थोडा है थोडे की जरुरत है @30.10.18

आज सरे मम एकाकीपण!

आईच्या गर्भामधे एका छोट्याश्या बीजाच्या रुपात आपले अस्तित्व निर्माण होते. माता पित्याचा अंश बनून आपण एका अद्भुत विश्वाच्या दिशेने हळूवारपणे प्रवास करु लागतो. एक अफाट अनाकलनीय विश्व ज्याच्या उत्पतीचे अनेक वैज्ञानिक तर्क आहेत परंतू त्याच्या शाश्वत अस्तित्वाबद्दल ज्ञान अद्याप अप्राप्त आहे. या विश्वामधे आणखी एक अद्भुत गोष्ट आहे जी येथील सर्वच बाबींची दोन मुख्य गटांमधे विभागणी करते. सजीव आणि निर्जीव. सजीवाचे वेगळेपण सिद्ध करणारी चेतना ज्यास आत्मा असे नाव देण्यात आले ती देखील एक गुढ कल्पना आहे. एका प्रचंड मोठ्या उर्जा स्रोताचा एक लहानसा भाग एका जीवात प्रवेशित होऊन एक काया धारण करतो ती काया काही विशिष्ट कालावधीनंतर त्या उर्जेला पुन्हा कदाचित तिच्या मूळ स्रोताकडे जाण्यास वाट मोकळी करुन देते या प्रवेश अर्थात जन्म आणि गमन अर्थात मृत्यू या दोन विलक्षण टोकांमधे प्रत्येकाला मिळलेले जीवन ही या सबंध विश्वातील एक अभूतपूर्व घटना असते. जन्मापूर्वी मृत्यू पश्चात त्या उर्जास्रोताच्या नशिबी असलेले एकाकीपण त्या जीवनरुपी कालावधीमुळे सरुन जाते त्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या स्वरुपात भेटत राहतात ज्यामुळे जीवन तेजोमय होऊन जाते. त्या शरीरातील उर्जेला एक आकार प्राप्त होतो त्यास विस्तारायला, उंच भरारी घ्यायला एक आकाश मिळते. परंतू या विस्ताराकरीता अनेक जण कारणीभूत असतात म्हणूनच त्यांच्याप्रतीचा तो आत्यंतिक कृतार्थ भाव ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांनी एका अत्यंत सुंदर काव्यामधे मांडला आहे. जणू निशेच्या अस्तित्वाने काळोखामधे बुडून गेलेल्या अवनीस सूर्यनारायणाच्या आगमनाने एकाकीपण सरल्यागत वाटत असेल तसेच माणसाच्या आयुष्यात आईच्या उदरातून बाहेर आल्यावर या अफाट विश्वामधे घेतलेला पहिला श्वास म्हणजे त्याचे एकाकीपण संपविणाराच ठरतो तेथूनच त्याच्या तेजोमय जीवनाचा प्रवास सुरु होतो. शांताबाई लिहीतात,

आज सरे मम एकाकीपण

तेजोमय हो अवघे जीवन!

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात हे तेज म्हणजे त्याच्या जीवनाला आकार देण्याकरीता त्याच्या संपर्कात येणारे वेगवेगळे लोक होत. त्या व्यक्तीचे अस्तित्व बहरुन येण्यासाठी, त्याला वेगवेगळ्या मानसिक स्थितींमधे आधार देण्यासाठी, ठेच लागून पडल्यावर त्याला उचलण्यासाठी, त्याच्या मनातील विविध कल्पनांना दिशा देण्यासाठी, त्याच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यासाठी, त्याला मानवाचा जन्म प्राप्त झाला आहे त्यामुळे त्याचे मनुष्यत्व सिद्ध करण्यासाठी, त्याच्या जीवनाच्या विकासासाठी त्याला पावलोपावली मदत करणारे पाठबळ देणारे अनेक हात तेजोमय संजीवन बनून त्याच्या सोबत असतात. हेच शांताबाईंनी लिहीलेय,

उजळीत फुलवित चराचराला

ह्रदयी अजी रवीराज उदेला

श्रांत विकल या मम जीवाला

तेज तयाचे दे संजीवन!

