोरांना काय शिकवितात हे बघण्याची उस्तुकता मला लागलेली होती. सादरीकरण सुरु झाले मी जे काही बघितले त्यावर माझा अजूनही विश्वास बसलेला नाही. पालक आपल्या मुलांसोबत असे काही करु शकतात हे कल्पनेच्या पलीकडे आहे. त्या शिबीराचे नाव होते बी ऑड. नावावरुन काही लक्षात येत नव्हते. परंतू प्रत्यक्षात तो सारा प्रकार बघून मीच स्वतः त्या परीसरात ऑड व्यक्ती भासू लागलो.

त्या साऱ्या पोरांनी अतिशय गोड नेटका पांढरा शुभ्र गणवेष परीधान केला होता. अगदी नीट ॲन्ड क्लीन. त्यांच्या ट्रेनर ने सादरीकरण सुरु केले. सुचनांनुसार त्या मुलांनी एक एक गोष्टी करुन दाखविल्या. त्या बघत असताना त्यांचे पालक त्यांचे फोटो काढीत होते, हसत होते, टाळ्या वाजवत होते त्यांच्यात ऑड ठरलेला मी डोक्यावर हात मारुन त्यांची किव करीत बसलो होतो. सुचना देण्यात येत होती. सूचना : एकमेकांच्या डोक्यावर हात फिरवून भांग मोडा. पोरे दोनच्या जोडीमधे एकमेकांच्या केसांवरुन हात फिरवत होती. सूचना : एकमेकांचे इन केलेले शर्ट खेचून बाहेर काढा. मुलांनी ते देखील केले. सूचना : बाजूच्या टेबलवर ठेवलेला शाईचा पेन उचलून एकमेकांच्या शर्टवर उडवा. मुलांनी असे केल्यावर अंगावर पाल पडल्यागत तोंडे त्यांच्या आयांनी केली. सूचना : एकमेकांना वाकुल्या दाखवा. मुलांनी तसे पण केले. आपणा सर्वांच्या लक्षात आलेच असेल, तो वर्ग मुलांना खोड्या शिकविण्याचा वर्ग होता!! खोड्या शिकवण्याचा वर्ग? होय. साधारण दहा प्रकारच्या खोड्या या वर्गामधे शिकविल्या गेल्या त्याचे सादरीकरण करण्यात आले. सारे काही संपल्यावर ट्रेनरने मुलांना सूचना दिली की आता हे सारे विसरुन जायचे पुन्हा गुड बॉय आणि गुड गर्ल बनायचे. साऱ्यांना परत नीट ड्रेस अप करण्यासाठी आत नेण्यात आले माती शाई इत्यादींनी खराब झालेले कपडे बदलून ही पोरे पुन्हा नवा नीट आणि क्लीन ड्रेस घालून आलीत. मग बक्षिस समारंभ झाला सर्वात चांगले खोड्यांचे सादरीकरण करणाऱ्या मुलांना बक्षिसे देण्यात आली. आपल्या चिमुरड्यांना बक्षिसे स्विकारताना बघून काही पालकांना भरुन वगैरे आले. खोड्यांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम आटोपल्यावर जवळपास पालकांच्या वेडाचाराचे बळी ठरलेली, प्रोफेशनॅलीझमच्या नावाखाली सुरु असलेल्या विकृत प्रकारामधे भरडून निघालेली यांत्रीकतेच्या जगामधे जवळपास यंत्रांमधे परावर्तीत झालेली ती शंभर कोवळी मुले शिस्तीत परत गेली. सारेच जवळपास गेले होते. मी एकटा सुन्न होऊन त्या मैदानाच्या एका टोकावर उभा होतो. कोणते भविष्य बघितले मी? कोण आहेत हे लोक जे लहान कोवळ्या मुलांना देखील व्यापारी दृष्टीकोनातून वापरतात, त्यांच्यातले बालपण करपून टाकून त्यांना खोड्या करायला शिकविण्यासाठी वर्ग चालवितात आणि या वर्गांमधे आपल्या मुलांना पाठवून त्याचा आनंद घेणारे हे पालक कोण आहेत? काय हक्क आहे त्यांना या कोवळ्या मुलांना लहानपणीच प्रोफेशनल बनविण्याचा? केवळ जन्म दिला म्हणून!! त्यांना मुले म्हणून जगण्याचा अधिकार या सर्व पालकांच्याही परमपित्याने दिलाय. तो अधिकार हरवून घेण्याचा हा प्रकार म्हणजे अमानवीय कृत्य आहे. परंतू हे सारे होत आहे. हे थांबवायला हवे. प्रोफेशनॅलीझमचा खरा अर्थ शिक्षितांनाच कळत नसेल तर त्यांना सुशिक्षित तरी कसे म्हणायचे? यासंबंधी काय म्हणावे काय बोलावे हे सुचतच नाहीये! वाचकांना सुचत असल्यास सांगावे!! एकच म्हणावे वाटते, अभी तो बहोत समझ की जरुरत है!!




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18