थोडा है थोडे की जरुरत है@16.10.18

नवी भाषा आलीय..

माझ्या आचार्य पदवीच्या अभ्यासादरम्यानची गोष्ट. माझे मार्गदर्शक परतवाड्याच्या जगदंबा महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जनार्दन कुरुप हे मुळचे केरळातील कायनकुलम या गावाचे रहिवाशी होते. मी त्यांच्या मार्गदर्शनात आचार्य पदवीचा अभ्यास करण्याचे ठरविले परंतू सुरुवातीच्या दोन वर्षांमधे माझा काही कारणांमुळे अभ्यास होऊ शकला नाही. दरम्यान माझे मार्गदर्शक डॉ. कुरुप यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन त्यांच्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. मार्गदर्शक बदलवायचे नव्हतेच त्यामुळे मी त्यांच्या केरळातील गावाला जाऊन आचार्य पदवीचा अभ्यास करण्याचे ठरविले. मी मधून मधून त्यांच्या गावी जायचो. अत्यंत सह्रदयी असलेले माझे मार्गदर्शक मला त्यांच्या घरीच थांबवून घ्यायचे. परंतू कधी कधी मी जरा आसपास भटकायला जायचो. तसे ते कायानकुलम नावाचे गाव छोटेच होते. एकदा मी रात्रीच्या वेळी एका छोट्याश्या बस स्टॉपवर उभा होतो एका ठिकाणाहून मला परत घरी यायचे होते. अडचण अशी झाली की माझ्या आसपास उभ्या असलेल्या मोजक्याच प्रवाश्यांपैकी कुणालाही हिंदी भाषा देखील येत नव्हती. ते सर्व मल्याळम मधे बोलत होते. त्यांना मी मला कुठे जायचे आहे ते सांगण्याचा बस कोणती पकडावी हे विचारण्याचा असे माझे दोन्हीही प्रयत्न असफल ठरले होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर मला यश मिळाले मी माझ्या नियोजित ठिकाणी पोहोचू शकलो. परंतू त्या पंधरा ते वीस मिनीटाच्या कालावधीत मी स्वतःला त्या लोकांमधे त्रयस्थ वाटत होतो. असे वाटण्याचे माझ्या मते सर्वात महत्वाचे कारण होते, भाषा. माणसाला माणसाशी जोडून ठेवणारे सर्वात महत्वाचे माध्यम, भाषा. तीच वेगवेगळी असल्याने संवाद होत नव्हता. संवाद नसल्यामुळे त्यांना मी त्यांचा वाटत नव्हतो मी देखील अवघडलेला होतो. भाषा जर वेगळी असेल तर आपल्याला अवघडल्यासारखे होणारच आणि त्या समुहाचा मी सदस्य नाही ही खंत मनामधे उमटत राहणार. परंतू ही अशी माझी स्थिती माझ्या घरापासून खूप दूरवरच्या एका दुसऱ्या राज्यात झाली तर नवल नसावे. त्यातही त्या मंडळींचा दोष नव्हताच. त्यांच्या प्रदेशात गेल्यावर मला त्यांची भाषा यायला हवी होतीच. मी ते करु शकलो नाही त्यामुळे दोष माझाच होता असे मी मानतो. परंतू ही अशी अवघडलेली अवस्था आपल्याच प्रदेशात, नव्हे आपल्याच घरात आपल्याच परीवारातील काही मंडळींच्या सहवासात होत असेल तर त्याला काय म्हणावे

होय! मी अशी परकेपणाची भावना माझ्या मनात निर्माण करणारी अवस्था माझ्या घरात बसून अनुभवली. आपणास आश्चर्य वाटत असेल परंतू मी या गोष्टीचा उलगडा केल्यावर मला खात्री आहे की आपल्यापैकीही बऱ्याच मंडळींनी ती अनुभवलेली असणार त्या भावनेची आठवण आपल्याला होईलच. परंतू अडचण हिच होतेय की ही परकेपणाची भावना दूर करण्यासाठी मात्र आपले प्रयत्न दिवसेंदिवस कमी पडत आहेत आणि या भावनेला वृद्धींगत करणारे प्रयत्न बलशाली होत आहेत. वेळ हातातून निघून जाण्याआधी आपण त्वरेने काहीतरी करायला हवे. आपल्याच मंडळींमधे परके असल्याची भावना वेदनादायी असते. ज्या मंडळींच्या सहवासात मला ही भावना सहन करावी लागली ती मंडळी म्हणजे, माझ्या मोठ्या नातेवाईक परीवारातील नव्या पिढीची पोरे.

जवळपास एकाच वयाचे म्हणजे वय वर्षे १२ ते २० या वयोगटातील सहा पोरे माझ्या घरी एकत्रीत बसली होती. पोरांसोबत संवाद साधण्याची मला नेहेमीच इच्छा असल्याने मी त्यांच्यासह बसलो होतो. बोलणे सुरु होते थोड्या वेळाने मी त्यांच्या समुहापासून हळूहळू दूर जाऊ लागलो. याचे कारण ते बोलत असलेली भाषा. म्हणजे ती सारे पोरे मराठी भाषाच बोलत होती परंतू त्यांच्या चर्चेच्या विषयातील अनेक शब्द ते विषय मला माहितच नव्हते. ते आपसात बोलत असताना सर्वजण छान एकत्रीतपणे संवाद साधत होते कारण त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्या शब्दांचे अर्थ माहीत होते. मी मात्र त्या सर्व प्रकारात स्वतःलाच संपुर्णपणे वेगळा परका भासू लागलो. एका विषयाचा आचार्य पदवी धारक, अध्यापनाचा पंधरा वर्षाचा अनुभव, साडेसहा वर्षांचा प्रशासनाचा अनुभव, वगैरे वगैरे सारे काही असूनही त्या छोट्या पोरांच्या समुहामधे ती पोरे असे काही बोलत होती जे मला माहितच नव्हते. त्याक्षणी माझ्या केलेल्या अभ्यासाच्या प्रक्रीयेमधे बराच अभ्यास व्हायचा आहे, माहिती घ्यायची आहे सर्वात महत्वाचे म्हणजे नव्या पिढीसोबत संवाद ठेवायचा असेल तर तो नव्या दमाने करावा लागेल याची मला तीव्रतेने जाणिव झाली.

