थोडा है थोडे की जरुरत है @ 23.10.18
आय सी यु च्या बाहेरचा बेंच
मोठाच अपघात होता तो. नकळत घडलेला परंतू तिचे सारे जीवन ढवळून काढणारा. सायंकाळी नवरा घरी आल्यावर त्याला सांगायची कामे तिने कागदावर लिहून ठेवली होती. सारी कामे कागदावर लिहून ठेवायची तिच्या बाबांनी लावलेली सवय कधी कधी हास्याचा व टिंगलीचा विषय ठरायची. परंतू गोष्टी विसरायला नको म्हणून ती देखील कुणाचीही तमा न बाळगता कामे लिहीलेल्या चिठ्ठ्या सोबत बाळगायची. त्या दिवशी नवऱ्याला जरा जास्तच उशीर झाला म्हणून मनातली शंका खरी ठरली. बाजुचे काका सांगत आले की, हरीशला कार्यालयातून येताना मोठा अपघात झाला, त्याच्या गाडीला एका भरधाव वाहनाने धडक दिली व त्याला जखमी अवस्थेत एका मोठ्या रुग्णालयाच्या आय सी यु मधे भरती केलेय व तिला ताबडतोब तिकडे जायला हवे. आता जरावेळाने आपल्या पतीसोबत बाहेर जायच्या तयारीत असलेल्या तिला होती त्या स्थितीमधे धावत निघावे लागले. मनात नाही नाही त्या शंका येत होत्या, प्रत्यक्ष त्याला बघत नाही तोपर्यंत जीव थाऱ्यावर नव्हता, डोळ्यातून अश्रु वाहत होते पण सारे लक्ष मात्र दवाखान्याकडे. त्या दिवशी तो रस्ताही जरा लांबच वाटत होता. धावतच ती वरच्या मजल्यावर पोहोचली. तेथे त्याचे काही मित्र होते ज्यांनी तिला सांगितले की ऑपरेशन करीत आहेत. नंतर काही दिवस आयसीयु मधे ठेवावे लागेल. आतापर्यंत धावधाव करणारी ती त्या आयसीयुच्या समोरच्या बाकावर बसली. पायातले त्राणच निघून गेले होते तिच्या. कुणीतरी पाणी दिले प्यायला म्हणून अधाशासारखी पाणी प्यायली व स्तब्ध बसून राहीली. काही वेळाने डॉक्टर आले व त्यांनी ऑपरेशन नीट झाल्याचे सांगितले परंतू काही दिवस बेशुद्धावस्था राहील व त्यानंतरही काळजी खूप जास्त घ्यावी लागेल अशी सूचना त्यांनी केली. सुरवातीचा तो धावपळीचा प्रहर आटोपला. पतीला वेगवेगळ्या नळ्या लावलेल्या स्थितीत ती बघून आली. परमेश्वराचे आभार मानले तिने मनोमन की त्याचे प्राण वाचविले. धावपळ करणारी मंडळी हळूहळू पांगायला लागली. स्वाभाविकच होते. त्यांच्या एकंदर बोलण्यावरुनच तिला जाणवू लागले होते की त्या सर्वांना आता जायचे आहे. सर्वांनी वेळेवर खूप धावपळ केली होती व त्यामुळे सर्वांचे तिने आभार मानले. सासुबाई देखील म्हणाल्या की आम्ही घरचे सगळे सांभाळून घेऊ, पोरीची काळजी करु नको, तिची शाळा वगैरे सारे आम्ही बघून घेऊ. तू दवाखाना बघ. तिला बरे वाटले. दवाखान्यात थांबणे हीच तिची देखील प्राथमिकता होती. एकंदरीत सर्वांनीच पुढील काही दिवसांकरीता दवाखान्याची संपुर्ण जबाबदारी अलगद तिच्या खांद्यावर टाकली. रात्री दहा वाजता सारे निघून गेल्यावर ती एकटीच उरली. सकाळपासून वेगवेगळ्या मनःस्थितींमधून जात जात आता मात्र तिला थकवा आला होता. थंड पाणी तिने तोंडावर मारले. त्रास होतो थंडीमुळे तरीही त्या