या अश्या पद्धतीने अनेकांच्या सहवासाने सहकार्याने समृद्ध होणारे जीवन कायमच यशस्वीतेच्या मार्गावरुन जाते असे नाही. या त्याच्या मार्गात काही अडथळे येतात. काही अडथळे त्याचे स्वतः निर्मित असतात तर काही त्याच्या मार्गामधे अवरोध निर्माण करण्यासाठी येतात. अश्यावेळी हा तेजोमय प्रकाश दुःखाच्या तमाखाली झाकला जातो. प्रवासाची गती कमी होते. अश्या वेळी वेदना, अवहेलना किंवा उपेक्षा असल्या बाबींचा सामना करावा लागतो. या अश्या प्रसंगी काही वेळा तर हा प्रवास आता पुढे जाऊ शकेल की नाही इतपत मानसिक दुर्बलता निर्माण होते. कमी अधिक प्रमाणात असले प्रसंग सर्वांनाच सहन करावे लागतात आणि त्यावेळी परत तेच एकाकीपण डोके वर काढायला लागते. परंतू आता मात्र या सर्व वेदनादायी स्थितीत मनावर उमटलेल्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी आपल्यासोबत कुणीतरी असते त्याचे सोबत असणे ही खरी उपलब्धी ठरते. त्या सोबतीमुळे परत एकदा ते दुःखाचे तम ओसरु लागते, वेदनांनी काजळून गेलेले ह्रदय पुन्हा प्रकाशित होऊ लागते. असे झाले की आयुष्याला परत नवा बहर येतो त्याचे सुरेल गाणे होऊ लागते. शांताबाई हे फार सुरेख मांडतात,

सुवर्ण आरुण प्रकाश पसरे

ह्रदयीचे उजळले कोपरे

तम दुःखाचे अखिल ओसरे

चित्ती स्फुरले सुंदर गायन!

या असल्या वेदनांच्या दुःखाच्या प्रसंगांमधे त्या हताश जीवनाला ज्यांनी सांभाळले असते, ज्यांनी त्याच्या मनावरील दुःखाचे तम ओसरविण्यास मदत केली असते ते तर त्याच्या जीवनाचा खराखुरा आधार बनलेले असतात. त्यांच्या पासून आता कधीही वियोग होऊ नये असे त्याचे मन कायमच देवाला प्रार्थना करीत असते. अश्या व्यक्तीचा सहवास प्रेम हे त्याला शरीरबंधनाच्या पलीकडे जाऊन आत्मिक वाटू लागते. अर्थात अश्या कुण्यातरी आधारभूत ठरलेल्या व्यक्तीचे त्याच्या जीवनातील अस्तित्व, त्याला त्याच्या जीवनाला सचेतन ठेवणाऱ्या त्या उर्जास्रोताशी मिसळून गेलेले भासते त्यामुळे ते नाते किंवा तो संबंध त्याच्या जीवनाचा मुलाधार बनतो म्हणूनच त्याचे जीवनातील महत्व ओळखून त्याने कुठेही जाऊ नये तर सतत सोबत रहावे अशी अपेक्षा त्याचे मन करीत राहते. ही त्याच्या मनाची अवस्था शांताबाई फार चपखलपणे रेखाटतात,

असेच या पुढतीही देवा

वियोग अपुला कदा व्हावा

नातरी टाका तनुही जाळून

जाऊ नका परी आता येथून!

एखादे जीवन समृद्ध होण्यासाठी त्यास कितीतरी जणांचे सहकार्य लाभत असते ही आठवण शांताबाई प्रकर्षाने या कवितेत आपल्याला करुन देतात. मी माझे या उक्तीने बरेच वेळा लोक जगतात. माझे सारे माझेच आहे, मी स्वयंपूर्ण आहे, मज कुणाचीही गरज नाही, मी आत्मनिर्भर आहे अश्या पद्धतीच्या वल्गना देखील सहजच केल्या जातात. परंतू विधात्याने मुळात प्रत्येक सजीवाची निर्मीती करताना वेगवेगळ्या आधारांच्या सोबतीनेच त्याला जगणे भाग पडावे अशी केली आहे. त्याच्या अस्तित्वाच्या पहिल्या अणूच्या निर्मीतीसाठी त्याच्या आई वडीलांच्या आवश्यकतेपासून तो त्याच्या जीवित अस्तित्वाच्या शेवटच्या हुंकारापर्यंत कायम त्याला कुणावरतरी अवलंबून रहावे लागणार हीच परमेश्वराची योजना आहे. दोन एकाकीपणांमधील सर्वांच्या सहकार्याने उजळून निघणाऱ्या जीवनात या सर्वांप्रती ऋणनिर्देश करण्याचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा निदान एक दिवस ठरवावा. त्याकरीता आपला जन्मदिवस हा फारच योग्य राहू शकतो कारण त्याच दिवशी आपले एकाकीपण सरुन आपले जीवन अनेकांच्या मदतीने तेजोमय होण्याची सुरुवात झाली असते. त्या सर्वांना या दिवशी मनापासून सांगणे असते, माझ्या जीवनाला तुम्हा सर्वांच्या प्रेमाचा सहकार्याचा जो भरभक्कम आधार लाभलाय ते माझे पूर्वसंचित आहे ते कायम माझ्या सोबत रहावे, तुम्ही साऱ्यांनी मला सांभाळत रहावे आपला स्नेह असाच कायम वृद्धींगत व्हावा, कारण तुमचे माझ्या जीवनातील अस्तित्व हेच तर खरे संजीवन आहे.. तेच माझे एकाकीपण संपविणारे तेज आहे! केवळ ते आहे, म्हणूनच मी आहे!!






Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18