पोरांचे बोलणे हळूच काही पात्रांच्या नावांवरुन माझ्यापासून दूर गेले. यात वोल्डमॉर्ट, डंबलडोर, स्नेप, हरमाईनी, हॅग्रीड, रॉन, मॅगगॉनल या नावांसोबत काही अजून गोष्टी जसे क्विडीच, वॅन्ड, हॉगवर्ड्स, डेथली हॉलोज, ग्रीफीन डॉर, स्लीदरीन, हपलपफ, रेवेन क्लॉ ज्या मला ठाऊकच नव्हत्या. मला खात्री आहे की वाचकांपैकी बहुतांश लोकांना देखील हे काहीही ठाऊक नसणार. परंतू आपल्या घरातील साधारण दहा ते पंधरा वर्ष वयोगटाच्या कोणत्याही मुलाला किंवा मुलीला याबद्दल विचारा ते यापैकी प्रत्येक गोष्ट तपशीलवार आपल्याला समजावून सांगतील त्यांना हे सारे कधी कळले याचे आपण आश्चर्य करत बसू. हॅरी पॉटर नावाच्या अत्यंत गाजलेल्या कादंबरी खंडांमधील ही सारी नावे आहेत. यापैकी काहीच ठाऊक नसल्याने किंवा जुजबी माहिती असल्याने मी हळूच मनाने त्या समुहापासून दूर झालो. गोष्ट तेवढ्यावर थांबली नाही. त्यानंतर सध्या पोरांमधे फार प्रसिद्ध असलेल्या वेगवेगळ्या टेलीव्हिजन सिरीजवर या सर्वांचे बोलणे सुरु झाले. त्यात फ्रेंड्स नावाची मालिका, त्यासोबत नव्याने सुरु झालेली शेरलॉक होम्स ही मालिका, त्यांचे वेगवेगळे सिझन्स या संदर्भात चर्चा सुरु झाली. प्रत्येकजण हिरीरीने त्यात सहभागी होत होता, बोलत होता आणि मी मात्र त्या प्रत्येक सिझनच्या चर्चेसोबत त्यांच्यापासून दूर जात होतो. मला त्यापैकी फार कमी बाबी माहित होत्या. जुन्या काळी आर्थर कानन डायलच्या शेरलॉक होम्सच्या पुस्तकांचे ज्ञान अपुरे पडत होते कारण हे सारे नव्याने निर्माण केलेले वेगळेच काहीतरी होते. एकंदरीत काय, ही नवी पिढी अशी काही भाषा बोलत होती की मी त्यांच्या समुहापासून इच्छा असूनही दूर फेकला गेलो. त्यांनी मला दूर केले नाही परंतू संवाद करु शकल्याने त्यांचे विषय मला समजल्याने मीच अवघडून गेलो. केरळातील त्या छोट्या गावी देखील माझाच दोष होता आणि येथेही माझाच आहे हे मला मान्य करावे लागले. काही क्षण ही पोरे काय फालतू बोलतात, त्यांनी आपल्या संस्कृतीचे वाचायला हवे वगैरे सारखे ठराविक संवाद माझ्या मनात आले परंतू ते फार उपयोगाचे नव्हते. या पिढीत माझ्यात पडलेल्या दिवसागणिक वाढत जाणाऱ्या अंतराला कमी करण्यासाठी मलाच पुढाकार घेण्याची गरज होती. ती नवी भाषा शिकायला हवी होती.

नव्या पिढीने आपल्याला आवडतात ती ऐतिहासिक किंवा सामाजिक आदर्श समजून घ्यावे असे आपल्याला मनापासून वाटत असेल तर आपल्याला त्यांची नवी भाषा शिकावी लागणार आहे. त्यांच्या भाषेत रुळून त्यांना आपण आपले वाटेल असे काहीतरी आपल्याला बोलावे लागेल. त्यानंतर ते आपल्याला त्यांच्या वर्तुळात जरा तरी प्रवेश देतील. त्यामुळेच आपला संवाद वाढेल त्यानंतरच आपल्याला हवे तसे आदर्श त्यांना समजावता येतील. ते सांगताना देखील आपल्या मनातले पूर्वग्रह किंवा दुषित हेतू आपल्याला दूर ठेवावे लागतील नव्या पिढीला रुचेल त्याच भाषेत त्यांना सांगावे लागतील. तरच आपल्याला वाटते तसे होईल अन्यथा आपल्या आणि नव्या पिढीमधले अंतर इतके वाढेल की आपला आवाजही त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही.. हे होऊ नये म्हणून ही पोरांची नवी भाषा शिकुयात




 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.06.21

थोडा है थोडे की जरुरत है @ 10.12.19