दिवशी मात्र त्या पाण्याच्या स्पर्शामुळे तिला खरोखरीच छान वाटले. एकाच दिवसात पार थकून गेली होती ती. आरशात स्वतः ला बघून जरा चेहेरा नीट केला व मग ती त्या आयसीयुच्या बाहेरच्या बेंचवर येऊन बसली. आतमधील वेगवेगळ्या पेशंटचा एक एक नातेवाईक तेथे बसलेला होता. पेशंट तर आतमधे औषधोपचार घेत होते परंतू त्यांची अहोरात्र काळजी करणारे काही लोक त्या बाहेरच्या बेंचवर बसले होते. त्यामधे ही देखील सामील झाली. एक मोठा प्रवास होता तिच्या नशीबी त्या बेंचवर बसण्याचा. तिला ते ठाऊक नव्हते. जराशी भुकेची जाणीव झाली म्हणून तिने सासुबाईंनी आणलेले पराठे खाण्याचा प्रयत्न केला. परंतू दवाखान्यातील एका वेगळ्या प्रकारच्या वासामुळे तिला काहीच खाता आले नाही. दोन घास खाऊन तिने डबा पुन्हा बंद करुन ठेऊन दिला. दिवसभराच्या थकव्यानंतर आणि शरीरासोबत मनही थकले असल्याने तिला झोप लागली.
रात्री दोन वाजता अचानक नर्स तिच्या पतीचे नाव घेत बाहेर आली. झोपेतूनच खाडकन दचकून ही जागी झाली. धस्स झाले तिच्या मनात. कापऱ्या आवाजात तिने विचारले, काय झाले? नर्स म्हणली ही दोन इंजेक्शन्स ताबडतोब घेऊन या खालच्या डीस्पेन्सरीतून. काहीही न सांगता ती नर्स त्या आयसीयुच्या दरवाज्या आड गुडुप झाली. काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे असे तिला वाटले. धावतच चार जिने उतरुन ती डीस्पेन्सरीत गेली. तेथून इंजेक्शन्स आणले व नंतर त्या नर्सला दिले. किलकिल्या केलेल्या दारातून ते देताना तिने धडधडत्या मनाने तिला विचारले की काय झाले? त्या नर्सने तितक्याच प्रोफेशनली तिला सांगितले, सकाळी डॉक्टर सांगतील, तुम्ही झोपा. काही लागल्यास मी तुम्हाला उठवते. दार धाडकन बंद झाले. परत मनात नाही नाही ते विचार घेत ती परत त्या बेंचवर जाऊन बसली. डोळ्यातून पाणी वाहू लागले होते. काही सुचत नव्हते. त्याक्षणी तरी ती केवळ एकटी होती. पदराचे टोक तोंडात दाबून हुंदका दडविण्याचा प्रयत्न तिने केला. तिचे तरी वय फार नव्हते. अश्या प्रकारचा कसलाही अनुभव तिला नव्हता. त्या क्षणी जवळच्या कुणाच्यातरी कुशीत शिरुन रडावे वाटत होते तिला. कसेतरी तिने स्वतःला सांभाळले. तेवढ्यात एक वयोवृद्ध हात तिच्या खांद्यावर पडला. दचकून तिने बघितले तर एक आजोबा तिच्या बाजुने बसले होते. रडू नकोस पोरी. सारे ठिक होईल, आता तुला याची सवय करावी लागेल. मी देखील तुझ्यासारखाच या बेंचवरचा प्रवासी आहे. माझी पत्नी येथे भरती आहे. गेल्या पाच दिवसांपासून मी देखील दिवसरात्र या बेंचवर बसलेला असतो. सवय कर, धीर धर. आजोबांच्या त्या प्रेमळ व सहानुभुतीच्या शब्दांनी तिला अजून रडूच कोसळले. त्यापुढे आजोबा काही बोलले नाही. त्यांनी तिला रडू दिले. कारण उद्या सकाळपासून तिच्या बाबतीत काय सुरु होणार हे त्यांना ठाऊक होते. पहाचे चारच्या सुमारास तिचा डोळा लागला.
पहाट झाली आणि पहिले भेटकरी, काका हजर झाले. काळजीपोटी ते तिच्या नवऱ्याला बघायला आले होते. आल्याबरोबर त्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. कसे झाले, काय झाले, असे कसे झाले, मला का लगेच कळविले नाही, मी असताना या दवाखान्यात का आणले, दुसरीकडे माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, येथे पैसे फार जास्त घेतात, तुम्ही लोक आम्हाला जवळचे मानत नाही असे बहुविध प्रश्न त्यांनी विचारुन तिला भंडावून सोडले. जमेल तशी उत्तरे देऊन तिने तो किल्ला लढवला. अपघातानंतर आता काही मदत हवी का या एका प्रश्नाला सोडून त्यांनी सर्व प्रश्न विचारले व नंतर मला याच भागातल्या एका ऑफीसला जायचेय असे म्हणून ते गेले. यानंतर भेटकऱ्यांनी उच्छाद मांडला. प्रत्येकाला पेशंटला भेटायचे होते, सूचना करायच्या होत्या, हिच्याकडून सगळी कथा ऐकायची होती, व स्वतःच्या ज्ञानानुसार काहीतरी नवे सुचवून जायचे होते. हा सर्व प्रकार पुढील दहा ते बारा दिवस सुरु होता. या दरम्यान नर्सचे बोलावणे, तिला चार जिने उतरुन जाऊन डीस्पेनसरीतून औषधी आणून देणे, तब्येतीबद्दल डॉक्टरांनी सांगितलेले काहीही न कळता तब्येत सुधारते आहे ही आशा टिकवून ठेवणे व त्या आयसीयु समोरील बेंचवर बसून जमेल तशी झोप घेणे व आपली ताकद टिकवून ठेवणे हे तिने जवळपास वीस दिवस केले. विसाव्या दिवशी तिच्या पतीला दवाखान्यातून सुटी मिळाली. त्याला घरी नेण्यासाठी तिचा दिर खास गाडी घेऊन आला. काही मित्र मंडळी आले. सर्वांनी तिच्या पतीचे एक फायटर म्हणून कौतुक केले. मृत्यूच्या दाढेतून परत आला होता. सासुबाईंचेही मित्र मंडळींनी कौतुक केले, घरचे सगळे त्यांनी सांभाळल्यामुळे वहिनींना इकडे पूर्ण लक्ष देता आले वगैरे. दिराने तिच्या पतीला हाताला धरुन लिफ्टमधून नेतो असे सांगितले. हिने मात्र सर्वांना पुढे जायला सांगितले व मी येतेच मागून असे म्हणून ती मागे थांबली. सारे काही शांत झाल्यागत परत एकदा त्या आयसीयु समोरच्या बेंचवर विसावली. डोके मागे टेकले. गेल्या वीस दिवसाचा त्या बेंचचा सहवास व तो प्रवास तिला आठवून गेला. अचानक आवाज आला. घे पोरी चहा घे! यावेळी तिने आजोबांचा आवाज ओळखला. गेले वीस दिवस रोजच सकाळी ते तिला हातात चहाचा कप आणून देत असत. खूप केलेस पोरी. तु जे केलंस त्याला तोड नाही. परंतू हा आयसीयुसमोरचा बेंच तसा दुर्दैवीच असतो. पेशंट बरा झाला तर त्याला फायटर म्हणून गौरविल्या जाते, घर सांभाळणाऱ्यांचे सांभाळ चांगला केला म्हणून कौतुक करण्यात येतं, परंतू या बेंचवर बसणाऱ्याकडे मात्र सारेच दुर्लक्ष करतात. काहीच न बोलता तिने आजोबांना नमस्कार केला नि एकदाच केवळ, काही क्षण त्या गेल्या वीस दिवसातील तिचा सोबती असलेल्या त्या बेंचकडे बघितले नि डोळ्यातील आसवे पुसत ती जिने उतरु लागली. या लेखाद्वारे मी तिच्या योगदानाला सलाम करतोय व माझ्या परीने एक छोटीशी पावती देतोय.
तिला व तिच्या सारखे योगदान देणाऱ्यांना आपल्याला समजून घेता येईल?
It's a real fact Sir.🙏
ReplyDeleteवास्तविकता
ReplyDelete